Friday, September 26, 2008

स्व.मोगूबाई आणि श्रीमती किशोरीताई


हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात गुरुशिष्यपरंपरेला अपरंपार महत्व आहे. शिष्याने किंवा चेल्याने अत्यंत लीनवृत्तीने गुरूकडून कणाकणाने विद्या संपादन करायची आणि गुरूजी किंवा उस्तादजी यांनी अगदी श्वासोच्छ्वास आणि शब्दोच्चारापासून संगीताचा संपूर्ण अभ्यास त्याच्याकडून चांगला घोटून घ्यायचा अशा पद्धतीने या दिव्य शास्त्राचा प्रसार पिढ्यानपिढ्या होत आला आहे. संगीतज्ञांच्या घरी जन्माला आलेल्या मुलांना तर त्याचे बाळकडू अगदी जन्मल्यापासूनच मिळायला सुरुवात होते. श्रेष्ठ अशा पितापुत्रांच्या अनेक जोड्या या क्षेत्रात होऊन गेल्या आहेत, पण स्व.मोगूबाई कुर्डीकर आणि श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची अत्युच्चपदापर्यंत पोचलेली आई व मुलगी यांची अद्वितीय जोडी आहे.


स्व.मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म गोव्यातील कुर्डी या गांवी १५ जुलै १९०४ रोजी झाला. गोड आवाजाची देणगी मिळालेल्या आपल्या मुलीने संगीताच्या क्षेत्रात चांगले नांव मिळवावे असे त्यांच्या आईला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या गायनाच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आधी स्थानिक देवालयात होणारी भजने वगैरे शिकल्यानंतर तिला एका संगीत नाटक कंपनीत पाठवण्यात आले. नाटकांत कामे करण्यासाठी त्या सांगलीला आल्या. तेथे त्यांची संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांच्याबरोबर भेट झाली. पुढे अल्लादियाखाँसाहेब मुंबईला आल्यावर त्यांच्याबरोबर त्याही मुंबईला आल्या. त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायनाचे शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य प्राप्त केले. आवाजाची दैवी देणगी, खाँसाहेबांची तालीम आणि कठोर परिश्रम यांच्या योगावर त्या स्वतः उच्च कोटीच्या गायिका झाल्या. देशभरातील अनेक मंचावर त्यांनी आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. संगीत नाटक
अकादमी आणि संगीत रिसर्च अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळाले भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ही पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. त्या जशा स्वतः उत्कृष्ट गायिका होत्या तशाच फारच चांगल्या शिक्षिका ठरल्या. पद्मा तळवलकर, कमल तांबे, सुहासिनी मुळगांवकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड यासारख्या त्यांच्या शिष्यगणानेही दिगंत कीर्ती मिळवली आणि जयपूर घराण्याचे नांव पसरवले.


या सर्व शिष्यवर्गात मेरूमणी शोभेल असे सर्वात ठळक नांव त्यांच्या सुकन्या किशोरी आमोणकर यांचे आहे. किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ रोजी झाला. कळायला लागल्यापासूनच त्यांनी आपल्या आईकडून शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि लवकरच जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीत नैपुण्य मिळवले. जयपूर घराण्याचा मूळ बाज कायम ठेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि गायन कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःची अशी अद्भुत शैली निर्माण केली आहे. आजच्या जमान्यातल्या त्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायिका मानच्या जातात. त्या श्रेष्ठ गायिका तर आहेतच, पण बुद्धीमत्ता, विद्वत्ता, व्यासंग आदि अनेक गुण त्यांच्या अंगात आहेत. संगीतशास्त्राचा तसेच संगीतविषयक साहित्याचा त्यांनी खूप अभ्यास केला आहे. त्यावर सखोल विचार केलेला आहे. या सा-या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या गायनात दिसून येतो.


शास्त्रीय संगीतातील ख्यालगायन तर त्या करतातच, पण ठुमरीसारखे उपशास्त्रीय संगीत, भावपूर्ण भावगीते
आणि भक्तीरसाने ओथंबलेली भजने त्यांनी गायिलेली आहेत. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडी निघालेल्या आहेत आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. त्याद्वारे त्यांचे गायन आता जगभर घरोघरी पोचले आहे. त्यांचा कोठलाही सार्वजनिक कार्यक्रम ऐकायला दुरून येऊन श्रोते गर्दी करतात आणि तो हाउसफुल झाल्याशिवाय रहात नाही.


किशोरीताई कांहीशा शीघ्रकोपी आहेत अशी एक समजूत पसरवली गेलेली आहे. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी रंगमंचावरील वादक साथीदार, मंचामागील संयोजक आणि समोरील श्रोतृवृंद हे सगळेच त्यांच्या धाकात असल्यासारखे वाटते. त्यांचे गाणे सुरू असतांना कोणाचा मोबाईल वाजता कामा नये, कोणीही त्याचे रेकॉर्डिंग करू नये वगैरे सूचना कडक शब्दात दिल्या जातात आणि त्यांचे कसोशीने पालनही होते. पण एकदा त्यांचे गाणे रंगात आले की सारेजण आपोआपच ब्रम्हानंदात विलीन होऊन जातात. कांहीतरी अद्भुत आनंद घेऊनच प्रत्येक श्रोता सभागृहाच्या बाहेर पडतो.


किशोरीताईंनासुद्धा पद्मविभूषण या पदवीने सन्मानित केले आहे. हा खिताब मिळालेली आई व मुलगी यांची ही एकमेव जोडी असावी. त्याशिवाय त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. इतर सन्मानांची तर गणनाच करता येणार नाही. अशी आहे ही माता व कन्या यांची अद्वितीय जोडी.

No comments: