Tuesday, November 12, 2019

गेट्टी सेंटर म्यूजियमसुमारे शंभर वर्षांपूर्वी जे.पॉल गेट्टी या अमेरिकन माणसाला तो अठरा वर्षांचा असतांना त्याच्या श्रीमंत वडिलांनी दहा हजार डॉलर्स दिले. त्याने ते धंद्यात गुंतवून एक पेट्रोलियमची विहीर खणून घेतली. नशीबाने त्यातून भरपूर तेल निघाले आणि त्याला पहिल्याच वर्षात दहा लक्ष डॉलर्सची कमाई झाली. पॉल हा श्रीमंत घराण्यातला असूनसुद्धा तो काटकसरी, कामसू आणि धोरणी असल्यामुळे त्याने कष्टाने आपला व्यवसाय वाढवत नेला, जागतिक मंदीची लाट आलेली असतांना इतर उद्योजकांच्या विहिरी आणि कारखाने विकत घेतले आणि पेट्रोलियमच्या व्यवसायात मोठे स्थान मिळवले. १९५७ मध्ये तो सर्वात श्रीमंत अमेरिकन झाला आणि १९६६ मध्ये तर संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्याची नोंद झाली. 

कलासक्त पॉलला पुराणकालीन वस्तूंची आवड होती आणि त्या जमवण्याचा छंद होता. त्याने युरोपमधील जुन्या काळातली पेंटिंग्ज, पुतळे आणि खास बनावटीचे फर्निचर वगैरे दुर्मिळ सामान खरेदी करून ते अमेरिकेला नेले. महायुद्धानंतर आलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीत डबघाईला आलेल्या युरोपमधील अनेक  वस्तूसंग्रहालयांमधून त्याने हजारो वस्तू विकत घेऊन आपला संग्रह वाढवत नेला. त्याने लॉस एंजेलिसमधील आपल्या बंगल्याजवळ एक मोठी जागा घेऊन तिथे या वस्तू साठवून ठेवल्या. तसेच या कामासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट तयार करून त्याला अब्जावधि डॉलर्सचा निधि प्रदान केला. जे.पॉल गेट्टी याचे सन १९७६ मध्ये निधन झाल्यानंतरही या ट्रस्टने आपले काम तर चालू ठेवलेच, पण  लॉस एंजेलिसजवळ असलेल्या ब्रेंटवुड नावाच्या टेकडीच्या माथ्यावर 'गेट्टी सेंटर' नावाचे भव्य म्यूजियम उभारले. शिवाय जुन्या इमारतीचेही पुनरुज्जीवन करून तिथे 'गेट्टी व्हिला' नावाचे दुसरे केंद्र उघडले. ग्रीक, रोमन वगैरे प्राचीन काळातील पुराणकालीन वस्तू आणि संशोधनकेंद्र या व्हिलामध्ये ठेवले आणि मध्ययुगापासूनची जुनी चित्रे, पुतळे आणि छायाचित्रे याना गेट्टी सेंटरमध्ये मांडून ठेवले. तसेच तिथे डोंगराच्या उतारावर एक सुंदर उद्यान उघडले.

लॉस एंजेलिसहून उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गालाच या सेंटरचे मुख्य प्रवेशद्वार आहे.  तिथून आत गेल्यावर एक विशाल पार्किंग लॉट आहे. तिथे आमची कार पार्क करून बाहेर आल्यावर आम्ही तिथे असलेल्या छोटेखानी स्टेशनात गेलो. तीन लहानसे डबे असलेली एक छोटीशी गाडी गडगडत खाली आली आणि प्लॅटफॉर्मवर उभी असलेली पन्नास साठ माणसे त्यात चढून बसली किंवा उभी राहिली. हिल स्टेशन्सवर असतात तसल्या या पिटुकल्या गाडीत बसून खाली पसरलेल्या शहराचे विहंगम दृष्य पहात पहात आम्ही ती टेकडी चढून वर गेलो. तिथल्या या गाडीची सारखी वरखाली ये जा चालली असते आणि रोजच हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना ती खाली किंवा वर नेत असते.

स्टेशनवरच आम्हाला एक चिटोरे दिले गेले होते, त्यात त्या दिवसभरात असलेल्या सहलींची (टूर्सची) यादी दिली होती. वेगवेगळी थीम्स घेऊन त्यांनी या सहली बनवल्या आहेत. चित्रे, छायाचित्रे, पुतळे, उद्याने, वास्तुकला अशा विशिष्ट कलाकृतींचा अभ्यास करण्यासाठी यातली आपल्याला हवी ती टूर निवडायची सोय आहे. आम्ही सेंटरमध्ये जाऊन पोचल्यानंतर निघणारी पहिलीच सहल सर्वसामान्यांसाठी होती, तीच आम्ही घेतली. त्या ग्रुपमध्ये वीस पंचवीस माणसे होती.

एक दोन मिनिटात थोडक्यात माहिती दिल्यानंतर आमच्या मार्गदर्शिकेने आम्हाला दुसऱ्या मजल्यावरील एका दालनात नेऊन एका भव्य पेंटिंगसमोर उभे केले.  ते एक अठराव्या शतकातले पेस्टल पोर्टेट होते. अठराव्या शतकातल्या कुठल्याशा मोठ्या फ्रेंच अधिकाऱ्याला एका कोरीव काम केलेल्या लाकडी खुर्चीत बसलेले त्यात दाखवले आहे आणि त्याच्या हातात एक जुने पुराणे मोठे जाडजूड रजिस्टर आहे. त्या माणसाचा पोशाख, त्याच्या चेहेऱ्यावरले भाव, त्याचे लांब केस, हाताची बोटे, जमीनीवरील सुंदर गालिचा, पाठीमागे असलेले सुबक पार्टिशन वगैरे असंख्य गोष्टी त्यांतल्या अनेक बारकाव्य़ांसकट हुबेहूब चितारल्या आहेत. पेस्टल या प्रकारात विशिष्ट पद्धतीच्या भुकटीचा किंवा खडूचा उपयोग करून ते चित्र तयार केले जाते. हे अत्यंत किचकट आणि चिकाटीचे तसेच कौशल्याचे काम असते. त्यात कसलीही बारीकशी चूक केलेली चालत नाही कारण ती दुरुस्त करणे जवळ जवळ अशक्य असते. वर्षानुवर्षे काळजीपूर्वक आणि कौशल्याने शेकडो निरनिराळ्या रंगांच्या छटांच्या भुकट्यांचे थरावर थर चढवून ही चित्रे तयार केली जात. आमच्यासमोर असलेले भव्य चित्रच सुमारे दोन मीटर उंच आणि दीड मीटर रुंद होते. त्या काळात हातानेच कागद तयार केला जात असल्याने  इतका मोठा कागदही मिळत नव्हता. यामुळे अनेक कागद एकमेकांना जोडून हे पेंटिंग बवले असले तरी कुठेही ते जोड दिसत नाहीत इतक्या बेमालूम रीतीने ते जोडले गेले आहेत. त्या चित्रापेक्षाही मोठ्या अशा लाकडी फ्रेमसकट ते जास्तच भव्य दिसत होते. फ्रेमसकट त्या चित्राचे वजन काही टन इतके होते. असे हे अवाढव्य पण अत्यंत नाजुक असे चित्र कशा प्रकाराने हाताळून आणि पॅक करून युरोपमधून अमेरिकेतल्या या डोंगरमाथ्यावर आणून ठेवले असेल याचेही कौतुक वाटले.  दोनअडीच शतके उलटून गेली असली तरी त्याचे चमकदार रंग टिकून आहेत. यासाठी अर्थातच खास प्रकारचे रंग वापरले गेले आहेत. शिवाय ते चित्र फ्रेममधल्या एका तितक्याच प्रचंड काचेमागे सुरक्षित ठेवले आहे. यातली इतकी मोठी सलग काचच त्या काळातली जगातली सर्वात मोठी काच होती आणि ती तयार करणे हेच एक मोठे आव्हान होते असे आमच्या गाईडने सांगितले.

त्यानंतर आम्ही सुप्रसिद्ध डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गौ याचे आयरिसेस (Irises) हे खास चित्र पाहिले. त्या चित्रकाराने त्याच्या जीवनाच्या अखेरच्या काळात काढलेले हे एक आगळे वेगळे आणि सुंदर असे निसर्गचित्र आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकल्या आणि विकत घेतल्या गेलेल्या सर्वात जास्त किंमतीच्या दहा चित्रांमध्ये त्याचा समावेश होतो असे म्हणतात. आयरिस हे पश्चिमेकडील एक विशिष्ट प्रकारचे फूलझाड आहे. त्याला युरोपमधल्या वाङमयात एक वेगळे स्थान आहे, ते कसले तरी प्रतीक समजले जाते.  या पेटिंगमधल्या पानाफुलांचे आकार, रंग आणि त्यातून प्रगट होणारे भाव, चित्राचे काँपोझिशन, प्रकाशाचा खेळ, रंगसंगति वगैरेंबद्दल आमची गाईड भरभरून बोलली. त्यातले बरेचसे आमच्या डोक्यावरून गेले आणि जेवढे डोक्यात शिरले ते जास्त काळ टिकून राहिले नाही. हा काही आपला प्रांत नाही एवढेच यावरून सिद्ध झाले.

ही प्रसिद्ध चित्रे पहात असतांना तसेच या दालनातून त्या दालनात जातांना वाटेत एकापेक्षा एक अशी अनेक उत्कृष्ट चित्रे पहायला मिळाली. मायकेलँजेलो किंवा  व्हिन्सेंट व्हॅन गौ यांच्याखेरीजसुद्धा शेकडो उत्तम चित्रकार मधल्या शतकांमध्ये युरोपात होऊन गेले याचाच हा पुरावा होता. यापूर्वीही मी रोम आणि पॅरिसच्या वस्तूसंग्रहांमध्ये अशी असंख्य सुंदर चित्रे पाहिली होती.

अर्धापाऊण तास चित्रकलांचे नमूने पहात हिंडल्यानंतर आम्हाला शिल्पकलांच्या दालनात नेऊन एका खास पुतळ्यासमोर उभे केले गेले. हा एका जुन्या पोपचा पुतळा होता. संगमरमराच्या पांढऱ्या शुभ्र दगडामध्येसुद्धा इतर रंगांच्या छटा असतात आणि त्यांचा सुंदर उपयोग हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराने करून घेतला आहे. त्याचप्रमाणे त्वचेचे काँप्लेक्शन, कपड्यांवरील कलाकुसर आणि मुख्य म्हणजे चेहेऱ्यावरले आणि डोळ्यामधले भाव सारे काही इतके सुंदर जमले आहे की हा पुतळा अगदी जीवंत वाटतो. इतरही अनेक कलापूर्ण पुतळे या दालनात मांडून ठेवलेले आहेत.

यानंतर गाईडने आमचा निरोप घेतला आणि म्यूजियमचा उरलेला भाग स्वतःच पहायला आम्हाला सूट दिली. पुतळ्यांच्या दालनाशेजारीच जुन्या काळातल्या वास्तुसजावटींचे नमूने आहेत. यात सौंदर्य आणि उपयुक्तता यांची सुरेख सांगड घातलेली पहायला मिळाली.  युरोपमधल्या एकाद्या श्रीमंत माणसाचे कोरीव काम असलेले अवाढव्य आकारांचे पलंग, त्यावरील गाद्या गिरद्या, लोड आणि अंथरूण पांघरूणासह मांडून ठेऊन बेडरूमचे देखावे केले आहेत, तसेच सोफे, कपाटे आरसे वगैरेंमधून ड्रॉइंगरूम्स सजवून ठेवल्या आहेत. त्या काळातल्या कौशल्यपूर्ण सुतारकामात एकेका कपाटात अनेक कप्पे आणि चोरकप्पे करून त्यात मौल्यवान वस्तू कशा लपवून ठेवलेल्या असत आणि ते कप्पे उघडण्यासाठी किती गुप्त कळा बसवलेल्या असत याचेही दर्शन घडले. 

आणखी एका दालनात गेल्या दीडशे वर्षांमधली उत्तमोत्तम छायाचित्रे मांडून ठेवली आहेत. आम्ही एक फेरफटका मारला, पण आधीच खूप वेळ उभे राहून दमणूक झालेली असल्यामुळे एकेका फोटोपुढे रेंगाळत बसलो नाही. दुसऱ्या मजल्यावरील एका दालनामधून दुसऱ्यात जाण्यासाठी जाणारा मार्ग टेरेसमधून जातो. या इमारतीच टेकडीच्या माथ्यावर बांधलेल्या असल्यामुळे चहूबाजूंना दूरवर पसरलेल्या शहराचे विहंगम दृष्य पहायला मिळते आणि त्यात हे डाउनटाऊन, हा विमानतळ, इकडे आपण राहतो वगैरे ओळखीच्या जागा लोकेट करतांना मजा येते.

एकंदरीत पाहता गेट्टी सेंटर पहाण्यासाठी आम्ही खर्च केलेला वेळ सार्थकी लागला. आमचे पैसे वसूल झाले असे म्हणता येणार नाही कारण ते खर्च झालेच नाहीत. हे सगळे वस्तुसंग्रहालय तिथल्या गाइडेड टूर्ससकट अगदी निःशुल्क आहे. पार्किंग आणि कँटीनच्या सेवेसाठी थोडेसे डॉलर मोजावे लागतात तेवढेच. 

No comments: