मी आहे तरी कोण ???
मी लहानपणापासून परंपरागत संस्कारांमध्ये वाढलो असलो तरी तथाकथित धार्मिक रूढींवर आणि कर्मकांडांवर माझा विश्वास बसत नव्हता. त्यांचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही असेच मला वाटत आले आहे. त्यामुळे मी 'अध्यात्म' हा शब्द असंख्य वेळा ऐकला असला तरी नेमके कशाला अध्यात्म म्हणतात या विषयी मला गूढ वाटत होते. ते निवांतपणे थोडेसे समजून घ्यावे म्हणून मी चार वर्षांपूर्वी यू ट्यूबवर काही प्रवचने ऐकायचा प्रयत्न केला होता. "माझे शरीर, माझे मन, माझ्या भावना, माझी कीर्ती, माझा मीपणा" वगैरे म्हणणारा हा 'मी' कोण असतो, (कोSहम्) हा प्रश्न पुराणकालापासून अनेक महान तत्वज्ञानी विचारत आले आहेत आणि ऋषीमुनींपासून ते आधुनिक काळातल्या कित्येक संत महंत विद्वानांनी याची खूप विस्ताराने उत्तरे दिली आहेत. मी त्यातली अत्यल्प अशी काही उदाहरणे ऐकायचा प्रयत्न केला. इतर सगळे विचार बाजूला ठेवून एकाग्रचित्ताने अंतर्मुख होऊन विचार केला आणि तुमची पात्रता असली तर ते तुमचे तुम्हाला समजेल असे काही तरी हे महात्मे सांगत होते. काही लोकांनी तर असेही सांगितले की ज्याला हे नीट समजले आहे असा गुरु तुमच्या पूर्वसंचितातून तुम्हाला मिळाला तरच आणि तोच तुम्हाला अध्यात्माची वाट दाखवू शकेल. बहुतेक वेळा ती प्रवचने माझ्या डोक्यावरूनच गेली. मला कधी या निर्गुण निराकार अगम्य आणि अदृष्य अशा अंतरात्म्याचा शोध घेण्याची मनापासून ओढही लागली नाही. त्यापेक्षा या जगातलेच निरनिराळे लोक मला कोण समजत आले असतील किंवा माझे मलाच मी कोण असावा असे वाटत गेले होते हे पहायला थोडे सोपे आहे असे वाटले होते म्हणून मी फेसबुकवर एक लेखमाला सुरू केली होती आणि ती तब्बल दोन तीन वर्षे चालवली होती. त्यातले काही भाग एकत्र करून मी ते "मी आहे तरी कोण ??? - भाग १, २, ३" मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत.
भाग १ : https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html
भाग २ : https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html
भाग ३ : https://anandghan.blogspot.com/2022/08/blog-post.html
त्यानंतर काही कारणाने त्यात खंड पडला. मधल्या काळात माझा जुना संगणक बंद पडला होता आणि नव्या संगणकात जुन्या फाइली भरतांना त्यातल्या काही फाइली कुठेतरी हरवून गेल्या होत्या. मी ते सगळे विसरून गेलो होतो आणि मला दुसरे काही आकर्षक विषय मिळाले होते म्हणून मी तिकडे वळलो होतो. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला त्या जुन्या लेखांची आठवण करून दिली. मी त्यानंतर लिहिलेल्या स्फुटलेखांचा गठ्ठा मला शोधाशोध केल्यावर सापडला. त्यावर थोडा हात फिरवून मी हा चौथा भाग तयार केला आहे. या सगळ्या पन्नास वर्षांपूर्वीच्या घटना असल्यामुळे त्यांच्या तपशिलात काही फरक पडण्याची शक्यता नव्हतीच. हे लिखाण तेंव्हा जसे होते तितकेच आजही आहे.
मी आहे तरी कोण ? असा प्रश्न तर बहुतेक सर्वांनाच पदोपदी पडत असणारच. माझ्या शाळा आणि कॉलेजमधल्या आणि नोकरी शोधतांना आलेल्या अनुभवांमध्ये मी वेळोवेळी कोण होतो आणि तो कसा बदलत गेलो होतो हे मी पहिल्या भागात लिहिले होते. ट्रेनिंग स्कूलमधल्या शिक्षणाच्या काळात एका पूर्वीपेक्षा वेगळ्या जगात आणि वेगळ्या प्रकारच्या लोकांच्या सहवासात वावरत असतांना मला आलेल्या अनुभवांबद्दल मी थोडे विस्ताराने दुसऱ्या भागात लिहिले होते आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आलेले अजब अनुभव तिसऱ्या भागात होते. त्यानंतर पुढे आलेल्या अनुभवांची कथा या चौथ्या भागात दिली आहे.
मी कोण आहे ? भाग ७६
ट्रेनिंग स्कूलमधले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आमच्यातल्या चौदा जणांना बीएआरसीमधल्या रिअॅक्टर्सवर काम करून प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक वर्षासाठी तिकडे पाठवले होते. पण ते वर्ष संपायच्या आधीच पीपीईडीमध्ये गरज होती म्हणून त्यातल्या पाच मुलांना तिकडे काम करायला पाठवले होते. वर्षाअखेरीस उरलेल्या नऊ मुलांना डिव्हिजन हेड मेकोनीसाहेबांनी भेटीला बोलावले. पुढील प्लेसमेंटसाठी कुठल्या उपविभागात किती रिकाम्या जागा आमची वाट पहात आहेत याची कुणालाही काडीमात्र कल्पना नव्हती. मेकोनीसाहेबांनी माझ्यासह रामकृष्णन, दास आणि वागडिया यांना पीपीईडीमध्ये पाठवले. ही प्लेसमेंट करतांना त्यांनी कोणता विचार केला, कोणता निकष लावला हे कुणालाच कधी सांगितले गेले नाही. दुसरे दिवशी आम्हाला आपापले नेमणूकपत्र दिले गेले आणि ताबडतोब त्या ऑफीसात जाऊन हजर होण्याचा हुकूम मिळाला.
आमच्यातल्या ज्या चार जणांना पीपीईडीमध्ये पाठवले होते, त्यातल्या दोघांचे ऑफिस कुलाब्याला आणि दोघांचे भायखळ्याला होते. मला आणि मानबेंद्र दासला भायखळ्याला जाऊन तिथले मुख्य एस एल काटी यांना रिपोर्ट करायला सांगितले होते. त्या काळात बीएआरसीमधील डायरेक्टर, हेड ऑफ डिव्हिजन अशा मोठ्या हुद्यावरील लोकांनाच सरकारी गाडी मिळत असे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना दादर, चेंबूर अशा स्टेशनांपासून फक्त ऑफिसच्या वेळी बीएआरसीत जाण्यायेण्यासाठी बसेस होत्या. एरवी लोकल ट्रेन किंवा बीईएसटी बसनेच प्रवास करावा लागत असे. त्या काळात आम्हाला टॅक्सीने जाणे परवडण्यासारखे नव्हते आणि बीएआरसी गेटवर रिकामी टॅक्सी मिळणे हेही अशक्य होते.
मी आणि दास दोघांनी बीएआरसी गेटपसून एक बस घेतली आणि सायनला बस बदलून भायखळा गाठले. तिथे रिचर्डसन आणि क्रूडास कंपनी शोधून पीपीईडीचे ऑफिस गाठले. आमच्या बॅचची तीन मुले तिथे आधीच आलेली होती. त्यांनी आमचे स्वागत करून आम्हाला पंख्याखाली बसायला दिले. घाम पुसून आणि ग्लासभर पाणी पिऊन थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही काटीसाहेबांना भेटायला गेलो.
तिथल्या एका लहानशा केबिनमध्ये एका साधारण टेबलाच्या मागे असलेल्या साध्या खुर्चीवर सौजन्यमूर्ती असे काटी सर बसले होते. त्यांच्या समोरच्या बाजूला मांडलेल्या चार खुर्च्यांपैकी दोनांवर आम्ही बसलो आणि आमचे हुकूमनामे त्यांना सादर केले. त्यांनी लगेच पीएला बोलावून त्याला काहीतरी सांगितले. काटीसाहेबांचे दोन तीन मिनिटे आमच्याशी थोडे औपचारिक बोलणे होत असतांना नटराजन आणि रस्तोगी नावाचे दोन वरिष्ठ अधिकारी आत आले आणि आमच्या दोन्ही बाजूंना बसले. काटीसाहेबांनी त्यांना सांगितले की त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी दोन नवे इंजिनियर आले आहेत, त्यांना घेऊन जावे. मग नटराजन सर मला त्यांच्या क्युबिकलमध्ये घेऊन गेले आणि रस्तोगी सर दासला. आम्ही दोघांनी पुढे आयुष्यभर काय काम करायचे होते ते असे त्या दिवशी चुटकीसरशी ठरले गेले होते. आमचा शैक्षणिक इतिहास, पूर्वानुभव, आवडनिवड, अॅप्टिट्यूड असली कुठलीही भानगड विचारात घेण्याची कुणालाच काही गरज वाटली नाही.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ७७
डॉ.होमी भाभांनी भारतामध्ये अणुशक्तीच्या विकासासाठी कोणकोणती कामे करायची याचा खूप विस्तृत स्वरूपाचा आराखडा तयार केला होता आणि त्यांच्या मनात आणखीही बऱ्याच गोष्टी होत्या, पण १९६६मध्ये ते अचानक एका विमान अपघातात स्वर्गवासी झाले आणि डॉ.विक्रम साराभाई या बाहेरच्या शास्त्रज्ञाची त्यांच्या जागी नेमणूक झाली. त्याच्या आधी चार वर्षात दोन युद्धे आणि दोन पंतप्रधानांचे निधन झाल्यामुळे देशातले राजकीय वातावरण थोडे अस्थिर होते. अशा त्या काळात अणुशक्तीसारख्या खास विषयाकडे कोण आणि किती लक्ष देणार होते?
मी नोकरीला लागल्यानंतर अणुशक्तीपासून वीजनिर्मिती करण्यासाठी पीपीईडी या नावाचे वेगळे खाते सुरू केले असले तरी त्याला बहुधा केंद्र सरकारकडून कायम स्वरूपाची मंजूरी मिळालेली नव्हती. त्यामुळे आमची नेमणूकही तात्पुरती, पण अनिश्चित काळपर्यंत चालण्याची शक्यता असलेली ( Temporary, but likely to continue indefinitely) अशा स्वरूपाची होती आणि पीपीईडीमध्ये झालेली बदलीही तशाच तात्पुरत्या स्वरूपाची होती. (Appointed in RED and seconded to PPED). तरीही आमच्याकडून तीन वर्षांचा बाँड घेतलेला असल्यामुळे निदान तितकी वर्षे तरी नोकरीवरून काढणार नाहीत असा भरवसा आम्हाला वाटत होता. त्या वेळी पीपीईडीसाठी वेगळी इमारत नव्हतीच आणि ती बांधायची काही योजनासुद्धा नव्हती. कुलाबा आणि भायखळा भागातल्या तीनचार इमारतींमध्ये काही खोल्या भाड्याने घेऊन तिथे आमची ऑफिसे सुरू केली गेली होती.
बीएआरसीचे संचालक डॉ.होमी सेठना हेच पीपीईडीचेही संचालक होते, आरईडीचे प्रमुख श्री.मेकोनी यांना पीपीईडीचे हेड, डिझाइन ग्रुप हे दुसरे पद दिले होते, बीएआरसीमध्ये चीफ सिव्हिल इंजिनियर असलेले श्री.वेंगुर्लेकर आणि चीफ इलेक्ट्रिकल असलेले श्री.नरसिंगराव यांच्याकडे पीपीईडीमधले सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे जास्तीचे काम दिले होते. हे सगळे उच्च अधिकारी आपापल्या बीएआरसीमधल्या ऑफीसांमध्ये बसूनच या जबाबदाऱ्या सांभाळत होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल्स या विभागाचे काम बीएआरसीमधल्या श्रीनिवासन यांच्या हाताखाली केले जात होते, पण त्यांचीच हैद्राबादच्या ईसीआयएलमध्ये बदली झाली होती. प्रॉजेक्ट प्लॅनिंगचे काम पाहण्यासाठी पर्ट (PERT)आणि एस्टिमेशन असा एक वेगळा ग्रुप बीएआरसीमधल्या बॅनर्जी यांच्या हाताखाली दिला होता. उरलेले आम्ही लोक श्री.काटी यांच्या हाताखाली भायखळ्याच्या ऑफिसात नेमले गेलो होतो.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ७८
बीएआरसीमध्ये १२-१३ वर्षे उत्कृष्ट काम करून पुढे आलेले श्री.सुरेश लक्ष्मण काटी यांना पॉवर प्रॉजेक्ट्स इंजिनियरिंग डिव्हिजन मध्ये प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर असे मानाचे पद देऊन त्यांच्या हाताखाली १०-१२ वर्षे अनुभव असलेल्या बीएआरसीमधल्या सात आठ अभियंत्यांची टीम दिली होती. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली कुणाकडे एकदोन, तर कुणाकडे तीनचार असे आमच्यासारखे कनिष्ठ इंजिनियर होते. माझे बॉस नटराजनसाहेब तिथे नवेच होते आणि त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मी एकटाच आणि पहिलाच सहाय्यक होतो.
मला त्यांच्यासोबत काम करण्याचा तोंडी आदेश मिळाल्यानंतर मी त्यांच्यामागोमाग त्यांच्या क्युबिकलमध्ये गेलो. एका पत्र्याच्या टेबलाच्या उजव्या बाजूच्या आणि समोरच्या बाजूच्या कडांना पुरुषभर उंच पत्र्याची पार्टिशन्स ठोकून थोडासा आडोसा तयार केला होता. त्यांच्या खुर्चीच्या मागे लगेच दुसऱ्या अधिकाऱ्याचे पार्टिशन होते. त्यांनी मला डाव्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि टेबलावर पसरलेले कागदपत्र जरासे आवरून माझ्यासाठी एक फूट बाय दीड फूट रिकामी जागा करून दिली. राजस्थानमधील कोटा या शहराजवळ एक नवे अणुविद्युतकेंद्र उभारले जात आहे आणि त्यासाठी यंत्रसामुग्री पुरवायचे काम आपल्याला करायचे आहे वगैरे थोडक्यात प्रस्तावना करून त्यांनी मला एक जाडजूड ग्रंथ वाचायला दिला.
कॅनडामध्ये उभारल्या जात असलेल्या एका अणुविद्युतकेंद्रामधल्या रिअॅक्टरच्या सेफ्टी रिपोर्टच्या झेरॉक्स कॉपीजचे बाइंडिंग करून ते पुस्तक तयार केलेले होते. मी आपल्या नव्या साहेबाच्या इतके जवळ बसून ते गहन पुस्तक वाचायचा प्रयत्न करत असलो तरी मी जे वाचत होतो त्यातले काहीही माझ्या डोक्यात शिरायला तयार नव्हते. पंधरावीस मिनिटांनी मी काही तरी सबब सांगून त्यांच्या क्युबिकलमधून बाहेर पडलो. बहुधा त्यांनाही तेच हवे असावे. त्यामुळे त्यांनाही त्यांचे काम जरा निवांतपणे करता येत होते.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ७९
तिथे एका बाजूला सगळ्या वरिष्ठ इंजिनियरांच्या क्युबिकल्स होत्या आणि मोठ्या हॉलमध्ये खूप टेबले दाटीवाटीने मांडून ती कनिष्ठ इंजिनियरांना दिलेली होती. त्यात माझे तीन बॅचमेट होते आणि बाकीची मुले आम्हाला एक दोन वर्षांनी सीनियर, पण एकाच वयोगटातली होती. त्या सर्वांचे एकमेकांशी चांगले मेतकूट जमलेले होते. मी बाहेर आल्यावर माझ्या मित्रांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली. त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी पहिलाच मराठीभाषी होतो, बाकीच्या मुलांमध्ये हिंदी, पंजाबी, बंगाली, तामीळ, मल्याळी, कानडी वगैरे निरनिराळ्या भाषा बोलणारी आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यांमधून आलेली मुले होती. मी बीएआरसी ट्रेनिंग स्कूलमध्ये आल्यापासून अशा संमिश्र वातावरणाला सरावलो होतो आणि इंग्रजीमिश्रित हिंदी भाषाही सफाईने बोलायला लागलो होतो. कोण कुठून आला आहे आणि मुंबईत कुठे रहात आहे वगैरे जुजबी माहिती विचारून झाल्यावर तो इथे काय काम करत आहे यावर थोडी चर्चा झाली आणि त्यातून मला इथे रोज काय काम करायचे आहे याची अंधुक कल्पना आली.
तिथले बहुतेक लोक बीएआरसीमधून आलेले होते आणि त्यांच्या टेबलखुर्च्यासुद्धा तिथूनच आणलेल्या होत्या. मी सायरसमध्ये ट्रेनिंग घेत असतांनाही मला वेगळे टेबल आणि खुर्ची मिळालेली नव्हतीच, त्यामुळे मी हात हलवतच तिथे आलो होतो. निदान तिथे तरी मला लगेच हक्काची खुर्ची मिळेल अशी माझी अपेक्षा होती, पण तिथेही कुठलीच खुर्ची माझी वाट पहात बसलेली नव्हती. आमच्यासाठीसुद्धा बीएआरसीमधून जुने फर्निचर मागवले गेले आहे आणि ते येण्यात आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. पण ते काम ज्यांना दिले होते ते बॅनर्जीसाहेब स्वतः भायखळ्याच्या ऑफिसमध्ये बसतच नव्हते आणि त्या काळातली टेलिफोन प्रणाली दिव्य असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे अशक्य नसले तरी संभवनीयही नव्हते.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ८०
त्या वेळी भायखळ्यातल्या पीपीईडीच्या ऑफिसात काम करणाऱ्या ज्यूनियर लोकांपैकी कोणी ना कोणी परगावी गेलेला असला किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेला असला तर त्याची जागा रिकामी असायची. मी तिथे बसून घेऊ शकत होतो. अशी रिकामी जागा नसलीच तरी बॉसच्या शेजारी बसण्यापेक्षा एकाद्या मित्राच्या शेजारी बसणे ठीक होते. त्यामुळे मी पुन्हा नटराजनसाहेबांच्या खोलीत जाऊन बसण्यासाठी तिथे परत गेलो नाही. मला वेगळी टेबल खुर्ची मिळाली नव्हती म्हणून त्यांना कदाचित ओशाळवाणे वाटले असेल आणि त्यांनी मला आपल्या शेजारी बसवून घेतले असेल. पण मी माझी सोय करून घेतली असल्याचे त्यांना सांगितले आणि तो सेफ्टी रिपोर्ट घेऊन बाहेर आलो. एक नोटिंग पॅड आणले आणि तो रिपोर्ट वाचून त्याच्या नोट्स काढायला लागलो.
शेजारी दुसऱ्या हॉलमध्ये टायपिंग पूल होता. चार पाच टायपिस्ट तिथे बसून सगळ्या ऑफिसचे टायपिंगचे काम करत होते, पण तिथे त्यांच्यापेक्षा जास्त टेबले होती. मी त्यांच्यातल्या प्रमुखाला त्यातले एक टेबल मागितले. तो आधी म्हणाला की हे लहान आकाराचे कारकुनांचे टेबल आहे, अधिकाऱ्यांसाठी नाही. मी म्हंटले की तरीही मला ते चालेल. मग त्याने सांगितले की लवकरच आणखी स्टाफची भरती होणार आहे, त्यांना ते टेबल लागेल. मी सांगितले की माझ्यासाठीही नवीन अधिकाऱ्यांचे टेबल येण्यातच आहे. ते आले की मी लगेच हे टेबल परत करेन. ते नाही आले तरी तुमचा नवा स्टाफ आला की हे टेबल घेऊन जा. त्या काळापर्यंत आमच्या ऑफिसमधले स्टाफचे लोक मुजोर झाले नव्हते, ते अजून ऑफिसर्सना मान देत होते. त्यामुळे तात्पुरते का होईना, पण मला ते टेबल मिळाले. मी ते दुसऱ्या हॉलमध्ये आणले. आता मीही इतरांप्रमाणे काही तरी काम अंगावर घेऊन ते करू शकत होतो.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ८१
श्री.मेकोनी, हेड डिझाइन ग्रुप आणि श्री.काटी, प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर यांच्या हाताखाली असणाऱ्या आमच्या ऑफिसला डिझाइन ऑफिस या नावाने ओळखले जात असे, पण मी त्याऑफिसात दाखल झालो तेंव्हा तिथे प्रत्यक्षात फारशी डिझाइन अॅक्टिव्हिटी होत नव्हती. त्यावेळी उभारणीचे काम सुरू असलेल्या राजस्थान अॅटॉमिक पॉवर प्रॉजेक्ट (आरएपीपी)चे डिझाइन त्याच वेळी कॅनडामध्ये बांधल्या जात असलेल्या डग्लस पॉइंट पॉवर प्रॉजेक्टसारखेच होते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी एका कॅनेडियन कंपनीवर होती. त्यांनी काढलेल्या ड्रॉइंगमधली एक रेषा किंवा स्पेसिफिकेशनमधला एक स्वल्पविराम यालासुद्धा आम्ही स्पर्श करू शकत नव्हतो. त्या वेळी आम्ही कसलीही नवीन डिझाइन कॅल्क्युलेशन्स, अॅनॅलिसिस, ड्रॉइंग्ज वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता. यातली आणखी गंमत म्हणजे ही सर्व कॅनेडियन डॉक्युमेंट्सही तेंव्हा आमच्यासाठी उपलब्धच झालेली नव्हती. ती हळूहळू कदाचित जहाजाने येत होती आणि तीही कुठल्याच क्रमाने येत नव्हती.
काटीसाहेबांच्या केबिनच्या बाजूलाच पी.एन.अरुमुगम नावाच्या साहेबांचे केबिन होते. ते पीपीईडीचे प्लॅनिंग इंजिनियर होते. आम्ही सर्वजण कागदोपत्री काटीसाहेबांच्या हाताखाली असलो तरी प्रत्यक्षात अरुमुगमसाहेबांनी सांगितलेले काम करत होतो. ते प्रत्येक इंजिनियरला रोज बोलावून त्याने काय काम केले ते विचारत होते आणि त्यावर चर्चा करत होते. आरएपीपीसाठी भारतातून किंवा कॅनडामधून जी काही सामुग्री लागणार असेल ती पुरवणे हे आमच्या ऑफिसचे काम होते. परदेशातून मागवायचे असलेले कुठलेही सामान फक्त कॅनडामधूनच आयात करायचे होते आणि त्यासाठी एक ग्रीन शीट रिक्विझिशन एईसीएल या कॅनेडियन कंपनीकडे पाठवली की काम झाले. मग कालांतराने कधी तरी ते सामान भारतात येऊन पोचले की जहाजातून उतरवून घेऊन रेल्वे किंवा ट्रकने कोट्याला पाठवायचे काम बीएआरसीमधल्या स्टोअर्स ऑफिसरकडे होते, पण आम्हाला त्याचा मागोवा घेत रहायचे होते. भारतात खरेदी करायच्या सामानासाठी एक इंडेंट तयार करून तेही बीएआरसीच्या परचेस डिव्हिजनकडे पाठवायचे, पण त्यानंतरही ते कुणाकडून घ्यायचे ते ठरवणे, त्या कंपनीशी संपर्क साधून तिचा पिच्छा पुरवत राहणे, त्या वस्तूचे कसून इन्स्पेक्शन करणे वगैरे सगळी जबाबदारी पीपीईडी वर होती. या सगळ्या इंडेंट्स आणि रिक्विजिशन्सवर सही करण्याचा अधिकार फक्त अरुमुगम साहेबांकडे होता, इतकेच नव्हे तर सगळ्या इंजिनियरांनी केलेल्या सर्व पत्रव्यहाराची एक प्रत त्यांना पाठवली जात असे आणि मुख्य म्हणजे ते स्वतः ती सगळी पत्रे वाचत असत. त्यांच्याकडे अचंभित करणारा असा कामाचा अवाका होता.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ८२
राजस्थानात उभारल्या जात असलेल्या अणुविद्युतकेंद्रात प्रत्येकी २२०मेगावॉट इतकी वीज पुरवणारी दोन युनिट्स असणार होती. तोपर्यंत भारतात इतकी मोठी वीजकेंद्रे अजून सुरू झालेली नव्हती. त्यामुळे हीच केंद्रे फार मोठी समजली जात होती. त्यापैकी पहिल्या युनिटमधली सर्व यंत्रसामुग्री कॅनडामधून येणार होती आणि दुसऱ्या युनिटमधली बरीचशी यंत्रसामुग्री त्याच ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्सनुसार भारतात तयार करून घ्यायची होती. ते काम आम्ही करायचे होते.
आपल्याला शिलाईमशीन किंवा रेफ्रिजरेटर आणायचा असला तर ते विकणाऱ्या अनेक कंपन्यांची दुकाने आणि शो रूम्स असतात, तिथे त्यांची नवनवी मॉडेल्स मांडून ठेवलेली असतात. आपण तिथे जाऊन ती पहायची, त्यांचे आकार आणि ती कोणकोणती कामे करतात वगैरे पहायचे, किंमत विचारायची आणि आपल्याला पाहिजे ते यंत्र विकत घ्यायचे. आजकाल तर मोठमोठ्या आकर्षक जाहिरातींमधून त्यांची सगळी माहिती आधीच प्रसिद्ध केलेली असते आणि ती पाहूनच लोक आपल्यालाही ही वस्तू आणायची आहे असे ठरवतात.
पण आम्हाला तयार करून घ्यायची यंत्रसामुग्री जगभरात कुठेच अशी रेडीमेड मिळण्यासारखी नव्हती. आमचे वीजकेंद्र सोडून दुसरीकडे कुठेच त्यांचा काही उपयोगही नव्हता, त्यामुळे कुठलाही कारखानदार ती तयार करून विकायला ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातला प्रत्येक पार्ट ड्रॉइंगनुसार तयार करून झाल्यावर त्यांची जुळवाजुळव करून एक एक यंत्र तयार होणार होते आणि ते कसे करायचे याचा विचार आम्ही करायचा होता. आधीचा काहीच अनुभव नसतांना तर हे मोठे आव्हान होते.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ८३
आपल्याला स्वयंपाकघरात एकादा नवा वेगळा खाद्यपदार्थ तयार करायचा असला तर त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तो पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी सगळी उपकरणे जवळ असायला हवीत, तसेच त्याची कृति माहीत असायला पाहिजे किंवा ती शिकून घेतली पाहिजे. इंजिनियरिंगमध्येही तसेच असते. कुठलेही यंत्र तयार करायचे असले तर त्यासाठी आधी कुठकुठले निरनिराळे सुटे भाग लागतील हे ठरवून त्यातला प्रत्येक भाग (पार्ट) कुठल्या धातू किंवा अधातूपासून कसा बनवायचा याचा विचार केला जातो. ती तांत्रिक माहिती इंजिनियरिंगच्या भाषेत म्हणजे रेखाचित्रांमध्ये (ड्रॉइंग्जमध्ये) लिहून ठेवली तर ती दुसऱ्या अभियंत्यांना समजेल अशा प्रकारे सांगता येते.
आम्हाला जी यंत्रे तयार करवून घ्यायची होती त्याची रेखाचित्रे कॅनडामधल्या इंजिनियरांनी त्यांच्या भाषेत तयार करून पाठवायची होती आणि ती इकडे यायला लागली होती. ती रेकॉर्डसेक्शनमधून आणून त्यांचा अभ्यास करणे हे माझे पहिले काम होते आणि त्यातून मिळत असलेल्या माहितीवरून त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळतो हे शोधायचे होते. मेकॅनिकल इंजिनियरांची एक सर्वसाधारणपणे समान जागतिक भाषा असली तरी त्यात देशानुसार काही पाठभेद असतात. तोपर्यंत भारतात कायद्यानेच दशमान पद्धत (मेट्रिक सिस्टम) सक्तीची झाली होती, पण ही सगळी कॅनेडियन ड्रॉइंग्ज इंच आणि फुटात होती. आम्हाला लहानपणापासून फूटपट्टी वापरायची सवय असल्यामुळे त्यांचा अर्थ लागण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण सात अष्टमांश किंवा सत्तावीस बत्तीसांश असले अपूर्णांक ओळखीचे वाटत नव्हते. निरनिराळे व्ह्यूज दाखवण्याच्या पद्धति, वेल्डिंगचे तसेच आणखी काही सिम्बॉल्स वगैरेही थोडे वेगळे होते. मी अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्याने ते शिकून घेतले.
(क्रमशः)
मी कोण आहे ?
भाग ८४
१९६३-६४ च्या काळात मी इंजिनियरिंग कॉलेजात शिकत होतो तेंव्हा लोखंडाचे विविध प्रकार असतात एवढे आम्हाला शिकवले गेले होते. आम्ही त्यांना CI, MS, CS, SS अशा नावांनीच ओळखत होतो आणि तीच नावे ड्रॉइंगमध्ये लिहित होतो. त्यांचे पुन्हा अनेक उपप्रकार असतात वगैरे माहिती धातूविज्ञान (मेटॅलर्जी) या विषयात शिकवली होती, पण तीसुद्धा जास्त सखोल नव्हती. तोपर्यंत ISI ची भारतीय मानके अजून फारशी प्रचलित झाली नव्हती आणि आमच्या अभ्यासक्रमात येऊन पोचली नव्हती. मी जेव्हा कॅनेडियन ड्रॉइंग्ज उघडून पाहिली तर त्यात प्रत्येक पार्टच्या मटीरियलचे नाव ASTM A--- किंवा B--- असे लिहिलेले आणि त्यात पुढे एकादी ग्रेड दाखवलेली होती. मला त्यावरून लगेच काही बोध होत नव्हता. आमच्या ऑफिसात लायब्ररीच्या नावाने एका शेल्फमध्ये काही पुस्तके ठेवलेली होती, त्यात एएसटीएमचे काही जुने व्हॉल्यूम्स होते. ते फक्त तिथे बसून पहायला मिळत होते.
ते वाचून एवढे समजले की अमेरिकेत एएसटीएम नावाची एक मोठी संस्था आहे ती सगळ्या धातू किंवा अधातूंसाठी मानके तयार करते आणि तिथले कारखाने त्यानुसार आपला माल विकतात. प्रत्येक मानकामध्ये काही प्रकारच्या तपासण्यांची यादी दिलेली होती आणि त्या तपासणीमधून मिळणारे गुणधर्म कमीतकमी इतके असावेत आणि दोष इतक्यापेक्षा कमी असावेत यांची कोष्टके दिली होती. रासायनिक पृथक्करण (केमिकल काँपोझिशन) केल्यावर त्यातून कार्बन, मँगेनीज, सल्फर, फॉस्फरस, निकेल, क्रोमियम आदि मूलद्रव्यांच्या मर्यादा दिल्या होत्या, मेकॅनिकल टेस्टिंगमधून मिळणाऱ्या यूटीएस, यील्ड, इलाँगेशन, इम्पॅक्ट आदि गुणधर्मांवर किमान आणि कमाल मर्यादा दिल्या होत्या, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगआणि रेडिओग्राफीमध्ये किती आकाराचे डिफेक्ट मिळाले तरी चालतील ते दिले होते. या सगळ्या तपासण्या एएसटीएमने प्रमाणित केलेल्या प्रयोगशाळांमध्येच करणे बंधनकारक होते आणि त्या कोणत्या उपकरणांचा उपयोग करून कशा प्रकारे केल्या पाहिजेत यावरही वेगळी स्टँडर्ड्स होती. कालांतराने या सगळ्या गोष्टी आम्हालाही तोंडपाठ झाल्या. पण सुरुवातीला एवढेच समजले की या प्रकारच्या तपासण्या केलेला कच्चा माल भारतातल्या बाजारात कुठेही मिळणार नव्हता, तो आयात करणे आवश्यक होते.
(क्रमशः)
मी कोण आहे ? - भाग ८५
आमच्या यंत्रांचे सांगाडे आणि त्यावर बसवायचे सुटे भाग यांचे आकार आणि मोजमापे दाखवणारी रेखाचित्रे कोलॅबोरेटरकडून हळूहळू मिळाली. हे भाग कुठल्या पदार्थांपासून तयार करायचे हे त्यात दाखवले होते. पण त्याशिवायही मोटर्स, गिअरबॉक्सेस, कपलिंग्ज, बेअरिंग्ज यासारखे अनेक स्टँडर्ड पार्ट्स त्या ड्रॉइंग्जमध्ये दाखवले होते आणि ते प्रोप्रायटरी आयटेम्स कुठल्यातरी कॅनेडियन किंवा अमेरिकन कंपनीचे पार्ट नंबर अमूक तमूक एवढेच दिले होते. त्यांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्या सगळ्या कंपन्या आणि त्यांचे ते प्रॉडक्ट्स यांची नावे कॅनडामध्ये रहात असलेल्या आमच्या प्रतिनिधीला पाठवली आणि त्यांचे कॅटलॉग गोळा करून पाठवून द्यायची विनंति केली. ते मिळायला बराच वेळ लागणार होता आणि ती माहिती मिळाली तरीही नेमके तेच प्रॉडक्ट्स वापरणे करारानुसार बंधनकारक होते. शिवाय पेटंट अॅक्टनुसार दुसरा कोणी ते निर्माण करू शकत नाही. त्यात कसलाही बदल करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला नव्हतेच. इतकेच नव्हे तर हे सगळे भाग एकमेकांना जोडण्यासाठी जे नट, बोल्ट,स्क्र्यू, वॉशर वगैरे लागणार होते तेसुद्धा अनब्रेको नावाच्या कंपनीचे किंवा कुठल्या तरी एएसटीएमनुसारच असायला हवे होते. त्यामुळे सुरवातीला तरी या सगळ्या गोष्टी आयात करण्यावाचून गत्यंतर नव्हतेच.
भारत सरकार आणि कॅनडाचे सरकार यांमध्ये उच्च पातळीवर जो सहकार्याचा करार झालेला होता त्याप्रमाणे ती संपूर्ण यंत्रसामुग्री आयात करणे शक्य होते आणि आम्ही ती करावी अशीच कॅनेडियन लोकांची इच्छा असावी किंवा त्या काळात ती भारतात तयार होणे शक्यच नाही अशी त्यांची कल्पना असली तरी त्यात काही आश्चर्य नव्हते. पण आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणे ही दिशा आमच्या नेतृत्वाने ठरवली होती आणि हे आव्हानात्मक काम आमच्यावर सोपवले होते. या कराराचा एक फायदा असा झाला की त्यात संपूर्ण यंत्रांसाठी जितक्या डॉलर्सची तरतूद केलेली असेल त्याच्या अर्ध्या किंमतीमध्येच आम्ही सगळा कच्चा माल आणि प्रोप्रायटरी आयटेम्स मागवून घेऊ शकत होतो. त्यासाठी वेगळे इम्पोर्ट लायसेन्स आणि परकीय चलन मिळवण्याचीही गरज नव्हती.
(क्रमशः)
मी कोण आहे ? - भाग ८६
मला बीएआरसीमधून पीपीईडीमध्ये पाठवले होते तेंव्हा माझे ऑफिस भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रूडास नावाच्या कंपनीच्या आवारात होते. तिथे त्या कंपनीचा मोठा कारखाना होता, त्यात हजारो कामगार कामाला होते. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका मोठ्या इमारतीत त्यांची कार्यालये होती. त्यातल्याच एका मजल्यावर असलेला एक मोठा हॉल त्यांनी पीपीईडीला कदाचित तात्पुरत्या वापरासाठी भाड्याने दिला होता. तिथे आमचे ऑफिस होते. ती कंपनी कुणासाठी कसले उत्पादन करत होती याचा आम्हाला गंधही नव्हता आणि त्यांच्या कारखान्यात आम्ही पाऊलसुद्धा टाकायचे नाही अशी सूचना आम्हाला दिलेली होती. तिथले पहारेकरी आम्हाला तिकडे फिरकूही देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कँटीनचा आम्हाला काही उपयोग नव्हता. आमच्या ऑफिसात जेमतेम पंचवीस तीसजण होते. तेवढ्या लोकांसाठी वेगळे कँटीन नव्हतेच. एका नंबरवर फोन करून ऑर्डर दिली की ट्रेमध्ये दोन किंवा चार कप चहा येत होता आणि मागवल्यास बिस्किटाचा पुडा मिळत होता. त्याच्या आधी मी हॉटेलातही बहुधा कपात किंवा ग्लासमध्येच चहा घेतला होता, चहाचा ट्रे मागवला नव्हता, त्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्या ट्रेचेच अप्रूप वाटायचे. त्यात किटलीत कढत चहाचा अर्क, निरनिराळ्या भांड्यांमध्ये गरम दूध, साखर वगैरे वेगवेगळे असायचे आणि आपण आपल्याला हवे असेल त्या प्रमाणात मिसळून ढवळून घ्यायचे. हे पारंपरिक इंग्रजी तंत्र असले तरी ते आमच्यासाठी नवे होते
आमच्या ऑफिसातली वरिष्ठ मंडळी घरातूनच जेवणाचा डबा आणून खात असत, पण माझ्यासारख्या ब्रह्मचाऱ्यांना बाहेर कुठेतरी जाऊनच काहीतरी खाऊन यावे लागायचे. चांगली म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत सुग्रास जेवण देणारी अशी हॉटेले तिथे जवळपास नव्हतीच. रोज आम्ही त्यांच्या शोधात इकडे तिकडे वणवण करत होतो. त्या रस्त्यावरच सोडालिटी हाऊस नावाची एक इमारत होती, त्यात ख्रिश्चन धर्मगुरु आणि जोगिणी यांच्या शिक्षणासंबंधित काही तरी व्यवस्था होती आणि त्यासाठी बाहेरगावाहून आलेले शिक्षणार्थी रहात होते. त्यांच्या जेवणासाठी एक मेस होती. आमच्या एका ख्रिश्चन सहकाऱ्याला त्याचा सुगावा लागला आणि त्याच्या प्रयत्नातून आम्हालाही तिथे प्रवेश मिळाला. तिथले जेवण आम्हाला मानवण्यासारखे होते. काही दिवस आम्ही तिथे जेवायला जात होतो.
आमच्या ऑफिसची भायखळ्याची ही जागा एक तात्पुरती व्यवस्था आहे हे सगळ्या सीनियर लोकांना चांगले माहीत होते, त्यामुळे कुठल्याही गैरसोयीबद्दल त्यांना सांगायला गेलो तर थोडा दम धरा असाच सल्ला मिळत असे. एक दोन महिन्यातच आमचे तिथले वास्तव्य संपले आणि अणुशक्तीखात्याच्याच गेटवेजवळ असलेल्या इमारतीत आमचे स्थलांतर झाले.
(क्रमशः)
मी कोण आहे ? - भाग ८७
भारतावर इंग्रजांचे राज्य असतांना मुंबईत राहणाऱ्या इंग्रजांच्या करमणुकीसाठी त्यांनी काही क्लब निर्माण केले होते, त्यातच एक रॉयल यॉट क्लब होता. शिडांवर चालणाऱ्या लहानशा होडीला यॉट म्हणतात. गेटवेऑफ इंडियाच्या आजूबाजूला समुद्रात अनेक यॉट्स फिरत असतांना दिसतात. गेटवेच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावरच या यॉट क्लबसाठी एक सुरेख इमारत बांधली होती. कालांतराने त्यांनी समोरच दुसरी आणखी भव्य इमारत बांधली आणि क्लबचा कारभार तिकडे हलवला. तिथे हा क्लब अजूनही चालू आहे.
होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा टाटा इन्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सुरू करण्यात आले तेंव्हा ते बंगलोर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होते. ते मुंबईला हलवल्यावर सुरुवातीच्या काळात ओल्ड यॉट क्लबची इमारत टीआयएफआरला दिली गेली. नंतर कुलाब्याच्या पलीकडे नेव्हीनगरमध्ये टीआयएफआरचा भव्य कँपस बांधण्यात आला. भारत सरकारने अणुशक्ती खात्याचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये ओवायसी बिल्डिंगमध्ये ठेवले.
मी १९६६मध्ये ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो तेंव्हा या इमारतीत अणुशक्तीखात्याचे मुख्य ऑफिस होते. शिवाय या खात्याशी संबंधित असलेली आणखी काही ऑफिसे होती. १९६८च्या अखेरीस त्यातली काही ऑफिसे दुसरीकडे हलवली गेली आणि तळमजल्यावरचा बराचसा भाग रिकामा करून पीपीईडीला देण्यात आला. तेंव्हा आमचे ऑफिस भायखळ्यातल्या रिचर्डसन अँड क्रूडासच्या इमारतीतून ओवायसीमध्ये शिफ्ट झाले. आम्ही सर्वात कनिष्ठ कर्मचारी असल्यामुळे या हलवाहलवीच्या कामातले मुख्य उत्साही स्वयंसेवक होतो. सगळ्या सामानांची व्यवस्थित गाठोडी बांधणे, ती ट्रक्समधून नेण्यासाठी चढवणे, उतरवणे आणि नव्या जागी व्यवस्थित जागी नेऊन पोचवणे वगैरे कामे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून घेण्याचा तो माझा पहिलाच एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता.
(क्रमशः)
---
मी कोण आहे ? - भाग ८८
ओल्ड यॉट क्लब ही ब्रिटिशकालीन जुनी इमारत तोपर्यंत सुस्थितीत होती. त्यालाही आता पन्नास वर्षे होऊन गेली असली आणि मध्यंतरी तिचा काही भाग कोसळला असला तरी ही मुख्य इमारत बहुधा अजूनही शाबूत आहे. पूर्वीच्या काळातल्या एका ब्रिटिश आर्किटेक्टने तिथल्या राजरजवाड्यांच्या आवडीनुसार त्यांच्या मनोरंजनासाठी बांधलेली ती एक राजेशाही वास्तू होती. गेटमधून आत गेल्यावर मोठे उद्यान होते. तिथे येणारे साहेब लोक आपल्या मडमांना घेऊन कदाचित त्या काळातल्या व्हिक्टोरिया नावाच्या मोठ्या बगीमधून येत असतील. त्या बगीतून उतरल्यावर त्यांच्यावर पावसाचे थेंब पडू नयेत म्हणून तिला झाकणारे भले मोठे पोर्च होते. इमारतीत शिरल्यावर समोरच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रुंद असा सुंदर लाकडी जिना होता. तो चढून वर गेल्यावर डान्स करण्यासाठी मोठा हॉल होता. तळमजल्यावरही दोन तीन प्रशस्त दिवाणखाने होते. खूप उंच हेडरूम असल्यामुळे हवा चांगली खेळत होती आणि त्या मानाने उकाडा कमी होत असे. कदाचित तिथे आम्ही उभी आडवी पार्टिशन्स घालून त्या वास्तूची शान थोडी बिघडवली असावी.
त्या जागेचे लोकेशन तर फारच छान होते. बोरीबंदर (मुंबई सीएसटी) आणि चर्चगेट या दोन्ही मुख्य रेल्वेस्टेशनपासून आणि हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन)या मुख्य बस टर्मिनसपासून ते चालत जाता येण्यासारखे होते, शिवाय तिथून बस आणि टॅक्सीने लवकर जाऊन पोचणेही सहज शक्य होते. गेटवर उभे राहिल्यास डाव्या बाजूला गेट वे ऑफ इंडियाची भव्य कमान, त्याच्या समोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि समोरच सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेल होते. मुंबई पहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण पहाणे आवश्यकच असल्याने त्यांची गर्दी सतत वहात असायची. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणारेही ओघाने आलेच. जवळपास अनेक प्रकारची चांगली खाद्यगृहे होती आणि सिनेमाथिएटरेही होती. जिथे आम्ही मित्र किंवा नातेवाइकांबरोबर मौजमजा करायला जात होतो अशा ठिकाणी रोज नोकरीसाठी जाणे याचेच आम्हाला खूप अप्रूप वाटत होते आणि मित्रांना आमचा हेवा वाटत होता.
(क्रमशः)
मी कोण आहे ? - भाग ८९
ओवायसीच्या मुख्य इमारतीत आत गेल्यानंतर उजव्या बाजूचा सगळा तळमजला आम्हाला मिळाला होता. आमच्या भायखळ्यातल्या ऑफिसच्या मानाने दोनतीनपट एवढी प्रशस्त जागा आम्हाला तिथे दिली गेली होते. तिथे गेल्यावर कुणी कुठे बसायचे याचे नियोजन करून एक नकाशा तयार केला गेला होता आणि तिथल्या जमीनीवर खडूने रेघा मारून चौकोन आखले होते, त्यात कुणाचे टेबल कुठे ठेवायचे हे दाखवले होते. पहिल्या हॉलमध्येच मागच्या बाजूला माझे बॉस नटराजनसाहेबांची क्युबिकल होती आणि त्याला लागूनच असलेल्या मोठ्या क्युबिकलमध्ये तीन चार इंजिनियर बसणार होते, त्यात माझीही जागा होती. असे तीन हॉल ओलांडून आत गेल्यानंतर टोकाला तीन लहान लहान वातानुकूलित खोल्या होत्या. त्या केबिन्समध्ये श्री.काटी, श्री.अरुमुगम आणि श्री.पीके भटनागर नावाचे साहेब बसणार होते.
श्री.काटी आमचे प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर होते आणि आम्ही सगळे काटीसाहेबांना रिपोर्ट करत होतो. श्री.अरुमुगम आमचे प्लॅनिंग इंजिनियर होते आणि आमच्याकडून काम करवून घेत होते. या दोघांशी चांगला परिचय झाला होता. श्री.भटनागर यांच्याकडे कुठली महत्वाची जबाबदारी किंवा कामगिरी दिलेली होती हे मात्र आम्हाला नीट समजले नाही. ते नेहमी सुटाबुटात असायचे, रुबाबदार होते, तितकेच शांत आणि सोज्वळ होते, त्यांचे वागणे आणि बोलणे सफाईदार आणि छाप पाडणारे असे असायचे. हे मी दुरूनच पहात होतो. मला त्यांच्या केबिनमध्ये जायची वेळच कधी आली नाही. ते थेट पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अणुशक्तीखात्याचे प्रमुख डॉ.विक्रम साराभाई यांच्या संपर्कात असतात आणि दिल्लीला किंवा परदेशात जात असतात असे ऐकले होते. काही काळानंतर भारत सरकारने पॅरिसला एक ऑफिस उघडले तिथे त्यांची नेमणूक झाली.
भायखळ्याच्या ऑफिसात मी एक कारकुनांचे टेबल उसने घेतले होते, ते माझ्या नावावर झाले नव्हतेच, त्यामुळे या हलवाहलवीमध्ये ते अंतर्धान पावले. ते माझ्या नव्या जागेवर येऊन पोचले नाही. त्या सुमाराला बीएआरसीमधूनही काही टेबलखुर्च्या आल्या होत्या, त्यातले एक मला दिले गेले होते. पण ट्रकमध्ये चढताउतरवतांना त्याचा एक पाय मोडला होता. मग पुन्हा थोडा नेट लावून प्रयत्न केला आणि मला त्याच्या बदल्यात गोदरेजचे ब्रँडन्यू टेबल मिळवले.
(क्रमशः)
मी कोण आहे ? - भाग ९०
भायखळ्याच्या ऑफिसमध्ये मला पुढील काही दिवस करायचे काम दिले गेले होते आणि मी त्याची हळूहळू सुरुवातही केली होती, पण तिथे सर्वांना बसायला पुरेशी जागा नव्हती आणि आपला बाडबिस्तरा आवरून केंव्हाही तिथून दुसरीकडे जावे लागणार आहे असे सांगितले जात असल्यामुळे अनिश्चितता होती. त्यामुळे बॉसकडूनही कुठले टार्गेट्सही दिले जात नव्हते. ओवायसीमध्ये गेल्यावर मला हक्काची टेबलखुर्ची मिळाली आणि ड्रॉइंग्ज वगैरे ठेवायला एक पत्र्याचे रॅकही मिळाले. आता मी जोमात काम करायला सुरुवात केली.
आम्हाला जी यंत्रसामुग्री तयार करवून घ्यायची होती त्याची दोनतीनशे ड्रॉइंग्ज कॅनडामधून टप्प्याटप्याने येत होती. रेकॉर्ड सेक्शनकडे रोज चौकशी करून आणि तगादा लावून मी त्यांच्या प्रिंट्स काढवून घेतल्या. जितकी ड्रॉइंग्ज हातात आली ती टेबलावर पसरून त्यांचा कसून अभ्यास केला. त्यातले निरनिराळे पार्ट कुठकुठल्या मटीरियल्सपासून तयार करायचे आहेत हे पाहून त्यानुसार निरनिराळ्या याद्या तयार केल्या. त्यावरून निरनिराळ्या प्रकारचे प्रत्येक मटीरियल किती लागणार आहे याचे अंदाज केले.
खरे तर ज्या कारखान्यांमध्ये ही यंत्रे तयार केली जाणार होती त्या कारखान्यातल्या इंजिनियरांनी हे किचकट काम करायचे असते, पण कोणते कारखाने हे काम करणार आहेत हे अजून ठरले नव्हते. हे सगळे मटीरियल निरनिराळ्या एएसटीएम स्पेसिफिकेशननुसार असणे आवश्यक असल्यामुळे ते भारतातल्या बाजारात उपलब्ध नव्हतेच आणि त्या काळात असलेल्या नियमांनुसार ते आयात करण्यासाठी इंपोर्ट लायसेन्स काढावे लागत होते. त्यासाठी खूप वेळ असे. तो विलंब टाळण्यासाठी आम्हीच ते काम करून सगळे मटीरियल कॅनडामधून आयात करायचे असे ठरवले होते.
आमच्या यंत्रांचे सांगाडे आणि इतरही काही मुख्य भाग पोलादाच्या पत्र्यांचे तुकडे कापून आणि ते वेल्डिंगने एकमेकांना जोडून तयार करायचे होते. ज्याप्रमाणे शिंपी लोक ग्राहकाच्या शरीराची मापे घेऊन शर्ट किंवा पँट बेततात आणि किती मीटर कापड लागेल हे सांगतात तशाच प्रकारे आम्ही प्लेट कटिंग डायग्रँम्स तयार करून किती आकाराच्या किती प्लेट्स लागतील याचे अंदाज बांधले.
(क्रमशः)
--
१५-०३-२०२३
मी कोण आहे ? - भाग ९१
गेली दोन वर्षे मी या लेखमालिकेमध्ये माझ्या जुन्या आठवणी क्रमाक्रमाने लिहीत आलो आहे. आज थोडे विषयांतर.
"मी कोण आहे ?" या प्रश्नावर मी एका विचारवंताच्या ध्वनिचित्रफितीमधले विचार ऐकले. कुठल्या तरी पाश्चात्य विद्वानाने असे सांगितले आहे म्हणे की "मी स्वतःला जो समजतो तो मी नसतो, तू मला जो समजतोस तोसुद्धा मी नसतो. तू मला काय समजतोस असे मला वाटते तो म्हणजे मी असेन."
किती गोंधळ आहे ना ? पण त्यात थोडे फार तथ्य असावे. मी स्वकेंद्रित वृत्तीचा असलो तर कदाचित स्वतःला महान किंवा सर्वश्रेष्ठ समजत असेन, बाकीची सगळी माणसे मला तुच्छ वाटतील. पण माझ्या मनात इंफिरिऑरिटी काँप्लेक्स असला तर मी उगाचच स्वतःला तुच्छ समजत असेन. दुसरा कोणी मला काय समजत असेल ते त्याच्या मनात असते. सहसा कोणीही ते स्पष्टपणे उघड उघड सांगत नाही. पण त्याच्या मनात माझी काय प्रतिमा असेल त्याचा काहीसा अंदाज मला त्याच्या वागण्यातून येतो. मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतून पाहिले तर मी म्हणजे लोकांच्या मनातली माझी प्रतिमा असते. तिला जपायचा आटोकाट प्रयत्न आपण सतत करत असतो.
अध्यात्मामध्ये "मी कोण आहे ?" या प्रश्नाच्या उत्तरात माझे शरीर आणि त्याचे नाव गाव, गुणदोष याला काहीच स्थान नसते. तिथे मी म्हणजे माझा आत्मा असतो. तो कसा असतो हे गूढ मला तरी अजून समजलेले नाही.
(क्रमशः)
--
19-03-2023
मी कोण आहे ? - भाग ९२
राजस्थानमधील कोटा इथे बांधल्या जात असलेल्या अणुशक्तीकेंद्रासाठी यंत्रसामुग्री तयार करून घेणे हे आमचे काम होते. यातल्या एका उपकरणाच्या (Equipment) निर्मितीचे काम मी नोकरीला लागायच्या काही दिवस आधीच आमच्या बीएआरसीच्या वर्कशॉपमध्ये सुरू झाले होते. उपकरण या शब्दावरून ती एकादी हातात धरता येण्यासारखी लहानशी वस्तू वाटेल, पण या इक्विपमेंटचे नाव 'कॅरेज अॅक्सेस डोअर'असे होते. हा डोअर म्हणजे दरवाजा एकाद्या हत्तीखान्याला शोभेल असा जंगी होता आणि त्यातून हत्तीच्या सोबत जिराफसुद्धा ताठ मानेने आत बाहेर करू शकेल इतका मोठा होता. खरे म्हणजे ती एक सरकणारी भिंत होती.
पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी भिंतीवर बसून तिला चालवत नेले होते अशी कथा आहे. चित्रांमध्ये ती भिंत एकाद्या कट्ट्याएवढी दाखवतात. इथे आकाराला महत्व नाही, जड वस्तूला सचेतन करणे हा अद्भुत चमत्कार होता. आम्ही तयार करत असलेली ही भिंतसुद्धा मागेपुढे सरकवता येणार होती. त्यासाठी कुणीही तिच्या डोक्यावर जाऊन बसायचे नव्हते, तशी सोयही नव्हती. शंभरदीडशे टन वजनाचा तो दरवाजा हाताने ढकलून उघडण्यासाठी कोणी सॅमसन पहिलवान आमच्याकडे नोकरीला ठेवला नव्हता आणि तो दरवाजा उघडल्याबरोबर रिअॅक्टरमधून निघणारे तीव्र किरण आणि तिथली दूषित हवा यांच्याशी संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे कुणीही त्या वेळी त्याच्या जवळपास जाणेही धोक्याचे होते. दूर आडोशाला उभे राहून एक बटन दाबले की दरवाजा आपोआप उघडेल अशी व्यवस्था करायची होती. अलीबाबाच्या गोष्टीतला चोरांच्या गुहेचा दरवाजा "खुल जा सिमसिम" म्हणताच उघडतो हे वाचतांना ती कल्पनाच मजेदार वाटली होती. आपण तसा दरवाजा तयार करून घेण्याची कल्पना एकदम भन्नाट वाटली होती.
(क्रमशः)
--
02/04/2023
मी कोण आहे ? - भाग ९३
आम्ही तयार करत असलेली ही चालणारी भिंत दगडाविटांची नव्हती. तो वीसबावीस फूट उंच, बारातेरा फूट आडवा आणि तीन फूट जाड असा एक अवाढव्य आकाराचा डबा होता. निरनिराळ्या जाडीच्या पोलादी पत्र्यांचे तुकडे कापून आणि ते एकमेकांना वेल्डिंग करून जोडून हा डबा तयार करायचा होता आणि त्यानंतर भल्यामोठ्या यंत्रांवर त्याच्या अनेक भागांचे मशीनिंग करायचे होते. इथे मुंबईच्या कारखान्यात तयार केलेला हा डबा रावतभाटा इथे उभारल्या जात असलेल्या प्रकल्पामध्ये नेऊन जागेवर उभा केल्यानंतर त्यात सिमेंट काँक्रीट भरले जाणार होते. पण हा डबा साधा सरळ चौकोनी आकाराचाही नव्हता. तांत्रिक कारणासाठी त्याच्या एका कोपऱ्यात मोठे भगदाड ठेवले होते तर दुसऱ्या कोपऱ्याजवळ आकार वाढवून त्याची भरपाई केली होती, त्यामुळे त्याचा आकार वेडावाकडा झाला होता. गोगलगाईच्या पोटात तिचे पाय असतात असे म्हणतात. त्याप्रमाणे आमच्या या दरवाजाच्या पोटातच सोळा चाके बसवायची होती, ती फक्त नखाइतकीच बाहेर डोकावत होती. या दरवाजाला ढकलण्यासाठी दोन मोठे हैड्रॉलिक सिलिंडरही त्याच्या पोटातच बसवायचे होते. त्याला ढकलले जात असतांना त्याने आपल्या मार्गावरून तसूभरही बाजूला जाऊ नये यासाठी बारा मार्गदर्शक चक्रे लावायची होती. याशिवाय तो पूर्णपणे बंद किंवा उघडलेल्या स्थितीत असतांना त्याला जागचे हलू न देण्यासाठी चार कुलुपे लावायची होती. यातले प्रत्येक कुलुप एकाद्या पहारीसारखे होते. काही अपघातामुळे आतल्या हवेचा दाब दुप्पटपर्यंत वाढला किंवा एकादा जबरदस्त धरणीकंप झाला तरीही या दरवाज्याला घट्ट धरून ठेवण्याएवढी या मजबूत लॉक्सची क्षमता होती.
या सगळ्यांचे मूळ डिझाइन एका कॅनेडियन कंपनीने केले असले तरी पुढील प्रकल्पासाठी आम्हीच ते करायचे होते म्हणून आम्ही सगळी कॅलक्युलेशन्स स्वतः करून पहात होतो आणि खात्री करून घेत होतो. त्याची निर्मिती सुरू असतांना पहायला मिळत असल्यामुळे आम्हाला वर्कशॉपच्या निरनिराळ्या भागातली कामे कशी चालतात हे ही जवळून पहायला मिळत होते.
(क्रमशः)