Tuesday, April 29, 2008

मधुमती पन्नास वर्षांची झाली


मधुमती हा माझा अत्यंत आवडता चित्रपट प्रकाशित होऊन नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने त्या काळातले सिनेजगत पूर्णपणे जिंकले होते. १९५८ साली आलेल्या चित्रपटांची बहुतेक सगळी महत्वाची फिल्मफेअर एवार्ड्स मधुमतीने निर्विवादपणे पटकावली होती. त्याबद्दल कोणाला तक्रार करायला जागा नव्हती, कारण तो सिनेमा तसाच अफलातून बनला होता. कथानक, दिग्दर्शन, संगीत आणि मुख्य पात्रांचे अभिनय यातल्या कशाच्या तरी आधारावर सर्वसाधारणपणे कोणताही सिनेमा चालतो. मधुमतीमध्ये या सगळ्याच गोष्टी अत्युत्कृष्ट दर्जाच्या होत्या, त्यांशिवाय अर्थपूर्ण गीतांतली शब्दरचना, उपकथानके, विनोदनिर्मिती, आटोपशीरपणा वगैरे साऱ्या गोष्टी छान जमल्या होत्या आणि तांत्रिक बाजूसुध्दा भक्कम होत्या. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम एक अप्रतिम असा चित्रपट निर्माण
होण्यात झाला.

काळोखी रात्र, त्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा भयाण वातावरणात सिनेमा सुरू होतो. कथानायक आपल्या मित्राबरोबर आडरानातल्या रस्त्यावर मोटारीतून जात असतांना अचानकपणे त्या वादळात तो सांपडतो. रात्रभर मुक्कामासाठी विसावा शोधत ते दोघे एका जुन्यापुराण्या हवेलीत शिरतात. त्या ओसाड पडलेल्या वाड्यातल्या पुराणवस्तू नायकाला ओळखीच्यावाटायला लागतात. अशा रहस्यमय गूढ वातावरणाने सुरुवात होत असतांनाच त्यातून जन्मजन्मातरीच्या आठवणीचे
'असंभव' कथानक समोर येते. असे असले तरी सुरुवात आणि शेवटाचा थोडा भाग वगळता उरलेला सिनेमा मुख्यतः एका हळुवार प्रेमकथेच्या भोंवतीच फिरत राहतो.

ईशान्य भारतातल्या निसर्गरम्य दृष्याने नायकाच्या आठवणीचा फ्लॅशबॅक सुरू होतो. पक्ष्यांची किलबिल, मेंढरांचे आवाज, मेंढपाळाची लकेर वगैरे ध्वनींमधून वातावरणाची निर्मिती होत असतांनाच मुकेशच्या आवाजात "सुहाना सफर है ये मौसम हँसी" हे गोड आणि खटकेदार गाणे सुरू होते. त्यातल्या "हमें डर है हम खो न जाये कहीं" या ओळीत जी आशंका नायक व्यक्त करतो ती खरी ठरते. त्या क्षणापासून नायकाबरोबर प्रेक्षकसुध्दा त्या वातावरणात स्वतःला हरवून जातात.

नायक आपल्या चहाच्या मळ्यातल्या नोकरीवर रुजू होतो तेंव्हाच त्याला त्या मळ्याच्या सीमा दांखवून त्यापलीकडे शत्रुपक्षाची जागा आहे, तिथे पाय ठेवणे सुध्दा धोक्याचे आहे हे सांगितले जाते. पण रानातून फिरत असतांना त्याला पलीकडून एका अत्यंत आवाजातील गाण्याचे आर्त शब्द ऐकू येतात, "आ जा रे परदेसी, मै तो कबसे खडी इस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार". मधुमती येण्यापूर्वीच महल या चित्रपटातील "आयेगा आनेवाला" या गीताने अशा प्रकारच्या गूढ गाण्यांची परंपरा सुरू झाली होती आणि त्यानंतर आलेल्या बहुतेक रहस्यपटात असे एक हाँटिंग साँग दिले गेले. "कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख ले आके परवाने", "नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवनकी आस", "तेरेबिन जिया उदास रे, ये कैसी मनहूस प्यास रे", "गुमनाम है कोई, बदनाम है कोई" वगैरे कित्येक गाणी अजरामर झाली आहेत. अगदी अलीकडे आलेल्या भूलभुलैया मध्ये अशाच प्रकारचे "तुमी जे शुमार" हे श्रेयाने गायिलेले अप्रतिम गाणे आहे. पण यातील कोणाचीही "आ जा रे परदेसी"ला तोड होऊ शकत नाही.

या गाण्याने मंतरलेल्या अवस्थेत नायक आपली सीमा पार करून 'उस पार' जातो. तिथे त्याची नायिकेशी भेट होते आणि छोट्या छोट्या प्रसंगांतून ती वाढत जाते. "जुल्मीसंग आँख लडी रे, सखी मैं का करूँ, जाने कैसी ये बात हुई रे" अशी गोड तक्रार लोकगीताच्या शैलीत नायिका आपल्या मैत्रिणींपुढे करते तर दोघेही प्रेमी "दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा" असे एकमेकांना सांगतात. 'कसमे वादे' वगैरे होऊन गेल्यावर मीलनाचा क्षण नजरेसमोर दिसायला
लागल्यावर "घडी घडी मोरा दिल धडके, हाय धडके, क्यूँ धडके, आज मिलनकी बेला आयी, फिर ये नजरियाँ क्यूँ फडके" या गाण्यात मीलनाची आतुरता व्यक्त करतांनाच मिळणा-या कांही अशुभ संकेतांमुळे आलेली मनाची व्याकुलता नायिका मांडते. या गाण्याची अशी गंमत आहे की याचीच चाल "आजारे परदेसी"या गाण्यात इंटरल्यूड म्हणून वापरली आहे, किंवा ती इंटरल्यूड इतकी आवडली की तिच्या चालीवर स्वतंत्र गाणे रचावेसे वाटले असेही म्हणता येईल.

या प्रेमकथेमध्ये सुध्दा नेहमीप्रमाणेच दोन मुख्य अडथळे आहेत. नायिकेचा अक्राळविक्राळ दिसणारा आडदांड बाप पहिल्यांदा त्यांच्या प्रेमात खो घालतो. अशा रासवट आणि रागीट बापांनाच नाजुक, सुंदर, कोमलांगी, मृदुभाषिणी कन्यका व्हाव्यात असा एक अजब अलिखित संकेत हिंदी चित्रपटांमध्ये पाळतात. श्रीमंत, बदफैली, व्यसनी, उध्दट, बलदंड असा खलनायक नायिकेच्या मागावर असतोच. या दोघांशीही प्रत्यक्ष लढून त्यांना नामोहरम करण्याएवढी शारीरिक कुवत नायकाच्या अंगात नसते आणि त्याने तसा प्रयत्न केल्याचे स्टंटसीनही दिग्दर्शकाने उगाच टाकलेले नाहीत. प्रथम नायिका आपल्या बापाची समजूत घालते आणि नंतर नायक आपल्या 'सच्चाई'ने त्याचे मन वळवतो. खलनायकाच्या कपटकारस्थानापुढे मात्र त्याची सपशेल हार होते. सिनेमा संपण्याला बराच वेळ शिल्लक असतांनाच नायिकेचा अंत झालेला पाहून प्रेक्षक अस्वस्थ होतो.

विरहाने व्याकुळ झालेला नायक "टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है, दिलने जिसे पाया था आँखेंने गँवाया है" असा विलाप करत निरर्थक रीत्या इतस्ततः भटकत असतांनाच योगायोगाने अगदी नायिकेसारखाच चेहेरा मोहरा असलेली दुसरीच एक मुलगी त्याच्या समोर येते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिने सादर केलेले "दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूवा" हे गाणे पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक प्लॅन जन्म घेतो. मधुमती पूर्वी आणि नंतर येऊन गेलेल्या अनेक चित्रपटात मी अनेक प्रकारचे फोक डान्सेस पाहिले आहेत, पण आजही सामूहिक आदिवासी नृत्य म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर दैया रे दैया शिवाय दुसरे कोणतेही गाणे उभे रहातच नाही.

जॉनी वॉकरने आपली हास्यमय भूमिका मस्त वठवली आहे. "जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा, हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा" हे एक दारुड्याचे विनोदी गाणे त्याच्या पात्रावर चपखल बसवले आहे. "हम हालेदिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये" हा एक मुजरा देखील गोष्टीत कुठे तरी बसवला आहे.

डुप्लिकेट नायिकेला अचानकपणे समोर दाखवून खलनायकाची हबेलंडी उडवावी आणि त्याच्याकडून कबूली जबाब मिळवून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळवून द्यावी असा बेत रचून नायक तसा प्रसंग घडवून आणतो आणि त्यात नाट्यमय घटना घडून रहस्यमय रीतीने गोष्टीवर अखेरचा पडदा पडतो. अशा प्रकाराने मिळवलेल्या कबूलीजबाबाच्या आधारावर कोणा अपराध्याला न्यायालयात शिक्षा होईल असे मात्र आज वाटत नाही. चारचौघांसमोर उघड उघडपणे गुन्हा करून त्याचा भरभक्कम पुरावा असतांनासुध्दा गुन्हेगाराच्या केसालाही धक्का पोचत नाही असेच अलीकडे येऊन गेलेल्या कित्येक सिनेमात पहायला मिळते. एवढा फरक गेल्या पन्नास वर्षात आपल्या समाजव्यवस्थेत पडला आहे.

दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला हे नायक नायिका म्हणून मधुमती येण्याआधीच प्रस्थापित झालेले कलाकार होते. मधुमती हे आणखी एक नांव त्यांच्या अविस्मरणीय भूमिका असलेल्या चित्रपटांच्या यादीत ठळक अक्षरात जोडले गेले. प्रत्येक भूमिकेत नवनव्या लकबी दाखवून त्यांची कंटीन्यूइटी दाखवायचे कसब प्राण हा गुणी नट कसे करू शकतो देव जाणे. मधुमतीतला त्याचा खलनायकी रोल लक्षात राहण्याइतक्या सफाईने त्याने वठवला आहे. निर्माता व दिग्दर्शक बिमल रॉय आणि संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी हे दोघेही या सिनेमाने कलाविष्काराच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोचले. त्यांनी पुढे अनेक चित्रपट काढले पण मधुमतीचे स्थान अढळपदावर राहिले.

असा हा चित्रपट निघून पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी अजून तो पुन्हा पहावासा वाटतो. सीडीचा शोधसुध्दा लागला नव्हता त्या काळातल्या या सिनेमाच्या सीडी आजही बाजारात मिळतात आणि खपतात. 'आजारे परदेसी' हे गाणे गेली पन्नास वर्षे माझ्या दहा आवडत्या गाण्यात आपली जागा राखून आहे. वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या मोठ्या लोकांच्या टॉप टेनमध्येही मी हे गाणे अनेक वेळा पाहिले आहे. मधुमती हा सिनेमा हीच हिंदी सिनेसृष्टीतली ही एक अजरामर अशी कृती आहे.

No comments: