Saturday, August 21, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ७व्हेन पंपामध्ये असलेल्या चक्रावरील व्हेन्स फिरता फिरता केसिंगमधील द्रवाला ढकलत बाहेर काढतात. वरील चित्रात दाखवलेले गीअर पंप आणि लोब पंपसुध्दा साधारणपणे याच तत्वावर काम करतात. मात्र या पंपामध्ये गीअर किंवा लोब्सच्या जोड्या बसवलेल्या असतात. यातील गीअरचे दाते क्रमाक्रमाने एकमेकात ग्ंतत आणि एकमेकांपासून विलग होत असतात. कोणत्याही यंत्रातल्या चाकाची गती कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अशीच रचना असते. मात्र गीअर पंपामधील दोन्ही चक्रे समान गतीने पण उलट दिशांनी फिरत असतात. केसिंगच्या मधल्या भागातले गीअरचे दाते एकमेकात गुंतत किंवा सुटत असतात त्याच वेळी विरुध्द बाजूचे दाते आपल्यासमोर असलेल्या द्रवाला पुढे ढकलत नेतात. या भागात गीअरचा दाता आणि केसिंगमध्ये अरुंद जागा असल्यामुळे हा द्रव केसिंगच्या डावीकडच्या भागातून उजवीकडच्या बाजूला येतो. डाव्या बाजूला असलेल्या दारातून तो केसिंगमध्ये येतो आणि उजव्या बाजूच्या पोर्टमधून बाहेर पडतो.

गीअर पंपामधून मोठ्या प्रमाणात प्रवाह निर्माण होत नाही, तसेच फार मोठा दाबसुध्दा निर्माण होत नाही. द्रवाला फक्त इकडून तिकडे ढकलण्याचे काम त्यातून होते. गिअर्समध्ये घर्षण होऊन झीज होऊ नये यासाठी त्या द्रवात लुब्रिकेटिंगचा गुण असणे आवश्यक असते. हा द्रव अतीशय तरल असला तर गीअरच्या दात्यांना त्यामधून फिरू देईल, त्यांच्याकडून ढकलला जाणार नाही. यामुळे जरासे चिकट किंवा व्हिस्कस अशा द्रवपदार्थांसाठी या पंपाचा उपयोग होऊ शकतो आणि वंगण, ग्रीज, मलम वगैरेंच्या कारखान्यात किंवा यंत्रांचे लुब्रिकेशन करण्याच्या योजनेत तसा तो केला जातो.

लोब पंपामध्ये पाकळ्यासारखे दोन, तीन किंवा चार लोब्स दोन वेगवेगळ्या शाफ्ट्सना जोडलेले असतात. ते एकाच गतीने पण विरुध्द दिशांनी फिरवले जातात. दोन गिअर्सचे दाते एकमेकांना ढकलत फिरतात. त्यातील एका चक्राला मिळालेली गती दुस-या चाकाला देण्याच्या कामासाठी नेहमी गिअर्सचा वापर होत असतो. तसे हे लोब्स करत नाहीत. त्यांना जोडलेल्या शाफ्ट्समार्फत ते समान गतीने पण वेगवेगळे फिरवले जातात. ते एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. पण फिरता फिरता दोन्ही लोब्स केसिंगमधील द्रवाला डाव्या बाजूच्या पोकळीतून उजव्या बाजूच्या पोकळीत ढकलम्याचे काम करत असतात. या पंपातले लोब्स द्रवाबरोबरच त्यात असलेल्या लहान सहान घन तुकड्यांनासुध्दा ढकलू शकतात. त्यामुळे सॉस, जॅम, लोणची यासारख्या खाद्यपदार्थांच्या कारखान्यात हे पदार्थ एका पात्रामधून दुस-या पात्रात टाकण्यासाठी आणि कॅन किंवा बाटल्यात भरण्यासाठी लोब पंपाचा उपयोग केला जातो. अर्थातच त्यातील सर्व भाग स्टेनलेस स्टीलसारख्या स्वच्छ धातूपासून तयार केले जातात.

No comments: