Thursday, April 25, 2013

जय बोलो हनुमान की


माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजयंती यांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या एकुलत्या एक रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात रामाच्या जन्माचेच आख्यान दर वर्षी असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना यायची. आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेत 'सिटीसेंटर'ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायचे कुणालाच कधी सुचले नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. इतर देवांच्या देवळातल्या गाभा-यात लहान मुलांना सहज प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नसल्यामुळे तो देव जास्तच जवळचा वाटायचा. त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजयंतीच्या दिवशीसुध्दा तिथे समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणा-यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच.     

हनुमानजयंतीच्या दिवशी सकाळी काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली तसबीर, सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून त्यांना वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. "राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।" अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे.

मारुतीच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कसे झाले, संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी त्यात काही स्वारस्य उरले नाही. पण बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमानाच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा 'इन्फिनिटी' या शब्दांचा अर्थ 'मारुतीचे शेपूट' या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना खूप मजा वाटत असे.  त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. त्यात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृभ फक्त एकाच पर्वतावर होते आणि  ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी अशा प्रकारे डोंगर, पर्वत वगैरे उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो.

मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. 'भीम्या' की 'शिद्राम्या' अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून आणि कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे दिसायचे, पण या हनुमानाला शोधात मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा 'हिन्दू धर्माचा घोर अपमान' आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. 'सेक्युलर' हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचे परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. "हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।" असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. त्याची स्तुती करणारा एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे. तो असा आहे.  
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।   
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो उच्च प्रतीचा योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच त्याची गणना देवांमध्ये केली गेली.
आज हनुमानजयंती आहे. त्या निमित्याने या देवाचे स्मरण आणि त्याचे पायाशी प्रणाम.

No comments: