आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली. पण आता मला शाळेत प्रवेश द्यायला कोणी तयार होईना आणि मी लुब्र्यासारखा शाळेच्या फाटकापाशी ताटकळत उभा राहिलो तरी आताची लेखकूमंडळी अमेरिकेपासून इंडोनेशियापर्यंत चहूबाजूला दूरवर पांगली असल्यामुळे त्यांना आमच्या गांवातल्या शाळेला भेट द्यायला जमेल असे वाटेना. म्हणून मीच त्यांच्या ई-अड्ड्यांना भेट देऊन कांही मिळते कां ते पहायचे ठरवले. मिसळपावाचे हॉटेल हा सध्याचा अतीशय गजबजलेला अड्डा असल्याचे कांनावर आल्यामुळे इथूनच सुरुवात केली. कांही स्वाक्षरीसंदेश दुसरीकडे मिळाले.
या अड्ड्यांवर येणारी थोडी मंडळी स्वतःच्या ख-या नांवाने वावरत असावीत. म्हणजे मी कांही त्यांची फोटो आयडेंटिटीज वगैरे पाहिलेली नाहीत, पण तशा प्रकारची नांवे कधीतरी वाचनात किंवा ऐकण्यात येतात. त्यातल्या दोन तीन लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला आणि ती त्याच नांवांची खरीखुरी माणसे असल्य़ाची खात्री पटली. पण इतरांबद्दल तसे सांगता येणार नाही. कधीही न ऐकलेली अफलातून नांवे मुलांना ठेवायची रुढी आजकाल पडत असली तरी मिपाच्या कट्ट्यावर दिसणारी कांही नांवे आपल्या मुलांना ठेवायला कोणतेही सूज्ञ आईवडील धजावतील असे वाटत नाही. त्यामुळे त्या सदस्यांनी स्वतःच ते बुरखे पांघरलेले असावेत असे दिसते. कांही सदस्य एक बुरखा पांघरून लिहीत असले तरी अधून मधून त्यातून बाहेर येऊन आपल्या एकाद्या टोपणनांवाने प्रतिसाद देतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे नांव पुन्हा गुलदस्त्यातच राहते.
तसे पहायला गेल्यास "नांवात काय आहे" असे चारशे वर्षांपूर्वी कोणी साहेब सांगून गेला आणि आजही बरेच लोक तेच वाक्य उच्चारत असतात या अर्थी त्यात कांही तथ्य असावे. त्यामुळे कुठल्या नावाने कोणी सही केली आहे इकडे फार लक्ष न देता त्यांनी स्वाक्षरीबरोबर दिलेले संदेश तेवढेच गोळा करायचा एक अल्पसा प्रयत्न मी केला आहे. यातले कांही लोक एका ओळीच्या चर्चाप्रस्तावावर पानभर लिहून खाली आपली संदेशपूर्ण सही करतात, तर कांहीजण पानभर लांबीच्या लेखाला "वाः", "मस्त", "जियो", "+१", "?", "!", "." असे गर्भित अर्थपूर्ण प्रतिसाद देऊन खाली दोन ओळींचा संदेश देतात. मी त्यांच्यात भेदाभेद केला नाही. संदेश गोळा करतांना वर लिहिलेला मजकूर सविस्तर वाचायला वेळ तरी कसा मिळणार म्हणा. माझ्या या संशोधनाला कोणी प्रायोजक न मिळाल्यामुळे मी आपल्या कुवतीनुसार फक्त एक लहानसा सँपलसर्व्हे केला आहे. ज्या सदस्यांचे महान संदेश यात आले नाहीत त्यांनी कृपया राग मानू नये. तसेच ज्यांचे संदेश मी घेतले आहेत त्यांनी सुध्दा मनात राग न आणता मी केलेल्या अडाणीपणाच्या टिप्पणीवर (वाटल्यास) हंसून घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. हे संदेश मी संकेतस्थळावरून जसेच्या तसे उचलले असल्यामुळे त्यातल्या व्याकरणाच्या चुका कृपया कोणी काढू नयेत आणि योगायोगाने त्या सापडल्याच तर मूळ लेखकाने जाणूनबुजून, कळून सवरून त्या केलेल्या आहेत असे समजून घ्यावे.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
हे वाक्य मालकांनी स्वतःच दिले आहे. संत तुकारामाच्या अभंगातला धनसंपदा हा शब्द त्यांनी हुषारीने टाळून संतसंगाऐवजी मिसळसंगाची आवड व्यक्त केली आहे. अलीकडच्या काळात त्यांना कार्यबाहुल्यामुळे मिसळपावसाठी पुरेसा वेळ मिळत नाही असे वाचनात आल्यानंतर मुक्ती आणि संपदा आता ज्याला नकोशा वाटायला लागल्या आहेत असा हा मिसळसाथी सदाभाऊ कोण असावा असा एक विकृत प्रश्न कांही लोकांच्या मनात उठतो म्हणे.
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
"Great Power Comes With Great Responsibilities"
A witty saying proves nothing.- Voltaire.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अशासारखी कांही वेचक (पण गुळगुळीत झालेली) सुभाषिते वाचायला मिळाली, मात्र वर लिहिलेला मूळ लेख आणि त्याला आलेले कांही प्रतिसाद पहाता मिसळीत शिरा मिसळून खात असल्यासारखे वाटले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
हे संदेश नक्कीच अंतर्मुख करणारे आहेत.
मिसळपावसंस्कृतीला साजेसे कांही संदेश आहेत. उदाहरणार्थ,
Drink Beer,
Save Water !!
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
यासारखे कांही खोचक संदेश दिसले. त्यातल्या तिस-या संदेशाचे
काय सांगावे .....,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच ते ...,बाकी सगळे शून्य !!
असे रूपांतरही केलेले पाहिले.
एका संदेशकाने संदेश न देण्याचे कारण असे लिहिले आहे,
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
तर दुस-या एकाने
प्रतिसादाचे सर्व अधिकार राखीव आहेत.
असे म्हणून सरळ सरळ मुस्कटदाबी केली आहे.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
असा एक संदेश आहे. त्यांनी लावलेल्या सुश्राव्य चालींचे कांही दुवे ते देत असतात, पण आमच्याकडे इंटरनेटचे अनलिमिटेड पॅकेज नसल्यामुळे यूट्यूबवरील गाणी पहातांना वेगाने वाढत जाणा-या मेगाबाईट्सकडे लक्ष जाते.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
यातली भाषा आणि आशय दोन्ही नीटसे समजत नाहीत. सगळी संस्थाने कधीची खालसा झालेली असल्यामुळे आता श्री सुध्दा त्याची इच्छा असली तरी कोणालाही शिवाशिवीच्या खेळातलेच राज्य तेवढेच देऊ शकेल असे दिसते.
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
ही बिहारीकरणाची चाहूल दिसते. भविष्यकाळात इथे खरोखरीच यूपीबिहारवाल्यांचे राज्यवा आवतवा झाले तर मराठीचा हा अवतार राजमान्य होईल. मर्दमराठे ती वेळ येऊ देणार नाही ही गोष्ट वेगळी.
पण समजा ती आली आणि उत्तरेकडून येणा-या रट्ट्यामुळे मराठ्यांना दक्षिणेकडे सरकावे लागले तर त्यांची भाषा कशी होईल याचे उदाहरण खाली पहाता येईल.
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
नागपूरकडच्या एकाने असे लिहिले आहे
पटता तो टेक. नहीं तो रामटेक.
यातला टेकमधला श्लेष थोडा समजला, पण रामटेकबद्दल कांहीच माहिती नसल्यामुळे उत्तरार्ध पार डोक्यावरून गेला, तसेच मी कुठल्याच बालाजीचा भक्त किंवा फॅन नसल्यामुळे या संदेशाचा अर्थ लागला नाही
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
एकाने असे लिहून जॉनी रावतची आठवण करून दिली.
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
या गांवढळ भाषेच्या बरोबर उलट गीर्वाणभाषेत एक संदेश की सूक्त असे कांहीतरी आहे
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
आपल्या संस्कृतप्रेमी विदूषी सध्या मिपावर दिसत नसल्यामुळे त्याचा अर्थ कुणाला विचारावा ते समजत नाही.
कांही सदस्य आपले बोधवाक्य बदलत असतात. माझ्या संशोधनात असे एक उदाहरण माझ्या चटकन लक्षात आले.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
असे मनसे व्यक्त केल्यानंतर त्यांनी देवाकडे असे मागणे मागितले,
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
मूळ इंग्रजी भाषेतील करेज आणि सिरीनिटी या दोन्ही शब्दांऐवजी शक्ती हा एकच सर्वसमावेशक शब्द वापरल्याने त्या वाक्याचा अर्थ पूर्णांशाने व्यक्त होत नाही असे वाटते. देवाकडे हे मागणे मागण्याची वेळ त्यांनी उर्दूमध्ये अशी सांगितली.
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. एकाद्या रंगलेल्या पार्टीत हातात जाम आणि लडखडाते कदम अशा अवस्थेत असतांना आमच्यासमोर नेमका कपाळाला गंधाचा उभा टिळा लावलेला एकादा साहेब हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन दत्त म्हणून उभा रहायचा आणि "व्वॉट्ट हॅप्पन्ड्ड इन् येस्ट्टरड्डेज मीट्टिंग्ग?" असले कांही विचारायचा तेंव्हा त्या क्षणी मला सारे त्यत्तीस कोटी देव आठवायचे.
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
हे त्यांचे बोधवाक्य ठळक अक्षरात लिहून समोर टांगून ठेवण्यासारखे आहे.
इतर कांही सदस्यांनीसुध्दा उर्दू शायरीचा आधार घेतलेला आहे, उदाहरणार्थ
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है
हे शेर तसे सरळसोपे दिसतात, पण यांचा जास्त सखोल अर्थ समजून घेण्याची इच्छा कोणाला असल्यास तर त्यासाठी सध्या आंतर्जालावर एक वेगळा धागा उपलब्ध आहे, त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा.
कांही प्रतिसादक आपल्या ब्लॉगचा दुवा आपल्या सहीच्या खाली देतात. त्यामागे एक थोडासा इतिहास आहे. जुन्या सदस्यांना तो माहीत असेलच. मिसळपावची स्थापना व्हायच्या आधीपासून कांही मराठी ब्लॉग सुरू आहेत, कांही नंतर उघडले गेले. आपल्या ब्लॉगवर लिहिलेले किंवा दुस-या एकाद्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले कांही निवडक लिखाण मिसळपाववर द्यायला सुरुवात झाली होती. पण "इतर जागेचे उष्टे खरकटे इथे कशाला आणता?" असा हल्ला झाल्यामुळे त्यातील कांहीजणांनी कानाला खडा लावला. त्यातले कांही लोक वाचकांच्या माहितीसाठी आपला पत्ता आपल्या सहीच्यासोबत देऊ लागले. इतरांनी त्याचे अनुकरण केले. ही माहिती देण्यातसुध्दा प्रत्येकाने आपापले वेगळेपण कसे दाखवले आहे ते पहा.
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
यातल्या शेवटच्या वाक्याचे असे विडंबनसुध्दा झाले आहे,
माझ्या या जागी चार ओळी रखडल्या आहेत, जमल्यास काढुन पहाव्यात.
अशी ही संदेशगाथा थोडक्यात दिली आहे.
No comments:
Post a Comment