Monday, April 01, 2013

संत एकनाथांच्या रचना (उत्तरार्ध)

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन 'भारुड' या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. 'विंचू चावला' या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी 'अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू' वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.  
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणा-या किंवा सासुरवास करणा-या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणा-या, परमेश्वरापासून दूर ठेवणा-या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि 'असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते' हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
    अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी 'भूत' या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची 'उलटी खूण' ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना 'जोशी' म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

'बुरा मत सुनो, बुरा मत बोलो' वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी  लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की 'मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो'. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी 'फकीर' या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
 

1 comment:

Unknown said...

njudsir Eknath maharajanchi mahiti vachun chan vatale. nath maharajansarkhya mahan santanchi mahiti tyanchya vangmayachya madhyamatun vegalya prakare milali. tumhi nathanchyawar kadhaleli ek sundar website aahe ti jarur bagha. www.santeknath.org