Friday, April 25, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १८ - थॅकरेज मेडिकल म्यूझियम


शत्रूचा संहार करण्यासाठी वापरात येणा-या विनाशकारी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे रॉयल आर्मरीज वस्तुसंग्रहालय जसे लीड्स येथे आहे तसेच माणसाचा प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाची जी धडपड सुरू आहे तिचे सम्यक दर्शन घडवणारे थॅकरेज मेडिकल म्यूझियमसुद्धा त्याच गांवात आहे. इसवी सन १९९७ मध्ये उघडलेल्या या संग्रहालयाने दरवर्षी इंग्लंडमधील 'म्यूझियम ऑफ द ईअर' हा बहुमान आपल्याकडे ठेवला आहेच, त्याशिवाय 'म्यूझियम ऑफ द युरोप' हा सन्मानसुद्धा पटकावला आहे. वैद्यकीय शास्त्रात व संबंधित तंत्रज्ञानात गेल्या दोन अडीचशे वर्षात कशी प्रगति होत गेली याचा माहितीपूर्ण तसेच कधी मनोरंजक तर कधी चित्तथरारक वाटणारा आढावा या ठिकाणी घेतला आहे. मात्र रॉयल आर्मरीजमध्ये संपूर्ण जगातील शिकारी व युद्धाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तसे इथे नाही. इथला सगळा प्रपंच मुख्यतः लीड्सच्या आसपासचा परिसर, युरोपमधील काही भाग इतक्याच प्रदेशापुरता मर्यादित आहे. जर्मनीमध्ये विकसित झालेली होमिओपथीसुद्धा त्यात अंतर्भूत नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेद, युनानी किंवा चिनी वैद्यकाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. वेगवेगळ्या काळात त्या भागात राहणा-या लोकांच्या अंधश्रद्धा, आरोग्यासंबंधी असणारे त्याचे अज्ञानमूलक गैरसमज वगैरे सुद्धा संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत. त्यातील कांही गोष्टी आपल्याला ओळखीच्या वाटतात, कांही चमत्कारिक वाटतात.
लीड्स येथील सेंट जेम्स या प्रमुख हॉस्पिटलच्या आवारातीलच एका वेगळ्या इमारतीत हे म्यूझियम आहे. बाहेरून त्याचा सुगावा लागत नाही. आपल्या जे.जे.हॉस्पिटलप्रमाणेच या हॉस्पिटलचे आवार अवाढव्य असून अनेक इमारतींमध्ये विखुरलेले आहे. त्यात नव्या जुन्या सगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्ज आहेत. रस्त्यावरील पाट्या व दिशादर्शक खुणा वाचत शोधतच तिथे जोऊन पोचलो. तिकीट काढून प्रवेश करतांक्षणी उजव्या हांताला एक दरवाजा लागतो. इथे लहान मुलांना प्रवेश निषिद्ध आहे. हृदय कमकुवत असलेल्या मोठया माणसांनीसुद्धा आंत जाण्याचा धोका पत्करू नये असे ठळक अक्षरात लिहिले आहे. त्यामुळे आपले हृदय धडधाकट आहे असे लहान मुलांना दाखवण्यासाठी त्यांना बाहेर थांबवून सज्ञान मंडळी आंत जातात.
तिथे एकच शो दर पांच मिनिटांनी पुन्हा पुन्हा दाखवतात. आधी सभागृहात अंधार गुडुप होताच आर्त संगीताच्या लकेरी सुरू होतात. अठराव्या शतकातील एक दृष्य पडद्यावर येते व खर्जातील घनगंभीर आवाजात कॉमेंटरी सुरू होते. त्यात सांगतात की हॅना डायसन नांवाच्या एका दहा अकरा वर्षाच्या मुलीला अपघातात झालेल्या व चिघळून सडू लागलेल्या जखमेचे विष तिच्या अंगात भिनू नये यासाठी तिच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या काळात भूल देणे नसतेच. भीतीनेच अर्धमेली झालेली ती पोर कण्हत असते. चारी बाजूंनी तिचे हातपाय करकचून आवळून धरतात. ती आणखीनच जोरात टाहो फोडते. कसायासारखा दिसणारा डॉक्टर हांतात सुरा पाजळत येतो आणि एका घावात तिचा पाय कापून वेगळा करतो. ती पोर जिवाच्या आकांताने किंचाळते आणि थंडगार पडते. एकदम भयाण नीरव शांतता पसरते. त्यानंतर कॉमेंटरीमध्ये सांगतात की या भयानक शस्त्रक्रियेनंतरसुद्धा तिच्या जगण्याची शक्यता कमीच असते. बरेचसे रुग्ण त्या धक्क्याने हृदयक्रिया बंद पडून दगावतात तर अनेक लोक त्यातून होणारा रक्तस्राव सहन करू शकत नाहीत. ज्यांच्या नशीबाची दोर बळकट असेल असे थोडेच लोक यातून वाचतात. पण इतर मार्गाने त्यांना वाचवणे अशक्य झालेले असते तेंव्हाच नाइलाजाने शस्त्रक्रिया केली जाई.
पुढे जाऊन आपण एका गुहेत प्रवेश करतो. त्यापूर्वीच वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळ्या व्यक्तीची नांवे लिहून ठेवलेल्या चतकोर कागदांचे सातआठ गठ्ठे ठेवलेले दिसतात. समोर मोठ्या फलकांवर त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती लिहिलेली असते ती पाहून आपण निवड करावी व आपल्याला वाटतील तितके कागद उचलून हातात धरावेत. ही सारी माणसे दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील लीड्सची रहिवासी होती. कदाचित ती काल्पनिक असतील किंवा प्रत्यक्षात होऊन गेलेलीही असतील. त्यात कोणी बालक, कोणी वृद्ध, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी ऐशोआरामात रहाणारे तर कोणी काबाडकष्ट करणारे असे होते. त्या सर्वांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात एवढेच समान सूत्र. पुढे गेल्यावर त्या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन होते. त्या काळातील घरे, घरातील सामानसुमान, आजूबाजूचा परिसर कुठे स्वच्छ, कुठे गलिच्छ आणि त्यात बसलेली, उभी किंवा झोपलेली आजारी माणसे ही सगळी दृष्ये अप्रतिम कलात्मकतेने पण अत्यंत वास्तववादी वाटावीत अशी उभी केली आहेत. त्या काळातील घरामधील उजेड किंवा काळोख, नाकात घुसणारे सुवास किंवा उग्र दर्प, कानावर आघात करणारे विचित्र ध्वनि, गोंगाट वगैरे सगळे कृत्रिम रीतीने निर्माण करून ते दृष्य आपल्याला खरोखरच त्या भूतकाळात घेऊन जाते.
प्रत्येक रोग्यावर त्या काळानुसार कोणकोणते उपचार होण्याची शक्यता तेंव्हा होती याचे पर्याय त्या त्या ठिकाणी एकेका फलकावर मांडलेले होते. प्रत्येकासाठी त्या काळात लागणारा अंदाजे खर्च त्यापुढे लिहिला होता. एक दृष्य पाहून पुढे जाण्यापूर्वी रोगाचे गांभीर्य व रोग्याची आर्थिक क्षमता यांचा विचार करून त्यामधील आपल्याला जो बरा वाटेल तो निवडून आपण हातातील कागदावर तशी खूण करून ठेवायची. या प्रकारे आपणसुद्धा भावनिक रीत्या त्या गोष्टीत गुंततो. त्या रोग्यांना जडलेला रोग कशामुळे झाला असावा याबद्दल तत्कालिन लोकांची जी कल्पना असेल त्याप्रमाणेच उपचार ठरणार. बहुतेक लोकांना तो ईश्वरी कोप वाटायचा. कुणाला भूतबाधा, चेटूक, करणी वगैरेचा संशय यायचा तर कांही लोकांना अन्नातून विषबाधा झाली असेल किंवा एखादा विषारी पशु किंवा कीटक चावल्याची शंका यायची. रोगजंतु व विषाणूंचा शोध अजून लागला नव्हता. प्रारब्ध, पूर्वसंचित वगैरै गोष्टी हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.
जसे रोगाचे निदान होईल त्यानुसारच उपचारसुद्धा होणार. त्यामुळे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे, साधुसंतांचा आशीर्वाद घेणे, चेटकिणीकडून करणीवरील उतारा मिळवणे, गळ्यात किंवा दंडावर तावीज बांधणे, अंगावर, कपड्यावर किंवा भिंतीवर एखादे चिन्ह काढणे, गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहणे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे, डॉक्टरकडे जाऊन त्यांची अत्यंत महागडी औषध घेणे वगैरे पर्याय असत. डॉक्टरांची औषधेसुद्धा विविध खनिज रसायने आणि प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थांचे परंपरा व अनुभव यानुसार केलेले मिश्रण असायचे. पूर्वानुभव व अनुमान धपक्याने ते दिले जायचे. त्याने गुण आला तर आला, नाहीतर रोग्याचे नशीब. इतक्या तपासण्या करून, वैज्ञानिक दृष्टीने विचारपूर्वक निदान करून व कार्यकारणभाव जाणून घेऊन आजकाल औषधयोजना केली जाते तरीही हे विधान ओळखीचे वाटते. या परिस्थितीत अजूनही आमूलाग्र बदल झाला आहे असे वाटत नाही. महाराणी व्हिक्टोरियाच्या काळातील त्यांतील प्रत्येक रोग्याचे प्रत्यक्षात शेवटी काय झाले याची उत्कंठा म्यूझियमतून बाहेर पडण्यापूर्वी शमवली जाते.
गुहेतून बाहेर पडल्यावर आपण वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य दालनात जातो. सुरुवातीला असे दिसते की लीड्समध्ये राहणा-या एका डॉक्टरने आरोग्य व स्वच्छता यातील परस्परसंबंध सर्वात आधी दाखवून दिला. 'लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरीबी' ही अतिशय चुकीची कल्पना आहे. उंदीर, माश्या, पिसवा यांचा सुळसुळाट असलेल्या, सांडपाण्याचा निचरा होत नसलेल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराई फैलावण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बंगल्यामध्ये राहणारे अमीर उमराव त्या मानाने निरोगी असतात. हे सगळे त्याने आकडेवारीनिशी मांडले व नगरपालिकेने यात लक्ष घालून नगराच्या दरिद्रनारायणांच्या भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे याचा पाठपुरावा केला. घाण आणि रोगराई यातील प्रत्यक्ष संबंध कशा प्रकारे जुळतो हे त्याला सांगता येत नव्हते, पण तो निश्चितपणे आहे असे त्याचे ठाम मत होते व ते प्रत्यक्ष पुराव्यानिशी त्याने दाखवून दिले.
त्यानंतर एडवर्ड जेन्नर व लुई पाश्चर प्रभृतींनी वेगवेगळे रोगजंतु सूक्ष्मदर्शक यंत्रातून आधी स्वतः पाहिले आणि जगाला दाखवले. तसेच ते मानवी शरीरात गेल्यामुळे संसर्गजन्य आजार होतात हे सिद्ध केले. हवेवाटे फुफ्फुसात, अन्नपाण्यावाटे जठरात व त्वचेवाटे किंवा तिला झालेल्या जखमांमधून रक्तप्रवाहात ते प्रवेश करतात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निरनिराळे रोग निर्माण होतात हे समजल्यावर त्यावर प्रतिबंधक उपाय शोधणे शक्य झाले. अनेक प्रकारची जंतुनाशक रसायने तसेच रोगप्रतिबंधक लशींचा शोध लागत गेला. दुस-या महायुद्धकाळात सापडलेल्या पेनिसिलीनने या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठला व प्रभावी रोगजंतुनाशकांचा एक नवा वर्ग निर्माण केला. श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण आदि मानवी शरीराच्या मूलभूत क्रिया तसेच अस्थि, मांस, रक्त, मज्जा आदि शरीराच्या घटकांबद्दल जसजशी अधिकाधिक माहिती समजत गेली तसतसे रोगांचे स्वरूप समजत गेले व त्यावरील उपाययोजना करणे वाढत गेले हा सगळा इतिहास विविध चित्रे आणि प्रतिकऋतींच्या माध्यमातून सुरेख व मनोरंजक पद्धतीने मांडला आहे.
शल्यक्रिया आणि मुलाचा (किंवा मुलाची) जन्म या दोन विशिष्ट विषयासंबंधी माहिती देणारी खास दालने आहेत. या दोन्हीमध्ये गेल्या दोनशे वर्षात कसकसे बदल होत गेले, त्यात आधी आणि नंतर घेण्याची काळजी, क्रिया सुरू असतांना कसली मदत लागते, कोणत्या आधुनिक सुविधा आता उपलब्ध आहेत वगैरे कालानुक्रमे व सविस्तर दाखवले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तान्ह्या बाळाचा मऊ स्पर्श, गरोदरपणामुळे शरीरावर पडणारा ताण वगैरेंची कृत्रिम प्रात्यक्षिके ठेवली आहेत. वाढत्या लहान मुलांचे संगोपन, त्यांना होऊ शकणारे आजार व त्यापासून दूर राहण्यासाठी बाळगायची सावधगिरी वगैरे एका दालनात दाखवल्या आहेत.
डॉक्टरी पेशासाठी लागणारी थर्मॉमीटर व स्टेथोस्कोपासारखी साधने, शल्यक्रियेसाठी लागणारी आयुधे, एक्सरे फोटोग्राफी, सोनोग्राफी आदि यांत्रिक साधनांचीही थोडक्यात ओळख करून दिली आहे. या वस्तुसंग्रहाच्या जोडीनेच या आवारात अशा सहाय्यक वस्तूंची तसेच वैद्यकशास्त्रावरील पुस्तकांची विक्री सुद्धा होते. तसेच या विषयावरील तज्ञांचे परिसंवाद वर्षभर सुरू असतात. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमुळे त्यावर होणारा खर्च भरून निघतो तसेच मानवजातीची एक प्रकारे सेवाच घडते. असे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय लीड्सच्या वास्तव्यात पहाण्याची संधी मिळाली.

No comments: