Tuesday, September 16, 2008

गणेशोत्सव आणि पर्यावरण - ४


गणेशोत्सव चाललेला असतांना होत असलेले ध्वनिप्रदूषण आणि रस्ते अडवले गेल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व त्यामुळे होणारी वाहनांच्या धुरातली वाढ हे त्याचे दुष्पपरिणाम पर्यावरणावर होतात. या दोन्ही गोष्टी बहुतकरून सार्वजनिक उत्सवांमुळेच होतात. घरगुती गणेशोत्सवातून तसल्या प्रकारचा विपरीत परिणाम तो उत्सव चालला असतांना होत नाही. पण उत्सव संपून गेल्यानंतर गणेशाची मूर्ती व सजावटीचे सामान निसर्गाच्या सुपूर्द केले जाते त्यातून पर्यावरणाचे प्रदूषण होते असा आक्षेप त्यावर घेतला जातो. हे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी लोकांकडून अनेक उपायही सुचवले जातात. त्यांचा थोडा परामर्ष या लेखात घ्यायचा आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी एक नवी मूर्ती आणण्याएवजी एक सुंदर मूर्ती घरात आणून ठेवावी आणि तीच दरवर्षी उत्सवात मांडावी असा एक स्तुत्य विचार दिवसेदिवस प्रबळ होत आहे. हा मार्ग सोपा, परिणामकारक, खात्रीपूर्वक आणि वेळ, श्रम व पैसे या सर्वांची बचत करणारा असल्यामुळे खरे तर लगेच लोकप्रिय व्हायला हवा होता, पण तो व्यवहारात आणण्यात कांही भावनात्मक अडचणी आहेत.
एकाद्या मूर्तीमध्ये आज देवाची वसती आहे आणि उद्या ती नाही असे समजणे मनाला विसंगत वाटते हे त्यामागील मुख्य कारण आहे. पहायला गेलो तर हा विचार कांही अगदी नवा नाही. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुरुवातीलाच गणपतीचे प्रतीक म्हणून पाटावर एका सुपारीची स्थापना करतात. यथासांग पूजाविधी संपल्यानंतर उत्तरपूजा झाली की त्यातले विघ्नहर्ता गजानन अंतर्धान पावतात आणि ती पुन्हा साधी सुपारी होऊन जाते असे मानले जाते. दुसरे दिवशी गणपतीसमोर पानावर ठेवून त्याला अर्पण केलेल्या सुपारीबरोबरच प्रत्यक्ष गणपती झालेली सुपारी निर्विकारपणे गोळा केली जाते आणि सर्व सुपा-या मिसळून जातात हे आपण पाहतो. पूजा करणारा हे सगळे एक उपचार म्हणून करतो. त्या सुपारीतल्या गजाननाबद्दल त्याच्या मनात विशेष भक्तीभाव निर्माण होत नाही. इतर दर्शनार्थी लोकांचे तर त्याच्याकडे लक्षसुध्दा जात नाही. त्यामुळे दुसरे दिवशी ती सुपारी कातरून खातांना आदल्या दिवशी तो गणपती होता कां असा विचार करावा असे कोणालाही वाटतसुध्दा नाही. पण गणेशोत्सवाची गोष्ट वेगळी आहे. एकदा ज्या मूर्तीला प्रत्यक्ष देव मानून त्याची आपण भक्तीभावाने पूजा व आराधना करतो, त्याची मनोभावे प्रार्थना करतो, आपले सर्व मनोरथ तो पूर्ण करेल अशी अपेक्षा धरतो त्या वेळी आपल्या मनात त्या मूर्तीविषयी दृढ असे भावबंध निर्माण होतात. त्यानंतर ती मूर्ती म्हणजे एक साधी शोभेची वस्तू आहे असे समजणे कठीण आहे. रोजच्या रोज त्याची यथासांग अर्चना करणे आपल्याला शक्य नसते, पण ती केली नाही तर त्याचा अधिक्षेप होईल. तो होऊ नये म्हणून त्या मूर्तीचे जड अंतःकरणाने विसर्जन केले जाते. ते सुध्दा त्यानंतर कोणाकडूनही त्याचा अवमान होऊ नये अशा प्रकारे केले जाते.
कांही लोक वंशपरंपरेनुसार घरातला कुळाचार पाळण्यासाठी गणपतीचा उत्सव करतात. स्थळकाळानुसार त्याच्या विधीत थोडेफार बदल करणे त्यांना भाग पडत असले तरी शक्य असलेली कोणतीही गोष्ट ते मुद्दाम बदलत नाहीत. तसे केले तर आपल्यावर ईश्वरी प्रकोप होईल अशी धास्ती त्यांच्या मनात असते. ज्या लोकांच्या मनावर असे संस्कारच नसतात त्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची एवढी गरज वाटत नाही आणि जे निव्वळ हौस म्हणून करतात त्यांना दर वर्षी नाविन्य हवे असते. अशा अनेक कारणांमुळे गणेशोत्सवासाठी एकच कायम स्वरूपाची मूर्ती आणून ठेवण्याच्या सूचनेला कमी प्रतिसाद मिळत असावा.
घरगुती गणेशोत्सवात मूर्ती लहान असावी की मोठी हा मुद्दा गौण असतो. हार, फुले, दुर्वा वगैरे वाहिल्यानंतर गजाननाची लंबोदर तनु झाकली गेली तरी त्याचे सुमुख आणि वरदहस्त दिसायलाच हवेत एवढा तरी त्याचा किमान आकार असतो. एका माणसाने ती मूर्ती उचलून हातात धरून तिला विसर्जनाच्या स्थानापर्यंत नेणे त्याला शक्य होईल इतपत ती मोठी असते. या दोन्ही आकारमानात प्रचंड तफावत नसते.
गणपतीची मूर्ती मातीचीच असावी, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असू नये असा आग्रह धरतात आणि तो योग्यही आहे. मातीची मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात जाऊन निराकार बनते तसे प्लॅस्टरचे होत नाही. त्यामुळे त्यामागील हेतू साध्य होत नाही. प्लॅस्टर हे कृत्रिम द्रव्य नैसर्गिक मातीएवढे पर्यावरणमित्र नसते हा वेगळा मुद्दा आहे. सर्वसामान्य भाविकाला या दोन्हींमधला फरक समजत नाही आणि कदाचित ओळखताही येत नाही. मात्र तांत्रिक व आर्थिक कारणांमुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग वाढतच चालला आहे ही खेदाची गोष्ट आहे.
कांही उत्साही लोकांनी कागदाचा उपयोग करणे हा तिसरा पर्याय सुचवला आहे. पार्ल्याच्या महाजनांनी ओरिगामी या जपानी पध्दतीने कागदाच्या घड्या घालून त्यातून गणपतीचा आकार निर्माण केला आहे. एक कलाप्रकार म्हणून त्याचे कौतुक केले तरी अशा आकाराची मूर्त्ती पाहून मनात भक्तीभाव निर्माण होईल की नाही ते सांगता येणार नाही.
गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नवनव्या कल्पना मांडल्या जात आहेत. त्यापासून नेमके काय साध्य होऊ शकेल ते मला समजत नाही. कोणी घरातच एका टबात मूर्तीचे विसर्जन करतात. त्यानंतर ते पाणी बागेतल्या झाडांना घालतात म्हणे. ते जर झाडांना अपायकारक नसेल तर प्रदूषणाचा मुद्दाच कोठे येतो? आणि जर कां ते अपायकारक असेल तर पर्यावरणावर घातक परिणाम झालाच ना! बोरीवलीचे महाजन मात्र ती माती वर्षभर जपून ठेवतात आणि पुढल्या वर्षी तिच्यातून नवी मूर्ती स्वतः घडवतात. त्यांनी वेगळ्या कारणासाठी या कामाची सुरुवात केली होती, आता त्याला पर्यावरणमैत्रीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा गोष्टी खास लोकच करू शकतात.
गणपतीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी खास कृत्रिम टाक्या बनवल्या जात आहेत, पण त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही, कारण त्यातल्या पाण्याचे पुढे काय करणार याबद्दल कोणीच कांही बोलत नाही. "ते पाणी सांडपाण्याबरोबर वाहण्यासाठी सोडून दिले जाईल आणि त्याच्या तळातली माती डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकली जाईल" असे सांगितले तर गणेशभक्त आपली मूर्ती तिथे विसर्जित करायला तयार होणार नाहीत. ते सगळे पाणी आणि गाळ यांचे समुद्रात किंवा तलावात विसर्जित करणेही कठीण आहे. शिवाय ते कुठेही सोडले तरी पुन्हा पर्यावरणावर परिणाम करायला मोकळे आहेच. म्हणजे त्यातून प्रदूषण कमी कसे होणार हेच मला तरी समजत नाही.
"आपल्या मूर्तीचे विसर्जन झाले ना, आता पुढे त्याचे कांही का होईना." असा विचार किती सामान्य भाविक लोक करतील? "परमेश्वर विश्वाच्या अणुरेणूत भरलेला आहे, जसा तो समुद्राच्या पाण्यात आहे तसाच तो गटारातदेखील आहे." इतके तत्वज्ञान ज्यांना फक्त समजलेच नव्हे तर उमगलेही आहे असे गाढे विद्वान किंवा "पाणी म्हणजे एचटूओ" असे मानणारे वैज्ञानिक अशी मंडळीच बहुधा अशा प्रकारचे विसर्जन करायला तयार होत असावीत.
पूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाच्या गणेशोत्सवातून फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होण्याची शक्यता नसते. कारखाने व वाहने यांमुळे वातावरणावर जेवढा परिणाम रोज होत असतांना दिसतो त्यात त्याच्या मानाने अगदी अल्पशी भर वर्षातून एकदा उत्सव साजरा करतांना पडली तर तो करतांना त्याला अपराधीपणा वाटत नाही. कांही मंडळींनी यावर संशोधन करून या दोन्हींची आंकडेवारी दिली आहे. त्यातूनही असेच दिसते. अशा कारणांमुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जे उपाय सांगितले जात आहेत ते आचरणात आणण्याच्या आवाहनांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही.
. . . . . . .(क्रमशः)

No comments: