Sunday, September 28, 2008

निघालो अमेरिकेला

चीन आणि चिनी लोक यांच्याबद्दल लहानपणी मला खूप कुतूहल वाटायचे, तरुणपणी त्यांच्याबद्दल चीड,
संताप आणि द्वेष वाटायला लागला. त्या नकारात्मक भावना सौम्य होऊन आता थोडे कौतुक वाटू लागले आहे असे मी या अनुदिनीमध्या मागच्या महिन्यात लिहिले होते. यू.एस.ए. किंवा बोलीभाषेत अमेरिका या देशाबद्दल लहानपणापासूनच जास्तच गुंतागुंतीच्या संमिश्र भावना मनात उमटत होत्या आणि आजही थोड्या फार फरकाने त्या तशाच जटिल आहेत.

अमेरिकेच्या इतिहासाबद्दल माझे ज्ञान कोलंबसाच्या सफरीपासूनच सुरू होते. पृथ्वी गोल आहे याची खात्री
पटल्यानंतर पश्चिमेच्या दिशेने गेल्यास पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानला जाणारा जवळचा मार्ग मिळेल अशा आशेने तो उलट्या दिशेने निघाला. अमेरिकेच्या किना-याजवळची कांही बेटे पाहून त्याला हिंदुस्थानच सापडल्याचा भास झाला. त्याचे दमलेले सहकारी आणखी पुढे जायला तयार नव्हते आणि आपण लावलेला हिंदुस्थानचा शोध कधी एकदा आपल्या राजाला सांगतो असे कोलंबसला झाले होते. त्यामुळे अधिक खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता तो तिथूनच परतला. पुढे अमेरिगो व्हेस्पुसी वगैरे लोकांनी कोलंबसाने शोधलेला भूभाग वेगळाच असल्याचे दाखवून दिल्यानंतर त्या खंडाचे नांव अमेरिका असे ठेवण्यात आले आणि कोलंबसाला सापडलेल्या बेटांना वेस्ट इंडीज म्हणायला सुरुवात झाली. अमेरिकेतले मूळचे प्रवासी मात्र 'इंडियन'च राहिले. भारतीयांपासून त्यांचा वेगळेपणा दाखवण्याकरता त्याला कधी कधी 'रेड' हे विशेषण जोडण्यात येते. त्यानंतर युरोपियन लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे गेल्या आणि त्यांनी तिथे नंदनवन फुलवले.

अमेरिका ही जगातील सर्वात धनाढ्य व बलाढ्य अशी महासत्ता अशीच मला या गोष्टी समजायला लागल्यापासून या देशाची ओळख आहे. खेड्यातल्या श्रीमंत सावकाराबद्दल गरीब शेतक-याच्या मुलाला जे कांही वाटत असेल किंवा गल्लीतला पोर अमिताभ बच्चनसंबंधी कसा विचार करेल तशीच माझी अमेरिकेबद्दल भावना असायची. दबदबा, आदर, वचक, असूया, कौतुक वगैरे सगळ्या परस्परविरोधी भावना त्यात आल्या. अमेरिकेसंबंधी माहिती तर सतत कानावर पडतच असायची. तिकडे घरातल्या माणसागणिक उठायबसायच्या आणि झोपायच्या वेगळ्या खोल्या आणि फिरायला वेगळ्या मोटारी असतात वगैरे ऐकून अचंभा वाटायचा, तसेच हे पहायला आणि उपभोगायला तिकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हायची.

अमेरिकेत आधी गेलेल्या युरोपियन लोकांनी स्थानिक लोकांची निर्घृण कत्तल केली तसेच आफ्रिकेतून पकडून आणलेल्या निग्रो लोकांना पशूसारखे वागवून त्यांच्याकडून ढोरमेहनत करून घेतली वगैरेंच्या कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्यांच्या आजच्या समृध्दीचा पाया त्यांच्या पूर्वजांच्या अशा अमानुष वागणुकीवर रचलेला आहे हे विसरता येत नाही. पण आज अमेरिकेत असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाइले जातात, तसेच तिथे व्यक्तीविकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे म्हणतात. गेल्या शतकात कृषी, खाणकाम, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अमेरिकेने जी घोडदौड केली आहे ती फक्त कौतुकास्पद नव्हे तर विस्मित करणारी आहे.

अमेरिकेच्या गोटात सामील होणे स्वतंत्र भारताने नेहमीच नाकारले यामुळे राजकीय क्षेत्रात या दोन देशात मतभेद राहिले. कधी कधी ते विकोपालाही गेले होते पण आता पूर्वीपेक्षा त्यांच्यातले संबंध चांगले झाले आहेत. पण अमेरिकन सरकारची धोरणे बहुतेक सुशिक्षित भारतीयांना पसंत पडत नव्हती. एका बाजूला अमेरिकन सरकारवर टीका करायची पण तिथे जायची संधी मिळाली तर ती मात्र सोडायची
नाही असेच चित्र बहुतेक मध्यमवर्गीय सुशिक्षित भारतीयांच्या घरी मला दिसत आले आहे.

अशा संमिश्र भावना घेऊन मीही आज अमेरिकेच्या वारीला निघालो आहे. मला तिथे अर्थार्जन करायचे नाही आणि ते करण्याची मुभाही नाही. तिथल्या सुबत्तेचा माफक उपभोग घेत राहणे, हिंडणे, फिरणे, हिंडता
फिरता निरीक्षण करणे आणि 'लाइफ एन्जॉय करणे' एवढाच माफक उद्देश आहे. तिथे गेल्यावर शक्य तितक्या लवकर ब्लॉगवर येण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. तेंव्हा आता पुढचा भाग अमेरिकेतून लिहीन.

1 comment:

Prasanna Shembekar said...

तुमचे सर्वच लेख अत्यंत वाचनीय व माहिती देणारे असतात. तुमची शैली सुद्धा खुमासदार आहे.

अमेरिकेच्या पुढच्या लेखमालेची उत्सुकतेने वाट बघतो आहे.
आपला,
प्रसन्न शेंबेकर