Thursday, September 08, 2011

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी

मराठी संगीतातील लोकधारेला मोठी परंपरा आहे. कित्येक गाणी परंपरेने मागील पिढीकडून पुढील पिढीकडे चालत आली आहेत. काही गाणी संत किंवा शाहीरांनी लिहिली आहेत, तर आजच्या काळातील काही कवींनीसुध्दा लोकगीतांच्या शैलीमध्ये पद्ये रचली आहेत. प्रभातकाल मंगलमय करण्यासाठी गायिलेल्या भूपाळ्या, जात्यावरील ओव्या, मंगळागौर किंवा हदगा यासारखे स्त्रियांचे मेळावे, आरत्या, भजन, कीर्तन, भारुडे, तमाशामधील गण, गौळण, लावण्या, शाहीरांचे पोवाडे अशा विविध स्वरूपात हे लोकसंगीत ऐकायला मिळते. यामध्ये निरनिराळ्या प्रकारे आपल्याला गणपतीचे दर्शन होते.

माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या आणि पाठ केलेल्या भूपाळ्यांमध्ये खालील दोन प्रमुख होत्या. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करावी (म्हणजे दिवस चांगला जातो) ही शिकवण या दोन्ही गाण्यांमध्ये दिली आहे.

उठा उठा हो सकल जन, वाचे स्मरावा गजानन ।
गौरीहराचा नंदन, गजवदन गणपती ।।
ध्यानि आणुनि सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती ।
तो देईल ज्ञानमूर्ती, मोक्ष सुख सोज्वळ ।।
जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां ।
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्नवार्ता निवारी ।।
तो हा सुखाचा सागर, श्री गणराज मोरेश्वर ।
भावे विनवितो गिरीधर, भक्त त्याचा होऊनी ।।

पारंपारिक पध्दतीने कोणा गिरिधर कवीने ही भूपाळी रचली आहे. त्याच्याविषयी काही माहिती नाही. गजाननाचे स्मरण आणि स्तवन केल्यामुळे भक्ताला कसा लाभ होतो याचेच वर्णन या भूपाळीत आहे.


उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धि-सिद्धींचा नायक, सुखदायक भक्तांसी ।।
अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी ।
केशर कस्तूरी लल्लाटीं, कंठी हार साजिरा ।।
कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा ।
माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो ।।
कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो ।।

माझी आई ही भूपाळी पारंपारिक चालीवर म्हणत असे. पुढे लता मंगेशकरांच्या गोड आवाजात हे गाणे रेडिओवर मंगलप्रभात या कार्यक्रमात ऐकू येऊ लागले. हे कवी रामानंद कोणत्या काळात होऊन गेले की हे कोणा कवीचे टोपणनाव आहे हे गूढच राहिले. या भूपाळीत गणपतीचे रूप आणि त्याने परिधान केलेली वस्त्रे अलंकार वगैरेंचे सविस्तर वर्णन करून शेवटी हा देव संकटसमय़ी पावतो असे आश्वासन दिले आहे.

ॐकार प्रधान रूप गणेशाचे हा संत तुकारामांनी लिहिलेला अभंग मी आधी एका लेखात दिला होता. तुकोबानी गणेशाला उद्देशून याशिवाय आणखी काही अभंग लिहिले आहेत. यातला एक असा आहे.

गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई ।।
अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागु-या वाजती, नाचत आले गणपती ।।
अवघ्या गणांचा गणपती, हाती मोदकाची वाटी ।।
तुका म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

तुकारामांचा दुसरा एक अभंग असा आहे.

धरुनिया फरश करी, भक्तांची विघ्ने वारी ।।
ऐसा गजानन महाराजा, त्याला नमस्कार माझा ।।
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला, तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदीर असे ज्याचे वाहन, माथा जडित मुकुट पूर्ण ।।
नाग यज्ञोपवीत रुळे, शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।
भाव मोदक हारा भरी. तुका भावे पूजा करी ।।

तुकारामांनी असेही लिहिले आहे.

सिध्दीकांता चिंतामणी, माझी एका विनवणी ।।
घडो गणेशाचा संग, मनी रंगो बुध्दारंग ।।
चराचरी गजानन, माझे पाहोत नयन ।।
मायबापा सखया, तुका वंदीतो मोरया ।।

विठ्ठल आणि गणेश हे दो्ही एकच आहेत असे तुकारामांनी म्हंटलेले आहेच, सर्व देव एकच आहेत असे सांगतांना संत नामदेवांनी आपल्या अभंगात असे लिहिले आहे.

गणेश म्हणू तरी तुझाची देखणा, म्हणूनि नारायणा नमन तुज ।।
सारजा नमू तरी ते तुझी गायनी, म्हणूनि चक्रपाणी नमन तुज ।।
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता, म्हणूनि लक्ष्मीकांता नमन तुज  ।।
नामा म्हणे भेटी भेटी झाली पै राया, कोण गणो कोण गणो वा या सेवकासी ।।

जुन्या काळातील पंतकवींनी लिहिलेले श्लोक, आर्या वगैरे हा मराठी पद्याचा मोठा खजिना आहे. लहानपणी पाठ केलेला आणि अनेक वेळी म्हणून शाबासकी मिळवून देणारा हा श्लोक.


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे ।
माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनि चिंता नुरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे या मोरयाला स्मरे ।।

गणेशाचे किती सुंदर वर्णन या श्लोकात केले आहे !




. . . . . . . . (क्रमशः)

No comments: