Sunday, September 04, 2011

अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन

माझ्या ओळखीतील बहुतेक मराठी लोकांना गणपती अथर्वशीर्ष ठाऊक असते, अनेकांना ते पाठ असते. त्या मानाने आजकाल रामरक्षा कमी लोकप्रिय आहे. अथर्वशीर्ष या स्तोत्रात लहान लहान आणि तुलनेने सोपी वाटणारी वाक्ये आहेत. सुमारे दोन मिनिटात त्याचे वाचन किंवा पठण पूर्ण होते. गणेशोत्सवाच्या दिवसात हे स्तोत्र म्हंटले जाते. काही लोक जमेल तेंव्हा त्याची एकवीस आवर्तने करतात. काही मंडळी एकत्र जमून १००१ आवर्तनांचा सामूहिक कार्यक्रम करतात. पुण्यात हजारो स्त्रीपुरुष एकत्र येऊन त्याचे पठण करतांनाची छायाचित्रे बहुतेक दरवर्षी पहायला मिळतात.
या स्तोत्रात गणपतीची स्तुती केली आहे, तसेच त्याला विनंती केली आहे. स्तोत्र संपल्यानंतर शेवटी त्याला पुनःपुनः नमस्कार करतांनाच (नमोनमः) त्याचा शिवसुताय (शंकराचा मुलगा) असा (दुय्यम वाटणारा) उल्लेख येतो. संपूर्ण स्तोत्रात त्याचे वर्णन तोच सर्वोच्च (एकमेव) परमेश्वर असेच केलेले आहे. सुरुवातीलाच "त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हर्तासि ।" असे म्हणतांना या विश्वाचा तोच एकटा कर्ता, धर्ता आणि हर्ता असल्याचे सांगितले आहे. पुढील भागात "सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।" असे म्हणून ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. या वाक्यांचा अर्थ सारे जग तुझ्यातूनच जन्म घेते, तुझ्यामुळेच उभे राहते (चालते) आणि अखेर तुझ्यातच विलीन होते असा होतो.
जगामधील सर्व गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यात विलीन होतात हे आपण पाहतोच. पण पृथ्वी आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे स्वतः गणपतीच आहे असे "त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।" या वाक्यात म्हंटले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव ही त्रिमूर्ती या विश्वाचे कर्ता, धर्ता व हर्ता आहेत अशी हिंदू धर्मानुसार धारणा आहे. " त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम् " या वाक्यानुसार गणेश हा ब्रह्माविष्णूमहेश तर आहेच, शिवाय इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र वगैरे सर्व काही आहे. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात त्या सर्वांमध्ये गणेश आहे. संत तुकारामांच्या अभंगात आणि संत ज्ञानेशांच्या ओव्यांमध्ये असेच सांगितलेले आहे.
गणेशाने सर्व बाजूंनी (पूर्व, पक्ष्चिम, उत्तर, दक्षिण, वर आणि खाली अशा दिशांनी) आपले रक्षण करावे असे "अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् ।" या वाक्यांमध्ये म्हणतांना गणपतीचा वास सर्वत्र आहे असेच सुचवले आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या जागी तर तो आहेच, त्याच्याही पलीकडील अज्ञात अशा प्रदेशातसुध्दा तो आहे असे "त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । या ओळींमध्ये म्हंटले आहे. तो सत्व, रज, तमोगुणांच्या पार आहे, तसेच भूत भविष्य वर्तनमानकाळांच्या पलीकडे अनादी अनंत असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याची व्याप्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडेपर्यंत पसरलेली आहे.
अशा या अगम्य रूपाची आराधना करणे सामान्य माणसाला जमणार नाही. त्याच्यासाठी सोपे मार्ग आहेत. ॐ या अक्षरात तो सामावला आहे असे मागील लेखात लिहिले होते. गं या अक्षरामधील "गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारःश्चान्त्यरूपम् । बिन्दुरूत्तररूपम् । नादः सन्धानम् " असे अथर्वशीर्षात सांगितले आहे. त्यानुसार ॐगंगणपतयेनमः हा त्याचा मंत्र झाला.

"एकदन्तंचतुर्हस्तंपाशमङ्कुशधारिणम् ।

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।

रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् । "

असे त्याचे दृष्य वर्णन केले आहे. त्याप्रमाणे एक दात, सुपासारखे कान, मोठे उदर, चार हात, त्यापैकी तीन हातात पाश, अंकुश आणि रद धारण केलेले आणि चौथा वरदहस्त वर देण्याच्या मुद्रेमध्ये, रक्तवर्ण म्हणजे तांबूस कांती, त्याच रंगाची वसने, गंध आणि फुले असे त्याचे रूप या श्लोकांमध्ये दिले आहे आणि तेच साधारणपणे सगळीकडे दिसून येते. काही जागी तपशीलात थोडा बदल केला तरी इतर वैशिष्ट्ये टिकून ठेवली जातात. प्रकृती आणि पुरुष किंवा ब्रह्म आणि माया यापासून बनलेल्या सृष्टीच्या पार असलेल्या या देवाने भक्तांची अनुकंपा वाटल्यामुळे त्यांच्यासाठी हे रूप धारण केले आहे असा खुलासा खालील श्लोकात केला आहे.

"भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।

आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् । "
अशा प्रकारे गणपतीचे विश्वाच्या पार असलेले अगम्य अपार असे विशाल रूप आणि डोळ्यांना दिसणारे, वाचेने बोलता तसेच कानाने ऐकता येण्यासारखे सोपे रूप या सर्व रूपांची वर्णने गणपतीअथर्वशीर्षात केली आहेत.

No comments: