
माणसाच्या आयुष्यात मनाचे स्थान सर्वात मोठे आहे हे सांगून झाले आहेच. आपल्या जीवनाच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर आपले मन बसलेले असते आणि रस्त्यामधले खड्डे किंवा अडथळे चुकवून, प्रसंगी वेग वाढवून किंवा धीमा करून आपल्या जीवनाला ते पुढे नेत असते. इतर लोक दहा मुखांनी दहा सल्ले देत असतात. त्यातला आपल्याला सोयीचा आणि लाभदायक असा सर्वात योग्य कोणता हे मनच ठरवते कारण सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव त्यालाच असू शकते. त्यामुळेच "ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे." अशी एक म्हण आहे. कोणतीही गोष्ट "करू, करू" असे नुसते तोंडदेखले म्हणणारे लोक सहसा कधी कृती करत नाहीत, पण एकाद्याने ते काम मनावर घेतले तर मात्र तो माणूस ती गोष्ट पूर्ण करतो. त्यासाठी त्याच्या मनाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. सांगाल तेवढेच काम करणा-या सांगकाम्याचा बैल रिकामाच राहतो तसेच यंत्रवत हालचालीमधून केलेल्या विचारशून्य कृतीमधून सहसा फारसे काही साध्य होत नाही. एकाद्या कार्यासाठी कायावाचामनसा वाहून घेतल्यानंतर ते सिध्दीला जाते. तनमनधन अर्पण करणे म्हणजे संपूर्ण समर्पण झाले. अर्थातच त्यात मनाचा वाटा फार मोठा आणि मोलाचा असतो. अनेक मार्गांनी धन मिळवता येते आणि दाम देऊन तन (मनुष्यबळ) विकत घेता येते पण मनावर मात्र दुसरा कोणीसुध्दा ताबा मिळवू शकत नाही. ते ज्याचे त्यानेच स्वेच्छेने अर्पण करावे लागते.
मनाचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखूनच समर्थ रामदासांनी अनेक मनाचे श्लोक लिहून जनतेच्या मनातल्या सज्जनाला आवाहन केले आणि त्याला उपदेशामृत पाजून सन्मार्गाला जाण्यास उद्युक्त केले. भक्तीमार्गाचा मार्ग धरून अंती मोक्षप्राप्ती करण्याचा उपदेश त्यात आहे असे वर वर पाहता वाटते. पण परमार्थ साधता साधता त्याआधी या जगात कसे वागावे याची सोपी शिकवण त्यात दिली आहे. शतकानुशतके पारतंत्र्यात भरडलेल्या मनांची मरगळ झटकून त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न या सोप्या पण मनाला भिडणा-या श्लोकांमधून समर्थांनी केला होता.
इतर साधूसंतांनीदेखील जनतेच्या मनालाच आवाहन करून भक्तीमार्गावर नेले. एकदा विठ्ठलाचे चरणी लीन झाल्यानंतर मनाला कोठेही जायला नको असे वाटते असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया ॥१॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगे खरे माप ॥४॥
संत एकनाथांनी हाच भाव वेगळ्या शब्दांमध्ये सांगितला आहे. एकदा त्या गोविंदाचा छंद लागला की दुसरी कसली काळजी नाही, दुसरा कसला विचारच मनात आणण्याची गरज नाही.
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद नि जसे रामरूप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ॥३॥
गोविंद हा जनी-वनी, म्हणे एका जनार्दनी ॥४॥
संत गोरा कुंभाराच्या जीवनावरील चित्रपटातल्या गीतात गदिमांनी या भावना अशा व्यक्त केल्या आहेत,
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ।।
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म ।
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म ।
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम ।।
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी ।
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी ।
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम ।।
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा ।
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा ।
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम ।।
तर गोरा कुंभार या नाटकातले अशोकजी परांजपे यांचे पद असे आहे,
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ।।
जन्म-मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्या हो जाहला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।
संत तुकारामाचे मन विठ्ठलाच्या चरणी रमले होते तर संत तुलसीदासाचे मन श्रीरामामध्ये विलीन झाले होते. खूप जुन्या काळातल्या तुलसीदास या नाटकातले गोविंदराव टेंबे यांचे पद असे आहे.
मन हो रामरंगी रंगले।
आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले ।।
चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले ।
भवतरंगी रंगले ।।
मन या विषयावर असंख्य गीते आहेत. त्यातली माझी आवडती तसेच तुफान लोकप्रिय असलेली काही गाणी निवडून या लेखाचा प्रपंच केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सगळ्याच रचना महान आहेत. त्यात गाठलेली विचारांची उंची आणि शब्दांमध्ये दडलेला गहन अर्थ समजून घेणे सोपे नाही. हे "विश्वचि माझे घर" किंवा "चिंता करतो विश्वाची" असे सहजपणे सांगून जाणा-या ज्ञानेश्वरांनी विश्वरूप परमात्म्याशी त्यांचे मन कसे एकरूप होऊन गेलेले आहे हे या अभंगात सांगितले आहे. यावर आणखी भाष्य करण्याची माझी योग्यताच नाही.
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥
. . . . . . . . . . . . . . (समाप्त)
No comments:
Post a Comment