परमहंस योगानंद या नावाचे एक प्रख्यात जगद्गुरू होऊन गेले, पण मी मात्र हे नाव कधी ऐकलेच नव्हते. सात आठ महिन्यांपूर्वी माझ्या एका वॉट्सअॅप ग्रुपवर रोज स्वामी योगानंदांचे सुविचार यायला लागले. "परमात्मा सगळीकडे भरला आहे तसा तो तुमच्यातही आहे. त्याची ओळख पटवून घेणे हे तुमचे कर्तव्य तर आहेच, एकदा ती पटवून घेतलीत तर तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे याची जाणीव तुम्हाला होईल." सर्वसाधारणपणे अशा अर्थाचे हे संदेश मी दोन तीन वेळा वाचल्यानंतर ते वाचणे सोडून दिले होते. असे काही तरी अगम्य पण गोड गोड बोलून भक्तांना भुलवणारा आणखी एकादा बाबा अवतीर्ण झाला असावा असे मला त्यावेळी वाटले होते. मला त्याची जास्त चौकशी करण्यातही रस वाटला नाही.
इथे अमेरिकेत आल्यानंतर दिवाळीच्या निमित्याने ठेवलेल्या एका पार्टीमध्ये भेटलेल्या इथल्या एका माणसाने माझी चौकशी करता करता मी इथे आल्यापासून काय काय पाहिले ते सहज विचारले.
"अमके तमके बीच, गेटी म्यूजियम" वगैरे काही नावे मी सांगितली.
मग त्याने विचारले, "परमहंस योगानंदांचा आश्रम पाहिलात की नाही?"
"हे कोण योगानंद ?" मी प्रतिप्रश्न केला.
"तुम्हाला परमहंस योगानंद माहीत नाहीत ?" त्याला थोडे आश्चर्यच वाटले. कारण अमेरिकेत एवढा प्रसिद्ध झालेला हा भारतीय गुरु भारतात तर सगळ्यांनाच ठाऊक असणे त्याला अपेक्षित होते. पण मला आध्यात्मात गोडी नसल्यामुळे मला अशा साधूबाबांची फारशी माहिती असत नाही.
काही दिवसांनी मी माझ्या कॉलेजमधल्या एका जुन्या मित्राला भेटायला गेलो. तो गेली चाळीस वर्षे अमेरिकेत राहून इथलाच नागरिक झालेला आहे. त्याच्या घराच्या हॉलमध्ये समोरच परमहंस योगानंदांची मोठी तसबीर लावून त्याला भरघोस पुष्पहार घातला होता. त्यांच्याबद्दल तो अत्यंत श्रद्धेने बोलत होता. अर्थातच तो त्यांचा भक्त झाला होता.
"तुझे हे गुरु कुठे राहतात?" मी त्याला विचारले.
"अरे त्यांनी तर सन १९५२ मध्येच समाधी घेतली. पण त्यांनी सुरू करून दिलेल्या संस्थांचे जगभर शेकडो ठिकाणी आश्रम आहेत आणि त्यांची हजारो वचने, भजने, प्रवचने वगैरे उपलब्ध आहेत." माझ्या मित्राने माहिती दिली.
हे परमहंस योगानंद गोरखपूर इथे घोष आडनावाच्या एका बंगाली कुटुंबात सन १८९३मध्ये जन्माला आले. त्यांना लहानपणापासूनच धार्मिक ओढा होता. त्यांना श्रीयुक्तेश्वर गिरी नावाचे गुरु भेटले आणि ते आध्यात्माकडे वळले. गुरूच्या माध्यमातून त्यांना ईश्वराचाच असा आदेश आला की त्यांनी भारताबाहेरील जगाला उद्धाराचा मार्ग दाखवावा. म्हणून ते सन १९२० मध्ये अमेरिकेत गेले आणि तिथेच राहिले. त्यांनी अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये दौरे करून ठिकठिकाणी व्याख्याने दिली आणि मार्गदर्शन करणारी पुस्तके लिहिली. त्यामधील एका योग्याचे आत्मचरित्र ( अॅन ऑटोबायॉग्राफी ऑफ ए योगी) या पुस्तकाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि त्यांच्या चाळीस लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यामधून जगातील लक्षावधी लोकांचे जीवन बदलले आहे, ते सन्मार्गाला लागले आहेत असा दावा आहे.
आंतरराष्ट्रीय ख्याति प्राप्त झालेल्या या योग्याचा भारत सरकारनेही सन्मान करून त्याच्या स्मरणार्थ पोस्टाची दोन तिकीटे काढली आहेत. त्यांच्या जन्माला १२५ वर्षे झाली या निमित्याने गेल्या महिन्यातच त्यांच्या स्मरणार्थ १२५ रुपयांचे नाणे काढले आहे. त्याचे उद्घाटन अर्थमंत्री श्रीमती सीतारामय्या यांनी केले.
इथे लॉस एंजेलिसलाच दोन तीन ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्या मित्राच्या घरापासून त्यातल्या त्यात जवळ म्हणजे तीन चार मैलांवर असलेल्या आश्रमात तो जवळ जवळ रोज जाऊन प्रवचने ऐकतो आणि ध्यान धारणा समाधी वगैरे उपासना करत असतो. लेक श्राइन नावाचा योगानंदांचा आश्रम अतीशय रम्य आणि पाहण्यासारखा आहे, तो तरी मी पाहावाच असे माझ्या मित्राने आग्रहाने सांगितले.
काल रविवारचा दिवस होता तेंव्हा आपण हा आश्रम पाहूनच यावा असे मलाही वाटले. तो आमच्या घरापासून सुमारे पंचवीस मैलांवर अंतरावर असल्याने सुमारे पाऊण तासाचा ड्राइव्ह होता. मुलाने गाडी काढली आणि आम्ही तेवढ्या वेळात तिथे जाऊन पोचलो. लॉस एंजेलिसच्या जवळच असलेल्या पॅसिफिक पॅलिसेड्स नावाच्या गावात हा लेक श्राइन नावाचा आश्रम आहे. परमहंस योगानंद यांनी स्थापन केलेल्या सेल्फ रिअलायजेशन फेलोशिप या मुख्य संस्थेने त्यांच्या हयातीतच हा आश्रम बांधला आहे. इथे समुद्रकिनाऱ्याला लागूनच एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या उतारावर सनसेट बुलेवार्ड नावाच्या वळणावळणाच्या घाटासारख्या रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत हे श्राइन बांधले आहे.
इथून समुद्रकिनारा दिसत नाही, पण या परिसरातच एक सुंदर लहानसे नैसर्गिक तळे आहे. एका चिमुकल्या धबधब्यामधून त्यात सतत पाणी पडत असते. बहुधा ते पंप करून पुन्हा टेकडीवर नेत असतील किंवा तो खराच झरा असला तर ते पाणी कुठल्याशा प्रवाहात सोडत असतील. त्या तळ्यात सुंदर बदकांचे थवे पोहत होते, दोन सुरेख राजहंसही विहार करत होते. माणसांना न घाबरता ते सगळे पक्षी किनाऱ्यावर अगदी हाताच्या अंतरावर जवळ येत होते. तसेच त्या तळ्याच्या पाण्यात मोठमोठे चांगले हात हातभर लांब असे अनेक रंगीबेरंगी मासेही मस्त सुळसुळत होते. त्यांना पाहून मला पुण्याच्या पु ल देशपांडे जपानी उद्यानाची आठवण झाली.
तळ्याच्या सगळ्या बाजूंनी भरगच्च झाडे लावली आहेत. काही मोठी झाडे, त्यावर चढत गेलेल्या वेली आणि त्यांच्या पायाशी झुडुपांची गर्दी यामुळे आपण एकाद्या गर्द रानात गेल्यासारखे वाटते. ही सगळी हिरवी गार झुडुपे निरनिराळ्या आकर्षक फुलांनी डंवरून गेलेली आहेतच, ती पाने आणि फुले यांचा एक मधुर सुगंध सगळीकडे दरवळत असतो. या झाडीमधून वाट काढत जाणाऱ्या एका वळणावळणाच्या रस्त्याने तळ्याची परिक्रमा करण्याची व्यवस्था आहे. वाटल्यास मध्येच थांबून आडोशाला बसून शांतपणे ध्यान करण्याची सोयही जागोजागी केलेली आहे. तिथे काही साधक डोळे मिटून ध्यान करत बसलेले दिसले.
बागेत शिरतांना सुरुवातीला एक सुवर्णकमलकमान (गोल्डन लोटस आर्च) आहे. ते परमात्म्याची ओळख पटण्यासाठी आत्म्याला झालेल्या जागृतीचे प्रतीक आहे म्हणे. पुढे एक गांधी जागतिक शांती स्मारक आहे. तिथे ठेवलेल्या पेटीत महात्मा गांधीची थोडी राख ठेवली आहे. परमहंस योगानंद भारतात गेले असतांना त्यांनी महात्माजींना त्यांच्या वर्धा येथील आश्रमात भेटून क्रिया योगाची शिकवण दिली असे त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. या स्मारकाच्या दोन्ही बाजूंना क्वान यिन नावाच्या दयाळू चिनी देवतेच्या मूर्ती ठेऊन त्याला जागतिक स्वरूप दिले आहे. धर्मांचा दरबार (कोर्ट ऑफ रिलीजन्स) नावाच्या जागी ॐ, क्रॉस, स्टार, चक्र आणि चंद्रकोर ही हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध आणि इस्लाम या पाच प्रमुख धर्मांची प्रतीके ठेवली आहेत. भगवान श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर, मॅडोना वगैरेंच्या मूर्तीही मधून मधून ठेवल्या आहेत. विंडमिल चॅपेल नावाच्या छोट्याशा इमारतीत शांतपणे बसून प्रार्थना करण्यासाठी बाके मांडून ठेवली आहेत पण समोर क्रॉसच्या जागी परमहंस योगानंद आणि आणखी काही महात्म्यांच्या तसबिरी आहेत. त्या हॉलच्या वरच्या बाजूला एक जुनी पवनचक्की आहे. या सगळ्या गोष्टी बागेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तळ्याच्या काठी बांधलेल्या आहेत आणि बागेतील पानेफुले पहात फिरत फिरत त्या पहायच्या आहेत.
फिरत फिरत पुढे गेल्यावर अखेर एका खोलीत परमहंस योगानंद यांचे अनेक फोटो, जुन्या काळातल्या त्यांच्या वापरातलेल्या वस्तू आणि त्यांनी जगभरातून गोळा करून आणलेल्या किंवा त्यांच्या भक्तांनी त्यांना भेट दिलेल्या अनेक कलाकुसरीच्या वस्तू तसेच रंगीबेरंगी स्फटिक वगैरेंचे एक सुंदर प्रदर्शन आहे. त्यातील प्रत्येक वस्तूची माहिती देणारे फलकही त्या वस्तूंच्या जवळ मांडून ठेवले आहेत. प्रदर्शनाला लागूनच गिफ्ट शॉप आहे. अमेरिकेतल्या कुठल्याही सौंदर्यस्थळातून बाहेर जाण्याची वाट अखेर गिफ्ट शॉपमधूनच जाते, तसेच इथेही आहे. त्या ठिकाणाला दिलेल्या भेटीची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू पर्यटक घेऊन जातील अशी आशा किंवा अपेक्षा असते. इथल्या दुकानात वस्तू, मूर्ती, चित्रे वगैरे आहेतच, शिवाय परमहंस योगानंदांनी लिहिलेली किंवा त्याच्याबद्दल माहिती देणारी पुस्तकेही ठेवली आहेत.
बागेला लागूनच एका उंचवट्यावर इथले प्रार्थनामंदिर आहे. या अष्टकोनी इमारतीच्या बांधणीत पूर्व आणि पश्चिमेकडील निरनिराळ्या वास्तुशिल्पकलांचा संगम झालेला आहे. वर पारंपरिक घुमटाकार शिखर आहेच, त्यावर सुवर्णकमळ आहे. तिथे एका वेळी चारशे साधक समाधीसाधना करू शकतील एवढी व्यवस्था आहे. मंदिराशेजारी असलेल्या इमारतीत राहण्याची व्यवस्था आहे. जगभरातून आलेले भक्त इथे राहून साधना करू शकतात. प्रवचने, सांघिक उपासना वगैरेंसाठी एक सभागृह आहे.
परमहंस योगानंद यांनी अमेरिकेत लॉस एंजेलिसजवळ बांधलेल्या या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. त्यांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे असे इथल्या मार्गदर्शिकेने आवर्जून सांगितले.
------------
Yogananda Quotes
Let my soul smile through my heart and my heart smile through my eyes, that I may scatter rich smiles in sad hearts. Paramahansa Yogananda
There is a magnet in your heart that will attract true friends. That magnet is unselfishness, thinking of others first; when you learn to live for others, they will live for you. Paramahansa Yogananda
Only the wise know just where predestination ends and free will begins. Meanwhile, you must keep on doing your best, according to your own clearest understanding. you must long for freedom as the drowning man longs for air. Without sincere longing, you will never find God. Paramahansa Yogananda
The happiness of one's own heart alone cannot satisfy the soul; one must try to include, as necessary to one's own happiness, the happiness of others. Paramahansa Yogananda
The Creator, in taking infinite pains to shroud with mystery His presence in every atom of creation, could have had but one motive - a sensitive desire that men seek Him only through free will. Paramahansa Yogananda
Read more at https://www.brainyquote.com/authors/paramahansa-yogananda-quotes
No comments:
Post a Comment