दोन महिन्यांपूर्वी अचानक मेधाचा मेसेज आला, "आम्ही स्निग्धाच्या भावलाभावलींच्या (लुटुपुटीच्या) लग्नाचा समारंभ करणार आहोत, त्यासाठी तुम्ही मंगलाष्टके लिहून द्याल का?" असे तिने त्यात विचारले होते. माझ्या लहानपणी म्हणजे मी शाळेत शिकत असतांना आमच्या घरातल्या एका लग्नसमारंभासाठी कामचलाऊ मंगलाष्टके तयार केली होती. थोडी गंमत, थोडी हौस आणि थोडी शाबासकी मिळवण्याची इच्छा त्याच्या मुळाशी होती. पण त्यामुळे 'मंगलाष्टकवाला' असा शिक्का माझ्या नावावर बसला आणि त्यानंतर आमच्या घरात जितकी मंगलकार्ये झाली त्यातल्या बहुतेक वेळी मंगलाष्टकाचे 'काम' माझ्यावर सोपवले गेले. लग्न झाल्यानंतर माझ्याबद्दलची ही 'कीर्ती' माझ्या सासुरवाडीपर्यंत जाऊन पोचली आणि तिकडच्या मंगलकार्यांसाठी पण मला अधून मधून 'विनंत्या' येऊ लागल्या. मलाही त्यात मजा वाटत असल्यामुळे मीही त्यांना मान देत गेलो. हे सगळे गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून चालत आले आहे. त्यामुळे माझे भाऊ बहिणी आणि मेहुणेमेहुण्यांपासून ते त्यांच्या मुलाबाळांपर्यत अनेकांच्या लग्नात म्हणण्यासाठी मी मंगलाष्टके (खरे तर मंगलपंचके) करून दिली. पण आता त्यांच्या मुलींच्या बाहुलाबाहुल्या म्हणजे आणखी दोन पिढ्या पुढच्या झाल्या. त्यांच्यासाठी काय योग्य होईल हा एक प्रश्नच होता. याबद्दल मेधाशीच बोलून घ्यायचे ठरवले.
तिने याबद्दल जास्त खोलवर विचारच केला नव्हता असे तिच्या बोलण्यातून दिसले. लग्न लावण्यासाठी मंगलाष्टके 'लागतात' आणि तिच्या लग्नातली मंगलाष्टके मीच करून दिली असल्यामुळे ती माझ्याकडून मिळू शकतात एवढे तिला ठाऊक होते. मी 'नाही' म्हंटले असते तर तिने आणखी कोणाला विचारले असते. मलाही हे काम थोडे इंटरेस्टिंग वाटले होते. पण होकार देऊन ते काम सुरू करण्यापूर्वी निदान त्याची चौकट तरी ठरवून घेणे आवश्यक होते. त्या बाबतीत मेधाने मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले.
आपल्याकडची परंपरागत मंगलाष्टके 'शार्दूलविक्रीडित' या थोड्या अवघड वृत्तात असतात. यातले 'याकुंदेंदुतुषारहारधवला' यासारखे संस्कृत भाषेमधले श्लोक छोटी स्निग्धा अस्खलितपणे म्हणून दाखवते हे मला माहीत होते. मी स्वतः तिच्या वयाचा असतांना मलाही ते अवगत होते, पण तेंव्हा त्यातील एका शब्दाचाही अर्थ समजत नव्हता किंवा त्याला काही अर्थ असतो याचादेखील त्यावेळी कदाचित पत्ता नसावा. प्रत्यक्षातल्या लग्नसमारंभांमधल्या मंगलाष्टकांबद्दलसुध्दा बहुतेक वेळा हेच होत असते. ती लक्षपूर्वक ऐकून त्यातल्या शब्दांचा अर्थ किंवा त्यातला भाव समजून घेण्याच्या मूडमध्ये त्या वेळी कोणीही नसतो. असे असले तरी या लहान मुलांच्या कार्यक्रमात मात्र त्यांना सगळ्या विधींमध्ये गोडी वाटायला हवी असे मला वाटले.
हा कार्यक्रम संपूर्णपणे लहान मुलामुलींनी मिळून साजरा करायचा असेल असे गृहीत धरले तर मंगलाष्टके म्हणण्याचे कामही त्यांच्यातलीच कोणी चिमुरडी मुले किंवा मुली करणार. त्यामुळे त्यांना समजतील असे सोपे शब्द आणि लहान लहान वाक्ये त्यात असायला हवीत, त्याला 'गेयता' आणण्यासाठी ते शब्द ठेक्यात बसायला हवेत आणि त्याला 'काव्य' म्हणायचे झाल्यास त्याची यमके जुळायला हवीत. एवढे प्राथमिक नियम मीच ठरवून घेतले आणि मंगलाष्टकांमधला आशय ठेऊन हळूहळू सुचतील तशा काही ओळी तयार केल्या. भावलाभावलींचा हा लग्नसमारंभ आणि त्यातले मंगलाष्टक याबद्दल काही निश्चित समजण्यापूर्वीच ती पाठवून देण्याची घाई करण्यात अर्थ नव्हता. काही दिवसांपूर्वी मेधानेच त्याबद्दल चौकशी केल्यानंतर ती रचना तिच्याकडे पाठवून देऊन तिच्या सुपूर्द केली. तिने लगेच उत्तर पाठवून धन्यवाद कळवले आणि त्यात आणखी काही गोष्टींचा समावेश करता येईल का असे विचारले. त्यासाठी आणखी चार ओळी जमवून पाठवल्या आणि त्यात कसलेही फेरफार करायला माझी मुळीच हरकत नाही हे सुध्दा कळवले. ई मेलद्वारा याहून अधिक काही करता येण्यासारखे नव्हते आणि त्याची गरजही नव्हती.
मी पाठवलेली रचना अशी होती. परंपरागत आरत्यांच्या ठेक्यावर ती लिहिली असली तरी ती बालगीतांसारखी म्हणायची होती. उदाहरणादाखल 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी' या दोन ओळीसुध्दा याच ठेक्यावर गाता येतात. म्हणजेच माझे मंगलाष्टक या गाण्याच्या मीटरमध्येसुध्दा बसत होते.
गणपती बाप्पा लौकर चला । सांगा धावाया उंदिरमामाला ।।
महालक्षुमी अंबेजोगाई । देवी शारदा भवानी आई ।।
सा-याजणी या कृपा करून । सर्व देवांना सवे घेऊन ।।
लग्नाचा आम्ही मांडला थाट । आशीर्वाद द्या होऊ दे नीट ।।
भावला आमचा देखणा धीट । खूप हुषार थोडा चावट ।।
नाजुक सुंदर गोड भावली । लाजरी नवरी छान सजली ।।
स्निग्धा बघा कशी दिसते छान । नवे अलंकार वस्त्रे लेवून ।।
गिरिजाचा तर किती दिमाख । मस्त दागिने नवा पोशाख ।।
त्यांच्या मैत्रिणी सया जमल्या । कुणी विहिणी अन् करवल्या ।।
सजून धजून रुबाबदार । ऐटीत हिंडे राजकुमार ।।
भुस्कुट्यांचा हा कुलदीपक । गोड दिसतो बाळ शौनक ।।
टिमारणीच्या सुरम्य स्थळी । पाहुण्यांनी ही गढी फुलली ।।
ताशे वाजंत्री करती डुमडुम । फटाके फुटती धडाड्ड धुम्म ।।
खाण्यापिण्याची केली चंगळ । लाडू चिवडा यांचा फराळ ।।
गोड पक्वान्ने मसालेभात । मस्त जमली पहा पंगत ।।
वरात काढू थाटामाटात । बँडबाजावर नाचत गात ।।
अशी सारी मस्त करू धमाल । गुड्डागुड्डीचे शुभमंगल ।।
त्यात मंगलाष्टकांचा 'फील' येण्यासाठी अखेरच्या दोन ओळी 'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात लिहिल्या होत्या.
झाली वेळ मुहूर्त आज शूभ द्या आशीर्वचा मंगल ।
नांदा सौख्यभरे शुभंभवतु अन् कूर्यात सदा मंगल ।।
सुमुहूर्त सावधान ।।
१२ मे च्या मुहूर्तावर त्यांच्या परिवारामध्येच व्रतबंधाचा समारंभ होणार होता आणि त्या निमित्याने खूप पाहुणे मंडळी जमणार होती, त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हे बाहुलाबाहुलीचे लग्न लगेच दुस-या दिवशी ठेवले होते. त्यासाठी पण मेधाने एक सुरेख निमंत्रणपत्रिका तयार करून ती इंटरनेटवर सर्वांना पाठवली. लग्नकार्याची सगळी तयारी अगदी तपशीलवार करून ठेवली होती.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
1 comment:
अप्रतीम. :)
Post a Comment