Friday, September 09, 2011

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ३

कोळीगीते हा एक अत्यंत आकर्षक असा लोकगीतांचा प्रकार आहे. त्यातल्या ठेक्यावर आपोआप पावले थिरकायला लागतात. मल्हारी, एकवीरा आई वगैरे कोळी मंडळींची दैवते आहेत आणि असली तर बहुधा त्यांचीच स्तुती कोळीगीतांमध्ये असते. पण कोळीगीतांसारख्या ठेक्यावर आणि ठसक्यात गायिलेले गणपतीचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे.


तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन्‌ तूच माता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे ?
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

या गाण्यातील कारुण्याचा भाव हृदयद्रावक आहे. वर्षभरातून एकदा गोड अन्नाचा स्पर्श होतो आहे आणि को सुध्दा गुळ-फुटाणे-खोबरं नि केळं यांचा. केवढी दैन्यावस्था ? पण अशा परिस्थितीतसुध्दा मायबाप गजाननावर अमाप श्रध्दा आहे, यातून तोच बाहेर काढेल, दुःखांचा नायनाट करेल आणि सुखाचे दिवस आणेल असा विश्वास आहे.मराठी कोळीगीते आणि गुजराथी गरबा या दोघांचीही आठवण करून देणा-या ठेक्यावरले एक गाणे एका काळी लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले होते आणि अजूनही गणेशोत्सवात ऐकायला हमखास मिळते. ते आहे.

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग ।
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो ।।

या चिकमाळेला रेशमी मऊ दोरा ग ।
मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिकमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं ।
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग ।
अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यान गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं ।
चला करू या नमन गणरायला गं ।। ४।।

या गाण्याचा आशय अगदी साधा आहे. एक अनमोल अशी हि-यामोत्यांची माळ करून गणपतीला घातली, ती त्याला शोभून दिसली आणि त्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला वगैरे गोष्टी इतक्या सहजपणे सांगितल्या आहेत की ते गाणे ऐकायला मजा वाटते आणि ठसकेदार उडत्या चालीमुळे गुणगुणावेसे वाटते.

सगळ्या कामांची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करायची पध्दत असली तरी मराठी नाटकांच्या सुरुवातीला नटवराला नमन करण्याचा पायंडा आपल्या आद्य नाट्याचार्यांनी पाडला आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या संगीत शाकुंतल या नाटकातली नांदी आजही ऐकायला मिळते.

पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥

यात नटेश्वर शंकराला आधी वंदन केल्यानंतर लगेच विघ्नविनाशक गणपतीचे आवाहन करून आपले नाटक निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्याला विनंती केली आहे. 'सबकुछ बाळ कोल्हटकर' या पध्दतीने त्यांनी सादर केलेल्या नाटकांमध्ये 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गणेशावर श्रध्दा हा या नाटकाचा विषयच असल्यामुळे त्याच्या शीर्षकगीतात गणपतीची भक्ती येणारच. हे गीत आहे.

गजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करोनी,
मंगल शिवपद मनी स्मरोनी. सद्भावाने मुदित मनाने,
अष्टांगांची करूनि ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

अभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे,
विनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हर घडी ।।

विघ्न विनाशक गणेश देवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,
आशिर्वाद हा द्यावा मजला, धन्य होऊ दे कुडी ।।

पार्वती नंदन सगुण सागरा, शंकर नंदन तो दुःख हरा,
भजनी पुजनी रमलो देवा, प्रतिमा नयनी खडी ।।

वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

या गीतात गणपतीविषयी भक्तीभाव आहेच, शिवाय निस्वार्थ, निरभिमान आणि विनम्र वागणूक ठेवावी असा हितोपदेशसुध्दा आहे.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: