Friday, December 10, 2010

मन

मन म्हणजे काय हे कुणाला सांगायची काही गरज आहे कां? आपल्या सर्वांकडे मन असतेच. अनेक, किंबहुना असंख्य निरनिराळ्या कल्पना, विचार आणि भावनांचे तरंग त्यात सतत उठत असतात तसेच ते विरूनही जात असतात. पण त्यांना थारा देणारे हे मन आपल्या शरीरात नक्की कुठे असते? प्रीतीमुळे प्रेमिकांच्या 'हृदया'ची स्पंदने ('दिल'की धडकने) वाढतातच, शिवाय 'बहरुन ये अणु अणू, जाहली रोमांचित ही 'तनू' अशी त्यांची अवस्था होते. एकादी करुण घटना नेहमी 'हृदय'द्रावक असते आणि ज्याच्या 'काळजा'ला ती भिडत नाही त्या माणसाला आपण 'निर्दय' म्हणतो. आईचे मृदू 'काळीज' मायेने ओथंबलेले असते तर क्रूर कर्म करणा-या माणसाला उलट्या 'काळजा'चा म्हणतात. भीतीपोटी आपल्या 'पोटा'त गोळा उठतो, 'पाय' लटपटतात, चित्तथरारक गोष्टीने 'सर्वांगा'वर कांटा उभा राहतो, तर रागाने 'तळपाया'ची आग 'मस्तका'ला जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असा परिणाम करणा-या भावना मात्र इथे तिथे निर्माण न होता फक्त मनातच निर्माण होतात. म्हणजे त्या नेमक्या कुठे उठतात?

या मनाला शरीरातल्या हात, पाय, हृदय, काळीज, मेंदू यासारख्या अवयवांसारखा विशिष्ट आकार नसतो, ते कधी डोळ्यांना दिसत नाही की कानाला ऐकू येत नाही. रंग, रूप, गंध, स्पर्श, चंव, भार, घनता असले जड वस्तूचे कोणतेच गुणधर्म त्याला नसतात. पण जरी त्याचे आकारमान सेंटीमीटर किंवा इंचात मोजता येत नसले तरी एकाद्याचे मन आभाळाहून मोठे असते तर कोणाचे अतीशय संकुचित, अणूरेणूहून तोकडे असू शकते. त्याचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत मात्र असते. कुणी तरी म्हंटले आहे,
"शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुस-या कोणालाही मनाइतका मान नाही."
असे हे मन ! पाच ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला सभोवतालच्या जगाची माहिती मिळते आणि आपल्या बुध्दीला त्यातून सगळे समजत असते. पण मनाचे अस्तित्व मनालाच जाणवते, ते समजले असे वाटते पण उमगले याची खात्री वाटत नाही. मग आपले मन कल्पनेनेच त्याचाच शोध घेत राहते. असाच एक शोध कवी सुधीर मोघे यांनी किती सुरेख शब्दात व्यक्त केला आहे !

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले ।
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले।
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा ।।

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ ।
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल ।
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही ।
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही ।
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा ?

या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यासाठी सुधीर मोघे यांनीच आपल्या दुस-या एका सुरेख कवितेमध्ये थेट मनालाच असा प्रश्न विचारला आहे. पण हा प्रश्न विचारणारा 'मी' म्हणजे कोण असेल आणि त्याला मनाचे मनोगत कसे कळेल हा आणखी एक मोठा गहन प्रश्न आहे.

मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !

कोण जाणे केवढा तूं व्यापतोस आकाशाला ।
आकाशाचा अर्थ देसी एका मातीच्या कणाला ।
तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का !

कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श ।
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश ।
तुझे अरुपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का !

कशासाठी कासाविशी कुणासाठी आटापिटी ?
खुळ्या ध्यास-आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का !
मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?

असे हे मन ! भल्या भल्यांना न कळलेले, बुध्दीच्या आणि जाणीवांच्या पलीकडे असलेले पण तरीही सतत खुणावत राहणारे ! महान कवीवरांनी लिहिलेल्या विविध लोकप्रिय गीतांमधूनच त्यात डोकावून पहाण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

1 comment:

Anant S. Dhavale said...

Blog aawadala..