Friday, April 05, 2013

निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स (पूर्वार्ध)

रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा येतात आणि त्यांच्या बरोबर आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये सारखे बदल होत असतात. निसर्गामधील प्रत्येक पदार्थाला विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते सुध्दा परिस्थितीनुसार बदलत असतात. पण हे सारे बदल निसर्गाच्या ज्या नियमांमुळे होत असतात ते नियम मात्र शाश्वत आहेत. त्यात बदल होत नाहीत. प्राणीमात्रांचे गुणधर्म आणि स्वभावधर्म देखील निसर्गाने ठरवून ठेवले आहेत. वाघासारखा शक्तीशाली आणि हिंस्र प्राणी हरणासारख्या निरपराध, दुर्बल आणि गरीब प्राण्याला मारून खातो हे क्रौर्य वाटले तरी नैसर्गिक आहे. "बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी." हा निसर्गाचा नियम दिसतो. तरीसुध्दा जगातले बहुतेक सगळे प्राणी कळप करून राहतात. त्या कळपात बलिष्ठापासून दुर्बलापर्यंत असमान शक्ती असलेल्यांची उतरंड असते. त्यातला प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो. पण सर्वांनाच कळपात रहायचे असल्यामुळे या बाबतीत त्यांच्यात तडजोडही होत असते. बलवान प्राणीसुध्दा काही गोष्टी दुर्बलांना घेऊ देतात. प्राण्यांची नवजात पिल्ले स्वतः अत्यंत अशक्त आणि असमर्थ असतात, पण त्यांची सशक्त माता त्या पिल्लांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी तिची सगळी शक्ती पणाला लावते. कळपातले इतर बलिष्ठ प्राणीसुध्दा सर्वार्थाने त्यांच्याहून दुबळ्या असलेल्या लहान पिलांशी मायेने वागतात. निसर्गाचे हे नियम वर दिलेल्या नियमाशी विसंगत वाटतात, पण ते तसे आहेत. स्वतःचा जीव वाचवणे, अन्न गोळा करणे आणि पुनरुत्पादन एवढेच सगळ्या प्राण्यांचे जीवन मुख्यत्वाने असते. त्यांच्या या तीन मुख्य क्रियांशी संबंधित सगळ्या बाबींसाठी निसर्गाचे वरील नियम लागू पडतांना दिसतात. मुंग्या, माशा, डास यांसारखे कीटक किंवा डोळ्यांनाही न दिसणारे रोगजंतूंसारखे सूक्ष्म जीव पहायला गेल्यास कोठल्याही प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्बल दिसत असले तरी त्यांचा लहान आकार आणि चपलपणा यामुळे ते स्वतःचा बचाव करून घेतात, त्यांची अन्नाची गरज अतीशय कमी असते आणि पुनरुत्पादनाची क्षमता अचाट असते. हीच त्यांची बलस्थाने असतात आणि त्यांच्यामुळे ते तग धरून राहतात. वनस्पतींवर कोणी हल्ला केला तर त्या कोणाशी लढूही शकत नाहीत किंवा पळूनही जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होण्याची आणि नवी झाडे निर्माण करण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे त्या शिल्लक राहतात. 'बलिष्ठ' या शब्दाचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर हे निसर्गाच्या नियमानुसारच आहे.

मनुष्य हासुध्दा एक 'प्राणी' आहे आणि निसर्गाचे हे नियम त्यालाही लागू पडतात. माणसेसुध्दा अशीच वागतात याची असंख्य उदाहरणे रोज डोळ्यासमोर येत असतात. 'बळी तो कान पिळी' आणि 'माइट ईज राइट' अशा अर्थाच्या म्हणी सर्व भाषांमध्ये प्रचलित आहेत. 'जिसकी लाठी उसकी भैंस' या हिंदी म्हणीचा अर्थसुध्दा तशाच प्रकारचा आहे. यातला लाठीधारी इसम इतरांपेक्षा आणि म्हशीपेक्षाही जास्त बलवान असल्याने म्हशीवर त्याचा हक्क सांगू आणि गाजवू शकतो. माणसाला इतर प्राण्यांच्या मानाने खूप जास्त बुध्दी मिळालेली असल्यामुळे त्याने बुध्दीच्या जोरावर अनेक प्रकारची आयुधे, अवजारे, उपकरणे आणि यंत्रे तयार केली आणि त्यांच्या जोरावर आपले सामर्थ्य अनंत पटीने वाढवून त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले. शेती, कारखानदारी आणि उद्योगव्यवसायांमधून तो उत्पन्न घेऊ लागला, घरे, बंगले, इमारती बांधून त्यात राहू लागला, अनेक मार्गाने ज्ञान संपादन करू लागला, कला, क्रीडा, करमणूक वगैरे क्षेत्रांमध्ये भाग घेऊ लागला, वगैरे वगैरे. पण हे करत असतांना त्याने जी असंख्य निरनिराळी क्षेत्रे तयार केली त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची शक्तीस्थाने तयार झाली. बुध्दी, ज्ञान, अनुभव. कौशल्य, चलाखी, कष्टाळूपणा वगैरेंच्या आधाराने त्यातसुध्दा तुलनेने पाहता कोणी बलवान आणि कोणी दुर्बल हे भेद तयार झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यात तडजोड आणि सहकार्य यांचीही आवश्यकता पडत गेली. त्यांनाही वेगळ्या अर्थाने निसर्गनियम लागत गेले.

इतिहासपूर्व काळात कळपांमध्ये रानावनात हिंडणारा माणूस गावे, नगरे वसवून एका जागी रहायला लागल्यानंतरसुध्दा तो समूहातच रहात आला. एक राजा, म्होरक्या किंवा मुखिया त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या माणसांचे नेतृत्व करत असे आणि इतर सगळे त्याला मान देत असत. त्याने केलेल्या आज्ञा निमूटपणे पाळत असत. हे सगळे होत असतांना माणसांच्या वागणुकीसाठी नियम बनत गेले. काही हुषार, विद्वान, अनुभवी लोकांनी काही नियम बनवून त्याप्रमाणे आचरण करायला इतरांना सांगितले. त्यातले जे नियम लोकांना पटले ते त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले आणि इतरांना सांगितले, पहिल्या पिढीने पुढच्या पिढीला दिले अशा प्रकारे अनेक प्रथा, रूढी, परंपरा वगैरे तयार होत गेल्या. संत, महंत, विचारवंत लोकांनी आपल्या ग्रंथांमधून चांगल्या आचरणाचा उपदेश केला, देवदेवतांच्या कथांमधून अनेक उदाहरणे मांडली गेली. चांगल्या आचरणाला सगळ्याच धर्मांनी त्यांच्या विचारसरणीमध्ये महत्वाचे स्थान दिले. "दुराचरण करणा-या माणसांना देव शिक्षा करेल" असा धाक दाखवला गेला. अशा निरनिराळ्या मार्गाने निरनिराळे नियम प्रचारात आले. हे मानवनिर्मित नियम स्थलकाळसापेक्ष असतात. निरनिराळ्या ठिकाणची माणसे त्यांच्या गरजेप्रमाणे आणि सोयीनुसार वेगवेगळे नियम करत आले आणि कालांतराने त्यात बदलही होत गेले. या नियमांचे पालन होते की नाही यावर समाजाचे लक्ष असे आणि एकादा माणूस एकादा नियम तोडतांना आढळला तर त्याला काय शिक्षा करायची हे समाजाचे नेते किंवा राज्यकर्ते ठरवत असत. ते लोक अर्थातच इतरेजनांपेक्षा जास्त शक्तीशाली असत. नियमांचा भंग करणा-याचे काय करायचे हे बहुधा परंपरेनुसार किंवा ते ठरवणा-या बलिष्ठाच्या लहरीनुसार ठरत असे. म्हणजे अप्रत्यक्षपणे पुन्हा त्यात निसर्गाच्या नियमांचेच पालन होत असे.

लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी घरात त्यांचे पालक आणि शाळेतले शिक्षक काही नियम करतात आणि वाटल्यास त्यात बदलही करतात. कारखाने, बाजार, ऑफिसे वगैरे जिथे जिथे माणसे एकत्र येतात तिथे औपचारिक किंवा अनौपचारिक अशा आचारसंहिता असतात आणि एकमेकांना पाहून त्या पाळल्या जातात. देशामधील सर्वांना पाळावे लागणारे नियम राज्यकर्ते 'सरकार' करते तेंव्हा त्याला 'कायदा' असे संबोधले जाते. त्याचे पालन करायला लावणारी आणि ते न करणा-यांना शिक्षा करणारी पोलिस, न्यायाधीश, तुरुंग वगैरेंनी युक्त अशी व्यवस्था निर्माण होत गेली. इंग्रजांनी भारतात चालवलेल्या राज्यव्यवस्थेबरोबर त्यांच्या देशातली न्यायव्यवस्थाही इकडे आणली. त्यातून 'कायदा' या शब्दाला आज प्रचलित असलेला विशिष्ट अर्थ मिळाला. मुद्रणाचा प्रसार झाल्यानंतर सरकारने केलेले कायदे छापील रूपात उपलब्ध होऊ लागले. त्यापूर्वी समाजासाठी असलेले बरेचसे नीतीनियम अलिखित स्वरूपात असत आणि आपापल्या समजुतीनुसार त्यांचे पालन होत असे. त्यात वाद किंवा दुमत झाले तर शास्त्री, पंडित, काझी, धर्मगुरू वगैरे लोक आपापल्या पोथ्या पुराणांमधून दाखले देऊन त्यावर निर्णय देत असत. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर जनतेसाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी त्यांनी एक यंत्रणा उभी केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या तत्वानुसार कायदे करणे हे काम जनतेच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देशाच्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजांनी उभारलेली शासकीय यंत्रणाच स्वीकारली गेली. 

मानवांच्या समाजाने एकत्र रहावे, त्यांच्या जीवनात स्थैर्य असावे, एकमेकांशी सहकार्य करून सर्वांनी उन्नती साधावी हा मुख्य उद्देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या या सर्व डोला-याच्या मुळाशी असतो. माणसामाणसांमध्ये किंवा त्यांच्या गटांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे स्पर्धा आणि संघर्ष होणार आणि त्य़ात प्रबलांची सरशी होणार हे निसर्गनियमानुसार असते, पण त्यामुळे अनागोंदी माजू नये, समाज पूर्णपणे विस्कटून जाऊ नये, त्यात स्थैर्य रहावे यासाठी समाजातल्या आततायी, दुष्ट किंवा विघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने कायदे केले जातात. समाजातल्या एका व्यक्तीने फसवणूक, चोरी, मारामारी यासारखे कृत्य केले तर त्यापासून इतरांना त्रास होतो, ते स्वस्थ बसून राहणार नाहीत. त्या पहिल्या व्यक्तीला आवरले नाही तर तशा प्रकारची कृत्ये तो करतच राहील आणि इतर काही लोकांना त्याचे अनुकरण करावेसे वाटेल. अशामुळे समाजामधील अधिकाधिक लोकांना त्रास होत राहील, ते अस्वस्थ होतील आणि त्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन समाजाचे विघटन होईल. याला आळा घालण्यासाठी समाजामधील प्रत्येकाला बंधनकारक असे काही नियम केले जातात. त्यांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो त्यासाठी शिक्षा होऊ शकते. शिक्षा होण्याच्या भीतीमुळे गुन्हे करण्यापासून बहुतेक लोक परावृत्त होण्याची शक्यता असते. या उद्देशाने अनेक कायदे केले गेले. पण एक तर देशामधले हजारो कायदे आणि त्यातली लक्षावधी कलमे सामान्य जनतेला माहीत असू शकत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांची भाषा अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ स्पष्टपणे कळत नाही. वर्तमानपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांवरून जेवढे समजेल तेवढेच आणि तेसुध्दा फक्त सुशिक्षितांना ठाऊक असते. त्यामुळे इतिहासकाळातले परंपरागत नियम असोत किंवा आताचे जाडजूड पिनल कोड असोत त्या कायद्यांच्या माहितीच्या बाबतीत फार मोठा फरक पडलेला नाही, त्यामुळे त्यांच्या पालनालाही मर्यादा पडतात. याशिवाय हे कायदे राबवणारी सरकारची यंत्रणा किती कार्यक्षम आणि प्रामाणिक असते त्याचाही परिणाम त्यांच्या पालनावर पडत असतो.

परकीय सत्ता, राजेशाही, सरंजामशाही किंवा हुकूमशाही यासारख्या राज्यव्यवस्थेत बलिष्ठ सत्ताधीशांकडूनच दुबळ्या जनतेवर दडपशाही केली जाऊ शकते. अशा वेळी नीतीनियम आणि कायदे असले तरी ते गुंडाळून ठेवले जातात. न्याय अन्याय या शब्दांना अर्थ उरत नाही. असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. "पावसाने झोडपले किंवा राजाने मारले तर कुणाकडे दाद मागायची?" अशी एक म्हण आहे. अशा बहुतेक प्रसंगी बिचारी सामान्य जनता अगतिक असते. क्वचित काही ठिकाणी पीडित जनतेला संघटित करून त्या दडपशाहीचा प्रतिकार केला जातो आणि जुलमी राजवट उलथून पाडली जाते अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्या दुर्मिळ असतात. जेंव्हा सरकारचा कारभार अंतर्गत बेबनावामुळे ढिसाळ झालेला असतो तेंव्हाच हे बंडखोर सरकारच्या सामर्थ्यापेक्षाही अधिक बलवान होऊ शकतात आणि सत्ताधीशाला खाली खेचून त्याची जागा घेतात. पण या राज्यक्रांतीमध्ये न्यायव्यवस्था विस्कटली जाते आणि कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी पुष्कळ परिश्रम आणि वेळ लागतो. अलीकडील काळात बहुतेक सर्व पुढारलेल्या देशांमध्ये चालत असलेल्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी वर्गाकडे अमर्याद सत्ता जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी अनेक तरतुदी केल्या जातात. जनतेमधून निवडून आलेले तिचे प्रतिनिधी फक्त ठराविक कालावधीपुरतेच असतात, त्यानंतर निवडणुका होतात आणि आपले प्रतिनिधी बदलण्याची संधी जनतेकडे असते. सत्तेवर असतांनासुध्दा सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा आदि जागी विरोधकांना तोंड द्यावे लागते. न्यायालये आणि शासनयंत्रणा यांना स्वतंत्र स्थान असते. शासनाने अन्याय केल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. वृत्तपत्रे, टेलिव्हिजन यासारखी माध्यमे जनतेची गा-हाणी प्रभावीपणे मांडू शकतात.

या सगळ्यामुळे समाजात सगळे काही अगदी अलबेल झाले आहे असे म्हणता येणार नाही आणि ते कधीही होण्याची शक्यता नाही, कारण हे सगळे मानवी प्रयत्न आहेत. निसर्गाचे नियम यापेक्षा जास्त बलवान आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या निसर्गाने दिलेल्या भावनांच्या प्रभावाखाली माणसे चुका किंवा गुन्हे करतात आणि करत राहणार. शिक्षेच्या भीतीपोटी त्यावर अंशतः नियंत्रण येईल, पण गुन्हेगाराला पकडणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे, त्याचा न्यायनिवाडा करणे आणि त्याला शिक्षा देणे, तसेच ती अंमलात आणणे ही सगळी कामे माणसांनीच करावयाची असल्यामुळे त्यात मानवी चुका आणि निसर्गनियमामुळे काही बाधा येतात आणि त्या येत राहणार. 

................................................................................... (पुढील भाग उत्तरार्धात)

  

No comments: