Saturday, November 27, 2010

२६ नोव्हेंबर २००८ (भाग १,२)



२६ नोव्हेंबर २००८  (पूर्वार्ध)


त्या दिवशी मी अल्फारेटाला मुलाच्या घरी बसून दुपारचे जेवण घेत होतो. अचानक टेलीफोन वाजला. अजय ऑफीसमधून बोलत होता. मला वाटले तो तिकडे डबा खायला बसला असेल आणि जेवण करता करता त्याला गप्पा मारायच्या असतील. पण तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, "तुम्हाला मुंबईचं कांही कळलं का?"

आम्हाला घराबाहेरच्या जगाचं भानच नव्हतं. सांगितलं, "नाही बाबा. काय झालं?"

"तिथे कसलातरी मोठा घोटाळा झालाय्."

एवढ्या मोठ्या मुंबईत लहान सहान दुर्घटना रोजच घडत असतात. "बडे बडे शहरोंमें छोटी छोटी बाते होती रहती है।" हे माननीय कै.आबा पाटलांनी काढलेले अज्ञानमूलक उद्गार खूप प्रसिद्ध झाले होते आणि त्यांना भारी महागात पडले होते.  अशा घटनांच्याबद्दल वर्तमानपत्रांच्या आतल्या पानांवर बारीक अक्षरात असलेल्या बातम्या न वाचताच ते पान मी अनेक वेळा उलटतो. एकादी इमारत कोसळणे, बस किंवा लोकलचा अपघात, दंगेधोपे, अलीकडल्या काळात होत असलेले बाँबस्फोट यासारख्या मुंबईच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या घटना तिथल्या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर असतात. पण अल्फारेटाला आल्यापासून रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा प्रकारच नव्हता आणि कधी न्यूजपेपर आणलाच तर तिथल्या पेपरमध्ये मुंबईतल्या या बातम्या येतही नव्हत्या. अधून मधून इंटरनेटवर मुंबईतली वर्तमानपत्रे वाचून त्याची तहान भागवून घेत होतो पण त्यात एवढे समाधान होत नसे. त्यामुळे मुंबईत घडलेल्या अशा मोठ्या स्थानिक घटनासुध्दा अनेक वेळा आम्हाला अमेरिकेत समजत नसत. मग माझ्या मुलाला एवढे अस्वस्थ करणारा हा मोठा गोंधळ कसला असेल? आम्हाला कांही सुचत नव्हते.

माझी पत्नी पटकन म्हणाली, "मी ललिताला फोन करून विचारते."

"नको, नको." अजय जवळजवळ ओरडला. पुढे त्याने सांगितले, "एवढ्याचसाठी मी फोन केला आहे. दोन चार दिवस कोणीही भारतात कोणाला फोन करायचा नाही आणि तिकडून आला तरी कसली चौकशी करायची नाही. कां ते मी घरी आल्यावर सांगेन. तोपर्यंत टीव्हीवर पहात रहा, पण ते मलासुध्दा फोनवर सांगू नका."

आमच्या मनातले गूढ वाढतच होते. मी लगेच टीव्ही सुरू करून बातम्यांचे चॅनेल लावले. सीएनएन, फॉक्स वगैरे सगळीकडेच मुंबईमधल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याची त्रोटक ब्रेकिंग न्यूज येत होती. पण लगेच पुन्हा अमेरिकेतल्या स्थानिक बातम्या दाखवत होते. आम्हाला त्या नीट समजतही नव्हत्या आणि त्यात स्वारस्यही नव्हते. तरीही मुंबईतली परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिकडच्या बातमीची वाट पहात आम्ही टीव्ही लावून तो पहात बसलो होतो. त्या मानाने बीबीसीवर मुंबईला जास्त वेळ दिला जात होता. आम्ही पहायला सुरुवात केली त्या वेळेपर्यंत बोरीबंदरवरला हल्ला करून आतंकवादी तिथून पसार झाले होते. बातम्यांमध्ये तिथली काही दृष्ये दाखवत होते आणि ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाउस या ठिकाणी ते त्यांच्या निर्घृण कारवाया करत होते. त्याबद्दल फारशी माहिती बाहेर आली नव्हती.

ऑफीसमधून घरी आल्यानंतर अजयने सांगितले की "अशा प्रसंगी टेलीफोन, ईमेल वगैरेंचे स्कॅनिंग चाललेलं असतं आणि भारतातल्या लोकांशी अमेरिकेतून ज्या ज्या कोणी संपर्क साधला असेल ते सगळेच संशयास्पद समजले जातात आणि मग त्यांच्या मागे चौकशीचं झेंगट लागू शकतं." असे त्याला ऑफीसमधल्या कोणीतरी सांगून सावध रहायचा सल्ला दिला होता. त्यामुळे या वेळी केवळ उत्सुकतेपोटी जास्त चौकशा करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे अधिक श्रेयस्कर होते. दक्षिण मुंबईत आमच्या ओळखीचे कोणी रहातच नाही आणि मुंबईच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांनीही या बातम्या टीव्हीवरच पाहिल्या असतील. आम्हाला त्या ठिकाणीचा आँखो देखा हाल कोणाकडून समजण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे आम्हाला भारतामधून कोणाचा फोन आलाही नाही आणि आम्हीही कोणाला फोन करून काही विचारले नाही की सांगितले नाही.

मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये अनेक अमेरिकन नागरिक अडकले असल्याचे जेंव्हा बाहेर यायला लागले तसतसा तिथल्या बातम्यांना देण्यात येणारा वेळ वाढत गेला आणि अमेरिकेतल्या दिवसाअखेरीस (म्हणजे भारतात दुसरा दिवस उजाडला असतांना) सीएनएनवर सतत रनिंग कॉमेंटरी सुरू झाली. आम्हीही त्यानंतर टीव्हीकडे टक लावून ती पहात बसलो. बोरीबंदरवरील हल्ल्यानंतर लगेचच पोलिस मुख्यालयातले तीन बडे अधिकारी त्या जागेच्या जवळपास मारले गेले होते. पण ही बातमी मात्र निदान चार पाच तास जाहीर केली गेली नव्हती. हळू हळू टप्प्याटप्प्याने ती सांगितली गेली तेंव्हा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या पध्दतीने ती तिकडे सांगितली जात होती त्यावरून अनेक प्रश्न मनात उठत होते. अजूनही त्यांना समर्पक अशी उत्तरे सापडलेली नाहीत.

गेटवे ऑफ इंडियाजवळील मोकळ्या जागेत अनेक वृत्तवाहिन्यांनी तंबू ठोकून ऑब्झर्वेशन पोस्ट बनवलेली दिसत होती. कधी तिथून दिसणारे दृष्य तर कधी त्या वार्ताहरांना दाखवत होते. त्यात अनेक महिला सुध्दा दिसत होत्या. ताजमहाल हॉटेलच्या वेगवेगळ्या भागातून धुराचे प्रचंड लोट उठत होतेच, अनेक वेळा ज्वालांचे लोळसुध्दा स्पष्ट दिसत होते. कुठल्या क्षणी कोणती बातमी आतून बाहेर येईल याचा नेम नव्हता आणि प्रत्येक वार्ताहर ती जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसत होता. हे लोक शिफ्ट ड्यूटी करत आहेत की सतत तिथे बसून आहेत हेच कळत नव्हते. जवळजवळ ती अमेरिकेतली संपूर्ण रात्र आम्ही बातम्या पहात जागून काढली. आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकावर रहात असतांनासुद्धा मुंबईत चाललेले हे भयानक थरारनाट्य आम्हाला जागच्या जागी खिळवून ठेवत होते. यावरून प्रत्यक्ष ज्यांच्यासमोर ते उलगडत होते त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करावी.
-----------------

२६ नोव्हेंबर २००८  (उत्तरार्ध)

पुढील जवळजवळ दीड दोन दिवस मुंबईत घडत असलेल्या घटना आम्ही अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी घरात बसून श्वास रोखून टीव्हीवर पहात राहिलो. अखेरीस सर्व अतिरेक्यांचा पाडाव झाला, सर्व जागी लागलेल्या आगी विझल्या आणि सर्व जागा व्यवस्थितपणे तपासून त्या पूर्ववत सुरक्षित झाल्याबद्दलची घोषणा करण्यात आल्यानंतर हे खास प्रक्षेपण थांबले. या घटनांमध्ये मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींची, तसेच यातून सहीसलामत सुटलेल्या लोकांची आकडेवारी, त्यातले कोणत्या देशामधले किती होते वगैरेचे तपशील, ते लोक मुंबईला कशासाठी गेले होते वगैरे माहिती देणे, त्यातल्या अमेरिकन नागरिकांबद्दल जास्तच तपशीलवार खुलासे, अनेकांच्या मुलाखती, त्यांच्या भावना, अनेकजणांच्या प्रतिक्रिया आणि इतर अनेकांनी त्यांच्यावर केलेले भाष्य वगैरे आणखी चार पाच दिवस चालले. त्यानंतर भारतातल्या बातम्या येणे कमी कमी होत थांबले, तसे आम्हीही अमेरिकेतल्या टीव्हीवरल्या बातम्या पाहणे बंद केले.

ताजमहाल हॉटेल किंवा ओबेरॉय हॉटेल या जागी त्या वेळी जे लोक मरणाच्या सापळ्यात सापडले होते, त्यांत माझ्या जवळच्या आप्तांपैकी कोणी असण्याची शक्यता नव्हतीच, ओळखीतले कोणी असण्याची शक्यतासुध्दा अगदी कमी होती. प्रत्यक्षातसुद्धा तसे कोणी तिथे नव्हतेच असे नंतर समजले. नोकरीत असेपर्यंत मी काही वेळा या हॉटेलांमध्ये गेलेलो असलो तरी आता भविष्यात कुठल्याच पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे योग दिसत नव्हते. यातल्या कोणत्याही हॉटेलचे शेअर मी विकत घेतलेले नव्हते. नरीमन हाउस किंवा खाबाद हाउस ही नावेदेखील मी कधी ऐकली नव्हती. थोडक्यात सांगायचे तर बोरीबंदर सोडता मुंबईत इतरत्र त्या वेळी घडत असलेल्या घटनांच्या जागांचाही माझ्या व्यक्तीगत आयुष्याशी तेंव्हाही काही प्रत्यक्ष संबंध नव्हता आणि माझ्या जीवनावर त्यांचा काही परिणामही होणार नव्हता. तरीसुध्दा मी त्यात एवढा का गुंतून गेलो होतो?

पण मी पूर्वी पाहिलेल्या असल्यामुळे त्या जागा माझ्या तशा चांगल्या ओळखीच्या होत्या. ताज हॉटेलच्या किबहुना गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात दहा वर्षांहून अधिक काळ माझे ऑफीस होते त्यामुळे त्या भागात माझे रोज जाणे येणे होत होते. मला त्या जागेबद्दल जास्तच आत्मीयता वाटत होती आणि बातम्यांचे मुख्य ठिकाण तेच होते. गेटवेजवळ ज्या ठिकाणी उभे राहून वार्ताहर मंडळी दुरून सारे दृष्य पहात होते तिथे मी स्वतः पूर्वी शेकडो वेळा उभा राहिलो होतो. यामुळे टीव्हीवर दाखवले जाणारे दृष्य मला पटकन समजत होते. या सर्वापेक्षा मोठे कारण म्हणजे दूरदेशी रहात असतांना भारतातल्या, त्यातून मुंबईतल्या व त्यात पुन्हा ओळखीच्या ठिकाणांची दृष्ये पाहण्याची वेगळीच ओढ होती. दुसरे कारण असे होते की यापूर्वी मी होऊन गेलेल्या घटनांची छायाचित्रे बातम्यांमध्ये पाहिली होती, अलीकडच्या काळात काही रेकॉर्डेड व्हीडिओ क्लिप्स पहात होतो, पण क्रिकेट किंवा फूटबॉलसारखे सामने सोडले तर मला त्यापूर्वी कोणतीच महत्वाची घटना प्रत्यक्ष घडत असतांना पहायला मिळाली नव्हती. "युध्दस्य वार्ताः रम्याः" असे म्हणतात. इथे ते प्रत्यक्ष पहायला मिळत होते आणि तेसुध्दा स्वतः मात्र हजारो मैल दूर अगदी सुरक्षित जागी बसून! त्यामुळे ते पहाण्याखेरीज दुसरे काही त्या वेळी सुचत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. चारपाच दिवसांनी ती पूर्णपणे बदलूनही गेली.

भारतात परत आल्यानंतर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात कुठे ना कुठे २६-११ चा उल्लेख यायचाच. हा क्रम पुढील अनेक वर्षे  चाललेला होता. आधी अनेक दिवस तपास, नंतर खटला भरला जाणे, तो चालतांना रोज न्यायालयात होणारे वादविवाद आणि (हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनसुध्दा) त्यावर राजकारणी आणि इतर प्रसिध्द लोकांच्या टीकाटिप्पण्या वगैरे चाललेले होते, अर्ध्याहून अधिक दिवस ते मुखपृष्ठावर येत होते, क्वचित कधीतरी आतल्या पानांवर यायचे. शिवाय हुतात्म्यांचा होणारा (किंवा काही वेळा न होणारा) गौरव, त्यांच्या नातलगांच्या संबंधातल्या बातम्या, त्यावर त्यांचे अभिप्राय वगैरेंना बरीच प्रसिध्दी मिळत असे. या घटनांमध्ये ज्यांचा बळी गेला त्यातल्या काही जणांनी प्राणपणाने लढत असतांना आधी अतिरेक्यांना मारले होते किंवा त्यांच्यापासून इतर लोकांचे प्राण वाचवले होते. काहीजण लढायला गेले होते, पण प्रत्यक्ष कृती करण्याआधीच स्वतः हताहत झाले होते. इतर बहुसंख्य निरपराध लोक मात्र त्यांना काही समजण्याच्याही आधीच अतिरेक्यांच्या गोळीबाराचे शिकार झाले होते. या सर्वांना सरसकट हुतात्मे म्हणणे कितपत योग्य आहे? पण तसे केले जाते खरे.

जो एक अतिरेकी जीवंतपणे पोलिसांच्या हाती लागला तो जबर जखमी झाला होता. त्याला महत्प्रयासाने बरे कशाला केले? तो अद्याप जीवंत का आहे? त्याला जीवंत ठेवण्यासाठी (किंवा त्याची बडदास्त ठेवण्यासाठी) करदात्यांचा कोट्यावधी रुपये एवढा पैसा का खर्च केला जात आहे? असे प्रश्न विचारून त्या निमित्याने सरकारवर अद्वातद्वा तोंडसुख घेणे हा तथाकथित सुशिक्षित लोकांचा अत्यंत आवडता छंद झाला होता. कोठेही कोणीही चार लोक भेटले की हा विषय निघायचा आणि जो तो यथेच्छ मुक्ताफळे उधळून आपले मन मोकळे करून घ्यायचा. देशाच्या पंतप्रधानापासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सारे प्रवक्ते लोकसभेत किंवा इतरत्र जे सांगत असत ते कोणाही सर्वसामान्य माणसाला मुळी पटायचे नाही. या अतिरेक्यांनी केलेला अतिरेकाचा कहर लोकांच्या मनाला इतका भिडलेला आहे की ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजूनही आलेले नाहीत. मलासुध्दा कोणाचे समर्थन करावेसे वाटत नाही, पण सरकार म्हणजे कोणी एक व्यक्ती नसते आणि ते चालवणारी माणसे अधिकृतपणे गैरकायदेशीर मार्गाने वागू शकत नाहीत. 'अबतक छप्पन' एन्काउंटर्स वगैरे घडत असले तरी ते उघडपणे मान्य करणे किंवा त्यांचे समर्थन करणे कोणालाच शक्य नसते. न्यायालयात ज्या आरोपीला उभे केले जाते, त्यानेच गुन्हा केला आहे हे साक्षीपुराव्याच्या आधारावर सिध्द केले गेल्यानंतर फक्त न्यायमूर्तीच त्याला शिक्षा ठोठावू शकतात आणि पोलिसखात्यातील विशिष्ट हुद्दा धारण करणारी व्यक्तीच त्याची अंमलबजावणी करू शकते.

हा खटला उभा करण्यासाठी जेवढे (कदाचित शेकडो असतील) साक्षीदार आणि (कदाचित हजारो पाने) दस्तऐवज जमवले गेले, त्यात जेवढा वेळ गेला, त्याची गरज होती का? असे सामान्य माणसाला वाटणे साहजीक आहे. एका खुनासाठी एकच फाशी असते आणि अनेक गुन्ह्यासाठीसुध्दा फक्त एकदाच फाशी देता येते. मग इतका मोठा खटाटोप कशाला करायचा? त्यात वेळ आणि पैसा का घालवायचा? मुख्य म्हणजे न्यायनिवाडा करून गुन्हेगाराला शिक्षा करण्यात एवढा उशीर का लावायचा? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात. पण न्यायदानाच्या सध्याच्या व्यवस्थेचा विचार करता कदाचित ते आवश्यक असेल. हे करण्यामागे काही राजकीय उद्दिष्टेदेखील असू शकतात. ती उघड करणे हिताचे नसते.

प्रदीर्घ काळ चाललेला हा खटला अखेर संपला आणि हातात सापडलेल्या एकमेव गुन्हेगाराला अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठावली गेली. तरी त्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी लगेच झाली नाही. तो गुन्हेगार सरकारी खर्चाने बिर्याणी खात जेलमध्येच राहिला होता आणि त्याच्या सुरक्षेसाठी इतका कडक पोलिस बंदोबस्त केला गेला होता की आर्थर रोड जेलचा परिसरच एकाद्या किल्ल्यासारखा दिसत होता. अखेर राजकारणातली सोय पाहून एके दिवशी त्याला अत्यंत गुप्तपणे फांसावर लटकावले गेले आणि या विषयावर पडदा पडला.

तरीसुद्धा सन २००८ मधील २६ नोव्हेंबरच्या घटना आणखी बराच काळ आठवणीत रहाणार आहेत आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल बातम्या येत रहाणार आहेत.
...... संपादन दि. २६-११-२०१८

No comments: