प्रत्येक स्तोत्राची सुरुवात श्रीगणेशायनमःने करण्याची पध्दत आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिध्द) या ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाचे वंदन असे केले आहे.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रम्ह कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥
तर संत तुकारामांनी एका अभंगात असे लिहिले आहे,
ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥
अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥२॥ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ॥३॥
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥
समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांची सुरुवात अशी केली आहे,
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
या तीन्हीवरून असे दिसते की गणेश किंवा गणपती हा हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे आद्य देव आहे. ब्रह्मा आणि विष्णूसह भगवान शंकर या सर्वांचा समावेश या ॐकार आदिदेवात होतो. सर्व चराचरात भरलेला हा परमेश्वर निर्गुण निराकार असा आहे. उपासना करण्यासाठी त्याने गजाननाचे सगुण रूप घेतले आहे. शंकर पार्वतीचा पुत्र हे त्याचे एक रूप असेल, पण त्याने इतर अनेक रूपे घेतली असल्याचे पुराणामधील कथांमध्ये सांगितले जाते. दोन, चार किंवा दहा हात असलेल्या गणेशाच्या मूर्ती पुरातन मंदिरांमध्ये दिसतात काही रूपांमध्ये त्याला अनेक मस्तकेसुध्दा दाखवली आहेत. त्यामागे निरनिराळी कारणे असल्याचे खुलासेही केले जातात. त्यातून चतुर्भुज आणि एकदंत गजमुखाची आकृती आजकाल सर्वत्र प्रमाण समजली जाते. पण हे भक्तांनी ठरवले त्याप्रमाणे ठरले.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी वेदाचा आधार घेऊन सांगितले आहे की अ, उ आणि म मिळून झालेला ॐकार हेच गणेशाचे मुख्य रूप आहे. अकार हे पाय, उकार हे पोट आणि मकार हे मस्तक असे ज्ञानेश्वर सांगतात तर अकार, उकार आणि मकार हे अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश असल्याचे तुकारामांनी सांगितले आहे. याचाच अर्थ गणपती हे दैवत विश्वाच्या सुरुवातीपासून आहे असा होतो. चतुर्थीला त्याचा जन्म झाला ही घटना एका अवतारापुरती आहे. असे म्हणता येईल.
2 comments:
Shirish he Ganapati che nav aahe ka?
शिरीष हे गणपतीच्या प्रचलित नावांमध्ये तर नाहीच. माझ्याजवळ गणपतीच्या शंभराहून अधिक नावांची एक यादी आहे, त्यातही शिरीष हे नाव नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते एका फुलाचे किंवा फुलझाडाचे नाव आहे. धन्यवाद.
Post a Comment