Sunday, November 01, 2009
भुताटकीचा सोहळा - हॅलोविन
मागल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मी अमेरिकेत होतो. त्या वेळी दुकानांदुकानात चक्क भोपळे मांडून ठेवलेले दिसायला लागलेले पाहून गंमत आणि कुतूहल वाटले. त्यांची संख्या दिवसेदिवसे वाढतच होती. हे भोपळे भाजीपाला विभागात ठेवलेले नव्हते, तर मुख्य प्रवेशद्वारातून आंत शिरताच लक्ष वेधून घेतील अशा रीतीने चांगले सजवून मांडून ठेवलेले असत. चिरून त्यांची भाजी करण्यासाठी ते भोपळे मुळी नव्हतेच. खरे तर ते भोपळ्यासारखे दिसणारे लहान मोठ्या आकाराचे पोकळ ठोकळे असायचे. कांही ठोकळ्यावर काळ्या रंगात विचित्र चित्रे काढलेली होती, कांही भोपळ्यांच्या सोबत अशी चित्रे असलेले स्टिकर्स मिळत होते आणि कांही ठिकाणी तशी चित्रे कापून त्या भोपळ्याला तशा आकारांच्या खिडक्या केल्या होत्या आणि त्याच्या आंत दिवा लावून ठेवलेला असायचा. त्याच सुमाराला कपड्यांच्या विभागात खास प्रकारच्या ड्रेसेसचे पीक आले होते. फँटम, बॅटमॅन वगैरे कॉमिकमध्ये दाखवतात तसले अंगाशी तंग बसणारे काळे सूट आणि भुताखेतांची किंवा वटवाघुळांची भयानक चित्रे रंगवलेले टीशर्ट सगळीकडे विकायला ठेवले होते, शिवाय विचित्र प्रकारचे मुखवटे (मास्क) दिसत होते. ही असली कसली फॅशन आली आहे असे आधी वाटले, पण ही सगळी येणा-या हॅलोविन फेस्टिव्हलची तयारी आहे असे चौकशी करता समजले.
अमेरिकेत दर वर्षी ३१ ऑक्टोबरला हॅलोविन उत्सव साजरा केला जातो. कुठल्याच अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व न माननारे लोकसुध्दा मोठ्या हौसेने या भुताटतीच्या सोहळ्यात भाग घेतात. येशू ख्रिस्ताच्याही जन्माआधीपासून युरोपातल्या कांही आदिवासी जमाती अशा प्रकारचा दिवस साजरा करत असत. वर्षातून एक दिवस सर्व मृतात्मे त्यांना वाटल्यास जीवंत माणसांच्या जगात येऊन वावरतात अशी समजूत होती. त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून किंवा त्यांना बरे वाटावे म्हणून जीवित लोकसुध्दा त्या रात्री भुताखेतासारखा वेष धारण करून फिरत असत. त्यामुळे भूत कोणते आणि माणूस कोणता यातला फरक न समजल्यामुळे सुरक्षितता मिळावी अशी त्यांची धारणा होती. पुढे कांही वदंता या दिवसाला जोडल्या गेल्या. तसेच रोमन लोकांच्या कांही सणांची त्या आदिवासी सोहळ्याशी सांगड घातली गेली. ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाल्यानंतर क्रॉस धारण केल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळेल अशी खात्री वाटू लागली. ईश्वर आणि सैतान या दोघांचाही समावेश त्या लोककथांमध्ये झाला. अखेर अमेरिकेत त्याचा जास्तच प्रसार झाला असे दिसते.
मागच्या वर्षी हा दिवस ऐन आपल्या दिवाळीच्याच सुमाराला आला होता. आकाशकंदील लावून आणि दिव्यांची आरास करून आम्ही आपले घर मंगलमय करण्याच्या प्रयत्नात होतो तर आजूबाजूला कांही ठिकाणी भेसूर दिसणारे जॅक ओ लँटर्न दिवे टांगले होते. आमच्या घराजवळच एका बंगल्यापुढे तर भुते, पिशाच्चे, हडळी वगैरेंचे संमेलनच भरले होते. यातले कोणी झाडांना लटकत होते, कोणी भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यांना टांगले होते आणि कोणासाठी जमीनीवर खांब रोवले होते. त्यांच्यावर वटक ठेऊन त्यांच्यापासून माणसांचे रक्षण करण्यासाठी त्यातच एक क्रॉससुध्दा उभा करून ठेवला होता.
त्या दिवशी संध्याकाळी आम्ही अल्फाराटाच्या सर्वात मोठ्या मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये सगळीकडे हिंडतांना आपण मुलांच्या एकाद्या फँन्सी ड्रेसच्या पार्टीत गेल्यासारखेच वाटत होते. अगदी लहान मुलांना स्पायडरमॅन, हीमॅन वगैरेंसारखे थोडे सौम्य वेष घातले होते आणि त्या भलत्या वेषात ती कमालीची गोड दिसत होती. कांही मोठी मुले भयंकर वाटणारी रूपे घेऊन आली होती. भिन्न प्रकारच्या प्राण्यांचे मुखवटे घातलेली आणि मोठमोठे जबडे, सुळे, शिंगे वगैरे धारण करणारी माणसे शिवगण या नांवाने चित्रात दाखवली जातात तसे कांहीजण दिसत होते. या भागात आता आशिया आणि आफ्रिका खंडातल्या लोकांची मोठी संख्या असल्यामुळे त्यातल्या कांही लोकांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या देशातल्या समजुतींप्रमाणे राक्षसी रूप दिले होते. कित्येकजण नुसतेच मजेदार कपडे परिधान करून आले होते. अर्थातच सगळेजण आपापल्या आणि ओळखीतल्या मुलांचे फोटो काढण्यात मग्न असल्यामुळे आजूबाजूला सारखे कॅमे-यांचे फ्लॅश चमकत होते. मॉलमधले सगळे वातावरण उत्साहाने नुसते ओसंडत होते. कांहीही निमित्याने चार घटका मौजमजा करायची एवढ्याच उद्देशाने सगळेजण त्या ठिकाणी गोळा झाले होते.
भुताखेतांच्या अस्तित्वावर खरोखरच विश्वास ठेवणारे लोक आता अमेरिकेत फारसे भेटणार नाहीत. तिथल्या खेड्यापाड्यांमध्ये सुध्दा सगळीकडे दिव्यांचा लखलखाट झाल्यामुळे आता भुतांना रहायला अंधारी जागाच उरलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी कोणाला कांही करायची गरज वाटत नसते, पण तरीसुधादा एक गंमत म्हणून असे सण साजरे केले जातात. या निमित्याने भोपळे कोरून त्याचे लँटर्न बनवण्याच्या स्पर्धा होतात, तसेच या दिवशी भीतीदायक गोष्टी सांगण्याची चढाओढ लागते. त्या एका दिवशी घालण्यासाठी मजेदार कपडे तयार केले जातात. यातले बरेचसे चीन किंवा भारतातून आले असल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment