Monday, November 02, 2009

आयुधे, औजारे आणि यंत्रे - (भाग १ -४)

हा लेख आधी चार भागांमध्ये प्रकाशित केला होता. आता तो एकत्र करून आणि थोडे संपादन करून पुनर्प्रकाशित केला आहे दि.१० डिसेंबर २०१८

आयुधे, औजारे आणि यंत्रे - (भाग १)


आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला. अशा दोन प्रकारांनी त्याची क्षमता वाढली. हिंस्र पशूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा दुबळ्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करण्यासाठी त्याने हा वार केला असला तर ते त्याचे आयुध झाले आणि झाडाचे फळ तोडण्यासाठी किंवा काटेरी झुडुप बाजूला करण्यासाठी असेल तर ते त्याचे औजार झाले. क्षमतेपेक्षा जास्त परिणाम साधणे हाच या दोन्हीमागील मुख्य उद्देश असतो. ज्या कामासाठी संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज नसते ती करतांना आयुधे आणि औजारांच्या वापराने आपले काम सोपे होते. या दोन्हीमधला हा अन्यौन्य संबंध अनादिकालापासून चालत आला आहे.

इतर प्राण्यांच्या मानाने मनुष्यप्राणी अधिक बुध्दीमान असल्यामुळे निरीक्षण, परीक्षण, आकलन वगैरेंद्वारे तो नव्या गोष्टी शिकत गेला आणि नवे प्रयोग करून आपली क्षमता वाढवत गेला. हातातले दांडके कठीण आणि बळकट असेल आणि त्याचे टोक अणकुचीदार किंवा धारदार असेल तर ते जास्त परिणामकारक ठरेल, ते फेकून मारले तर त्याचा मारा कांही अंतरावर असलेल्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकेल वगैरे गोष्टींचा विचार करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांच्या सुधारित आवृत्या काढत गेला. इतर प्राणी मात्र निसर्गदत्त नखे, शिंगे, सुळे वगैरेंचाच उपयोग करीत राहिले. त्यामुळे त्यांना नामोहरम करणे माणसाला अधिकाधिक सोपे होत गेले, हिंस्र पशूंची भीती कमी झाली. गाय, बैल, घोडा आदि कांही पशूंना तर त्याने वेसण घातले आणि कधी त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारून तर कधी मायेचा हात फिरवून व प्रेमाने खायला चारा देऊन त्यांना आपल्या सेवेला जुंपले. सुरुवातीच्या काळात निसर्गात आपोआप वाढलेल्या अरण्यात अन्न शोधत फिरत असतांनाच माणसाने निरनिराळ्या वनस्पतींचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातल्या आपल्या उपयोगाच्या वनस्पतींची मुद्दाम लागवड करून त्यापासून धान्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पैदास करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्याचे जीवन इतर पशूंपेक्षा खूप वेगळे झाले. ते करण्यासाठी आयुधांची तसेच औजारांची निर्मिती करून तो त्यांचा उपयोग करत गेला.

आदिमानवाने हातात मिळालेल्या दांडक्याचा तडाखा दुसऱ्या माणसालाही मारलाच असणार. पण तोसुध्दा बुध्दीमान असल्यामुळे त्याने जास्त चांगले दांडके हातात घेऊन प्रतिकार केला असणार. अशा प्रकारे माणसामाणसांमधील शस्त्रस्पर्धा आदिमानवाच्या काळापासून सुरू झाली आणि अजून ती चाललेलीच आहे. माणसाची जसजशी प्रगती होत गेली तसतसा त्याच्या हातातील आयुधांच्या रूपात फरक पडत गेला. अग्नी कसा पेटवायचा, कसा प्रज्वलित ठेवायचा आणि कसा विझवायचा हे आत्मसात केल्यानंतर आणि त्यात कशाकशाची आहुती घालता येते याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पूर्वी अशक्य असलेली अनेक कामे तो करू लागला. खनिज पदार्थांपासून विविध धातू, मुख्यतः लोखंड आणि त्यापासून पोलाद तयार करण्याच्या कलेने त्याच्या जीवनात प्रचंड फरक पडला. त्यापासून तलवार, कट्यार, खंजीर यासारखी आयुधे तयार करता आली आणि त्याचे कणखर टोक अग्रभागी बसवल्यामुळे बाण आणि भाला यांची मारक शक्ती अपरंपार वाढली. त्याचप्रमाणे लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड, जमीन खणण्यासाठी कुदळ व पहार, दगडमातीचा ढिगारा उपसण्यासाठी फावडे, ती वाहून नेण्यासाठी पाटी, स्वयंपाक करण्यासाठी तवा, परात, कढई वगैरे असंख्य आयुधे, औजारे व उपकरणे त्यापासून तयार करता येऊ लागली. प्राचीन इतिहासकाळाच्याही आधी या प्रकारच्या अनेक गोष्टी माणसाच्या वापरात आल्या होत्या. इतिहासातात नोंदल्या गेलेल्या सर्व लढाया अशा आयुधांचा उपयोग करूनच लढल्या गेल्या होत्या. ही आयुधे तयार करण्यासाठी विविध प्रकारची औजारे त्या काळात उपलब्ध झालेली असणारच. या दोन्हींचा विकास एकमेकांच्या बरोबरीने होत राहिला.

लोखंड तयार करण्याचे काम घरोघरी करता येत नाही. लोखंडाचे खनिज सगळीकडे सापडत नाही. ते अत्यंत उच्च तपमानापर्यंत तापवण्याचे काम घरातल्या चुलीत होऊ शकत नाही. ते खास प्रकारच्या भट्टीतच करावे लागते. त्यानंतर वितळलेल्या लोखंडाचा अती ऊष्ण रस साच्यात ओतायचे काम साध्या हाताने किंवा लाकडाच्या औजाराने करणे शक्य नसते. त्यासाठी खास प्रकारची साधनसामुग्री लागते. ती आधी तयार व्हायला हवी. प्राचीन काळात कुठल्याच प्रकारची स्वचालित यंत्रसामुग्री अस्तित्वात नसल्यामुळे सारी कामे माणसांच्या हातातले बळ आणि त्यांची सहनशक्ती यांच्या मर्यादेत राहूनच करावी लागत. त्यामुळे कांही थोड्या ठिकाणीच अल्प प्रमाणात लोखंड तयार केले जात असे आणि व्यापाराद्वारे ते इतरत्र पोचत असे. लोखंडाच्या गोळ्याला तो मऊ होण्याइतपत तापवून ऐरणीवर ठेवणे आणि घणाच्या घावाने त्याला हवा तसा आकार देणे ही कामे तुलनेने सोपी आणि अनेक ठिकाणी करता येण्याजोगी असल्यामुळे लोहारकाम मात्र गांवोगांवी होऊ लागले आणि त्यातून शस्त्रे आणि औजारे तयार होऊ लागली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कोठल्याही धातूचा उपयोग आजच्या मानाने कमीच असे. घरोघरी मातीच्या चुली तर असतच, पण मातीचीच गाडगी, मडकी असत. श्रीमंत लोकांकडे रांजण असतील. धान्यधुन्य ठेवण्यासाठी दगडामातीपासून बांधलेली कोठारे, हौद किंवा पेवे असत.

.. . . . . . . . . .(क्रमशः)

----------------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग -२

शस्त्र चालवण्यातली निपुणता, बाहूबल, मनाचा खंबीरपणा, जिद्द, समयसूचकता वगैरे अनेक वैयक्तिक गुणांचा युध्दात विजय संपादन करण्यात मोठा वाटा असतो हे जरी खरे असले तरी सैनिकाच्या हातात चांगले शस्त्र आले तर या सगळ्या गुणांचा परिणाम कांही पटींनी वाढतो. ज्या सैन्याकडे उच्च दर्जाची शस्त्रे होती, त्यांचीच युध्दात सरशी होत गेली असे इतिहासात बहुतेक वेळा घडले आहे. त्यामुळे सर्व शासनकर्त्यांना आपले सैन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्य ठेवणे आवश्यक असे. ज्यांनी तिकडे दुर्लक्ष करून विलासोपभोगाकडे अधिक लक्ष दिले त्यांची अधोगती होत गेली, कांहींची तर दुर्गती झाली.

माणसाने अग्नीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याचा उपयोग प्रत्यक्ष संहार करण्यासाठी सुध्दा केला जाऊ लागला. सर्वसामान्य माणसाकडे लाकूड, कापूस, खाद्य तेल यासारखे जे ज्वलनशील पदार्थ असत त्यांचा संहारक उपयोग विरोधकांच्या घराला किंवा साठ्याला आग लावण्यापुरताच मर्यादित असे. अशा वस्तू युध्दभूमीवर वाहून नेण्यात विशेष फायदा नव्हता. पण कांही अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग लढाईसाठी होऊ लागला. शत्रूच्या खेम्याला आग लावणे, त्याच्या सैन्यातील जनावरांना बिथरवणे, त्याची शस्त्रास्त्रे उध्वस्त करणे, त्याच्या तटबंदीला सुरुंग लावून त्यात खिंडार पाडणे अशासारखी कामे करता येऊ लागली. एकाद्या नळीमध्ये हा स्फोट घडवून आणला तर त्यातून एकादे अस्त्र दूर भिरकावता येईल अशी कल्पना कुणाला सुचली असली तरी अशी भक्कम नळकांडी कुठून आणायची हा प्रश्न होता. निसर्गात उपलब्ध असलेली वेळूची नळी वापरली तर मोठ्या स्फोटामुळे तिच्या जागच्या जागीच ठिकऱ्या होऊन गेल्या असत्या. मात्र अशा छोट्याशा नळीत थोडीशी दारू भरून ती बाणाच्या टोकाशी ठेऊन ते बाण शत्रूवर सोडायचे प्रयोग चीनमध्ये झाले. लक्ष्यावर जाऊन आपटल्यावर ती दारू पेट घेत असे किंवा धनुष्यातून सोडल्यावर जळत जळत पुढे जात असे. त्याला एक प्रकारचे अग्नीअस्त्र म्हणता येईल.

माणसाला प्राचीन कालखंडातच चाकाचे महत्व समजले. लाकडापासून बनवलेल्या चाकांच्या आधारावर उभे असलेले गाडे त्याने बनवले आणि बैल, रेडे, घोडे, उंट यासारख्या पशूंच्या बलाचा वापर करून त्यावरून वाहतूक सुरू केली. अशाच तत्वावर बांधलेल्या रथात बसून राजे महाराजे युध्दभूमीवर आपल्या सैन्याचे नेतृत्व करू लागले. पराक्रमी वीरांना अतीरथी, महारथी यासारखी बिरुदे देत असत. औजारे बनवण्याच्या कामात चाकाचा चांगलाच उपयोग झाला. कुंभाराचे लाकडाचे चाक, विहिरीतून पाणी उपसण्याचा रहाट ही कांही उदाहरणे झाली. पण ती चाके तयार करण्यासाठी सुताराने चाकावर फिरणाऱ्या यंत्रांचाच उपयोग केला असणार. लेथ या प्रकारच्या यंत्रात लाकडाच्या ठोकळ्याला गोलाकार देता येतो आणि ड्रिल या प्रकारच्या यंत्राने त्यात गोल आकाराचे भोक पडते. त्या भोकात वर्तुळाकार दांडा बसवता येतो. या दोन प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करून वेगवेगळ्या आकाराची आधी लाकडाची आणि नंतर लोखंडासह निरनिराळ्या धातूंची चाके आणि गोल आकाराचे दांडे यासारखे सिलिंडर तयार होऊ लागले.

पूर्वीच्या काळात ही यंत्रे माणसांनी हातानेच फिरवावी लागत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे किती मोठ्या आकारमानाची व वजनाची वस्तू त्यातून निर्माण करता येईल यावर मर्यादा येत असे. एक मोठे चाक आणि एक लहान चाक पट्ट्याने एकमेकांना जोडून या मर्यादा वाढवण्याचे तंत्र तयार झाले. दाते असलेली चाके (गियरव्हील्स) तयार करून ती थेट एकमेकांना जोडली जाऊ लागल्यावर त्यांची मालिका करता येणे शक्य झाले. त्यांचा उपयोग करून एकादे लहान चक्र खूप वेगात फिरवणे तसेच अवाढव्य आकाराचे चक्रदेखील हाताच्या जोराने (हळूहळू) फिरवणे या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. चाकाला विशिष्ट प्रकारचा दांडा जोडून चाक फिरवताच तो दांडा पुढे मागे किंवा वरखाली सरकवता येऊ लागला किंवा दांड्याला सरळ रेषेत गती देऊन त्याला जोडलेले चक्र गोल फिरवणे शक्य झाले. अशा अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत औजारांच्या जोडीला यंत्रे आली. यंत्रांच्या सहाय्याने लोखंडाला अनेक प्रकारचे आकार देता येणे शक्य झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची रचना करणे शक्य झाले. शेती, विणकाम, सुतारकाम, लोहारकाम वगैरे अनंत व्यवसायात लागणारी औजारे तयार करण्याचे काम सोपे झाले. या यंत्रांचा उपयोग आयुधे तयार करण्यासाठी प्रामुख्याने होऊ लागला. त्यातून चाकू, सुऱ्या, कात्र्या वगैरे बनू लागल्याच, पण कट्यारी आणि तलवारींना आकार देणे, त्यांना धार लावणे वगैरे कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ लागली. शस्त्रांचे कारखाने उभे राहिले.
. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
------------------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ३

धातूंपासून नळ्या तयार करता येऊ लागल्यावर लहानमोठ्या आकाराच्या तोफा तयार करण्यात यश मिळाले. अवजड तोफा वाहून नेण्यासाठी त्यांना गाड्यावर ठेवले जात असे किंवा चाके जोडली जात आणि जनावरांना जुंपून त्या ओढून नेल्या जात. तोफेच्या नळकांड्यात दारू ठासून भरत आणि त्याच्या पुढे दगडाचा किंवा लोखंडाचा गोळा ठेवला जाई. दारूच्या आतपर्यंत जाणारी एक कापसाची वात असे. ती पेटवली की जळत जळत तिची ज्वाला दारूपर्यंत पोचे आणि तिचा क्षणार्धात स्फोट होऊन त्या ज्वलनातून खूप वायू निर्माण होत. ते वायू मर्यादित जागेत कोंडले गेल्याने त्याचा दाब वाढत जाई आणि त्या दाबाच्या प्रभावाखाली तो गोळा वेगाने बाहेर फेकला जात असे. नळीतून जातांना मिळालेल्या दिशेने दूरवर जाऊन तो खाली पडत असे. आभाळातून अचानक आलेल्या या यमदूताचा प्रतिकार करणे शत्रूला शक्यच नसल्यामुळे त्याची दाणादाण उडत असे. शत्रूसैन्यावर दुरून मारा करण्यात तोफ अतीशय परिणामकारक असली तरी ती धनुष्यबाणाची जागा घेऊ शकत नव्हती. ती अवजड असल्यामुळे वेगाने वाहून नेता येत नसे आणि घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात नेणे तर कठीणच असे. शिवाय एक बार उडाला की दुसरा बार भरायला वेळ लागत असे. त्यामुळे हातघाईच्या लढाईत तिची अडचणच होत असे. लहान आकाराच्या नळ्यांचा उपयोग करून हँडगन्स, बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करण्यात आली. ही शस्त्रे आणि त्यांसाठी लागणारा दारूगोळा सैनिक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत. मोठ्या तोफांचा उपयोग खास कामांसाठी केला जाऊ लागला. युध्द चालले नसतांना फुरसतीच्या काळात या तोफा किल्ल्यांच्या तटबंदीच्या आड आणि बुरुजांवर नेऊन ठेवल्या जात. चालून येणाऱ्या शत्रूसैन्यावर दुरून गोळाफेक करून त्यांची वासलात लावली जात असे. तसेच किल्ल्याला वेढा घालून बसल्यावर त्याच्या लाकडी दरवाज्याला किंवा विटांच्या तटबंदीला तोफेच्या सहाय्याने खिंडार पाडून आंत प्रवेश मिळवला जात असे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत राहिले. तोफेसारख्या लांब नळीतूनच वेगाने गोळा सोडण्याएवजी एक दट्ट्या हळूहळू पुढेमागे ढकलणे, त्याला दांड्याद्वारे चक्राला जोडणे, पाणी उकळून त्याची वाफ करणे, ती मजबूत पात्रात साठवणे, पाइपातून दुसरीकडे नेणे, तिच्या दाबावर आणि प्रवाहावर झडपांद्वारे नियंत्रण ठेवणे अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीची एकमेकींशी सांगड घालण्याचे प्रयत्न होत होते. अशा प्रयत्नांमधून वाफेच्या दाबाने सिलिंडरमधून पिस्टनला आतबाहेर ढकलून त्याला जोडलेले चाक फिरवण्यात यश मिळाले. त्या यंत्राची रचना अशी केलेली होती की एकदा हे इंजिन सुरू केले की जोपर्यंत बॉयलरमध्ये वाफ तयार होत राही तोपर्यंत तो पिस्टन सतत आतबाहेर करत राही आणि त्याला एका दांड्याने जोडलेले चक्र सतत फिरत राही. हे सगळे आज सोपे वाटत असले तरी त्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या भागांची कल्पना करून त्याबरहुकूम त्यांची निर्मिती कार्यशाळेत करता येणे आवश्यक होते. यंत्रांच्या विकासाने एवढी मजल मारल्यानंतरच ते शक्य झाले. वाफेचे इंजिन बनवल्यानंतर त्याच्या रूपाने ऊर्जेचा एक नवा अखंड स्रोत सापडला. त्यापूर्वी अग्नीचा उपयोग फक्त ऊष्णता निर्माण करण्यासाठी होत असे. आता अग्नीच्या शक्तीवर चाके फिरू लागली. वाहत्या वाऱ्यावर फिरणाऱ्या पवनचक्क्या आणि पाण्याच्या प्रवाहाने फिरणारी जलचक्रे त्याआधी निघाली होती, पण अग्नीवर चालणारे इंजिन सोयिस्कर जागी ठेवणे आणि केंव्हाही हवा तितका वेळ चालवणे शक्य असल्यामुळे ते जास्त सोयीचे होते.

यंत्रांची चाके फिरवण्याचे काम हाताने करणाऱ्याच्या शक्तीला मर्यादा असत, तसेच तो माणूस थोड्या वेळात थकून जात असे. घोडे किंवा बैल यांच्या शक्तीचा उपयोग मुख्यतः गाडा ओढण्यापुरताच होत असे. उसाचा चरक, तेलाची घाणी यासारखी कांही थोडी यंत्रेच जनावरांकडून फिरवली जात असत. वाहता वारा, पाण्याचा प्रवाह वगैरेंच्या सहाय्याने चाक फिरवणे कांही थोड्या जागी कांही विशिष्ट परिस्थितीतच शक्य असल्यामुळे अशा यंत्रांचा उपयोग मर्यादित होता. पण वाफेच्या इंजिनाने या सगळ्या मर्यादा पार केल्या. जितक्या मोठ्या आकाराचे इंजिन तयार करता येतील, जितक्या प्रमाणात वाफ निर्माण करून तिचा दाब वाढवत नेता येईल आणि जितक्या वेगाने झडपांची उघडझाप करता येईल तितकी जास्त शक्ती त्या इंजिनात असेल. या सगळ्या बाबीत सुधारणा करत जाऊन अधिकाधिक जास्त अश्वशक्ती असलेली इंजिने तयार होऊ लागली. पूर्वी जितकी यांत्रिक कामे माणसांच्या बाहुबलाने होत असत ती इंजिनाच्या ताकतीवर अनेकपट जोमाने आणि वेगाने होऊ लागली. त्यामुळे अधिकाधिक सक्षम यंत्रे विकसित होत गेली. रुळावरून धांवणारी रेल्वेगाडी, पाण्यात चालणारी जहाजे, कापड विणण्याचे माग, खाणीतून खनिजांचे उत्खनन करून ते जमीनीवर आणण्याची यंत्रणा, त्यापासून धातू बनवण्याचे काम करणाऱ्या भट्ट्या आणि त्याला आकार देणारी यंत्रे अशी असंख्य उदाहरणे देता येतील. या सर्वांचा उपयोग करण्यात शस्त्रनिर्मितीला अग्रक्रम मिळाला. तोफा, बंदुका वगैरेंचे कारखाने धडधडू लागले तसेच त्यांच्या गुणवत्तेत सतत वाढ होत राहिली. युरोपमधील देशांनी या बाबतीत आघाडी मारल्यामुळे ते देश शस्त्रसज्ज झाले आणि त्याच्या जोरावर त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली.
. . . ...... . . . . . . . (क्रमशः)
-------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ४

यंत्रयुग सुरू झाल्यावर यंत्रांचा विकास प्रचंड वेगाने होत गेला. त्यांच्या सहाय्याने जमीनीतून पेट्रोलियम तेल काढण्याला सुरुवात केल्यानंतर वाफेच्या अवजड इंजिनांच्या जागी तेलावर चालणारी सुटसुटीत इंजिने आली. त्यामुळे अधिक कारखाने सुरू झाले, रस्त्यावर मोटारी धांवायला लागल्या आणि आकाशात विमाने उडू लागली. वीजनिर्मिती आणि पुरवठा करणे शक्य झाल्यानंतर विजेवर चालणारी जास्तच सोयिस्कर यंत्रे घराघरात तसेच कारखान्यात आली. अधिकाधिक कणखऱ आणि बळकट अशा मिश्रधातूंचे उत्पादन, त्यांना ठोकून, लाटून, कापून आणि घासून हवा तसा आकार देणे, अशा विशिष्ट आकारांच्या तुकड्यांची जोडणी करून गुंतागुंतीची अवजड यंत्रे तयार करणे शक्य झाले. या सर्वांचा परिणाम अधिकाधिक प्रभावी शस्त्रास्त्रे तयार होण्यावर झालाच. अवजड तोफांच्या जागी वेगवान रणगाडे आले तसेच त्यांना निकामी करणारे बाँब आले. आगबोटींना बुडवण्यासाठी टॉर्पेडोज आले तसेच आगबोटीवरून मारा करण्यासाठी खास प्रकारच्या तोफा आल्या. साध्या बंदुकांऐवजी मशीनगन्स, रॉकेट्स वगैरे गोष्टी आल्या. अनेक प्रकारची अतीवेगवान आणि चपळ विमाने तयार झाली. त्यातून जमीनीवर बाँबहल्ले करणे, पॅराशूटमधून सैनिकांना खाली उतरवणे, अतीशय उंच जाऊन जमीनीवरील ठिकाणांचे निरीक्षण करणे अशी अनेक प्रकारची कामे करता येऊ लागली. ही सगळी शस्त्रास्त्रे म्हणजे खास स्वरूपाची यंत्रेच होती. माणूस हाताने जे काम करू शकतो त्याहून जास्त काम, अधिक वेगाने आणि सफाईने करणे हा प्रत्येक यंत्राचा उद्देश असतो. ही विनाशकारी यंत्रे हाताळणारे सैनिक प्रचंड प्रमाणात विध्वंस करण्याचे काम झपाट्याच्या वेगाने सहजपणे करू शकत होते. यामधील कांही आयुधे शांततेच्या काळात तयार झाली तर कित्येक शस्त्रे पहिल्या दोन महायुध्दांच्या काळात युध्दपातळीवर प्रयत्नांची शर्थ करून तयार केली गेली. ते साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानात भर घालावी लागत गेली हे ओघाने आलेच.


अणुबाँबच्या महाभयंकर विस्फोटाने दुसरे महायुध्द संपले. असे महाविध्वंसक अस्त्र आपल्याकडे असलेच पाहिजे अशा विचाराने अनेक राष्ट्रांनी ते तयार करण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्ता ज्यांच्यापाशी होती अशा महासत्तांनी ते तंत्रज्ञान मिळवले, अधिकाधिक शक्तीशाली बाँब बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आणि आपले विध्वंसक सामर्थ्य जगाला दाखवून दिले. ही अस्त्रे शत्रूच्या ठिकाणांवर नेमकी नेऊन टाकण्यासाठी अधिकाधिक पल्ला आणि क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तयार केली गेली. त्यासाठी शक्तीशाली अग्निबाण तयार होत असतांना त्यांच्या सहाय्याने अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात टेहळणी करून माहिती मिळवणे हे त्यांचे मुख्य काम असे. या उपग्रहांबरोबर संपर्क साधण्यासाठी आणि त्यांनी पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक संदेशप्रणाली आणि संगणक यांचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे दुसऱ्या महायुध्दानंतरच्या काळात अणुशक्ती, अग्निबाण, उपग्रह आणि संगणक यांच्या तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने जी प्रगती झाली तिच्या मुळाशी शस्त्रास्त्रस्पर्धा हे एक प्रमुख कारण होते.

असे असले तरी या तंत्रज्ञानाचा माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक प्रकारे फायदाही झाला. अणुशक्तीच्या सहाय्याने विजेची निर्मिती होऊ लागली, उपग्रहामुळे सर्वच प्रकारच्या संदेशवहनात क्रांती झाली. दूरचित्रवाणीमुळे जगभरातले कार्यक्रम घरबसल्या पाहता येऊ लागले आणि दूरध्वनीतून पृथ्वीच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या माणसाबरोबर संभाषण करणे सहज शक्य झाले. घरोघरी संगणक आले आणि आंतर्जालाच्या माध्यमातून लेखी मजकूर, आवाज आणि चित्रे अशा सर्वांची देवाणघेवाण क्षणार्धात करता येऊ लागली. जेथे जाऊ तेथे सांगाती नेता येणाऱ्या मोबाईल फोनमधून असे संदेश जिथे असू तिथे मिळू लागले. वसुधैव कुटुंबकम् अशी मनाची तयारी झाली नाही पण आपण ग्लोबल व्हिलेजचे नागरिक झालो. ही सगळी कमाल या नव्या काळातल्या यंत्रांमुळेच होऊ शकली.

या उपयुक्त सुविधांचा दुरुपयोग करून कांही अतिरेकी विध्वंसक कृत्ये करत आहेत. यामुळे यंत्र आणि शस्त्र, औजार आणि हत्यार यांच्यामधील जवळीक अधोरेखित होते. शस्त्रास्त्रे उदंड झाल्यामुळे मानवजातच समूळ नष्ट होणार असल्याचे भाकीत डूम्सडेवाले कधीपासून करताहेत, त्याचप्रमाणे पूर्वी दिवसभर राबून जेवढे काम होत असे ते आता यंत्रांच्या सहाय्याने चुटकीसरशी होऊ लागले तर उरलेल्या वेळात माणूस काय करेल अशी काळजी काही लोकांना लागली आहे. प्रत्यक्षात मात्र जिकडे पहावे तिकडे माणसेही उदंड होतांना दिसत आहेत आणि तरीसुध्दा बालवाडीतल्या मुलापासून त्याच्या पेन्शनर आजोबापर्यंत कोणाकडेही मोकळा वेळ नसतो. माझ्यासारखा निरुद्योगीसुध्दा हा असला लेख लिहायला काढतो आणि डेडलाईन येईपर्यंत तो टंकत बसतो.

. . . . . . . . . . (समाप्त)

No comments: