आजकालच्या लहान मुलांना यूएसएबद्दल इत्थंभूत माहिती असते, पण मी शाळेत शिकत असतांना आम्हाला कुठल्या तरी इयत्तेतल्या भूगोलामध्ये 'अमेरिकेची संयुक्त संस्थाने' या नावाचा एक धडा असायचा. त्यात जेवढे लिहिलेले असे तेवढेच मला माहीत होते. न्यूयॉर्क हे त्या काळातले जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर होते, तिथे एंपायर स्टेटसारख्या जगातील सर्वात जास्त उंच इमारती होत्या, जगातील सर्वात उंच असा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा होता, संयुक्त राष्ट्रांचे (यूनोचे) ऑफीस तिथे होते वगैरे कारणांमुळे न्यूयॉर्क हे नंबर वन शहर होते. असे असले तरी त्या देशाची राजधानी मात्र वॉशिंग्टन इथे होती. शिकागो इथे स्वामी विवेकानंदांनी एक मस्त भाषण करून सर्वांची मने जिंकली होती एवढ्या कारणासाठी ते शहर लक्षात राहिले होते. त्याशिवाय अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पॅसिफिक महासागराच्या किनारी सॅनफ्रँसिस्को नावाचे मोठे बंदर होते आणि तिथे जगातला सर्वात मोठा पूल होता. आणखी कुठे तरी हॉलीवुड नावाच्या ठिकाणी सगळे इंग्रजी सिनेमे काढले जात असत. त्या काळातल्या परीक्षेत भूगालाच्या पेपरातल्या एकाद्या प्रश्नाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी एवढी माहिती पुरेशी होती. शाळा सोडल्यानंतर तिचाही काही उपयोग होणार असेल असे मला तेंव्हा वाटत नव्हते. त्यामुळे मला तरी तेंव्हा अमेरिकेच्या बाबतीत याच्या पलीकडे काही इंटरेस्ट नव्हता.
पण मोठेपणी माझा अनेक प्रकारांनी अमेरिकेशी संबंध येत गेला आणि माझे सामान्यज्ञान वाढत गेले. अकरा वर्षांपूर्वी मी अमेरिकेला पहिली भेट दिली त्या वेळी नायगाराचा धबधबा, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन वगैरेकडचा भाग पाहिला होता. या वर्षी मी लॉसएंजेलिसजवळ असलेल्या टॉरेन्सला आल्यावर थोडेसे हॉलीवुड पाहिले होते. सॅनफ्रॅन्सिस्को या शहराबद्दल मात्र मला लहानपणापासून उत्सुकता होती आणि लॉसएंजेलिसप्रमाणे ते शहरही कॅलिफोर्नियामध्येच असल्यामुळे माझ्या या वेळी पहायच्या यादीत होते.
सॅनफ्रॅन्सिस्को इथे भारताची वकीलात आहे. माझ्या मुलाचे तिथे काही काम निघाले आणि त्या निमित्याने आम्ही सर्वांनीच सॅनफ्रॅन्सिस्कोला जाऊन यायचे ठरले. लॉसएंजेलिसपासून सॅनफ्रॅन्सिस्को सुमारे चारशे मैल दूर आहे, म्हणजे मुंबईहून अहमदाबाद, हैद्राबाद किंवा पणजीपेक्षा थोडेसेच जास्त अंतरावर आहे. मुंबईहून या तीन्ही शहरांना जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची सुरेख व्यवस्था आहे. रात्रीचा प्रवास करून सकाळी तिथे पोचायचीही सोय आहे. पण इथे अमेरिकेत त्यातले जे काही आहे ते फारसे सोयिस्कर नसावे. इथे सर्वांकडे स्वतःच्या मोटारी असतातच आणि बहुतेक लोक विमानाने किंवा स्वतः गाडी चालवूनच प्रवास करतात असे समजले. ज्यांना यातले एकही शक्य नसेल असे लोकच रेल्वे किंवा बसचा विचार करतात. आम्ही पाच जण होतो. इतक्या सगळ्यांनी विमानाने जाणे महाग पडले असते. त्यामुळे आमचे कारने जायचे ठरले.
एका शनिवारी दुपारी आम्ही रहात असलेल्या टॉरेन्स या गावातून निघालो. आमच्या घरापासून तीन चार मैलांच्या अंतरावरूनच उत्तरेकडे जाणारा महामार्ग जातो. पण आमच्या जीपीएसच्या मनात काय आले कोण जाणे त्याने आम्हाला लॉसएंजेलिसच्या शहरी भागातूनच तासभर फिरवले आणि वीस पंचवीस मैल इकडे तिकडे भटकल्यानंतर आम्ही महामार्गाला लागलो. कॅलिफोर्नियाच्या या भागात खूप डोंगर आहेत. इथून फक्त वीसपंचवीस मैलांवर घनदाट झाडी आहे. तिथे बऱ्याच वेळा वणवे पेटलेले असतात आणि ते विझवण्यासाठी सरकारला खास मोहिमा उघडाव्या लागतात. तरीही ते आटोक्यात येत नाहीत त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित जागांवर हलवावे लागते अशा बातम्या नेहमी येत असतात. पण आम्हाला दिसलेले डोंगर मात्र उघडे बोडकेच होते. त्यावर लहान लहान झुडुपे आणि अगदी तुरळक काही मोठी झाडे होती. त्यामुळे वन्य प्राणी दिसण्याची शक्यताच नव्हती. एक बऱ्यापैकी वळणावळणांचा घाट पार केल्यानंतर मात्र सपाट जमीन लागली त्यावर दोन्ही बाजूंना नजर पोचेल तिथपर्यंत शेते पसरली होती. त्या शेतांमध्ये कुठली पिके घेतली जात होती ते काही मला ओळखता आले नाही, पण यांत्रिक शेती असल्यामुळे क्षितिजापर्यंत एकच एक सलग गालिचा पसरल्याचा भास होत होता. बैलजोडी घेऊन शेतात काम करणारा शेतकरी दिसण्याची काही शक्यता तर नव्हतीच, पण एक दोन ठिकाणी मेंढ्या आणि गुरांचे कळप दिसले. त्या दिवशी कुठले यंत्रही तिथे काही हालचाल करतांना दिसले नाही. पाच वाजेपर्यंत सूर्य मावळून काळोख पसरला आणि आम्ही आमच्या गाडीच्या दिव्यांनीच उजळलेले रस्त्यांमधले रिफ्लेक्टर्स पहात मार्गक्रमण सुरू ठेवले.
रात्री दहाच्या सुमाराला आम्ही सॅनफ्रॅन्सिस्कोच्या अलीकडे असलेल्या मिलब्रा नावाच्या गावी जाऊन पोचलो. इंटरनेटवरूनच आम्ही आमची रहाण्याची व्यवस्था तिथल्या एका बी अँड बी घरात केली होती. त्या घराचा पत्ता आणि दरवाजा उघडण्याचे कोडवर्ड्स आम्हाला ई मेलने कळवले गेले होते. घर नंबर शोधत शोधत आम्ही तिथे जाऊन पोचलो. "तिळा तिळा दार उघड" म्हणत ते उघडले तर समोर फक्त खाली उतरण्याच्या पायऱ्या होत्या. चांगल्या पन्नास पायऱ्या उतरून गेल्यावर आणखी एक दरवाजा दिसला, तो उघडून आम्ही आत प्रवेश केला. आम्ही इतक्या खाली उतरून गेलो असलो तरी ते तळघर नव्हते. ते दार्जिलिंगसारख्या डोंगराळ ठिकाणी असतात तसे डोंगराच्या उतारावर बांधलेले घर होते. बाहेरच्या खोलीत एक टेबल आणि पाचसहा खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या टेबलावर दूध, साखर, पॉवडर वगैरे चहा कॉफी तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ ठेवले होते. एका बाजूला स्वयंपाकाचा ओटा होता आणि खणात आवश्यक अशी भांडी ठेवली होती, तसेच त्यांचा उपयोग करून झाल्यावर ती स्वच्छ घासूनपुसून परत ठेवावीत अशा सूचना देणारे फलक होते. आम्हाला इथे कसलीही सेवा मिळणार नव्हती पण आपल्या आपण काही तयार करून खायची सोय होती.
इकडल्या महामार्गांवर रोडसाइड ढाबे नसतात. तीनचारशे मैलांच्या रस्त्यात फक्त एक दोन जागी विश्रांतीस्थाने दिसली आणि तिथे कॉफी किंवा इतर पेये आणि त्यांबरोबर खाण्यासाठी पिझा, बर्गर, रॅप्स, टॉर्टिला यासारखी खाद्ये मिळत होती. आम्ही खाण्यापिण्याचे भरपूर पदार्थ सोबत आणले होतेच, थोडे त्या ठिकाणी घेऊन भूक भागवली होती. बी अँड बीला पोचल्यावर गरमागरम कॉफीबरोबर बिस्किटे, टोस्ट वगैरे खाऊन झोपायची तयारी केली. आतल्या खोलीत पाच लोकांसाठी पुरेशी झोपायची व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी काय काय पहायचे यावर अंथरुणावर पडल्यापडल्या थोडे संशोधन आणि विचार विनिमय केला. मोठ्या शहरांमध्ये 'हॉप ऑन हॉप ऑफ' बसेस असतात, तशीच एक बस घ्यावी असे तेंव्हा वाटले.
रविवारी सकाळी उठून सगळ्यांनी खाऊन पिऊन तयार होण्यात जरा वेळ गेला. आम्ही सॅनफ्रॅन्सिस्कोच्या बाहेर मिलब्रा इथे रहात असल्यामुळे ती पर्यटकांची बस पकडण्यासाठी आधी त्या बसच्या एकाद्या स्टॉपपर्यंत जाणे आवश्यक होते. जिथे गाडी उभी करून बसने पुढे जाता येईल अशी ठिकाणे पाहता 'गोल्डन गेट पार्क' हे एक नाव दिसले. आम्ही जीपीएसच्या आधाराने तिथपर्यंत जाऊन पोचलो. हे पार्क म्हणजे नुसताच प्रचंड विस्तार असलेली बाग आहे आणि त्यात शेकडोंनी मोठमोठाले वृक्ष उभे आहेत. आम्ही गेलो त्या वेळी तिथे अनेक लोक जॉगिंग करत होते. असे धावत किंवा फिरत फिरत तास दीड तास वेळ घालवण्यासाठी ही चांगली जागा होती. आम्ही त्या बागेच्या आतूनच कारमध्ये बसून एक फेरफटका मारला पण आम्हाला मुद्दाम 'पाहण्यासारखे' असे काहीच तिथे आढळले नाही. तिथे आमची गाडी उभी करायला भरपूर जागा असली तरी त्या 'बिगबस'चे नामोनिशाणही दिसले नाही. माणशी पन्नास डॉलर्स घेऊन ते बसवाले असली पंधरा वीस ठिकाणे दाखवत असतील तर एवढी दगदग करण्यापेक्षा आपणच मिळतील तेवढी प्रेक्षणीय ठिकाणे पहायचे ठरवले.
मी लहानपणापासून 'गोल्डन गेट ब्रिज'चे नाव ऐकलेले होते आणि हा पूल त्याच नावाच्या पार्कच्या जवळच असणे अपेक्षित होते म्हणून आम्ही आधी तो पूल पहायचे ठरवून तिकडे आपला मोर्चा वळवला. जीपीएसवर 'गोल्डन गेट ब्रिज' शोधता शोधता आमची गाडी सरळ त्या पुलावरच गेली. हावडा ब्रिजसारखा हाही एक पोलादी बांधणीचा सस्पेन्शन ब्रिज आहे. सॅनफ्रॅन्सिस्कोचे आखात (Bay) आणि प्रशांत महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीच्या (Strait) मुखाला गोल्डन गेट असे म्हणतात. पॅसिफिक महासागरातून येणाऱ्या बोटी या मैलभर रुंद अशा अरुंद खाडीतून प्रवेश करतात म्हणून हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचे प्रवेशद्वार आहे असे म्हणता येईल. त्या खाडीवर हा पूल बांधला आहे. त्याच्या दक्षिणेच्या बाजूला सॅनफ्रॅन्सिस्को शहर आणि उत्तरेच्या बाजूला मॅरीन कौंटीमधला डोंगर आहे. सुमारे ९००० फूट (पावणेदोन मैल) लांब, ९० फूट रुंद आणि साडेसातशे फूट उंच असा हा पूल १९३७ मध्ये बांधून पूर्ण झाला. त्या वेळी तो जगातील सर्वात लांब केबल सस्पेन्शन ब्रिज होता आणि त्याचे मनोरे जगातील सर्व पुलांमध्ये सर्वात उंच होते. अशा प्रकारे तो सर्वच दृष्टींनी जगातला सर्वात मोठा पूल होता आणि पुढील जवळजवळ पन्नास वर्षे राहिला. ऐंशी वर्षे जुना असलेल्या या पुलावरून आजही रोज एक लाखांहून अधिक वाहने येजा करत असतात. जहाजांना बेमध्ये जाण्यायेण्यासाठी खाडीमधील पाण्यापासून पुलाखाली चार हजार फूट रुंद आणि दोनशे फूट उंच इतकी जागा ठेवली आहे. त्यातून बोटींची ये जा सुरू असते.
गोल्डन गेट ब्रिज पार करून पलीकडे गेल्यानंतर व्हिस्टा पॉइंट नावाची जागा आहे. तिथे एका प्रशस्त मोकळ्या जागेत कठडे बांधून पर्यटकांना हिंडण्या फिरण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. जहाजांसाठी खूप उंच खांब बांधून त्यावर हा पूल बांधला असल्यामुळे ही जागासुद्धा चांगल्या उंचीवर आहे. तिथून हा पूल तर दिसतोच शिवाय दूरवर नजर टाकून सॅनफ्रॅन्सिस्को शहरासह पाचदहा मैलांपर्यंतचा परिसर दिसतो. इथे रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. इथे 'The Lone Sailor memorial' या नावाचे एक नाविकांचे स्मारक आहे त्यात एका अमेरिकन सेलरचे प्रतीकात्मक शिल्प आहे. गोल्डन गेटमधून पॅसिफिक महासागरात स्वदेशासाठी गेलेल्या सर्व दर्यावर्द्यांची प्रतीके दाखवणारी म्यूरल्स या ठिकाणी आहेत. त्यात नौदलाच्या शाखा (the Navy, the Marine Corps, the Coast Guard) तसेच व्यापारी जहाजांवरील नाविक (The Merchant Marine) यांचा समावेश होतो.
व्हिस्टा पॉइंटला तासभर वेळ घालवून फोटोबिटो काढून झाल्यावर आम्ही फिशरमॅन्स व्हार्फला जायचे ठरवले. खरे तर ही जागा खाडीच्या पलीकडल्या बाजूला थोडी समोरच्या बाजूलाच होती आणि आम्ही गोल्डन गेट ब्रिजवरूनच परतून पुन्हा पलीकडे गेलो असतो तर तिथे लवकर पोचलो असतो. पण आमच्या गाडीमधल्या जी पी एसने आम्हाला उलट दिशेने जायला लावले आणि आम्ही तिथल्या डोंगरांमधले सृष्टीसौंदर्य पहात वळसा घालून गेलो. त्या मार्गावर रिचमंड ब्रिज आणि ओकलँड बे ब्रिज हे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या आखातावरले आणखी दोन मोठे आणि नवे पूल पहायला मिळाले. तसेच सॅनफ्रॅन्सिस्को डाऊन टाऊनचे सगळ्या बाजूंनी दर्शन घडले. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन किंवा आपल्या मुंबईतल्या नरीमन पॉइंटप्रमाणे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या या भागात अनेक गगनचुंबी इमारती दाटीवाटीने उभ्या आहेत. त्यांच्या आकारांमध्ये जरा जास्त विविधता असल्यामुळे त्या दुरून पहायला छान वाटतात.
फिशरमॅन्स व्हार्फ हे पूर्वीच्या काळातले मच्छीमारांचे बंदर असणार. आज ते पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण झाले आहे. तिथे समुद्रकिनाऱ्यावर असंख्य लहान लहान दुकानांची एक प्रचंड बाजारपेठ आहे किंबहुना नेहमीच एक कायम स्वरूपाची जत्रा भरलेली असते. त्यात अनेक रेस्तराँ, फूड स्टॉल्स, शोभेच्या किंवा आठवण म्हणून घेऊन जायच्या छोट्यामोठ्या वस्तूंची दुकाने, खेळण्यांची दुकाने वगैरेंची भाऊगर्दी आहे. तसेच रस्त्यावर कसरतीचे किंवा हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारे, विदूषकी चाळे करणारे, हातापायाने आणि तोंडाने एकाच वेळा अनेक वाद्ये वाजवून दाखवणारे, तीनचार जण मिळून लोकप्रिय इंग्लिश गाणी गाणारे, त्यावर ठेका धरून नाचणारे, झटपट फोटो काढून देणारे, हुबेहूब रेखाचित्र किंवा व्यंगचित्र (कॅरीकेचर) काढून देणारे असे अनेक कलाकार रस्त्यातच आपली कला सादर करत असतात आणि हजारोंच्या संख्येने जगभरातून आलेले पर्यटक एका हातात काही तरी धरून ते खात पीत आणि या सगळ्यांचा आनंद घेत गप्पाटप्पा करत निवांत भटकत फिरत असतात. त्यांचे चित्रविचित्र पोशाख, चेहऱ्यावरील रंगरंगोटी आणि हातवारे वगैरे पाहणेसुद्धा खूप मनोरंजक होते. आम्हीही त्या गर्दीत सामील झालो आणि इतरांच्या मौजेचे कारण बनलो.
कॅलिफोर्नियामध्ये खेकडे हा खूप लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवरील खाऊगल्ल्यांमध्ये क्रॅबचे अनेक प्रकार खायला मिळतात. आपल्याकडे वडापावचे स्टॉल असावेत तसे क्रॅब फूड पुरवणारे रेस्तराँ जिकडे तिकडे दिसत होते. त्यातले जे सर्वात मोठे आणि पॉश दिसणारे होते त्यात आम्ही शिरलो. प्लेट किंवा थाळीच्या आकाराचे मोठमोठे खेकडे असतात हे मी प्रथमच तिथे ऐकले. असा एक खेकडासुद्धा कदाचित जरा जास्तच झाला असता म्हणून आम्ही अर्धाच घेतला आणि त्याच्या जोडीला इतर काही सर्वसामान्य खाद्यपदार्थ घेतले. भरपूर तेलात तिकडच्या खास मसाल्यांसह खरपूस भाजलेला खेकडा समोर आला तेंव्हा त्याला कसे खायचे हे आधी समजत नव्हते, पण आजूबाजूचे लोक काय करतात हे पाहून आम्ही शिकून घेतले.
सॅनफ्रॅन्सिस्कोच्या आखातात अल्काट्राझ (Alcatraz) नावाचे एक लहानसे बेट आहे. त्या बेटावर एक खूप जुना दीपस्तंभ आहे. तिथे मिलिटरीचे ठाणे होते आणि अतिसुरक्षित असा तुरुंग होता. तिथून कुणीही निसटून जाऊ शकत नाही अशी त्याची ख्याती होती. अत्यंत खतरनाक अशा गुन्हेगारांना तेथे डांबून ठेवले जात असे. आता तेसुद्धा एक पर्यटनस्थळ झाले आहे. हे बेट फिशरमॅन्स व्हार्फ किनाऱ्यावरून समोरच दिसते. गेट वे ऑफ इंडियापासून एलेफंटा बेटावर जाऊन येण्यासाठी असतात तशा या बेटावर जाऊन येण्यासाठी किनाऱ्यावरून मोटर लाँचेसची सोय आहे. त्याचप्रमाणे इथेही लाँचमध्ये बसवून अर्धापाऊण तास आखातामधून फिरवूनही आणतात. त्या बेटावर जाऊन फिरून येण्याइतका वेळ आमच्याकडे शिल्लक नव्हता म्हणून आम्ही एका लहानशा लाँचमध्ये बसून एक लहानसा फेरफटका मारून आलो.
त्या नौकेत आमच्यासकट जेमतेम दहाबारा प्रवासी होते. तिचा चालक खूपच बोलका आणि मस्तमिजाज होता. त्याने ती नाव चालवत असतांना आजूबाजूला दिसणाऱ्या आगबोटी, पाणबुडी, पूल, बेट, मासे, खेकडे वगैरेंवर खुमासदार भाष्य करत आमचे चांगले मनोरंजन केले. नावेतल्या प्रवाशांना आळीपाळीने बोलावून त्यांच्या हातात नावेचे चाक दिले आणि डोक्यावर कॅप्टनची कॅप घालून फोटो काढू दिले. एका ठिकाणी एका खडकावर पन्नाससाठ सीलायन्सचा थवा होता. त्यातले बरेचसे निवांतपणे पहुडले होते, पण काहीजणांची खूप दंगामस्ती आणि कर्कश आरडाओरड चालली होती. हे प्राणी दिसायला मुळीच गोंडस नसतात, पण भारतात आपल्याला कधी पहायला मिळत नाहीत म्हणून त्यांचे कौतुक. या लाँचमधल्या फेरीत आम्हाला गोल्डन गेट ब्रिज आणि अल्काट्राझ आयलंडही जवळून आणि थोडे लक्षपूर्वक पहायला मिळाले.
नौकानयन करून झाल्यावर आम्ही आणखी काही वेळ तिथल्या गर्दीतून फिरत राहिलो. तिथे काही प्रेक्षणीय अशी म्यूजियम्सही होती. ऐतिहासिक काळातल्या आगबोटी आणि एक पाणबुडी किनाऱ्यालगत उभी करून ठेवली होती. हे सगळे नीट पहाण्यासाठी तीन चार दिवस लागले असते. पण इतका वेळ कुणाकडे असतो? आम्हीसुद्धा काही जागा वर वर पाहिल्या तोपर्यंत दिवस मावळायला आला होता आणि पाय दुखायला लागले होते.
दुसरे दिवशी आम्हाला भारतीय वकीलातीत जाऊन आमचे मुख्य काम करायचे होते. तिथे माझ्या अपेक्षेच्या मानाने खूपच चांगली व्यवस्था होती. यापूर्वी मी बर्मिंगहॅमच्य भारतीय वकीलातीचे ऑफीस पाहिले होते तिथे गर्दीचा महापूर होता. आम्हाला त्या इमारतीत शिरणेसुद्धा कठीण झाले होते. सॅनफ्रॅन्सिस्कोच्या कॉन्सुलेटमध्ये मुख्य म्हणजे गर्दी नव्हती, सर्वांना बसायला जागा होती आणि सिक्यूरिटीचा बाऊ नव्हता. आता सरकारी काम म्हणजे काही फॉर्म भरणे आले. त्यावर फोटो चिकटवायचे होते आणि आम्ही ते आणलेले नव्हते. ते लोक फीचे पैसे रोख किंवा क्रेडिट कार्डाने घेत नव्हते. ते मनीऑर्डरसारख्या प्रकाराने ट्रान्स्फर करून त्याची पावती फॉर्मला जोडायची होती. पण गंमत म्हणजे तिथे जवळच सीव्हीएस फार्मसी नावाच्या दुकानाची शाखा होती. तिथे ही सगळी कामे करून झाली. फीचे पैसे पाठवले, पावती घेतली, फोटो काढून त्याच्या प्रिंट्स काढून घेतल्या आणि आम्ही पुन्हा वकीलातीत जाऊन ते फॉर्म दिले. आता आम्हाला पाहिजे असलेली कागदपत्रे नंतर मिळणार होती.
मधल्या काळात आम्ही पुन्हा सागरकिनाऱ्याजवळ जाऊन तिथे असलेल्या गिरार्डेलीच्या आइस्क्रीमफॅक्टरीमध्ये गेलो. तीसुद्धा एक प्रेक्षणीय जागा आहे. एका मोठ्या हॉलमध्ये एका बाजूला आइस्क्रीम तयार करण्याच्या प्रक्रियेत लागणारी यंत्रसामुग्री व्यवस्थितपणे मांडून ठेवली आहे आणि तिथे बसून खाण्यासाठी किंवा पॅक करून नेण्यासाठी दिसायला आकर्षक आणि खायला चविष्ट असे आयस्क्रीम्सचे अनेक प्रकार अनेक प्रकारच्या काँबिनेशन्समध्ये उपलब्ध आहेत. ते सगळेच इतके चांगले वाटतात की काय काय घ्यावे ते कळत नाही, पण एकेक डिशसुद्धा इतकी मोठी असते की ती संपवता संपत नाही. आइस्क्रीम खाऊन आम्ही वकीलातीत परत आलो तोवर ती जेवणाच्या सुटीसाठी बंद झाली होती. मग आम्हीपण जेवण करून यायचे ठरवले.
जेवण करण्यासाठी आम्ही तिथल्या चायनाटाऊनमध्ये गेलो. तिथे गेल्यावर मात्र आपण खरेच चीनमध्ये गेल्यासारखे वाटावे इतके सबकुछ चिनी वातावरण होते. दुकानांवरल्या पाट्या आणि आतले बोर्ड चित्रमय चिनी लिपीत होते, तिथले विक्रेते आणि गिऱ्हाइके सगळेच मंगोल वंशाचे चिनी लोक होते आणि ते चँगचिंगमिंगफँग असले काही तरी अगम्य पण खूप बोलत होते. कॅलिफोर्निया हा भाग अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि पॅसिफिक महासागराच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या चीनमधून खूप मोठ्या संख्येने चिनी लोक तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत. बहुतेक शहरांमध्ये त्यांनी स्वतःच्या वेगळ्या वस्त्या वसवल्या आहेत आणि त्यात न राहणारे चिनी लोकसुद्धा बाजारहाट करण्यासाठी त्यांच्या चायनाटाऊनला जात असतात. तिथे खास चिनी अन्न पदार्थ विकणारी अनेक दुकाने तर आहेतच, त्यांच्या किराणा मालाची, भाज्यांची आणि फळांची दुकानेसुद्धा होती.
आम्ही एक बऱ्यापैकी दिसणारे हॉटेल निवडले. तिथे इंग्रजी समजणारी वेटर होती तिच्या मदतीने आम्हाला रुचतील आणि पचतील असे चिनी खाद्यपदार्थ मागवले. आम्हाला तिथे पोचायला थोडा उशीर झाला होता आणि त्यांच्या खानसाम्यांनाही भुका लागल्या होत्या त्यामुळे आमचे जेवण लगेच समोर आले. थोड्या वेळाने त्यांचे बल्लवाचार्यसुद्धा बाहेर येऊन दुसऱ्या टेबलावर जेवायला बसले.
त्या दिवशी आम्ही सकाळीच आमच्या बी अँड बीमधून चेक औट करून आमचे सामान कारच्या डिकीत ठेवले होते. चायनाटाऊन पाहून आम्ही तडक वकीलातीत गेलो, आमची कागदपत्रे तयार होतीच, ती गोळा केली, परतीच्या वाटेत खाण्यापिण्यासाठी काही तयार खाद्यपदार्थ विकत घेतले, कारची टाकी फुल करून घेतली आणि सॅनफ्रॅन्सिस्कोला टा टा बाय बाय करून परतीच्या प्रवासासाठी प्रयाण केले.
सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये विशेष जाणवण्यासारखी एक गोष्ट दिसली ती म्हणजे तिथला उंचसखल भूप्रदेश (Uneven terrain). या ठिकाणी पॅसिफिक महासागराचा काही भाग जमीनीत घुसून एक आखात तयार झाले आहे तसेच ते सगळ्या बाजूने वेढले जात असतांना समुद्रात घुसलेल्या एका डोंगरावर हे शहर वसवले आहे. (नकाशा पहा.) तिथली जमीन कमालीच्या खाचखळग्यांनी भरलेली आहे. आम्हाला तरी कुठेही सलग अशी मोठी सपाट जमीन दिसलीच नाही. बहुतेक रस्त्यांवर इतके कमालीचे चढउतार होते की समोरच्या चौकातले ट्रॅफिक सिग्नल दिसत होते, पण त्याच्या पलीकडे असलेला रस्ता किंवा त्यावरची वाहने दिसत नव्हती, ते सगळे खोल दरीत गडप झाल्यासारखे वाटायचे. चायना टाऊनमधल्या एका गल्लीतल्या इमारतीचा तळमजला शेजारच्या गल्लीतल्या इमारतीच्या गच्चीच्या लेव्हलला होता. शिवाय नो एन्ट्री, नो लेफ्ट, नो राइट वगैरेंचे सिग्नल जिकडे तिकडे लावलेले. त्यामुळे सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये गाडी चालवण्यात चालकाच्या कौशल्याचा कस लागतो तसेच कारचे ब्रेक आणि अॅक्सलरेटरही चांगले शक्तीशाली असावे लागतात. कुठल्याही गल्लीत शिरल्यानंतर त्यातून बाहेर पडायच्या वेळी समोर कोणते दृष्य असेल याचा थोडा सस्पेन्सच असायचा. आपले पुणे आणि बंगळूर ही शहरेसुद्धा अनेक टेकड्यांवर वसलेली असली तरी तिथे मी इतके भयानक चढउतार पाहिले नाहीत. शिवाय सॅनफ्रॅन्सिस्कोमधले बहुतेक डोंगर गर्द वनराईने झाकलेले होते आणि पहावे तिकडे हिरवे गार दिसत होते. मी तरी अशा प्रकारचे दुसरे कोणते शहर पाहिले नाही. त्यामुळे हाही एक वेगळा अनुभव मिळाला.
------------------------------
No comments:
Post a Comment