Tuesday, August 24, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ८आजच्या जगात नट आणि बोल्ट या वस्तू आपल्या सर्वांच्या ओळखीच्या असतात. या दोन्हींमध्ये हेलिकल आकाराचे आटे असतात. बोल्ट किंवा स्क्रूला हे आटे बाहेरच्या बाजूला असतात आणि नटाला एक गोल छिद्र पाडून त्याच्या आतल्या अंगाने हे आटे बनवलेले असतात. हे आटे एकमेकांना पूरक असल्यामुळे नट आणि बोल्ट एकमेकांमध्ये चांगले गुंतवता येतात. त्यानंतर बोल्टाला स्थिर धरून नट फिरवला की तो गोल गोल फिरत बोल्टाच्या आधाराने मागे किंवा पुढे सरकतो आणि नटाला स्थिर धरून ठेवले आणि तो बोल्ट गोल फिरवला तर तो फिरता फिरता मागे पुढे सरकतो हे सर्वांनी पाहिले असते. पण जर हा बोल्ट एका साध्या गोल छिद्रात घालून फिरवला, तर तो नुसता स्वतःभोवती फिरेल, मागे किंवा पुढे सरकणार नाही. त्या बोल्टवर कोरून काढलेले हेलिकल आटे आणि ते सरळ छिद्र यामध्ये असलेली रिकामी जागासुध्दा एका हेलिक्सच्या आकाराची असते. बोल्टच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही मोकळी जागासुध्दा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असते. मात्र त्या जागेत असलेली हवा, पाणी किंवा बारीक कण बोल्टाच्या आट्यांमुळे मागे किंवा पुढे ढकलले जातात.

या तत्वाचा उपयोग स्क्रू कन्व्हेयर्समध्ये केला जातो. धान्य, पीठ, सिमेंट, साखर यासारखे ढीग करता येण्याजोगे पदार्थ इकडून तिकडे करण्यासाठी असे कन्व्हेयर्स वापरतात. साध्या नटबोल्टमधले आटे समान आकाराचे असतात आणि त्यांना एकमेकात गुंतवल्यावर फारशी रिकामी जागा शिल्लक रहात नाही. या कन्व्हेयर्समध्ये या जागेचाच उपयोग करायचा असल्यामुळे स्क्रूचे दाते पातळ बनवून रिकामी जागा वाढवली जाते. घर्षण कमी करण्याच्या दृष्टीने घनपदार्थ वाहून नेणारे कन्हेयर्स अत्यंत धीम्या गतीने चालवावे लागतात. बहुतेक वेळा कन्व्हेयर्सची स्क्रूसारखी पाती आणि त्यांच्या भोवती असलेले बॅरल या दोन्ही गोष्टी पत्र्यापासून तयार केल्या जातात. त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन बिघाड होऊ नये म्हणून त्यात पुरेशी मोकळी जागा ठेवली असते.

या तत्वाचा उपयोग पंप आणि काँप्रेसरमध्येसुध्दा करता येतो. द्रव पदार्थांच्या वहनासाठी पंपाचा आणि वायुरूप पदार्थांसाठी काँप्रेसरचा उपयोग केला जातो. हे पदार्थ तरल असल्यामुळे बॅरल आणि स्क्र् यामध्ये जास्त फट ठेवली तर त्यातून ते परत मागे जाऊ शकतात. पंपाचा दांडा संथ गतीने फिरवला तर त्यांना मागे जाण्यासाठी अवधी मिळतो. यामुळे पंपाची कार्यक्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी पंपाची रचना करतांना द्रवाला ही संधी मिळू नये असा विचार केला जातो. कांही डिझाइन्समध्ये बॅरलच्या आत एक रबराचे लाइनर असते. स्क्रू जवळजवळ त्याला स्पर्श करत फिरतो. या लाइनिंगमध्ये हेलिकल आकार देऊन द्रवाला फिरत फिरत पुढे सरकण्याला मदत केली जाते. पंपाचा दांडा वेगाने फिरवला जात असल्यामुळे त्यावरले आटे द्रवाला पुढच्या बाजूला ढकलत राहतात.

कांही स्क्रू पंपांमध्ये फक्त एकच स्क्रू फिरत असतो तर कांहींमध्ये दोन स्क्रूंची जोडी असते. ही जोडी गिअर पंपासारखे काम करते. या प्रकारात संतुलन सांभाळले जाते. तिस-या एका प्रकारात इंपेलरलाच स्क्रूसारखा आकार दिला जातो. त्यातून इंपेलरच्या मुखात शिरता शिरता द्रवाचा दाब वाढत जातो. या पंपाची गणना मात्र सेंट्रिफ्यूगल प्रकारात होते.

No comments: