Thursday, September 25, 2008

महाराष्ट्र देश


आपले महाराष्ट्र हे राज्य आपल्या भारत या देशाचा एक भाग आहे हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे, पण "बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।" आणि "मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा । प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।" अशासारख्या सुप्रसिद्ध जुन्या कवितांमध्ये 'महाराष्ट्रदेश' असे वर्णन आले आहे. या गीतांचे कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि गोविंदाग्रज या सुविद्य व्यक्तींना महाराष्ट्र हा एक देश नसून ते एक राज्य आहे इतकी साधी गोष्ट माहीत नव्हती कां त्यांच्या मनांत भारतातून फुटून निघून महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश बनावा असे देशद्रोही विचार होते असे कोणाला वाटेल. पण तसे कांहीसुद्धा असणे शक्य नाही. मग नेमका काय घोळ आहे?

पहायला गेले तर 'देश', 'प्रदेश', 'राज्य', 'राष्ट्र' वगैरे शब्द जुनेच आहेत, पण या शब्दांचा जो अर्थ आपण काढतो तो मात्र तितकासा जुना नाही. एका राजाच्या अंमलाखालील प्रदेश म्हणजे 'राज्य' या अर्थाने हा शब्द प्राचीनकालापासून रूढ होता. मोठा बलशाली राजा असेल तर तो सम्राट या नांवाने ओळखला जात असे व इतर राजे त्याचे मांडलीक बनून रहात. त्या सर्वांचे मिळून त्याचे 'साम्राज्य' बनत असे. शंभर वर्षापूर्वी जगातील पांचही खंडांत इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा केनिया, युगांडा यांप्रमाणेच इंडिया किंवा हिंदुस्तान हा त्याचा भाग होता. आपल्या सोयीसाठी इंग्रजांनी आधी त्यातून बर्मा (ब्रम्हदेश किंवा आताचा मायनामार) व सिलोन (आताची श्रीलंका) वेगळे केले व स्वातंत्र्य देण्यापूर्वी हिंदुस्तानाचे विभाजन करून त्यातून भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले. या शिवाय हैदराबाद व म्हैसूरसारखी प्रचंड आकाराची तसेच सांगली वा जमखंडी यासारखी छोटेखानी अनेक संस्थाने इंग्रजांच्या अधिपत्याखाली होती. तेथील संस्थानिकसुद्धा स्वतःला 'राजे' म्हणवून घेत व त्यांचे संस्थान हे त्यांचे 'राज्य' असे. माझ्या लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकांत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यू.एस्.ए.) चा उल्लेख 'अमेरिकेची संयुक्त संस्थाने' असा केला जात असे. ब्रिटिश इंडियाची विभागणी मुंबई, मद्रास, बंगाल, पंजाब इत्यादि इलाख्यांमध्ये (प्रॉव्हिन्सेसमध्ये) केलेली होती.

इंग्रजी साम्राज्याला विरोध करून स्वातंत्र्याचा लढा देणा-या स्वातंत्र्यवीरांनीच 'देश' आणि 'राष्ट्र' हे शब्द आज रूढ असलेल्या अर्थाने प्रचारात आणले असावेत. आता ते 'कंट्री' आणि 'नेशन' या इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द वाटतात. पण भौगोलिक सीमारेषा दाखवणारा 'कंट्री' हा शब्द आणि त्या सीमांमध्ये राहणा-या लोकांचा समूह म्हणजे 'नेशन' इतका स्पष्ट फरक 'देश' आणि 'राष्ट्र' या शब्दांचा उपयोग करतांना केला जात नाही व हे दोन्ही समानार्थी शब्दच असावेत असे वाटते. संपूर्ण हिंदुस्तान हा एक देश असावा ही भावनाच इंग्रजांना मान्य नव्हती व त्यांना सोयीची नव्हती. शिवाय ते इकडे येण्यापूर्वीसुद्धा तो अनेक राज्यांमध्ये विभागला गेलेला होताच. त्यामुळे त्या काळात आपण व आपल्या ओळखीच्या व्यक्ती रहात असलेल्या जागेच्या आजूबाजूचा आपल्या परिचयाचा भाग तेवढा 'देश' आणि त्याच्या पलीकडील सगळा अपरिचित भाग 'परदेश' या अर्थाने हे शब्द वापरले जात असावेत असे जुनी पुस्तके वाचतांना वाटते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी सगळी संस्थाने खालसा करून त्यांच्या अंमलाखालील भूभाग भारतीय संघराज्यात विलीन करून घेतल्यानंतर जुनी राजेशाही संपुष्टात आली होती. त्यानंतरच्या काळात भारताची जी फेररचना करण्यात आली त्यात 'राज्य' या शब्दाला नवीन अर्थ दिला गेला, त्याची नव्याने व्याख्या केली गेली. 'प्रांत' हा त्या काळी प्रचारात असलेला शब्द बदलून त्याऐवजी 'राज्य' या संस्कृत शब्दाला प्राधान्य दिले गेले व अनेक 'राज्यां'चे मिळून भारतीय 'संघराज्य' करण्यात आले. तसेच भारत हा एक 'देश'असे सर्वसामान्यपणे समजले जाऊ लागले.

खरे तर 'प्रदेश' हा 'देशा'पेक्षा मोठा असायला हवा. पण त्याचा संकोच करून 'उत्तर प्रदेश', 'मध्यप्रदेश', 'आंध्रप्रदेश' अशी नांवे राज्यांना दिली गेली. त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र' हे राष्ट्रापेक्षा महान असले पाहिजे, पण खूप काळ घासाघीस करून शेवटी ते नांव आपल्या राज्याला देण्यात आले. यासाठी मोठा लढासुद्धा दिला गेला होता. हे करतांना फक्त व्याकरणाचा विचार न करता कांही परंपरा व लोकांच्या भावनांना महत्व देण्यात आले.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही कविता ज्या काळांत लिहिल्या गेल्या तेंव्हा 'राज्य' ही संकल्पनाच वेगळी होती आणि 'देश' शब्दाचा तत्कालिन रूढ अर्थही वेगळा होता. पण महाराष्ट्राचा भूगोल आणि इथल्या रहिवाशांच्या पूर्वजांनी रचलेला इतिहास या दोन्हींचे अत्यंत मार्मिक वर्णन या दोन्ही कवितांमध्ये दिले आहे आणि त्या अजरामर झालेल्या आहेत. इंग्रजांच्या राज्यात मराठी भाषा बोलणारी जनता मुंबई व मध्यप्रांतात तसेच हैद्राबाद संस्थानात विभागून इतर भाषिक लोकांबरोबर रहात होती. १ मे रोजी आपण जो महाराष्ट्रदिन साजरा करतो त्या दिवशी मुख्यतः मराठीभाषिक लोकांची वस्ती असलेल्या या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करून त्याचे एक वेगळे राज्य बनवण्यात आले. ही एक प्रशासनिक पुनर्रचना होती. यापूर्वीसुद्धा तेथील मराठी लोक व त्यांची संस्कृती अस्तित्वात होतीच. महाराष्ट्राचा 'जन्म' त्या दिवशी झाला म्हणजे तिथे पूर्वी कांही नव्हते अशातला भाग नाही. 'महाराष्ट्र' या नांवाच्या एका राज्याचा नवा प्रशासनिक कारभार त्या दिवशी सुरू झाला.

No comments: