Sunday, March 15, 2009

दुर्मिळ अंक


३० जानेवारीला हुतात्मा दिवस असेही म्हणतात. महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणासाठी हे नांव दिले गेले. मी दोन भागात हौतात्म्य हा लेख लिहिला होता तेंव्हा त्याचे स्मरण होणे साहजीकच आहे. त्यानंतर तीन चार दिवसांनीच योगायोगाने माझ्याकडच्या संग्रहातले एक जुने पान हाती लागले. ते लोकसत्ता दैनिकाने पांच वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेल्या महात्म्यांच्या निधनाच्या भयंकर वृत्ताचे प्रकाशन दुसरे दिवशी म्हणजे ३१ जानेवारी १९४८ च्या लोकसत्तेच्या अंकात कसे दिले होते याचे छायाचित्र या पांच वर्षांपूर्वीच्या अंकात दिले होते. त्या काळात आधुनिक संदेशवहनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे कुठल्याही माहितीचे ताबडतोब प्रसारण होणे अशक्यच असणार. त्यामुळे संध्याकाळी घडलेल्या दुःखद घटनेची माहिती लवकरात लवकर म्हंटले तरी रात्री छापून दुसरे दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात देणे क्रमप्राप्त होते. या अंकाचा एक विशेष सांगायचा झाला तर तो मोफत वाटला गेला होता. त्या अंकाचा प्रचंड खप होणार हे निश्चित असूनसुध्दा तत्कालिन वृत्तपत्र व्यवसायाने अशा भीषण घटनेतून आर्थिक फायदा उठवण्याचा विचार केला नव्हता.


कै. ग.त्र्यं. माडखोलकर या सुप्रसिध्द साहित्यिक संपादकाने त्या घटनेच्याही दोन वर्षे आधी "जो जळेल तोच जाळील" या मथळ्याखाली महात्मा गांधींवर लिहिलेला अग्रलेख या पांच वर्षांपूर्वी प्रसारित केलेल्या लोकसत्तेच्या अंकातच १९४८ सालच्या जुन्या लोकसत्तेच्या अंकाच्या चित्राच्या सोबत छापलेला होता. जातीय दंगे थांबावेत, हिंदू आणि मुसलमानांत दिलजमाई व्हावी यासाठी प्रयत्न करतांना "या जातीविद्वेशाच्या ज्वाळा मी विझवीन तरी किंवा त्यात मी स्वतः भस्म होऊन जाईन." असे उद्गार महात्माजींनी काढले होते. त्या संदर्भात माडखोलकरांनी हा अग्रलेख लिहिला होता. यादवांमधील आपसातले युध्द टाळता न आल्याने भगवान श्रीकृष्णांनी एका क्षुद्र असा निमित्याने अवतारसमाप्ती केली, दधिची महर्षींनी योगबलाने आत्मनाश करून घेतला आणि वृत्रासुराला मारण्यासाठी वज्रनिर्मिती करायला आपल्या अस्थी इंद्राला दिल्या, दक्षकन्या सतीने आणि भीष्मावर चिडलेल्या अंबेने होमकुंडात उडी घेतली वगैरे पुराणातले दाखले देऊन या असाध्य वाटणा-या परिस्थितीत महात्माजींचे काय होईल अशी चिंता व्यक्त केली होती. त्यात जी भीती व्यक्त केली होती त्याप्रमाणे विद्वेषाचा वडवानळ शांत झाला नाहीच, दुर्दैवाने त्यात अखेर त्यांचीच प्राणज्योत मावळली.


ही दुर्मिळ माहिती (पांच वर्षांपूर्वी) पुरवल्याबद्दल मी लोकसत्ताचा आभारी आहे.

1 comment:

Anonymous said...

धन्यवाद.. सुंदर माहीती दिलित त्या बद्दल....
सुंदर लेख आहे. सामाजिक बांधिलकीची जाण हल्ली कमी झालेली आहे . तेंव्हा नुकतेच स्वराज्य मिळाल्यामुळे प्रत्येक माणसाला "स्वराज्याची" आणि "स्वराज्यासाठी मिळवण्यासाठी लढलेल्या लोकांबद्दल" रिस्पेक्ट होता.

तो अग्रलेख वाचायला आवडेल..