Monday, May 20, 2013

बाहुलाबाहुलीचे लग्न - भाग २


बाहुलाबाहुलीचे लग्न ज्या घरासमोरील मांडवात होणार होते त्याच्या शेजारच्या घरात आम्ही उतरलो होतो. अक्षयतृतियेच्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो तिथल्या दिवाणखान्यात हनुमानाचा एक मोठा पोस्टर ऊभा करून ठेवलेला होता. हे मारुतीराया असे अचानकपणे इथे कशासाठी प्रकट झाले हे मला त्यावेळी समजले नाही. नऊ सव्वानऊ वाजण्याच्या सुमाराला परगावाहून आलेली पाहुणे मंडळी हळू हळू मांडवात जाऊ लागली आणि तिथे मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न.होत राहिली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून गौरीसारख्या छान सजलेल्या गावातल्या गोड बालिकाही आपापल्या मातामाउलींच्यासह तिथे यायला लागल्या. मांडवातल्या प्रेक्षकांमध्ये मुख्यतः स्त्रीवर्गाचा भरणा होता. त्यामुळे बोटांवर मोजता येण्याइतके पुरुष एका बाजूला जरा मागच्या रांगांमध्ये जाऊन बसले. मुलींची पुरेशी गणसंख्या झाल्यानंतर त्यातला एक गट आणि जमलेली दोन चार मुले मिळून तो ग्रुप नवरा मुलगा बनवलेल्या बाहुल्याला घेऊन शेजारच्या घरापर्यंत मिरवत गेला आणि नवरदेवाला मारुतीचे दर्शन घडवून पुन्हा वाजत गाजत परत आला. मुलींचा दुसरा गट हातात तबके घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सिध्द होऊन उभा होता. देवदर्शन करून 'बाराती' परत येताच त्यांनी पंचारती ओवाळून त्यांचे स्वागत केले.

मांडवाच्या मधोमध एका मोठ्या टेबलावर गालिचा अंथरून आणि त्याच्या चहूबाजूला खांब उभे करून लग्नसोहळ्यासाठी सुरेख मंच तयार केला होता आणि त्याला पताका, माळा वगैरेंनी छान सुशोभित केला होता. नवरदेव भावल्याला त्यावर एका बाजूला उभा करून त्याच्या समोर अंतरपाट धरला गेला. नुकतीच मुंज झालेले दोन बटू धोतरे नेसून आणि उपरणे पांघरून भटजीच्या वेषात तयार होऊन आले होते. त्या टेबलाच्या दोन बाजूंना ते उभे राहिले आणि त्यांनी अंतरपाट हातात धरला. मुलींचा एक गट नवरी मुलगी म्हणून सजवलेल्या भावलीला घेऊन आला आणि तिला अंतरपाटाच्या दुस-या बाजूला उभी केली. त्या मांडवात आदल्या दिवशी झालेल्या मुंजीसाठी आलेले खरोखरचे गुरूजीसुध्दा तरुण आणि रसिक होते. त्यांनी पुढे येऊन "स्वस्तिश्रीगणनायकम्" वगैरे म्हणून मंगलाष्टकांची सुरुवात करून दिली.

त्यानंतर एका मुलीने तिच्या सुरेल आवाजात मंगलाष्टक गायला सुरुवात केली. तिथल्या एका संगीतप्रवीण बाईंनी त्याला साजेशी अशी खूप मधुर चाल लावली होती. ती चाल 'गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या मीटरवर असल्यामुळे त्यासाठी मंगलाष्टकांच्या शब्दरचनेमध्ये थोडे बदल केले होते. पेटीच्या साथीवर ते गाणे गाण्याची चांगली प्रॅक्टिसही करून घेतली होती. त्यानुसार त्यांनी पेटीवर साथ केली आणि त्या मुलीने संपूर्ण मंगलाष्टक व्यवस्थितपणे म्हंटले. रिहर्सल ऐकून इतर मुलींनासुध्दा ते पाठ झाले असावे, कारण त्यासुध्दा दबलेल्या सुरात साथ देत होत्या. लग्नसमारंभाला जमलेल्या सर्व मंडळींनी गोंगाट न करता शांतता राखली आणि संपूर्ण मंगलाष्टक ऐकून घेतले असे मी या वेळी पहिल्यांदाच पाहिले. पुन्हा गुरूजींनी पुढे येऊन ''तदेव लग्नम्'' वगैरे म्हणून झाल्यानंतर वधूवरांनी गळ्यात माळा घालायचा कार्यक्रम झाला. हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे या वेळी नव-या मुलाला उचलून धरण्याचा प्रघात पडू लागला आहे. एका बाजूने भावला आणि दुस-या बाजूने भावली यांना शक्य तितके उचलून झाल्यानंतर अखेर 'वाजवा रे वाजवा' झाले. दोन्ही भावल्यांच्या वतीने दोन मुलींनी वरमाला घातल्या. त्यानंतर नवरानवरींना म्हणजे त्या बाहुल्यांच्या जोडप्याला मंचावर एकत्र उभे करून ठेवले. या सोहळ्यासाठी बाहुल्यांची खास जोडी शोधून आणली होती. त्यांचे पेहराव, अलंकार, चेहे-यावरील भाव वगैरे सगळेच अफलातून होते.

थोड्या वेळाने 'विहिणींची पंगत' जेवायला बसली. त्यात सर्व बच्चे कंपनीला अमोरासमोर दोन रांगांमध्ये बसवून खाऊ घातले. सकाळचे दहा सव्वादहाच वाजले असल्यामुळे दोन तीन निवडक मुख्य पदार्थांचा 'ब्रंच' आयोजित केला होता. माइकवर 'अग्गोबाई ढग्गोबाई', 'मी बाबांचा ढापला फोन', 'नक्को ताई रुसू' यासारखी बालगीते लावली होती. 'विहिणबाई विहीणबाई चला आता उठा, स्वैपाकाचा तुम्ही तर केला चट्टामट्टा' या गाण्याचा गंमत म्हणून उल्लेख केला गेला, पण ''तिकडे लक्ष न देता सर्वांनी सावकाश मनसोक्त जेवावे, हवे असतील ते पदार्थ वाटेल तेवढे मागून घ्यावेत'' अशी सूचनाही केली गेली. अर्थातच मुले या वातावरणात तेच करणार याची सर्वांना खात्री होती. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात सगळा कार्यक्रम चालला होता. लग्नासाठी सुरेख रुखवत मांडून ठेवलेले होते. त्यात लहान लहान सोफासेट, पलंग, कपाटे वगैरे फर्निचर होतेच, रेफ्रिजरेटर, गॅस, कुकर, फूड प्रोसेसर वगैरे स्वयंपाकघरातल्या वस्तूही होत्या. आजकाल बहुतेक लहान मुलींच्या खेळामध्ये असल्या गोष्टी बहुधा असतातच. थोड्या चांगल्या क्वालिटीच्या नव्या वस्तू घेऊन त्या रुखवतात मांडल्या होत्या. शिवाय पिटुकल्या आकाराचे फराळाचे पदार्थ वगैरे सजवून ठेवले होते. मुलांना जेवायला वाढून झाल्यानंतर मोठ्या लोकांनाही डिशेस भरून दिल्या गेल्या आणि सावकाशपणे गप्पा मारत सर्वांनी त्याचा चवीने उपभोग घेतला.  

जमलेल्या मुलामुलींनी यजमानीण मुलींना भेटवस्तूंचा आहेर केला. त्यांनीही सुरेख 'रिटर्न गिफ्ट्स' आणून ठेवलेले होतेच ते सर्वांना वाटले. त्या सगळ्यांचे तोंडभर कौतुक झाले. ज्यांच्या बरोबर लहान मुले आलेली नव्हती अशा मोठ्या लोकांनी पण स्निग्धा आणि गिरिजा यांच्यासाठी काही ना काही आणले होतेच. व्यवस्थितपणे आखणी आणि त्यानुसार तयारी करून एक मजेदार 'इव्हेंट' सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल सगळ्यांनी मेधाची पाठ थोपटली आणि एक वेगळा अनुभव घेऊन ते परतले, 



No comments: