Saturday, June 29, 2013

बिनतारी संदेशवहन (उत्तरार्ध)

सागरी प्रवासाप्रमाणेच हवाई प्रवासातसुध्दा कोणालाही कसलाही निरोप पाठवण्यासाठी बिनतारी संदेश हाच एक मार्ग असतो. आकाशामधून विमानतळावर विमान उतरवण्यासाठी तिथल्या यंत्रणेला तयार रहायला सांगणे आवश्यक असते. विमानांची संख्या वाढत गेल्यानंतर विमानतळावरील रहदारीचे नियंत्रण करण्याची गरज पडू लागली आणि आता तर कुठलेही विमान एकाद्या विमानतळाजवळ आले की त्याने आभाळातसुध्दा कशा घिरट्या घालायच्या हे ग्राउंड कंट्रोलवालेच ठरवतात आणि तसे आदेश वैमानिकाला देत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मुंबईचे विमानतळ पाहिले तेंव्हा तिथल्या मैदानात फिरत असलेले काही गणवेशधारी लोक हातात धरलेले एक उपकरण कानाला लावून सारखे काही तरी बोलतांना दिसले. त्यांच्याकडे असलेला वॉकीटॉकी सेट मी त्यावेळी पहिल्यांदा पाहिला. तोपर्यंत मी साध्या टेलिफोनवरसुध्दा कोणाशी कधी बोललेलो नव्हतो. त्यामुळे विमानतळावरल्या लोकांकडचे अजब उपकरण पाहून माझ्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. आताचा मुठीत मावणारा चिमुकला सेल फोन आणि अँटेनाची लांब शेंडी असलेला त्या काळातला हातभर लांबीचा वॉकीटॉकी सेट यांची मनातल्या मनात तुलना करतांना हसू येते.

बिनतारी संदेशवहनाचा भरपूर उपयोग सैन्यदलामध्ये केला जातो. सीमेवरील सैनिकांना मागे असलेल्या छावणीशी तसेच एकमेकांशी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. दर इतक्या लढवय्यांमागे एक संपर्क साधणारा असे काही प्रमाण ठरवले जाते आणि तितके सिग्नलमेन ठेवले जातात. याचा सराव करण्यासाठी शहरात असतांनासुध्दा वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग केला जातो. मागे काही काळासाठी आमच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एक लश्कराची छावणी ठेवली होती. त्या काळात दिवसरात्र अधून मधून आमच्या टीव्हीवर अचानक एक प्रकारची खरखर सुरू होत असे आणि काही काळ ती चालत असे. टीव्हीच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून त्यात काही बिघाड सापडला नाही. शेजारीपाजारी चौकशी करता त्यांनासुध्दा असाच अनुभव येत होता. त्या वेळी आकाशसुध्दा निरभ्र असायचे. त्यामुळे हा डिस्टर्बन्स कुठून येतो ते काही समजत नव्हते. पुढे ती छावणी उठली आणि हा प्रॉब्लेमही नाहीसा झाला, तेंव्हा त्याचे कारण लक्षात आले. 

युरोपच्या सफरीमधल्या व्हॅटिकन सिटीमध्ये आम्ही फिरत होतो त्या वेळी त्या भागात निरनिराळ्या देशांमधल्या पर्यटकांचे निदान शंभर तरी घोळके फिरत होते आणि त्यांचे एकमेकांमध्ये थोडे मिसळणे अपरिहार्य होते. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला कानावर बसवायचे एक उपकरण (हेडफोन) दिले होते आणि आमचा गाईड प्रत्येक ठिकाणची माहिती आणि पुढे जाण्याच्या सूचना त्यावर देत होता. यामुळे प्रत्येकाला सगळी माहिती चांगली ऐकू येत होती आणि एकत्र राहण्याला मदत मिळत होती. युरोपअमेरिकेतल्या काही ठिकाणी तिथली स्थळे किंवा त्यांवरील प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला एक बिनतारी हेडफोन दिला होता आणि आपल्याला हव्या असलेल्या भाषेमधली कॉमेंटरी त्यातून ऐकण्याची सोय होती.

मी एकदा कोलकात्याच्या उपनगरातल्या एका कारखान्यात गेलो होतो, त्या काळात तिथली दूरध्वनिसेवा इतकी खराब आणि बेभरंवशाची होती की त्या कंपनीने कारखाना आणि हेड ऑफीस यांच्या दरम्यान थेट संपर्क साधण्यासाठी खासगी वायरलेस सेट बसवला होता. आमच्या ऑफीसातही बिनतारी संपर्कयंत्र बसवले  होते. भारतातल्या दूरवरच्या दुर्गम भागांमध्ये असलेल्या आमच्या प्लँट्स आणि प्रॉजेक्टसाइट्सवर काम करणा-या सहका-यांशी आम्ही त्यावर संभाषण करत असू. एसटीडीची सेवा सगळीकडे उपलब्ध होण्यापूर्वीच्या त्या काळात तेवढा एकच मार्ग आम्हाला उपलब्ध होता. पण हे वायरलेसवरले बोलणे सोपे नसायचे. टेलीफोनप्रमाणे त्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी संदेश पाठवले जात नसत. आपण एक वाक्य बोलून 'ओव्हर' असे म्हणायचे आणि एक बटन दाबून धरायचे, त्यानंतर पलीकडचा माणूस उत्तर देऊन 'ओव्हर' म्हणेल तेंव्हा ते बटन सोडून दुसरे दाबायचे आणि पुढले वाक्य बोलायचे अशी थोडी कसरत करावी लागत असे. त्यातसुध्दा खराब हवामान, सूर्यावरली चुंबकीय वादळे वगैरेंमुळे खूप डिस्टर्बन्स येत असे. आणि त्या सगळ्यावर मात करून आपले काम झाल्याचे समाधान मिळवायचे असे.

अनेक वर्षांपासून अशा प्रकारे विशिष्ट कारणांसाठी वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग होत होता. त्याच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली आणि तो उपयोग वाढत गेला. सुरुवातीला बरीच वर्षे मुंबईमध्ये फक्त स्थानिक दूरदर्शन दिसत असे. निरनिराळी केंद्रे बिनतारी यंत्रणांमधून एकमेकांशी जोडली गेली आणि मल्टिचॅनल टीव्ही सुरू झाला. पूर्वीच्या काळच्या वर्तमानपत्रांच्या निरनिराळ्या गावामधील वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या टेलिप्रिँटरमधून मुख्य कार्यालयाकडे जात असत आणि आणि दूरदेशीची छायाचित्रे रेडिओफोटोद्वारे तिकडे येऊन ती छापून येत असत. वृत्तपत्रीय क्षेत्रामधल्या संदेशवहनामध्ये काळानुसार सतत वाढ होत गेली. आता तर एकेका वर्तमानपत्रातला सगळाच मजकूर बिनतारी यंत्रणांमार्फत ठिकठिराणी पाठवला जातो आणि ठिकठिकाणच्या स्थानिक आवृत्यांमध्ये त्या ठिकाणच्या छापखान्यांमध्येच छापला जातो. अनेक वर्षे अस्तित्वात असलेली स्थानिक आवृत्ती आणि डाक एडिशन अशा निरनिराळ्या आवृत्या आता सहसा कुठे दिसत नाहीत.

गेल्या काही दशकांमध्ये अंतराळविज्ञानामधले (स्पेस सायन्स) संशोधन आणि बिनतारी संदेशवहन यांनी हातात हात धरून एकमेकांच्या आधाराने प्रचंड प्रगती केली. अग्निबाण (रॉकेट) उडवण्याचा एकादा शास्त्रीय प्रयोग केल्यापासून कुठल्याही क्षणी तो आकाशात किती उंचावर आणि नेमक्या कोणत्या जागी आहे आणि किती वेगाने कोणत्या दिशेने पुढे जात आहे वगैरे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्या रॉकेटसोबतच अत्यंत प्रभावी आणि वेगवान असे प्रक्षेपक (ट्रान्मिटर्स) पाठवणे, तसेच त्यांनी पाठवलेली माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील अशी अनेक उपकरणे जमीनीवर जय्यत तयार असणे आवश्यक असते. हा अग्निबाण वातावरणानधून वेगाने वर झेपावत असतांनाच आजूबाजूच्या वातावरणाची माहिती गोळा करून पाठवणारी उपकरणेसुध्दा त्याच्यासोबत पाठवली जातात. हे रॉकेट पृथ्वीपासून दूर जात असतांना सभोवतालच्या वातावरणामधला हवेचा दाब आणि तपमान कमी होत जाते, पण अग्निबाणाच्या उडण्याच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड धग, तसेच हवेच्या घर्षणामुळे निर्माण होणारी ऊष्णता यांचाही परिणाम त्या रॉकेटसोबत पाठवलेल्या प्रत्येक उपकरणावर होत असतो. अशा प्रकारे त्यांना अत्यंत कठोर परिस्थितींमध्ये तग धरून कार्य करत रहायचे असते. यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू खास प्रकारच्या पदार्थापासून तयार करावी लागते. अमेरिकेतली नासा आणि रशियामधली तत्सम संस्था यांनी अब्जावधी डॉलर्स किंवा रुबेल्स खर्च करून जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन करवले आणि त्यामधून अनेक नवनवीन मिश्रधातू तसेच मानवनिर्मित पदार्थ तयार करवून घेतले. या संशोधनामधून शिकत आणि नवनवे प्रयोग करून सुधारणा करत खूप लांब पल्ल्याची मोठमोठी रॉकेट्स तयार केली गेली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून दूर निघून जाणारे अग्निबाण उडवण्याची किमया साध्य झाल्यानंतर पृथ्वीसभोवती घिरट्या घालत राहणारे कृत्रिम उपग्रह तयार करून अशा रॉकेट्सच्या सहाय्याने त्यांना अवकाशात धाडण्यात आले.

अवकाशसंशोधनाच्या बदलत जाणा-या तंत्रज्ञानासोबत संदेशवहनातही अद्ययावत सुधारणा करून अंतरिक्षात भ्रमण करणा-या उपग्रहांबरोबर सतत संपर्क ठेवणेही अगत्याचे होते. त्यासाठी उपग्रहावर कुशल आणि विश्वासार्ह असे प्रक्षेपक ठेवले गेले, तसेच त्यांना चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशातून मिळवण्याची सोय केली गेली. सुरुवातीला शास्त्रज्ञांच्या गरजेसाठी तयार झालेल्या या तंत्रज्ञानाचा सामान्य जनतेला कसा लाभ होऊ शकेल याचाही विचार करण्यात आला. त्यासाठी जास्तीचे वेगळे ट्रान्स्मिटर्स व रिसीव्हर्स उपग्रहावर बसवून ते जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले. टेलिव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट यासारख्या सेवांसाठी आवश्यक असलेले संदेशवहन त्यामधून करता येऊ लागले. या संदेशांच्या लहरी सरळ रेषेमध्ये प्रवास करत असल्यामुळे आणि पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे जमीनीवर त्या फार जास्त अंतरावर जात नाहीत, पण उपग्रहावरून पृथ्वीचा मोठा भाग सरळ रेषेत येत असल्यामुळे ते प्रसारण खूप मोठ्या प्रदेशात पसरले जाते. या कारणामुळे उपग्रहामार्फत होणारे संदेशवहन अनेकपटीने प्रभावशाली ठरले. अर्थातच हे सगळे पूर्णपणे बिनतारी असते.

अग्निबाण आणि उपग्रह यांत वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू आकाराने आणि वजनाने लहानात लहान असणे अत्यंत आवश्यक असते. या दृष्टीने संशोधन करून प्रत्येक उपकरणामधला प्रत्येक भाग किती सूक्ष्म करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मिनिएचरायझेशनमुळे इलेक्ट्रॉलिक्सच्या बाबतीत कल्पनातीत फरक पडले. व्हॉल्व्ह्सच्या जागी सेमिकंडक्टर्स, त्यांच्या अनेक एलेमेंट्सना जोडणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, अनेक पीसीबी मिळून इंटिग्रेटेड सर्किट्स वगैरे पाय-या एकामागोमाग पार करून अत्यंत सक्षम पण आकाराने चिमुकली उपकरणे तयार होत गेली. हाताच्या मुठीत मावतील एवढे लहान पण अनेक कामे करू शकणारे सेलफोन हे याचे उदाहरण आहे. गंमत म्हणजे या प्रगतीबरोबर नवनव्या उपकरणांच्या किंमतीही कमी कमी होत गेल्या. वाढत्या महागाईच्या काळात हा एकमेव अपवाद म्हणता येईल.

सेलफोन आल्यानंतर तर संदेशवहनात क्रांतिकारक बदल झाले. आज आपल्याला घरात, ऑफिसात, रस्त्यात किंवा जिथे कुठे असू तिथून सातासमुद्रापलीकडे असलेल्या व्यक्तीशी बोलता येते, तसेच लेखी निरोप पाठवता येतात, चित्रेसुध्दा पाठवता येत असल्यामुळे आपण त्याच्या चेह-यावरले भाव पाहू शकतो. महाभारतातल्या संजयाला या प्रकारच्या दिव्य शक्तीचे एकतर्फी वरदान मिळाले होते, तो फक्त दूरचे पाहू किंवा ऐकू शकत होता, इतर अनेक ऋषीमुनिवर्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होते असे सांगतात. पण आजच्या तंत्रज्ञानाने सर्वसामान्य मर्त्य मानवांना कसलीही तपश्चर्या न करता हे प्राप्त झाले आहे. कोणत्याही खास सोयी म्हणजे एका काळी फक्त अतिविशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असायची. आता इतक्या चांगल्या सोयी कुणाच्याही खिशाला परवडणा-या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत.  बिनतारी संदेशवहनाने आता आपले जग लहान झाल्यासारखे, जवळ आल्यासारखे वाटायला लागले आहे.


.  . . . . . .  . . . . . .. . . .. . . ...  (समाप्त) 

No comments: