Sunday, November 22, 2009

स्पर्धा आणि यश

काय गंमत आहे? एकादी गोष्ट मिळावी म्हणून आपण जीवतोड प्रयत्न करतो आणि ती हाताला लागत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट कांहीसुध्दा प्रयत्न न करता आयती आपल्याकडे चालत येते. या ब्लॉगच्या बाबतीत हा अनुभव मला वारंवार येत गेला.

चार वर्षांपूर्वी ब्लॉग या प्रकाराचे अस्तित्वच मला माहीत नव्हते. खरे सांगायचे तर ईमेलच्या पलीकडे मी इंटरनेटचा वापरच करत नव्हतो. त्या काळी ज्या प्रकारचा संगणक आणि आंतर्जालाची सुविधा माझ्याकडे होती त्यावर यापेक्षा अधिक कांही करणे अशक्य नसले तरी ते कटकटीचे वाटायचे. सेवानिवृत्त झाल्यानंतर विश्रांतीसाठी मुलाकडे गेलो तेंव्हा माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ असायचा आणि त्याच्याकडला लॅपटॉप चोवीस तास इंटरनेटशी जोडलेला असायचा, त्याची स्पीडसुध्दा मी पूर्वी कधीही अनुभवली नव्हती इतकी चांगली होती. त्यामुळे मनमुराद सर्फिंग करायचा नाद लागला. आंतर्जालावर इकडे तिकडे भटकत असतांना ब्लॉगिंगचा शोध लागला आणि आपणही ते करावे असे वाटायला लागले. पण ते सगळे इंग्रजीत असायचे आणि फारच व्यक्तीगत स्वरूपाचे असल्यामुळे दहा वीस वाचल्यानंतर आणखी वाचावेसे वाटले नाही. पण आपण या सुविधेचा उपयोग कांही वेगळ्या प्रकारे करू शकू असे वाटले आणि धडपडत हा ब्लॉग कसाबसा सुरू करून दिला. त्यापूर्वी मराठीत ब्लॉग लिहिणारे आणखी कोणी आहेत याची मला कल्पनासुध्दा नव्हती आणि आपण लिहिलेले कोण वाचणार आहे हेही ठाऊक नव्हते.

सुरुवात करून झाल्यानंतर माझ्या ओळखीच्या जेवढ्या मराठीभाषिक लोकांचे ईमेल आयडी माझ्याकडे होते त्या सर्वांना मेल करून माझा हा प्रयत्न पहाण्याची विनंती केली. पण त्या काळात ज्या प्रकारचे काँप्यूटर त्या लोकांकडे होते त्यात देवनागरी अक्षरे दिसतच नव्हती. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मी लिहिलेल्या लिखाणाचा फोटो काढून ती अक्षरे चित्राच्या स्वरूपात द्यायला सुरुवात केली. ते थोडे कष्टाचे काम होते, शिवाय रोज उठून काय लिहायचे हा एक गहन प्रश्न होता. त्यामुळे नव्याची नवलाई चार दिवस झाली की हे बंद पडणार असे वाटले होते. त्या कालखंडात कांही अनोळखी मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी लिखाण चालू ठेवले. रोज अवांतर कांहीतरी लिहिण्याऐवजी एक विषय निवडून सलगपणे त्यावर कांही दिवस लिहायचे ठरवल्यामुळे मजकूर मिळत गेला. पण त्याच काळात ब्लॉगस्पॉटवर कांही तांत्रिक अडचण आल्यामुळे एक वर्षानंतर हा ब्लॉग चक्क बंदच पडला, म्हणजे मलाच तो उघडता येईनासा झाला. तोपर्यंत मी दुसरीकडे बस्तान बसवले असल्यामुळे लिखाण करायला वाव मिळत राहिला आणि तिकडे भेट देणा-या वाचकांची गर्दी हळूहळू वाढत गेली.

एक वर्ष सुषुप्तावस्थेत काढल्यानंतर मागच्या वर्षी या ब्लॉगला पुन्हा चैतन्य प्राप्त झाले आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी याहू ३६० आपला गाशा गुंडाळणार असल्याच्या वावड्या उठल्या. मधल्या काळात माझा काँप्यूटर आणि इंटरनेटसेवा या दोघांनीही कांत टाकून नवा जन्म घेतल्यानंतर त्यांची शक्ती वाढली होती आणि गूगलने ब्लॉगस्पॉटवर ताबा घेतल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढलेली दिसत होती या सर्व कारणांमुळे मला हुरूप आला आणि या ब्लॉगची दुसरी पारी मी उत्साहाने सुरू केली. आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची आहे असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. माझी स्पर्धा स्वतःशीच होती. आपणच पूर्वीपेक्षा वेगळे आणि वाचनीय असे कांही देऊ शकतो का यासाठी मी प्रयत्नशील होतो. ते करत असतांना इतर लोक काय करत आहेत हे पहायलासुध्दा मला फारसा वेळ मिळाला नाही.

अशातच अचानक एकदा ब्लॉगमाझाची जाहिरात समोर आली आणि आपले नांव देणे सोपे वाटल्यामुळे देऊन टाकले. आपली निवड व्हावी अशी इच्छा मनात होतीच हे नाकारण्यात कांही अर्थ नाही. पण त्यासाठी वेगळे काय करावे हे माहीतही नव्हते आणि ते जाणून घेऊन तसे करायचा प्रयत्नही केला नाही. या ब्लॉगस्पर्धेमध्ये कोणतेही निकष दिलेले नव्हते, त्यामुळे त्याचा विचार करून काही वेगळे असे कोणीच लिहिले नव्हते. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना
म्हणतात त्याप्रमाणे कोणाला खरी माहिती आवडते, तर कोणाला कल्पनाविलास, कोणाला विनोद भावतो तर कोणाला भावनाविवशता, कोणाला छायाचित्रे मोहवतात तर कोणी हौसेने व्यंगचित्रे काढतात, काही लोकांनी इतर अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची सोय करून दिली असते, तर जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्याची ओळख कोणी करून देतात. अशा विविध प्रकारांची तुलना करणे कठीण असते. परीक्षक महोदयांनी त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे त्यांना जे पसंत पडले त्या ब्लॉग्जची निवड केली आहे. त्यामुळे मिळालेल्या यशाने म्हणण्यापेक्षा कोणीतरी आपल्या प्रयत्नांची नोंद घेतली आहे या जाणीवेने मनापासून आनंद झाला.

ज्या लोकांनी माझे अभिनंदन केले आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि या स्थळाला भेट देत रहावे अशी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे. आपण लिहिलेले कोणी तरी वाचते आहे हे समजल्यामुळे जे समाधान मिळते ते मला शब्दात सांगता येणार नाही. ते मिळत रहावे एवढीच इच्छा !

----------------
माझ्या दुसऱ्या विषयावरील ब्लॉगवर आलेले हे प्रतिसाद या स्पर्धेशी निगडित असल्यामुळे खाली उद्धृत केले आहेत.

कांचन कराई said...
काका, स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्याबद्द्दल आपलं अभिनंदन!

भुंगा said...
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!

No comments: