Wednesday, April 07, 2021

मी आहे तरी कोण ??? - भाग १

 माझे शरीर, माझे मन, माझ्या भावना, माझी कीर्ती, माझा मीपणा वगैरे म्हणणारा हा मी कोण असतो, (कोहम्) हा प्रश्न पुराणकालापासून अनेक महान तत्वज्ञानी विचारत आले आहेत आणि ऋषीमुनींपासून ते आधुनिक काळातल्या कित्येक संतमहंतविद्वानांनी  याची खूप विस्ताराने उत्तरे दिली आहेत. त्यातली काही अत्यल्प अशी उदाहरणे मी वाचलीही आहेत, पण बहुतेक वेळा ती माझ्या डोक्यावरूनच गेली आहेत. मला तरी या निर्गुण निराकार आणि अदृष्य अशा अंतरात्म्याचा शोध घेण्याची मनापासूनओढ कधीच लागू शकली नाही. त्यापेक्षा या जगातले निरनिराळे लोक मला कोण समजत आले किंवा माझे मलाच मी कोण असावा असे वाटत गेले हे पहायला थोडे सोपे आहे.  मी गेले दोन महिने तसा एक प्रयत्न फेसबुकवरील फलकावर टप्प्याटप्प्याने लिहायचा प्रयत्न करत आहे. त्यातले पहिले पंचवीस भाग एकत्र करून हा लेख तयार केला आहे.

मी आहे तरी कोण ??? याचा पुढील भाग इथे. 

https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html

**************



मी कोण आहे?       भाग १

तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहीत आहे. वर तुमचं नाव तर दिलं आहे आणि मी कोण म्हणून काय विचारता? पण अहो ते फक्त माझं 'नाव' आहे, पण हा आनंद घारे कोण आहे ? असं तुम्हाला तिसऱ्या कुणी विचारलं तर निरनिराळी उत्तरे येणार नाही का? आणि ती मला माहीतही नसतील. पण मला एवढं माहीत आहे की मीच हा प्रश्न विचारला तर कुणीच काही उत्तर देणार नाही. म्हणून मला लोक कोण म्हणून ओळखत आले आहेत असे मला वाटत आले हे आठवायचा एक प्रयत्न मी करत आहे. 

मी अगदी लहान बाळ असतांना काय विचार करत होतो की काहीच विचार करत नव्हतो ते मला आता अजीबात आठवत नाही, पण मी शाळेत जायला लागलो त्याची मला आठवण आहे. त्या काळात सगळे तोक मला माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणूनच ओळखायचे आणि कुणी अनोळखी माणसानं विचारलं तर मीसुद्धा माझी तीच ओळख सांगत असे. माझ्या वडिलांना गावातले लोक बंडोपंत म्हणायचे त्यामुळे त्यांच्यासाठी मी 'बंडोपंतांचा मुलगा' होतो. माझे वडील आमच्या इतर नातेवाईकांपैकी कुणाचे बंधू तर कुणाचे काका किंवा मामा होते, पण सगळे त्यांना 'दादा' म्हणत असत. त्यामुळे तिथे मी 'दादांचा मुलगा' होतो.

सत्तर वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि आमच्या लहान गावात बहुतेक विवाहित स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याची पत्नी म्हणूनच ओळखले जात असे. त्यामुळे माझ्या आईचीही तशी स्वतंत्र ओळख नसावी. तिच्या मैत्रिणी तिला काय म्हणत असत ते काही मला आता आठवत नाही, पण त्या मला तिचा मुलगा म्हणूनच ओळखत होत्या एवढे मात्र आठवते. माझ्या आईच्या माहेरचे टोपणनाव 'बाई' होते, त्यामुळे त्या माहेरच्या कुटुंबांमध्ये मी बाईमावशीचा किंवा बाईआत्याचा मुलगा होतो. 

माझे शाळेतले मित्र मात्र मला माझ्या नावानेच ओळखायचे. जशी त्यांची नावे राजा, पम्या, सुऱ्या वगैरे होती त्याप्रमाणे तेही मला आनंदा किंवा आंद्या म्हणायचे. त्यांची संख्या कमी होती, पण मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवत असे आणि तेवढ्या वेळापुरती मात्र माझी स्वतंत्र ओळख असायची.

*******

मी कोण आहे?       भाग २

सगळ्याच लहान मुलांना आपापले आईबाबा खूप ग्रेट वाटत असतात आणि तेच सगळ्या दृष्टीने ठीक असते. मलाही माझे आईवडील खूप मोठे वाटत असत आणि त्यांचा मुलगा म्हणवून घेण्यात मलाही अभिमानच वाटायचा. त्यामुळे लहानपणची माझी ही ओळख मला आवडत होती. पण त्याबरोबर एक लहानशी जबाबदारी येत होती. "अमकीचं कारटं वांड आहे", "तमक्यांचा पोरगा वाया गेला आहे." अशी वाक्ये कधीकधी कानावर पडायची आणि "लोकांसमोर वेडेपणा करायचा नाही हं, शहाण्यासारखं वागायचं" असा उपदेशही ऐकायला मिळत असे. पण नक्की कशाला शहाणपणा म्हणतात हे माहीत नसल्यामुळे कधीकधी गोंधळही व्हायचा. 

माझे वडील कोणी पुढारी किंवा प्रसिद्ध क्रिकेटर, सिनेमातले हीरो वगैरे नव्हते, गावातले मोठे सावकार किंवा फौजदार नव्हते की शाळेतले गुरुजीही नव्हते. त्यामुळे वर्गातल्या इतर मुलांना ते माहीत नसायचे. त्यांचा मुलगा म्हणून मला काही जास्त भाव मिळायची शक्यता नव्हती. तिथे माझी ओळख माझ्याच नावाने होत असे. 

मी माझ्या वर्गातला वयात सर्वात लहान मुलगा होतो, अंगानेही काटकुळा तसेच बुटका होतो. इतर आडदांड मुलांची मला थोडी भीतीच वाटायची. मारामारीची वेळ आली तर मलाच जास्त मार खावा लागणार हे पक्के माहीत असल्यामुळे मी कधी कुणाशी भांडण उकरून काढत नव्हतो की दुसऱ्यांच्या भांडणात नाक खुपसायला जात नव्हतो. वर्गातल्या धांगडधिंग्यातही भाग घेत नव्हतो. त्यामुळे मास्तरांच्या नजरेत मी एक गरीब आणि शांत विद्यार्थी होतो. कुठल्याही शर्यतीमध्ये मी आपला मागे मागेच रहात असे आणि सामूहिक खेळात मला घेतलेच तर मी लिंबूटिंबू असायचा. पण माझा बुद्ध्यांक जरा चांगला असल्यामुळे पाठांतर, भाषण, भेंड्या वगैरे अवांतर गोष्टींमध्ये मात्र मी पुढे असायचा, मला परीक्षेत चांगले मार्क मिळायचे आणि तेंव्हा नव्यानेच सुरू झालेली स्कॉलरशिप परीक्षाही मी पास झालो होतो. त्यामुळे मी एक 'स्कॉलर' मुलगा झालो होतो. माझे मित्र नसलेली काही इतर मुलेही मला ओळखायला लागली होती. हळूहळू माझी एक वेगळी ओळख घडत होती.   

*******


मी कोण आहे?        भाग ३

शालांत परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षणाची काहीच सोय त्या काळात आमच्या गावात नव्हती. माझी ठाण्याच्या तत्वज्ञान विद्यापीठात निवड झाली आणि मी तिथे रहायला गेलो आणि सोमैया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतल्या पहिल्या वर्गात दाखल झालो. माझे आईवडील, भाऊबहीण, काका, मामा वगैरे कुणालाच तिथले कोणीही ओळखत नव्हतेच, इतकेच काय तर आधी तिथे मलाही कोणी ओळखत नव्हते. या नव्या जगात मलाच माझी ओळख करून द्यायची होती. 

सुरुवातीला मी तत्वज्ञान विद्यापीठाच्या गुरुकुलातला एक शिष्य किंवा साधक होतो. सनातन धर्मातली जीवनपद्धति, उपासना पद्धति वगैरे शिकायचा प्रयत्न करत होतो, रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना म्हणत होतो. आपली सगळी कामे आपणच करून आत्मनिर्भर होत होतो. तिथली माझ्याबरोबर असलेली दहाबारा मुले हेच करत होती, त्यांच्यातलाच मी एक होतो. तिथले मार्गदर्शक आम्हाला हे सगळे अत्यंत प्रेमाने  शिकवत होतेच, पालकांच्या मायेने आमची पूर्ण काळजी घेत होते. त्याच्यासाठी मी एक संस्कारक्षम बालक होतो. 

सोमैया कॉलेजमध्ये मी एक हुषार आणि जिज्ञासू विद्यार्थी होतो. बहुधा आमच्या बॅचपासूनच भारत सरकारने राष्ट्रीय शिष्यवृत्तीची (नॅशनल स्कॉलरशिपची) योजना सुरू केली होती आणि मला ती मिळाली होती. त्यामुळे 'स्कॉलर' ही शाळेतली ओळख माझ्याबरोबर पुढेही शिल्लक राहिली. मी इंटरमीजिएट परीक्षेत आमच्या कॉलेजात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल मला सुवर्णपदक मिळाले. पण ते गळ्यात पडेपर्यंत मी ते कॉलेज सोडून पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेलो होतो. त्यामुळे तिथे माझी ती ओळख झालीच नाही. 

******

मी कोण आहे?      भाग ४ 

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्यासमोर पुन्हा एक नवीन विश्व आले. तिथेही सगळे अनोळखी लोकच होते. मी या बाबतीत थोडा अनुभवी झालेलो होतो, पण दहाबारा मुलांमधून एकदम दीडदोनशे मुलांच्या वसतीगृहात आलो होतो. तिथे आमची आपुलकीने काळजी घेणारे असे कोणी नव्हते. एक जरब बसवणारे रेक्टर होते. आमच्या होस्टेलवर निरनिराळ्या बॅकग्राउंडमधून आलेली मुले होती. कॉन्व्हेटस्कूलमधून आलेली, फाडफाड इंग्लिश बोलणारी आणि लाडात वाढलेली बहुतेक मुले पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, सिंधी, पंजाबी वगैरे होती आणि त्यांचा वेगळा कळप झाला होता, त्यांची महागडी मेसही वेगळी होती. अनुसूचित जातीजमातींच्या आरक्षण कोट्यामधून प्रवेश मिळालेल्या मुलांचा वेगळा कळप होता. 

हॉस्टेलमधली बाकीची बहुतांश मुले मराठीभाषी आणि मध्यमवर्गातून आलेली होती. त्यांच्यातल्या कोल्हापूर किंवा सोलापूरहून आलेल्या मुलांनी आपापले ग्रुप केले होते, माझ्या गावातून आलेला मी एकटाच असल्यामुळे मी अमुकतमुक गाववाला नव्हतो. आमच्या हॉस्टेलमधल्या निरनिराळ्या मेसमध्ये काही वैशिष्ट्ये होती. एक संपूर्णपणे शाकाहारी होती तिच्यात दक्षिण भारतातल्या मुलांना प्राधान्य होते, तर अशाच दुसऱ्या एका मेसमध्ये गुजराती आणि मारवाडी मुले जास्त असायची. मी आपली सर्वसाधारण मराठी मेस निवडली होती. हॉस्टेल किंवा कॉलेजमध्ये आम्ही कोणीच एकमेकांची जात पहात नव्हतो, पण काही मुलांच्या आडनावावरून त्यांची जात ओळखू येत असे. माझ्या बाबतीत तसे होत नव्हते. मी 'आपल्या' जातीचा म्हणून कुणी मला जास्त जवळ केले नाही की 'परक्या' जातीचा म्हणून मला कुणी दूर लोटले नाही. भाषा, प्रांत, धर्म, जातपात वगैरेवरून माझी वेगळी ओळख झाली नाही.

मी त्या काळात कोण होतो? बाहेरच्या लोकांसाठी मी हॉस्टेलमध्ये राहणारा इंजिनियरिंग कॉलेजचा एक विद्यार्थी होतो आणि हॉस्टेलमध्ये रहाणाऱ्यांसाठी फर्स्ट ईयरचा, फर्स्ट फ्लोअरवर राहणारा आणि बी मेसमध्ये जेवणारा सामान्य मुलगा होतो, फार तर अशोक शेंडुरे आणि प्रदीप खारकर यांचा रूममेट होतो. पुढील दोन वर्षे यातला तपशील थोडा बदलत गेला. त्या काळात मी कधीकधी काही 'नसते उद्योग' करत होतो. एकदा एक सीआर (क्लास रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून निवडून आलो, एका वर्षी कॉलेजच्या अभ्यासाला लागणाऱ्या पुस्तकांच्या हॉस्टेलमधल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीचा ग्रंथपाल झालो आणि काही काळासाठी एका मेसक्लबच्या खजीनदाराचे काम सांभाळले.  सीआरला काही कामच नव्हते, पण लायब्रेरियन आणि ट्रेझरर यांना थोडा जनसंपर्क करावा लागत होता आणि त्यांची म्हणजेच माझी ती एक वेगळी ओळख होती.

 त्या वेळी आमच्या मेसमध्ये कॅरम, टेबलटेनिस, ब्रिज, चेस वगैरे इनडोअर खेळ खेळले जायचे. मला त्यातला कुठलाच खेळ चांगला खेळता येत नव्हता तरी मी उत्साहाने सगळीकडे लुडबुड करत होतो. पुढेही अखेरपर्यंत मला त्यातले काही फारसे जमले नाहीच, पण सगळ्या खेळांचे नियम मात्र समजले. या निमित्याने माझ्या जास्त मुलांच्या ओळखी झाल्या. ते मला नावाने ओळखायला लागले. 

*******


मी कोण आहे?        भाग ५

इंजिनियरिंगच्या अखेरच्या वर्षाची परीक्षा देऊन झाल्यावर हॉस्टेलमधली सगळी मुले अगदी उड्या मारत आपापल्या घरांकडे परत गेली, पण मी त्यांना अपवाद होतो. वर्षभरापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि मोठा भाऊ आमच्या आईला त्याच्याकडे बार्शीला घेऊन गेला होता. ज्या घरात माझा जन्म झाला होता आणि मी माझे सगळे बालपण मजेत काढले होते ते घर आता तिथे माझी वाट पहात नव्हते, माझी माणसे आता तिथे रहात नव्हती. मी तिथे जाऊन काही उपयोग नव्हता किंबहुना मी आता तिथे जाऊन राहूच शकत नव्हतो. उलट पुण्यातल्या हॉस्टेलच्या वातावरणात आणि मित्रमंडळींमध्ये मी चांगला रमलो होतो. पण तिथे मिळालेले मित्र आता चहूबाजूंना पांगले जाणार, ते पुन्हा कधी आणि कुठे भेटतील की भेटणारच नाहीत ते सांगताच येत नव्हते. त्या काळात आजच्यासारखी संपर्कमाध्यमे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्यापुढे कुणाशीही संपर्क ठेवणे अशक्य नसले तरी फार कठीण होते. एकदाचा एकादा माणूस नजरेआड गेला की गेला अशी परिस्थिति होती. या सगळ्याची हुरहुर मनाला लागली होती.

मी शाळेत असेपर्यंत इंजिनियर नावाचा प्राणीच पाहिला नव्हता, आमच्या लहान गावातही कोणी इंजिनियर रहात नव्हता आणि आमच्या नातलगांमध्येही कोणी इंजिनियर झाला नव्हता. त्या काळातल्या ज्या कथाकादंबऱ्या मी वाचत होतो त्यांच्या लेखकांनी तरी एकादा खराखुरा इंजिनियर पाहिलेला असेल की नाही कुणास ठाऊक, पण इंजिनियर म्हणजे बंगला, गाडी असे त्यांचे एक अतूट नाते ते रंगवत होते. एकदा का इंजिनियरिंगची डिग्री मिळाली की पुढे मजाच मजा असे एक चित्र दाखवले जात होते. पण शेवटच्या वर्षाला पोचेपर्यंत मला तेंव्हाच्या सत्यपरिस्थितीची चांगली जाण आली होतीच. इथे कुणीही माझ्यासाठी बंगला बांधून ठेवलेला नाही आणि कुणीही मला गाडीत बसवून तिथे घेऊन जाणार नाही हे मला पक्के ठाऊक झाले होते.  त्यामुळे हॉस्टेल सोडल्यानंतर मला पुढे कुठे जायचे आहे हेच एक मोठे प्रश्नचिन्ह होते. या सगळ्या कारणांमुळे मला जेंव्हा तिथून निघायची वेळ आली तेंव्हा मी मनातून थोडा उदास झालो होतो.

******


मी कोण आहे?        भाग ६

मला माझ्या आईला भेटायची ओढ लागलेली होतीच. ती त्या वेळी माझ्या मोठ्या भावाकडे बार्शीला रहात होती. मी हॉस्टेल सोडून निघाल्यावर माझे पाय आपोआप तिकडेच वळले. गावातला आमचा प्रशस्त वाडा चांगला दुमजली होता. त्याच्या मानाने भावाचे दोन खोल्यांचे घरकुल चिमुकले होते, पण तिथल्या लोकांच्या विशाल मनात माझ्यासाठी भरपूर ऐसपैस जागा होती. त्यांनी मला अत्यंत आपुलकीने सामावून घेतले. आई, भाऊ आणि वहिनी यांच्या प्रेमळ छायेखाली रहायला मला आवडत होते, पण मी तिथे फार दिवस राहू शकत नव्हतो कारण तिथे राहून मला नोकरी मिळणे फार कठीण होते. "असेल माझा हरी तर तो देईल खाटल्यावरी" असे म्हणत वाट पहात राहणे माझ्या स्वभावातही नव्हते की मला ते परवडण्यासारखे होते. "यत्न तो देव जाणावा" अशीच शिकवण मला मिळाली होती.

१९६६ सालच्या त्या काळात देशाची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती फारशी बरी नव्हती. उद्योगधंद्यांची वाढ मंदावली होती आणि फारशी नवीन नोकरभरती होतच नव्हती. त्या काळात कँपसइंटरव्ह्यू तर नव्हतेच. माझा कुठलाही काका किंवा मामा एकाद्या मोठ्या पदावर विराजमान नव्हता आणि तो मला कुठे चिकटवून देणार नव्हता. नोकरी मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांमधील जाहिराती वाचून अर्ज करायचे, मुलाखतीचे बोलावणे आले तर जाऊन ती देऊन यायचे आणि निवड झाली तर देवाचे आभार मानायचे एवढा एकच मार्ग होता. बहुतेक सगळ्या मोठ्या कंपन्याची ऑफिसे मुंबईपुण्याला होती आणि मलाही तिथेच राहून नोकरीसाठी प्रयत्न करायला हवे होते.

त्याच्या आधी आणखी काही कामेही करायची होती. कॉलेजमधून मार्कशीट आणायची होती, झेरॉक्सचा शोध लागायच्या आधीच्या त्या काळात सर्टिफिकेटांच्या ट्रू कॉपीज टाइप करून घ्याव्या लागत असत आणि त्यानंतर कुठल्या तरी अधिकाऱ्याकडून त्या अटेस्ट करून घ्यायच्या होत्या. यासाठी मलाच पुण्याला जाणे आवश्यक होते. परीक्षेचा निकाल लागताच मी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. 

****** 

मी कोण आहे?          भाग ७

माझा माझ्याहून थोडा मोठा भाऊ त्यावेळी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत (एनसीएलमध्ये) संशोधन करत होता. त्यासाठी त्याला भारत सरकारकडून पोटापुरती शिष्यवृत्ती मिळत होती. त्यातच काटकसर करून तो मला खर्चासाठी पैसे देत होता. त्याला स्वतःला घर करून रहायला अजून जमले नव्हते. नळस्टॉपजवळ एका खोलीत तो इतर दोनतीन मुलांबरोबर रहात होता. तिथेच मीही जाऊन पोचलो. ती मुले सकाळी उठून तयार होऊन पिंपरीचिंचवडकडे नोकरीला जायची ती रात्रीच परत येऊन आपापल्या पलंगावर झोपायची. तोपर्यंत मी बाल्कनीमध्ये आपली पथारी पसरून देई आणि सकाळी उशीरा उठून खोलीत येत असे. त्यामुळे मला त्यांचा काही उपसर्ग होत नव्हताच आणि मीही त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत होतो.

माझे तिथे राहणे नियमात बसत होते की नव्हते ते मला माहीत नव्हते, पण माझ्यामुळे कुणाला त्रास होत नव्हता की कुणाचे नुकसान होत नव्हते यामुळे मला त्यात अपराधीपणा वाटत नव्हता.  तसा तो थोड्याच दिवसांचा प्रश्न होता, एकदा का माझी दुसरी सोय झाली की मी तिथून जाणार होतोच. त्या खोलीचा मालक तिथे रहात नव्हता. त्याचा एक माणूस महिन्यातून एका ठरलेल्या दिवशी तिथे यायचा आणि जास्त विचारपूस न करता भाड्याचे पैसे घेऊन जायचा. त्याच्या नजरेला पडले नाही की झालं.  

त्या खोलीत स्वयंपाक करण्याची काहीच सोय नव्हती आणि परवानगीही नव्हती. कमीतकमी खर्चात पोटभर जेवण देणाऱ्या काही जागा माझ्या भावाने शोधून ठेवल्या होत्या तिथेच तो मलाही घेऊन जाऊन माझी क्षुधाशांती घडवायचा. सगळी इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रे घेऊन त्यातल्या वाँटेडच्या जाहिराती बघायच्या आणि अर्ज खरडून पोस्टात टाकायचे हाच माझा रोजचा उपक्रम होता. उरलेला वेळ पुस्तके वाचण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात फिरण्यात घालवत असे आणि चातकाच्या आतुरतेने पोस्टमनच्या येण्याची वाट पहात असे.   
*****
 
मी कोण आहे?            भाग ८

आणि एके दिवशी टपालाने मला एक लिफाफा आला. माझ्या नावाने आलेला तो बहुधा पहिलाच लिफाफा असावा. आधी तर त्याला डोक्यावर घेऊन नाचावे असे मला वाटले. मी अधीरपणे पण काळजीपूर्वक तो कापून आतले पत्र काढले. फिलिप्स या जगप्रसिद्ध कंपनीकडून मला मुलाखतीचे आमंत्रण आले होते. ठरलेल्या दिवशी मी लवकर उठून आणि  जरा बरे कपडे घालून तयार झालो आणि चौकशी करत करत लोणी काळभोरला त्या कारखान्यात जाऊन पोचलो. गेटवरल्या शिपायाला लिफाफा दाखवून आत प्रवेश केला आणि स्वागतिकेला पत्र दाखवल्यावर तिने मला एका केबिनकडे जायला सांगितले.

यापूर्वी मी फक्त सिनेमांमधले इंटरव्ह्यूचे सीन पाहिले होते. म्हणजे बाहेरच्या दालनात तणावाखाली घामाघूम झालेली बरीच मुले आपापल्या देवाचे नाव घेत बसली आहेत आणि आत बसलेले चार पाच शहाणे एकेकाला बोलावून त्याच्यावर प्रश्नांची झोड उठवत आहेत वगैरे. त्यामुळे मीही मनातून थोडा नर्व्हस होतोच. पण इथे तसले दृष्य नव्हते. आत बसलेल्या व्यक्तीने मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिले आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मग अत्यंत शांतपणे मी कोण आहे, कुठून आलो, पुण्यात कुठे राहतो, माझ्या घरी आणखी कोण कोण आहेत, ते काय काय करतात किंवा करत होते वगैरेची कसून चौकशी केली आणि पुन्हा बोलावू असे पोकळ आश्वासन देत माझ्या हातावर वाटाण्याच्या अक्षता ठेवल्या. माझ्याकडे उठावदार व्यक्तीमत्व नाहीच आणि माझे कपडेही भपकेदार नव्हते, अनोळखी माणसाशी बोलतांना माझ्या आवाजातही थोडा कंप आला असावा आणि मुख्य म्हणजे कुठल्याही थोरामोठ्या लोकांशी माझ्या ओळखी नव्हत्या. एकूण काय तर मी त्या माणसावर छाप पाडू शकलो नव्हतो.

मी आपला मारे मशीन डिझाईन आणि मशीन टूल्स वगैरे विषयांची उजळणी करून गेलो होतो, पण त्यातले एक अक्षरही विचारले गेलेच नाही. मला भेटलेला अधिकारी बहुधा पर्सोनल खात्यातला असावा. त्या काळात एचआर हा शब्द अजून रूढ झाला नव्हता. त्याने पास केलेल्या उमेदवारांनाच पुढे आतल्या साहेबांच्या भेटीला पाठवले जात असावे. पण इथे नंदीनेच मला आडवल्यामुळे मला त्या महादेवाचे दर्शन झालेच नाही. "मी आहे तरी कोण?" या प्रश्नाचा भुंगा काही काळ माझ्या मेंदूला कुरतडत राहिला.
*******

मी कोण आहे?           भाग ९

नोकरीच्या शोधातला माझा दुसरा अनुभव याच्या बरोबर उलट होता. गेल्या साठसत्तर वर्षांपासून हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य मानली जात आली आहे. त्या काळात त्यांनी नोकरीसाठी जाहिरात दिली नसतांनाही मी त्यांचा पत्ता मिळवून एक अनाहूत अर्ज पाठवून दिला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला लगेच त्यांचे उत्तर आणि मुलाखतीसाठी बोलावणे आले. त्याप्रमाणे मी त्यांच्या मुंबईच्या हेडऑफिसात गेलो. तिथेही एकाच माणसाने माझा इंटरव्ह्यू घेतला, पण तो चक्क एक तरुण गोरा साहेब होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच एका फॉरेनरशी बोलत होतो. 

तो कुठल्या देशातून आलेला होता कुणास ठाऊक पण त्याचा अॅक्सेंट मला नीट समजत नव्हता आणि माझे तर्खडकरी इंग्रजी त्याला तरी किती कळत होते याची मला शंका येत होती. त्यामुळे हळू हळू बोलत आणि प्रश्न किंवा उत्तरे पुन्हा पुन्हा रिपीट करत आमचे बोलणे चालले होते. तो मला निरनिराळी इंजिने आणि मोटारगाड्या, क्रेन्स वगैरेबद्दल प्रश्न विचारत होता आणि मी माझ्या पुस्तकी ज्ञानानुसार येतील तेवढी उत्तरे देत होतो.  असे चांगले अर्धापाऊण तास चालले होते. त्यानंतर त्याने मला एकदम विचारले की मी किती दिवसात नोकरीवर हजर होऊ शकेन? मला तर नोकरीची तातडीची गरज होती आणि मी त्या दिवसापासून जॉइन व्हायलाही तयार झालो असतो, पण आपण फार घाईही दाखवू नये असे मला वाटले. मी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली आणि खुषीत बाहेर पडलो.

त्याच कंपनीत माझ्या भावाचा एक सिव्हिल इंजिनियर मित्र काम करत होता. संध्याकाळी मी  त्याला भेटायला गेलो आणि ही बातमी सांगितली. त्याने मला सांगितले, "अरे, पण  आमच्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियरकडे फक्त कन्स्ट्रक्सन साइटवरच्या हेवी मशीनरीचे मेंटेनन्स करायचे शारीरिक कष्टाचे काम असते. ते तुला झेपणार आहे का? आणि तू एकदा का आसामातल्या किंवा केरळातल्या जंगलातल्या आमच्या धरण बांधायच्या साइटवर गेलास की तुला दुसरी नोकरी शोधणेसुद्धा कठीण जाईल. तेंव्हा आणखी एकदा नीट विचार करून काय ते ठरव."  

मी कोण आहे, काय करू शकतो किंवा नाही यावर विचार करायची वेळ माझ्यावर प्रथमच आली होती.
*****

मी कोण आहे?          भाग १०

कॉलेजच्या हॉस्टेलमधली मुले मेंढरांसारखी असतात. त्यांना कळप करून रहायला आवडते. एका कळपातली मुले जवळजवळ सारखेच आचार विचार ठेवतात. इतकेच नव्हे तर काही कळपसुद्धा दुसऱ्या कळपांच्या मागे मागे जाऊ पहातात.  आमच्या हॉस्टेलमध्ये रहायला आलेल्या उच्चभ्रू हायफाय कुटुंबांमधून आलेल्या बोल्ड मुलांचा एक  कॉस्मोपॉलिटन कळप बनला होताच. तो सगळ्याच बाबतीत इतर कळपांच्या पुढे होता. त्यातल्या मुलांचे भविष्य त्यांच्या मम्मीडॅडींनीच ठरवून ठेवले होते. ते सगळे डिग्री घेतल्यावर अमेरिकेला जाऊन एमएस करणार होते आणि हे बेत पहिल्यापासून बोलून दाखवत होते. त्यांचे बोलणे ऐकून ऐकून आम्हाही वाटायला लागले की जर हे लोक फॉरेनला जात आहेत तर आपण तरी का मागे रहावे? आमच्यात तरी काय कमी आहे? 

पहिला प्रॉब्लेम म्हणजे तेंव्हा आम्हाला फाडफाड इंग्रजी बोलता येत नव्हते, परदेशातल्या लोकांचे बोलणे आपल्याला समजेल की नाही याची शंका वाटत होती. त्यावर उपाय म्हणून आम्ही कँपात जाऊन इंग्लिश पिक्चर पहाणे सुरू केले. दुसरे म्हणजे अमेरिकेत गेल्यावर तिथे आम्हाला चटणी भाकरी, पोळी भाजी, वरण भात वगैरे मिळणार नाही, त्याचं काय करायचं? मग आम्ही नाश्त्याला ब्रेडऑमलेट खायला सुरुवात केली, शुद्ध शाकाहारी मुलेही मटणचिकन खायला शिकली. यातले ब्रेडऑमलेटपर्यंत ठीक होते, पण हॉलीवुडचे सिनेमे पहाणे आणि नॉनव्हेज खाणे या खर्चिक बाबी परवडण्यासारख्या नव्हत्या.  त्या आपोआपच कमी होत गेल्या.

कॉलेजच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात गेल्यावर ही श्रीमंत मुले आपापसात पासपोर्ट, व्हिसा, टोफेल, गेट, अप्लिकेशन्स, अॅडमिशन, असिस्टंटशिप वगैरे काही काही बोलायला लागली. त्यांचे मुंबईतले पालक यासाठी लागणाऱ्या सगळ्या हालचाली करत होते. आमच्यासाठी ही धावाधाव कोण करणार? माझ्याकडे तर त्यासाठी वेळही नव्हता आणि कुठले संसाधनही नव्हते. मग म्हंटलं इतकी धडपड करून आपल्या आईवडील आणि बहिणभावंडांपासून दूर परक्या देशात कशाला जायचे? आपला देशच किती चांगला आहे आणि इथे आपली गरज आहे! आपण आपले इथेच राहून नोकरी शोधावी. कॉलेज संपल्यावर आमचे कळप तर विखुरले गेले होतेच. आमच्यातल्या काही मुलांनी नंतरही जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले आणि एकमेका सहाय्य करून वर्षदोन वर्षांनी अमेरिका गाठली. माझ्यासारखी बाकीची मुले मात्र रिझल्ट लागल्यावर लगेच नोकरीच्या शोधाला लागली.
*****


मी कोण आहे?
भाग ११

त्या काळात आमच्या कळपात एक विचित्र समज खूप पसरला होता. तो असा होता की प्रायव्हेट सेक्टर म्हणजे स्वर्ग. तिथल्या नोकरीत चांगले पगार, दरवर्षी घसघशीत पगारवाढ आणि बोनस, शिवाय अनेक फ्रिंज बेनेफिट्स, पटापट प्रमोशन्स होत जीएम किंवा एमडीपर्यंत घोडदौड वगैरे वगैरे सगळी धमाल आणि सरकारी खाती ती सगळी भोंगळ, तिथली नोकरी एकदम गचाळ! तसे म्हणायला  कुणाकडेही फारसा डाटा नव्हता, पण कुणीतरी कुठे तरी तसं ऐकलं असं सांगितलं म्हणून सगळेच तसे सांगायला लागले होते. इतकेच नव्हे तर सगळ्यांना तसे वाटायलाही लागले होते. अगदी सरकारी नोकरांची मुलंसुद्धा त्यात सामील होती. त्यामुळे सरकारी नोकरी म्हणजे अगदी नक्को नक्को. प्रत्येकजण म्हणायचा "मी तर बाबा, प्रायव्हेट नोकरीच करणार !" हर्ड मेंटॅलिटी किंवा कळपाचे मानसशास्त्र !

त्यामुळे आमच्या आधीच्या बॅचचे माझे दोन चांगले मित्र, शिवराम भोजे आणि विठ्ठल रोण अणुशक्तीखात्याच्या प्रशिक्षणशालेत भरती झाले तेंव्हा मी बुचकळ्यात पडलो. भोजे हा एक चांगला अभ्यासू आणि शांत, विचारी मुलगा होता आणि रोण तर एकदम तुफान ब्रिलियंट होता. ते दोघे कसे काय सरकारी नोकरीत गेले? मला त्याचे आश्चर्य वाटले. ते एकेकदा आम्हाला भेटायला हॉस्टेलमध्ये आले होते तेंव्हा आम्ही त्यांना विचारलेही. दोघांनीही सांगितलं की अॅटॉमिक एनर्जी म्हणजे काही अगदी पीडब्ल्यूडी नाहीये. हे एक नवे उगवते क्षेत्र आहे आणि त्यात पुढे खूप वाढ होणार आहे. त्यामुळे प्रगतीला चांगला स्कोप आहे. तिथलं कामही खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग आहे आणि तिथली सगळी लोकं नेहमी फॉरेनला जात असतात. ते दोघेसुद्धा तिथं अजून फक्त ट्रेनिंग घेत होते आणि त्यांनी कामाला सुरुवातही केली नव्हती. पण  त्यांचे मेरिट आणि हार्डवर्क तर होतेच, शिवाय कदाचित त्यांचे नशीबही चांगले असेल, निदान त्या दोघांच्या बाबतीत तरी पुढे जाऊन त्यांचं भाकित तंतोतंत खरं ठरलं.

पुढे तसं होणारच असेल असं काही आम्हालाही तेंव्हा वाटलं नव्हतंच, पण आमच्यावर  त्यांच्या सांगण्याचा थोडा परिणाम झाला. विशेषतः त्या परदेशी जाण्याच्या फायद्याचं आकर्षण वाटलं आणि सरकारी क्षेत्राचा तिटकारा थोडा कमी झाला. अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटची जाहिरात आमची परीक्षा सुरू व्हायच्या आधीच आली तेव्हा कुणीतरी मुंबईहून दहाबारा फॉर्मांचा गठ्ठाच घेऊन आला, त्यातला एक फॉर्म माझ्याही हातात आला. एक दिवस गंमत म्हणून हसतखिदळत, थट्टामस्करी करत आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ते फॉर्म सामुदायिकरीत्या भरले आणि पोस्टाने पाठवून दिले. तेंव्हा आमच्यातला कुणीही त्याबद्दल गंभीर नव्हता. रिझल्ट लागल्यानंतर मात्र मार्कशीटची एक ट्रूकॉपी तिकडेही पाठवून दिली.  

(क्रमशः)
*******

मी कोण आहे?        भाग १२

मी शाळेत शिकत असतांनाही आमच्या शाळेसमोरच असलेल्या वाचनालयामध्ये जाऊन किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर ही मासिके वाचत होतो. त्यांमध्ये किर्लोस्करांच्या कारखान्यांचेही वृत्त येत असे. पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजला असतांना खडकीचे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि हरिहरचे मैसूर किर्लोस्कर हे कारखाने पाहिले होते तेंव्हा मनात एक अनामिक आपलेपणा वाटला होता.  शंतनूराव किर्लोस्करांच्या बद्दल माझ्या मनात अपार आदर होता आणि त्यांच्याविषयीच्या बातम्या मी उत्सुकतेने वाचत होतो. त्यामुळे त्या ग्रुपबद्दल एक आकर्षण वाटत होते. मला जेंव्हा किर्लोस्कर न्यूमॅटिक्सकडून पत्र आले तेंव्हा खूप आनंद झाला. मी तो कारखाना पाहिला नसला तरी तो मोठा आणि चांगलाच असणार याची खात्री होती.

पण दुसरे दिवशी मला अणुशक्तीखात्याचेही आमंत्रण आले. दोन्ही ठिकाणचे इंटरव्ह्यू एकाच दिवशी होते आणि मला तर दोनपैकी एकाच जागी जाता येणे शक्य होते. मित्रांकडून कळले की पुण्यातच रहाणाऱ्या आणखी काही मित्रांनाही त्याच दिवशी बोलावले होते. मला मनातून तर किर्लोस्करांच्या कंपनीत जायची इच्छा होती, पण आता विचारात पडलो. एकदा वाटले की त्यांच्याच इंटरव्ह्यूला जावे, पण मग फिलिप्समधला इंटरव्ह्यू आठवला. पुण्यातले मित्र आपापल्या घरात रहात होते हा एक मुद्दा त्यांच्या बाजूने होता आणि त्यांची त्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत असलेल्या कुणाशी ओळख असण्याचीही शक्यता होतीच. त्यामुळे त्यांचे पारडे थोडे जड वाटले. 

दुसऱ्या बाजूला अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटच्या इंटरव्ह्यूबद्दल ऐकले होते की तिथे भारतभरामधून आलेल्या हजारो मुलांमधून थोड्याच मुलांची निवड केली जाते म्हणजे तेही जरा कठीण कामच होते. पण तिथे प्रशिक्षणाच्या काळात त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार होती त्यामुळे नोकरीबरोबरच माझे हे दोन्ही प्रश्नही सुटणार होते. पुण्याहून मुंबईला जाण्यायेण्याचे जे काय दहावीस रुपये भाडे होते तेही मिळणार होते. असा सगळा विचार करून आणि मोठ्या भावाशी सल्लामसलत करून मी इंटरव्ह्यूसाठी मुंबईलाच जायचे ठरवले.

(क्रमशः)
******

मी कोण आहे?       भाग १३

अणुशक्तीखात्याच्या इंटरव्ह्यूसाठी मी मुंबईतल्या मरीन लाइन्स रेल्वेस्टेशनसमोर हरचंदराय हाऊसमध्ये जाऊन पोचलो. या जुन्या इमारतीतले दोन मजले त्या काळात भारत सरकारच्या ताब्यात होते. तिथल्या एका अगदी ठेंगण्या पण कार्यक्षम कारकुनाने माझ्याकडचे पत्र पाहिले आणि त्याच्याकडे असलेल्या लिस्टवर खूण करून मला एका हॉलमध्ये बसायला सांगितले. तिथे खूप खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या आणि त्यांवर अनेक उमेदवार विराजमान झाले होते. त्यातला कुणीच माझ्या ओळखीचा नव्हता. एक दोघेजण ऐटीत सुटाबुटात आले होते, आणखी कुणी कुणी टाय बांधले होते आणि बाकीचे माझ्यासारखे साधेच कपडे घालून आले होते. मी घरून निघतांना अंगात घातलेले इस्त्रीचे कपडे लोकलच्या गर्दीत थोडे चुरगळलेही होते आणि घामाने भिजलेलेही होते, पण त्याला माझा इलाज नव्हता. थोड्या वेळाने माझ्या नावाचा पुकारा झाला आणि मला चार नंबरच्या कमिटीकडे पाठवले गेले. तिथे एकाच वेळी सातआठ समित्या मुलाखती घेत होत्या आणि हे काम दोन तीन आठवडे रोज सातआठ तास चालणार होते असे समजले.

मी चार नंबरच्या केबिनमध्ये गेलो. तिथे एका लहानशा टेबलाच्या मागे दोन माणसे आणि दोन बाजूला एक एकजण बसला होता. त्यातला मधला माणूस सर्वात मोठा म्हणजे तीसपस्तीस वर्षांचा दिसत होता आणि बाकीचे तीघे अजून विशीमधले तरुणच होते. टेबलाच्या चौथ्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. टेबलावर पिण्याच्या पाण्याचा ग्लासही ठेवला होता, पण माझ्या घशाला कोरड पडलेली नव्हती. चेअरमनने माझे नाव विचारून ते त्यांच्या यादीतलेच असल्याची खात्री करून घेतली आणि मुलाखतीची सुरुवात करून दिली.

ड्रॉइंग हीच मेकॅनिकल इंजिनियरांची भाषा असते. यंत्रांचे वर्णन करतांना रेखा चित्रे काढून दाखवण्यासाठी किंवा गणिते सोडवतांना आकडेमोड करण्यासाठी त्या टेबलावर बरेच कोरे कागद आणि पेन्सिल ठेवलेली होती. एकेकाने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. अगदी मूलभूत तत्वांपासून ते अद्ययावत संशोधनांपर्यंत काहीही ते विचारत होते, पण अत्यंत सौम्य शब्दांमध्ये. आधी एक साधा प्रश्न विचारून त्यात हळूहळू जटिलपणा आणत होते, अधून मधून काही गुगली टाकत होते. मला एकाद्या विषयाचे किती सखोल आकलन झाले आहे हे जाणून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. पण एकमेकांमध्ये हास्यविनोद करत आणि मला धीर देत त्यांनी सगळे वातावरण प्रसन्न आणि खेळीमेळीचे ठेवले होते. त्यांनी लिचारलेले सगळे प्रश्न तांत्रिक विषयांवरच होते. इतिहास, भूगोल,  राजकारण, सामाजिक किवा आर्थिक समस्या असल्या अवांतर विषयांवर काहीही विचारले गेले नाही.

मला जेवढे माहीत होते आणि त्यावेळी आठवले ते मी सांगितले तसेच त्यांनी टाकलेली गणितेही सुचतील तशी सोडवली. त्यातला एक साधासोपा फॉर्म्यूला मला काही केल्या अजीबात आठवेना, पण मग मी पाचदहा सेकंदात तो तिथल्या तिथे डिराइव्ह करून दाखवला. मला वाटते की तेही माझ्या पथ्याचे पडले असावे. अर्धापाऊण तासांची मुलाखत किंवा गप्पा झाल्यावर मला त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन मेडिकल चेक अप करून घ्यायला सांगितले गेले. तो माझे संभाव्य सिलेक्शन झाले असण्याचा संकेत होता. 
*******

मी कोण आहे?      भाग १४

माझ्या एका इंजिनियर मित्राने काल लिहिले आहे की खरे तर त्याला गणिताची आवड होती आणि त्याने गणितात एमएससी, पीएचडी करायला पाहिजे होते असे त्याला कधीकधी वाटते. त्यावरून मीही मनाने एकदम सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. आमच्या लहानपणी रोज संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर घरातल्या मुलांनी स्तोत्रे आणि परवचा म्हणायचा असा दंडक होता. त्यात मोठ्या भावंडांचे पठण ऐकून ऐकून मलाही सगळे पाढे शाळेत शिकवले जायच्या आधीच तोंडपाठ होऊन गेले होते. त्या काळात आमच्या घराजवळच एक विनूकाका रहात होते. मी त्यांच्या घरी गेलो की ते मला एकादा तोंडचा हिशोब घालायचे. म्हणजे एका आण्याची दोन केळी तर डझनाचा भाव काय? किंवा बाजारातून पाच केळी आणली त्यातली दोन खाल्ली तर किती उरली? मी त्याचे उत्तर दिले की ते मला एक लिमलेटची गोळी बक्षीस द्यायचे. अशी किती तरी लिमलेटे मी खाल्ली होती.  शाळेत मला गणितात नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळायचेच, कधीतरी धांदरटपणामुळे एकादा मार्क गेला असेल, पण कोणताही प्रश्न समजला नाही किंवा गणित सुटले नाही असे कधीच झाले नाही. पेपरात जरी दहापैकी कोणतेही सात प्रश्न सोडवा असे लिहिले असले तरी मला दहाही प्रश्न येतच असत. त्यामुळे गणित हा माझाही प्रचंड आवडता विषय होताच.

शाळेत अंकगणितापासून सुरुवात होऊन पुढे त्यात भूमिती आणि बीजगणित आले. सायन्स कॉलेजमध्ये कॅल्क्युलस आणि ट्रिगनॉमेट्री आले तोपर्यंत ठीक होते. मला सगळी गणिते समजत होती आणि सोडवता येत होती. पण इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जे उच्च गणित सुरू झाले ते फार जटिल होते. ती गणिते सोडवायला खूप वेळ लागत असे आणि मला तो मिळत नव्हता. एकदम इतर दहाबारा नवे विषय शिकायचे, शिवाय वर्कशॉप, ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल्स यात सगळा वेळ निघून जायचा. त्यातही गंमत म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्स, हीट इंजिन्स यासारख्या तांत्रिक विषयातली गणिते त्या मानाने सोपी असायची. त्यामुळे मी तीच जास्त सोडवत असे. पण हळूहळू माझे मॅथेमॅटिक्सकडे दुर्लक्ष होत गेले, त्यातला काही भाग ऑप्शनला सोडून दिला आणि परीक्षेतले मार्क साठसत्तरपर्यंत खाली आले. जर मी गणित हा मुख्य विषय घेऊन उच्च शिक्षणाकडे गेलो असतो तर त्यात किती प्रगति करू शकलो असतो कोण जाणे.

मला असे वाटते की लहानपणी एकाद्या विषयात गति असली तर त्या विषयाची आवड असेलच असे सांगता येत नाही. गणिताची खरी मनापासून आवड असलेले, आज पंच्याहत्तर वयाचे असलेले माझे काही मित्र अजूनही वॉट्सअॅपवरून गणितातली वेगवेगळी कोडी पाठवत आणि सोडवत असतात. आता मला त्यात तितकेसे औत्सुक्य वाटत नाही.

*********

मी कोण आहे?      भाग १५

कॉलेजमधलीच आणखी एक आठवण, मी कोण होतो याबद्दलची. हॉस्टेलमधल्या आमच्या मजल्यावरच एक 'बडे बापका बेटा' रहायला आला. त्याचे आईवडील मुंबईतल्या पॉश कफपरेडमध्ये रहात होते. त्या मुलाने दोन तीन मोठमोठ्या ट्रंका भरून कपडे आणले होतेच, एक कॅनव्हासचा भलामोठा झोळा भिंतीला टांगून ठेवला होता. अंगातून कुठलाही कपडा काढला की तो सरळ त्या झोळ्यामध्ये टाकायचा. सुरुवातीच्या काळात दर आठवड्याला त्याच्या घरून कोणीतरी मोटारगाडीतून येत असे. त्यांच्याबरोबर एक नोकर कपड्यांचे गाठोडे आणायचा. तो खोलीत आल्याआल्या आधीचे चुरगळलेले बेडशीट आणि चादर काढून नवे अंथरायचा. टेबलावरील आणि खणामधील पुस्तके पुसून नीट जमवून ठेवायचा, गाठोड्यातले परीटघडीचे कपडे ट्रंकांमध्ये रचून ठेवायचा आणि झोळ्यामधल्या कपड्यांचे गाठोडे बांधून ते धुवायला मुंबईला घेऊन जायचा. त्याच्या खोलीचा अर्धा भाग चकाचक करून जायचा.

बाकीची मुले त्या मुलाकडे कौतुकाने पहायची, पण मला त्याचे हंसू येत असे. आमच्या घरी सगळ्या मुलांना लहानपणापासून 'आत्मनिर्भर' करण्यावर भर होता. त्यांना शाळेतून निघाल्यावर कॉलेजचे शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर पडायचे तर आहेच. त्यानंतर त्यांना मदत करायचा आईबाबा किंवा ताईमाई असणार नाहीत, त्यांची त्यांनाच आपली सगळी कामे करायची तर आहेतच. मग त्यांनी ती न कुरकुरता आनंदाने करावीत, तसेच ती अगदी व्यवस्थित होतील हे ही पहायला हवे. हे लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवलेले होते आणि घरातल्या मोठ्या माणसांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली आम्ही ती उत्साहाने शिकून घेतली होती. त्याबद्दल वेळोवेळी शाबासकी आणि प्रोत्साहन मिळत गेले होते. माझा 'बबड्या' होऊ दिला नव्हता.

माझ्याकडे कपड्यांचे तीनचारच जोड होते, पण मी ते जपून वापरत होतो आणि स्वतःच साबणाने स्वच्छ धुवून, वाळवून, नीट घडी करून ठेवत होतो. बाकीची मुलेही तेच करायची, पण काही जण कंटाळा आणि कुरकुर करत होते. माझे सगळे सामान एका बॅगेत मावेल एवढेच होते. हॉस्टेल सोडायची वेळ आली तेंव्हा मी आपली बॅग उचलली आणि प्रस्थान केले. 
********

मी कोण आहे?        भाग १६

 आम्हाला इंजिनियरिंग कॉलेजात एका वेळी दहा बारा विषयांचा अभ्यास करायचा होता आणि त्यांचा रोजच्या जीवनाशी काडीइतकाही संबंध नसल्यामुळे बहुतेक विषय जरा रुक्ष वाटायचे. असे विषयही रंगवून शिकवण्याची हातोटी ज्यांना साधली होती असे मुरलेले प्राध्यापक होते, पण आमच्या वाट्याला ते कमी आले. व्याख्यानांमध्ये व्यत्यय आणून गोंधळ माजवणारी वात्रट मुले मात्र जास्त होती आणि वर्गातली कंटाळलेली मुले त्यांना साथ देत असत. ही मुले आपापसात बोलतांनासुद्धा आपल्या गुरूजींविषयी आदर दाखवत नसत. त्यांना टोपणनावे ठेवणे, त्यांची टिंगलटवाळी करणे यावरच भर असे. त्या वेळी आमच्या मेकॅनिकल विभागात मुरब्बी ज्येष्ठ प्राध्यापकांचा तुटवडा होता. कनिष्ठ व्याख्यात्यांचे काही नवे चेहेरे दिसायचे आणि काही महिन्यांमध्ये ते अदृष्य होत असत. त्यांनाही बहुधा फारसे कार्यसमाधान मिळत नसावे. त्यांच्याकडे पाहता मला त्यांचा कधीच हेवा वाटला नाही आणि आपणही पुढे जाऊन विद्यादानाचे पुण्यकार्य करावे असा विचार त्या काळात तरी माझ्या मनात आला नाही.

मी आय आय टी मुंबईत एमटेकसाठी अर्ज करून ठेवला होता. माझ्याच वयाच्या तिथे शिकत असलेल्या एका नातलग मित्राला मी त्याचा सल्ला विचारला. त्याने स्पष्ट कळवले की जर मला पुढे जाऊन शिक्षणक्षेत्रात काम करायचे असेल तर स्नातकोत्तर पदवी मिळवणे आवश्यक आहे, पण इंडस्ट्रीमध्ये त्याला फारसे मूल्य नाही. एम टेक आहे म्हणून लवकर नोकरी मिळेल किंवा जास्त पगार मिळेल अशी खात्री नाहीच. कदाचित दोन वर्षे प्रत्यक्ष अनुभवाचे मोल त्यापेक्षा जास्त राहील. त्यामुळे मला आय आय टी कडून इंटरव्ह्यूसाठी आलेले बोलावणे पाहून खूप आनंद झाला नाही.

पण मी नोकरी शोधण्यासाठी उतावीळ झालो होतो त्या काळात मात्र एकदा आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपालांना भेटून तिथे जागा आहे का हे विचारावे असेही वाटलेच आणि आय आय टीचे पत्रही मी जपून ठेवले होते. हे दोन राखीव पर्याय माझे मनोधैर्य वाढवायला मदत करत होते.

*********

मी कोण आहे?      भाग १७

वर्तमानपत्रांमधल्या 'वाँटेड'च्या जाहिराती कमी व्हायला लागल्यावर माझा धीर सुटत चालला होता. अणुशक्तीकेंद्राचा इंटरव्ह्यू बरा झाला होता असे मला वाटले होते, पण त्यांचे पत्र आल्याशिवाय काही खरे नव्हते. "तो जॉब चांगला आहे" असे माझ्या दोन हुषार मित्रांनी एकमुखाने सांगितले होते, पण तिथे गेल्यावर कशा प्रकारचे काम करायचे आहे ते त्यांनी त्यावेळी सांगितले नव्हते. त्या वेळी तरी ते दोघे ट्रेनिंग स्कूलच्या क्लासरूममध्ये बसून निरनिराळ्या विषयांवरली लेक्चर्सच ऐकत होते, त्यांनीही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली नव्हतीच. त्यामुळे त्यांना तरी कितपत माहिती होती याचीही मला शंकाच वाटत होती.  तोपर्यंत भारतातले एकही अणुविद्युतकेंद्र सुरू झाले नव्हते त्यामुळे अणुशक्तीच्या शांतताकालीन उपयोगांबद्दल मी जवळजवळ पूर्ण अंधारातच होतो.

आपण आतापर्यंत खूप पुस्तकी ज्ञान मिळवले आहे, आता आपल्याला प्रत्यक्ष काम करायला हवे अशी माझी गैरसमजूत होती, त्यामुळे मी काहीतरी निर्मितीचे काम करायला उत्सुक झालो होतो. मला मोटारगाड्या, पंखे, लेथमशीन्स अशासारख्या एखाद्या कारखान्यात काम करायला मिळाले तर समाजाच्या उपयोगाच्या वस्तूंचे उत्पादन करण्याचे समाधान मिळणार होते. निर्जीव पुस्तकांमध्ये डोके खुपसून बसण्यापेक्षा धडधडत्या इंजिनांच्या सहवासात रहावे अशी प्रत्येक मेकॅनिकल इंजिनियरची इच्छा असावी असे मला वाटते. त्या सुमाराला टेल्को कंपनी पुण्याजवळ एक मोठा कारखाना उभारायच्या तयारीत होती आणि त्यांना मेकॅनिकल इंजिनियरांची गरज पडणारच होती. त्यामुळे मलाही तिथे काम मिळण्याची शक्यता दिसत होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या प्रकल्पाचे काम जरा लांबत गेले. काही महिन्यानंतर त्यांनी नोकरभरती सुरू केली आणि त्यात माझ्या काही मित्रांना संधी मिळालीही. पण तोपर्यंत मी नुसत्या आशेवर किती दिवस थांबणार?

काही दिवसांनी मला अणुशक्तीखात्याकडून पत्र आले आणि १५ ऑगस्टच्या सुमुहूर्तावर रुजू होण्याचा आदेश आला. त्या दिवसापर्यंत वाट पाहून मी तिकडे जायचा निर्णय घेतला. 

*******
   

मी कोण आहे?    भाग १८

मुंबईच्या वांद्रे भागाचा समुद्रकिनारा दंतुर आहे आणि त्याचा एक भाग खूप खडकाळ आहे. त्या भागाला बँडस्टँड असे नाव आहे. कोणे एके काळी तिथे बँडवाले येऊन बँड वाजवून लोकांचे मनोरंजन करत असत म्हणे. तिथे जाणारा रस्ता जिथे संपतो तिथेच पन्नास वर्षांपूर्वी एक गेट होते आणि आत गेल्यावर मिलिटरीने बांधलेल्या बराकी होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्या बांधल्या गेल्या होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्यदलाला त्यांची गरज नव्हती म्हणून रिकाम्या पडलेल्या त्या बरॅक्स अणुशक्तीखात्याला वापरायला दिल्या गेल्या होत्या.  त्यांचा उपयोग प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी केला जात होता.

माझी निवड झाल्यानंतर मला तिथेच बोलावले गेले होते. मी आपली बॅग घेऊन त्या पत्त्यावर जाऊन पोचलो. गेटमधून आत शिरल्यानंतर आजूबाजूला बरॅक्सच दिसत होत्या, पण एक उंचवटा चढून वर गेल्यावर एक लहानशी इमारत होती त्यात एक तात्पुरते ऑफिस केले होते. तिथे माझ्या आधी येऊन पोचलेल्या मुलांनी रांग लावली होती. मी जाऊन त्या रांगेत उभा राहिलो.  एकेका मुलाची सगळी प्रमाणपत्रे बारकाईने पाहण्याचे काम अगदी हळूहळू चालले होते आणि रांग वाढत चालली होती. तासाभरानंतर माझा नंबर आला. मला आलेले पत्र आणि माझी सर्टिफिकेट दाखवून झाल्यावर मला एक फॉर्म्सचा गठ्ठा देण्यात आला. त्यांवर आपले नाव गाव वगैरे माहिती लिहून खाली सही करायची होती.

तोपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते, रणरणत्या उन्हात उभे राहून लागलेल्या भूक आणि तहान या दोन्हींमुळे माझा जीव व्याकूळ झाला होता. त्यामुळे त्या किचकट सरकारी भाषेतल्या कागदांमध्ये नेमके काय काय लिहिले आहे त्यातले अक्षर न् अक्षर वाचून आणि समजून घेणे तर अशक्यच होते. इतर मुलांप्रमाणेच मीही ते थोडे वर वर चाळून पाहिले आणि खाली सह्या ठोकून दिल्या. त्या सह्या केल्यामुळे जे काही बाकीच्या मुलांचे होणार होते तेच आपलेही होईल एवढा दिलासा मनात होता.

**********

मी कोण आहे?        भाग १९

मुली आईवडिलांच्या प्रेमळ छत्रछायेत आणि भावंडांशी खेळत हसत बागडत लहानाच्या मोठ्या होतात, माहेरच्या घराच्या अंगणातल्या झाडांझुडुपांपासून ते त्या घरातल्या कपाटांच्या आणि कोनाड्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत सगळीकडे त्यांच्या आठवणी साचून राहिलेल्या असतात. शेजारीपाजारी, गल्लीमध्ये आणि गावात राहणाऱ्या कित्येक व्यक्तींशी त्यांचे भावनिक नाते जुळलेले असते. या सगळ्यांमधूनच त्यांची एक ओळख तयार झालेली असते. आणि एक दिवस ते सगळे मागे सोडून त्यांना सासरी जावे लागते. हा नाजुक प्रसंग कित्येक कथाकादंबऱ्यांमध्ये रंगवून लिहिलेला असतो, कितीतरी नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये  दाखवला जातो आणि कितीतरी कवींनी त्यावर डोळ्यात पाणी आणणारी गीते लिहिली आहेत.

पण मुलांवर ही वेळ येत नाही की काय? मला तर पाच वर्षांमध्ये तीन वेळा यातून जावे लागले होते. आईवडिलांचे घर सोडून तत्वज्ञान विद्यापीठाच्या आश्रमात, तिथून पुण्याच्या हॉस्टेलमध्ये आणि आता अणुशक्तीखात्याच्या बराकीत जातांना मला प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारच्या परिसरातल्या निरनिराळ्या प्रकारच्या इमारतींमधली वेगळ्या प्रकारची खोली मिळाली होती. कपडे आणि थोड्या रोजच्या गरजेच्या बारीकसारीक वस्तू सोडल्या तर माझ्याकडे पूर्वीच्या जागेतले काहीच नव्हते.  नव्या जागेतल्या खोलीत राहणारी इतर मुले वेगळी, काही जणांच्या मातृभाषा वेगळ्या, त्यांच्याशी संवाद साधायचा तर तो तिसऱ्याच एका भाषेत, आसपासचा सगळा परिसर नवा, त्यात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटणारी माणसे वेगळी. त्या सगळ्यांची नव्याने ओळख करून घ्यायची, त्यातून आपली नवी ओळख निर्माण करायची. हे सगळे सासरी जाण्यासारखेच तर होते. पण ते तितकेसे कठीण तर वाटले नाहीच, त्यातही एक प्रकारचे थ्रिल होते, आनंद होता.
 
********

मी कोण आहे?        भाग २०

अणुशक्तीखात्याच्या प्रशिक्षणशालेत प्रवेश मिळाल्यावर त्यांच्या वांद्र्याच्या वसतीगृहातल्या एका निसानकुटीमध्ये रहायची आमची व्यवस्था झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून त्या निसानहट्स घाईघाईमध्ये बांधल्या गेल्या होत्या असे सांगतात. पानशेत धरण फुटून आलेल्या महापुरात ज्यांची घरे वाहून गेली होती अशा पुणेकरांसाठी अशाच प्रकारच्या झोपड्या सैन्याने अगदी थोड्या दिवसात बांधून दिल्या होत्या. आमची निवड भावी पहिल्या दर्जाचे राजपत्रित अधिकारी (क्लास वन गॅझेटेड ऑफिसर) म्हणून झाली होती. पण "अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विज्ञानदासा बालकांसी" असा सात्विक विचार आमच्या संत होमीबाबांनी केला असेल आणि त्या दृष्टीने आम्हाला जवानांच्या साध्यासुध्या बराकींमध्ये रहाण्यापासून सवय व्हावी अशी व्यवस्था केली असेल.   

लढाईच्या काळात आमच्या त्या एकेका निसानहटमध्ये कदाचित दहापंधरा जवान दाटीवाटीने रहात असतील, पण आमच्यासाठी प्रत्येक झोपडीत दोन दोन अंशतः पार्टीशन्स घालून तिचे तीन भाग केले होते आणि प्रत्येक भागात दोन दोन पलंग, टेबले आणि खुर्च्या ठेऊन आमचे राहणे सुखकर केले होते. आमच्या बराकीत आम्ही सहाजण रहात होतो. किनाऱ्यावरील जराशा सपाट भूमीवर अशा वीसपंचवीस अर्धवर्तुळाकार पत्र्याच्या झोपड्या होत्या, त्याशिवाय डोंगराच्या उतारावर दहापंधरा कौलारू शेडही होत्या. काही मुलांना त्यात जागा मिळाली होती. अशाच काही शेड्समध्ये सर्वांसाठी स्नानगृहे आणि स्वच्छतागृहे होती. तिथे सगळी फक्त मुलेच रहात असल्यामुळे सगळेचजण फक्त एक पंचा किंवा लुंगी गुंडाळून तिथे जा ये करत होते. डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या पक्क्या इमारतीत एका खोलीत ऑफिस आणि हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि त्याला लागूनच भटारखाना होता. कॅरम, टेबलटेनिस यासारखे खेळ खेळायची तसेच घटकाभर बसून रेडिओ ऐकायची व्यवस्थाही होती. 

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या काळातसुद्धा मुंबईत जागेची इतकी प्रचंड टंचाई होती की आम्हाला डोक्यावर पत्र्याचे का होईना पण एक छप्पर मिळाले होते हीच एक फार मोठी सुखदायक गोष्ट होती. ती जागा कशीही असली तिथला परिसर मात्र अप्रतिम होता.  

*****

मी कोण आहे?     भाग २१

आमच्या झोपडीच्या पुढे पाचदहा पावलांवरच एक तारेचे कुंपण होते, त्याच्या पलीकडे लगेच किनाऱ्यावरले खडक सुरू होत होते आणि त्याच्यापुढे अथांग पसरलेला अरबी समुद्र किंवा वीर सावरकरांच्या शब्दात 'सिंधूसागर'. नजर पोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी आणि त्यावर उसळणाऱ्या फेसाळ लाटा. हे दृष्य तर मनोहर होतेच, त्या विशाल समुद्रापुढे मी किती क्षुद्र होतो याची रोज जाणीव होत होती. संध्याकाळच्या वेळी मावळणारा सूर्य पश्चिमेच्या आकाशात लालपिवळ्या रंगांची उधळण करता करता स्वतःच लालबुंद होऊन जात हळूहळू क्षितिजाजवळच्या ढगांमध्ये विलीन होऊन जात असे. एकाद्या संध्याकाळी आभाळ अगदीच निरभ्र असले तर तो पाण्याला स्पर्श करून झळाळून टाकत असे. आम्हाला हे सगळे अगदी घरासमोर रोज पहायला मिळत होते हे केवढे भाग्य? 

आमच्या वसतीगृहाच्या कुंपणाच्या बाजूने एक वळत वळत जाणारी अरुंद अशी कच्ची वाट होती. तिने पुढे गेल्यावर एक लहानशी इतिहासकालीन दगडी कमान आणि छोटीशी तटबंदी होती आणि तिच्यातून पलीकडे गेल्यावर एक दगडी बुरुजासारखा जुन्या काळातला चबूतरा होता. समुद्रात शिरलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्याच्या टोकाशी तो असल्यामुळे त्या पॉइंटला 'लँड्स एंड' असे नाव होते. तिथे गेल्यावर तीन बाजूने पाणीच पाणी दिसत असे. आम्ही अनेक वेळा तिथपर्यंत जाऊन तिथे बसत असू. पण हा बिंदू त्या काळातल्या फारशा लोकांना ठाऊकच नसावा. किंवा तिकडे आडबाजूला जाण्यात त्यांना चोराचिलटांचे भय वाटत असावे. त्यामुळे त्या काळात तरी तिथे पर्यटकांची गर्दी होत नसे.

मुख्य वांद्रे गावाहून आमच्या बँडस्टँडकडे येणारा रस्ता तिथेच संपत होता. तो आणखी पुढे कुठे जात नसल्यामुळे जास्त वहिवाटीचा नव्हता. तिथे य़ेणारा बीईएसटीचा एकच रूट होता आणि त्या रूटने कधीमधी येणाऱ्या बसमध्येही शेवटच्या स्टॉपपर्यंत येणारे पॅसेंजर्स कमीच असायचे. संध्याकाळच्या वेळी काही लोक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांमधून तिथे फिरायला येत असत. पण ते समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्याच्या कडेकडेनेच येरझारा करत असत. तिथल्या वेड्यावाकड्या आणि निसरड्या खडकांवरून चालत चालत समुद्राच्या पाण्यापर्यंत पोचणे गैरसोयीचे, कष्टाचे आणि धोक्याचेही होते. त्यामुळे थोडी साहसी मुलेच तसा प्रयत्न करत. भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटाच किनाऱ्यावरील लोकांना भेटायला पुढे पुढे येत असत. 

पुढील आयुष्यात मी देशविदेशातले अनेक सुंदर समुद्रकिनारे पाहिले आहेत, पण रात्रंदिवस समुद्राच्या लाटांचे संगीत ऐकत रहाण्याचा जो एक आगळा वेगळा अनुभव मला त्या काळातल्या हॉस्टेलमधल्या वास्तव्यात मिळाला तसा मात्र पुन्हा कुठेही मिळाला नाही. 

******

मी कोण आहे?         भाग २२

लहानपणी कर्नाटकातल्या जमखंडी या गावात मी मराठी माध्यमातून शाळा शिकत होतो आणि घरी आम्ही एकमेकांशी मराठीतच बोलत होतो, पण आमच्या बोळातली एकूण एक सगळी घरे ग्रामीण कन्नडभाषिकांची होती आणि त्यातल्या एकालाही मराठी बोललेले समजतही नव्हते. गावातल्या सगळ्या मराठीभाषिकांना कानडीची स्थानिक बोली समजतही होती आणि बोलताही येत होती, पण मराठी भाषा मात्र थोड्या वयस्कर कन्नड लोकांनाच समजत होती. माझ्या वयाच्या कानडी मुलांना तिचा गंधही नव्हता. त्यामुळे माझ्या धेडगुजरी स्टाइलमधल्या नेहमीच्या बोलण्यात अनेक कन्नड शब्द, वाक्प्रचार आणि हेल आपोआपच येत होते. त्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठातली अर्धी मुले मराठी आणि अर्धी गुजराथी होती, पण सगळी संचालक मंडळी गुजराथी होती.  त्यामुळे मलाही कामचलाऊ गुजराथी भाषा समजायला लागली होती, तसेच तिथे रहात असतांना माझ्या बोलण्यात काही गुजराथी शब्दप्रयोगही शिरले होते.

पुण्याच्या हॉस्टेलमध्ये मराठी मुलांची मोठी बहुसंख्या होती आणि माझ्या मित्रमंडळातली बहुतेक मुले शहरांमधली असल्यामुळे ती भलतेच शुद्ध मराठी बोलत असत. त्यांच्यात राहून माझ्या बोलण्यात बरीच सुधारणा होत गेली, कानडी आणि गुजराथी शब्द गळत गेले आणि मीही थोडे शुद्ध मराठीतून बोलायला शिकलो. आमच्या हॉस्टेलमध्ये काही प्रमाणात कन्नड, तेलुगू, गुजराथी, सिंधी वगैरे इतर भाषा बोलणारी मुलेही होती, पण माझे त्यांच्याशी बोलणे बहुतकरून हिंदी किंवा इंग्रजीमध्येच होत असे आणि त्यातून मला या भाषांमधील शब्दांच्या उच्चारांचा थोडा सराव होत गेला, तसेच त्यातले शब्द माझ्या बोलण्यात यायला लागले. 

आमच्या वांद्र्याच्या हॉस्टेलमध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब होते. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजराथपासून आसामपर्यंत पसरलेल्या निरनिराळ्या भागातून आलेली मुले तिथे होती. पंजाब, गुजराथ आणि महाराष्ट्रातल्या मुलांना बऱ्यापैकी हिंदी बोलता येत होते, पण केरळ आणि तामिळनाडूतल्या मुलांना ते अजीबात येत नव्हते. कर्नाटक आणि आंध्रामधली मुलेही थोडेफार हिंदी बोलू शकत होती, पण बंगाल आणि ओरिसामधल्या मुलांना ते तेवढेही जमत नव्हते याचे मात्र मला आश्चर्य वाटले. लवकरच प्रत्येक भाषिकांचे वेगवेगळे गट निर्माण झाले, पण सगळ्यांनाच इतर भाषिकांशी बोलण्याची गरजही असायची. त्यामुळे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमधून आमचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले, तसेच इतर भाषाही कानावर पडायला लागल्या. 

यात कधीकधी गंमतही होत असे. बंगाली मुलांचे 'सिग्रेट खाबो' ऐकल्यावर आम्हाला त्या कल्पनेने हसायला येई आणि  तामिळ मुलांच्या बोलण्यात वरचेवर येणारा 'तेरेमा' हा शब्द कानावर पडला की हिंदी मुलांचा भडका उडत असे.
******

मी कोण आहे?      भाग २३

आमच्या 'ट्रेनिंग स्कूल'चे होस्टेल वांद्र्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर होते पण आमची 'शाळा' मात्र मरीन लाइन्स स्टेशनसमोर भर वस्तीतल्या हरचंदराय हाउसमध्ये भरत असे. आमच्या तिथे जाण्यायेण्यासाठी 'स्कूलबस'ची सोयही ठेवलेली नव्हती. सगळ्या मुलांनी आपापल्या खर्चाने आणि धडपड करून तिथे रोज वेळेवर जाऊन पोचायचे होते. 

आम्ही सुमारे शंभर सव्वाशेजण होतो, त्यातले चारपाचजण मुळातले मुंबईचे रहिवासीच होते. त्यांना मुंबईचा भूगोल आणि गर्दीचे नागरिकशास्त्र चांगले ओळखीचे होते, लोकल रेल्वेगाड्या आणि बीईएसटी बसेसचे रूट्स वगैरे सगळे ठाऊक होते आणि इकडे तिकडे जाण्यायेण्यात काही अडचण नव्हती. फक्त त्यांना घर सोडून होस्टेलवर राहणे आवडत नव्हते. माझ्यासारख्या काही लोकांना मुंबईतल्या जीवनाची बऱ्यापैकी माहिती होती आणि रोजचा नसला तरी आधी अनेक वेळा केलेल्या स्थानिक प्रवासाचा अनुभव होता. कित्येकजण दिल्ली, कलकत्ता, मद्रास यासारख्या महानगरांमधून आलेले होते आणि त्या अनुभवातून आलेला स्मार्टपणा त्यांच्याकडे होता. काही थोडी मुले मात्र भागलपूर की संबळपूर अशा दूरच्या भागांमधून पहिल्यांदाच मुंबईला आली होती आणि ती मात्र पुरती भांबावलेली होती. इतर 'जाणकार' मंडळींनी त्यांची थोडी शाळा घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले.

आम्हाला दर महिन्याला तीनशे रुपये स्टायपेंड मिळणार होता आणि त्यातूनही घरभाडे, आरोग्यसेवा वगैरेसाठी बारा टक्के कापले जाणार होते. उरलेल्या पैशांमध्ये रोजचा प्रवास आणि खाण्यापिण्यासह सगळे खर्च भागवायचे होते. रोज टॅक्सीने गेल्यास महिन्याला मिळणारे सगळे पैसे आठदहा दिवससुद्धा पुरले नसते, त्यामुळे ते तर शक्यच नव्हते. बँडस्टँडहून मरीनलाइन्सला जाणारी थेट बससेवा नव्हती. तिथून कुठेही जाण्यासाठी फक्त एकच बसरूट होता तो बांद्रा रेल्वेस्टेशनकडे जाणारा होता. तिथून पुढे जायला लोकल ट्रेन किंवा बीईएसटी बस असे दोन पर्याय होते, त्यात लोकलचा प्रवास अर्ध्यापेक्षाही कमी वेळेत आणि खर्चात होत होता म्हणून सगळ्यांनी तोच मार्ग स्वीकारला.

बांद्रास्टेशनला जाण्यासाठी किंवा स्टेशनहून होस्टेलला परत येण्यासाठी तीनचार जणांनी मिळून टॅक्सीने जायची चैन मात्र आम्ही कधीकधी करत होतो, तसेच सुरुवातीच्या काळात लोकलचा फर्स्टक्लासचा पास काढून ती हौसही भागवून घेतली. पण त्या डब्यांमध्येसुद्धा जवळ जवळ सेकंडक्लासइतकीच गर्दी असायची. त्यामुळे डब्यात शिरायला मिळाले तरी बसायला गादीवाली मऊ सीट मिळणे कठीणच असायचे. 

*******

मी कोण आहे?       भाग २४

विज्ञान (सायन्स) आणि अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) अशा दोन प्रकारचे विद्यार्थी आमच्या प्रशिक्षण शालेत (ट्रेनिंग स्कूलमध्ये) होते. त्यात पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री तसेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, मेटॅलर्जी आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा उपशाखांचे ट्रेनीज होते.  त्या काळात बीएससी, एमएससी झालेल्यांना मुख्यतः कॉलेजे, विद्यापीठे किंवा सरकारी प्रयोगशाळांमध्येच नोकरीची संधी असायची. तिथे कुठेही सुरुवातीला जेवढा पगार मिळायचा त्यापेक्षा चांगलाच जास्त पगार अणुशक्तीखात्यात मिळणार होता आणि इथे पुढे करीयरमध्येही चांगला स्कोप होता. त्यामुळे त्या मुलामुलींसाठी ही एक सुवर्णसंधी होती आणि ते अर्थातच स्वर्गाला हात लागल्यासारखे आनंदात होते.

बहुतेक इंजिनियर मुलांना मात्र शक्यतोवर खाजगी क्षेत्रात काम करायचे होते. त्यामुळे ती मुले लार्सन अँड टूब्रो, टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, डीसीएम, आयबीएम वगैरेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतच राहिले होते. काही जणांना उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जायचे होते. शिवाय इथे ट्रेनिंगचे एक वर्ष आणि त्यानंतर तीन वर्षे नोकरी असा बाँड होता. काही मुलांना ते बंधन नको होते. काही मुलांना तर अभ्यासाचा जबरदस्त कंटाळा आलेला होता. अशा निरनिराळ्या कारणांनी इंजिनियरिंगची सगळी मुले मात्र हे ट्रेनिंग मनापासून मनावर घेत नव्हते. इंजिनियरिंगसाठी जितक्या मुलांची निवड झालेली होती त्यातली काही मुले आलीच नव्हती आणि ज्याला दुसरी चांगली संधी मिळेल तो मुलगा ती घेत होता, दर आठवड्याला चार पाच तरी मुले सोडून चालली जात होती. पुढे हे प्रमाण कमी झाले तरी अखेरपर्यंत काही मुले बाँडचे पैसे भरूनही जात राहिली होती.

माझ्यासाठी परदेशी जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि सरकारी की खाजगी यावर बराच काळ हो नाही करत करत मी इथे येण्याचा निर्णय घेतला होता. बाँडचे पैसे भरायचे तर माझ्याकडे काही साधनच नव्हते. त्यामुळे मी मात्र सुरुवातीपासूनच शहाण्या मुलासारखे वागायचे ठरवले आणि तिथे जे काही शिकायला मिळत होते ते लक्ष देऊन शिकत राहिलो.  

******

मी कोण आहे?      भाग २५

भारतभरातल्या निरनिराळ्या विद्यापीठांमधून पास झालेली मुले आमच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आलेली होती. त्यातल्या कोणी तीन वर्षांचा, कोणी चार वर्षांचा तर कोणी पाच वर्षांचा इंजिनियरिंगचा कोर्स केला होता. काहीजणांनी तर आधी डिप्लोमा करून फक्त दोनच वर्षे इंजिनियरिंग कॉलेजात काढली होती. अर्थातच निरनिराळ्या विद्यापीठांमधले अभ्यासक्रम तर थोडेबहुत वेगळे होतेच, शिवाय मुलांनी कोणते विषय कितपत आत्मसात केले होते यातही फरक असणारच. अणुशक्तीविषयी विशेष शिक्षण द्यायच्या आधी  सर्व प्रशिक्षणार्थींना मुख्य विषयांची एक किमान पातळीवरील माहिती असावी म्हणून सुरुवातीला आम्हाला कॉलेजमधल्याच काही विषयांचे थोडक्यात शिकवणे सुरू केले.  

माझाच विचार केला तर यातले काही विषय मला पक्के समजलेले होते, तर काही विषयांचा मी पूर्वी कधीतरी वरवर अभ्यास केला होता, काही विषयांमधले थोडे चॅप्टर्स मी ऑप्शनला टाकले होते, तर काही भाग मी कधी शिकलोच नव्हतो.  यातले अशा प्रकारचे बहुतेक खाचखळगे ट्रेनिंग स्कूलमध्ये भरून निघाले.  इथे मात्र जे शिकवले जात होते ते न शिकण्याचा पर्यायच नव्हता. लेक्चर्स झाले की लगेच त्यावरील टेस्ट असायची आणि त्यात वाईट मार्क मिळाले तर काढून टाकण्याची भीती होती. 

इंजिनियरिंग कॉलेजात आम्हाला फिजिक्स हा विषय नव्हता. त्यामुळे बीएससीला शिकवल्या जाणाऱ्या पदार्थविज्ञानाचा काही भाग आम्हाला शिकवला गेला. मी लहानपणापासून आल्बर्ट आईनस्टाइनचे नाव ऐकले होते आणि तो सर्वात मोठा, अगदी सर आयझॅक न्यूटनपेक्षाही मोठा असा शास्त्रज्ञ होता असा त्याचा नावलौकिक ऐकला होता. पण त्याने कसला महान शोध लावला होता हे मात्र कोणी मला नीटपणे सांगितले नव्हते. आगगाडीतून जातांना खिडकीबाहेरील झाडे मागे पळतांना दिसतात यात कसला नवा शोध आला आहे? रेल्वेच्या आधीच्या काळातसुद्धा घोड्यावरून किंवा होडीतून जाणाऱ्या लोकांना ते दिसले असणारच. आईनस्टाइनने नक्कीच काहीतरी वेगळे सांगितले असणार याची मला खात्री होती आणि त्याच्या सापेक्षतेच्या सिद्धांताबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल होते. इथे आमच्या अभ्यासक्रमातच तो धडा शिकवला गेला आणि निदान त्या वेळी तरी तो मला थोडा समजला असावा कारण मला त्यावरील पेपरात चांगले मार्क पडले होते. पण वस्तुमान, अंतर आणि वेळ या विज्ञानातल्या मोजता येणाऱ्या मूलभूत गोष्टीच सापेक्ष असतात अशी कल्पना करणेच किती कठीण आहे आणि इतक्या वर्षांनंतरही ते गूढ का वाटते एवढे समजले आणि लक्षात राहिले.


(क्रमशः)

2 comments:

Vaijayanti Patwardhan said...

Chan watla wachun. Umedwariche diwas athavle maza. Te jast sukar hote he janavla.

Pranav Jawale said...

सुंदर अनुभवचित्रण. यातली काही स्थाने गुगल मॅप वर शोधली पण नाही सापडली (उदा. हरचंदराय हाऊस). बहुधा सध्या नसावीत.