Monday, August 09, 2010

कौटुंबिक संमेलन - ६

खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात बरेच बदल करावे लागले.

आदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणा-या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन तिथपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता कमी झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.

नाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.
न्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.

आता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक कुटुंबामागे पक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच लाइट गेले आणि तो बंद पडला.

वीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.

. . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: