दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट।
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
कविवर्य ग दि माडगूळकरांनी जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य अशा शब्दांमध्ये गीतरामायणात सांगितले आहे. साधारण अशाच अर्थाचा "यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|" हा श्लोक महाभारतात आहे. ही उपमा मी असंख्य वेळा वाचली आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्नही सतत चाललेले असतात आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे. प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच आणि ठरल्याप्रमाणे ती झालीही. आपल्या जीवनात आलेली काही माणसेसुद्धा काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असेही होतच असते, म्हणून मी याला अर्धसत्य म्हंटले आहे.
काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे जातात, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही आणि अनेक वेळा ती पुन्हा कधीच भेटतही नाहीत. त्यांची गणना स्मृती ठेवुनी जाती या सदरातच करावी लागते.
माझे बालपण आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी नावाच्या एका लहानशा गावात गेले. दुष्काळी भागातल्या आमच्या या गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि तिथे अगदी साध्या पिण्याच्या पाण्यापासून ते अनेक गोष्टींचा नेहमीच खडखडाट असायचा. त्यामुळे शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तितकेसे मजेदार वाटत नव्हते. मोठेपणी परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते जुने खडतर लहानपण आपल्याला परत मिळावे अशी तीव्र इच्छा कधी मनात आली नाही. कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, त्यांचे बालपण आनंदाने ओसंडून गेलेले असेल, म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझ से मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन" असे त्यांना म्हणावेसे वाटले असेल पण आमची परिस्थिति तसे वाटण्यासारखी नव्हती. पण त्या गीतामधल्या "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची आणि वाटत राहणार आहे. त्याचप्रमाणे मी ज्या मित्रांबरोबर चढाओढीने या कागदाच्या नावा चालवत होतो, सायकलच्या टायरच्या किंवा सळीच्या रिंगा पळवत होतो, लपंडाव खेळत होतो त्यांना आता आमच्या सर्वांच्याच दुसऱ्या बालपणात पुन्हा भेटायची ओढ मात्र वाटते.
माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या हायस्कूलमधल्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी साधे बोलायलासुध्दा बंदी होती, मैत्री करणे कल्पनेच्या पलीकडे होते. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी गावातल्या मैदानावर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण संपल्यानंतर त्यातले फक्त तीन चारजण, तेही निरनिराळ्या ठिकाणच्या कॉलेजला जाऊ शकले. नोकरीचाकरी शोधण्यासाठी इतर मुलांची त्यांच्या कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सुऱ्या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझेच आमच्या गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत पार हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा मित्र निव्वळ योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा नक्की भेटायचे असे ठरवून पण आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी नंतर पुन्हा एकमेकांशी बोलणार कसे?
कॉलेजच्या जीवनामध्ये मी घरापासून दूर हॉस्टेलमध्ये रहात होतो. तिथे मला फक्त मित्रांचाच सहवास असायचा. त्या काळात मला अनेक नवे मित्र भेटले, मी त्यांच्या संगतीतही खूप रमलो, आम्ही सर्वांनी एकत्र खूप धमाल केली त्याचप्रमाणे अडीअडचणीला साथही दिली, जीवनातले कित्येक अनमोल क्षण मिळवले. पण पुन्हा वर्ष संपले की जुदाई आणि विदाई ठरलेलीच. एकदा संपर्क तुटला की "पुन्हा नाही गाठ" याचीच खूणगाठ मनाशी बांधून ठेवलेली. जीवन असेच पुढे पुढे जात राहिले. नोकरीमधल्या दीर्घ कालावधीत आणखी असंख्य नवे मित्र मिळत गेले, त्यातले काही जवळ राहिले, काही दूरदेशी चालले गेले आणि त्यांच्याशी संपर्क तुटत गेले.
टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. इंटरनेट आणि फेसबुक या माध्यमामधून मी शाळेतल्या जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण कदाचित माझे मित्र माझ्याइतके टेक्नोसॅव्ही झालेच नसावेत किंवा त्यांना या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला त्यांच्यातला कोणीच नेटवर सापडला नाही. सायन्स कॉलेजमधला माझा मित्र डॉ.एकनाथ देव मला सापडला, पण तो खूप वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला आहे. आता फेसबुकवर आमचे मेसेजिंग आणि फोटो पाठवणे सुरू आहे.
इंजिनियरिंग कॉलेजमधल्या मित्रांच्या बाबतीत मात्र मी बराच सुदैवी होतो. दहा पंधरा वर्षांपूर्वी मी मुंबईला रहात असतांना एकदा माझ्या घरी पुण्याहून एक पाहुणी आली होती. तिच्याशी बोलता बोलता समजले की अशोकराव जोशी या नावाचे तिच्या पतीचे कोणी काका की मामासुद्धा माझ्याच कॉलेजला शिकलेले आहेत. अशोक हे नाव आणि जोशी हे आडनाव धारण करणारे लाखो लोक असतील. पण माझ्याबरोबरसुद्धा एक अशोक जोशी शिकत होता आणि कदाचित तोच असू शकेल म्हणून मी लगेच तिच्याकडून त्यांचा फोन नंबर घेतला आणि फिरवला. तो चक्क माझा हॉस्टेलमेट अशोक जोशीच निघाला आणि आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. पण त्या काळात आम्ही मुंबईतच पण एकमेकांपासून खूप दूर रहात होतो आणि नोकरी व घर यांच्या व्यापात पार गुरफटून गेलो होतो. त्यामुळे आम्हा दोघांनाही प्रत्यक्ष भेटणे शक्य झालेच नाही. दोन तीन वेळा फोनाफोनी केल्यानंतर ते बंद झाले.
तीन वर्षांपूर्वी पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या कॉलेजमधल्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याच्या शक्यता वाढल्या. मला तशी इच्छा होती, पण त्यांच्यातल्या कुणाशी गेल्या पन्नास वर्षात संबंध न आल्यामुळे कुठून सुरुवात करायची हेच मला उमजत नव्हते. पण गंमत अशी की योगायोगाने अशोक जोशीसुद्धा आतापर्यंत पुण्याला स्थायिक झाला होता आणि पुण्यातल्या मित्रांमध्ये सामील झाला होता. त्यातला सदानंद पुरोहित आमच्या स्नातकवर्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या कामाला उत्साहाने लागला होता. जोशीबुवांकडून त्याला माझे नाव कळताच त्याने लगेच मला फोन लावला आणि दुसरे दिवशी तो माझ्या घरी येऊन थडकला सुद्धा. हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असे झाले. मी लगेच त्यांच्या रेडीमेड ग्रुपचा सदस्य झालो आणि त्यांच्या मीटिंग्जना जायला लागलो. आम्ही एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला आणि या मित्रांबरोबर चॅटिंगही सुरू केले. त्यांच्यातले दोघेतीघे फेसबुकवर अॅक्टिव्ह होते, त्यांच्याशी मैत्री केली.
आता माझ्या संपर्कक्षेत्राच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या होत्या. कशी कुणास ठाऊक, पण बबन या नावाच्या एका माणसाने माझ्या फेसबुकावरच्या एका पोस्टवर कॉमेंट टाकली होती. त्याची विचारपूस केल्यावर तो माझा मित्र एट्या निघाला. त्याने फेसबुकवर बबन असे टोपण नाव घेतले होते. तो कॉलेज सोडल्यावर २-३ वर्षातच अमेरिकेला गेला होता आणि तिकडचाच झाला होता. आता फेसबुकवरून त्याच्याशी संपर्क सुरू झाला. तो भारतात आला असतांना एक दोन दिवस पुण्यात मुक्कामाला होता. मी त्याच्यासोबत एक ब्रेकफास्ट मीटिंग ठरवली आणि इतर समाईक मित्रांना बोलावले. लाटांबरोबर पार सातासमुद्रापलीकडे दूर गेलेला आणखी एक ओंडका आठ दहा इतर ओंडक्यांना पुन्हा भेटला आणि ते घडवून आणण्याचे पुण्य मला मिळाले.
आमच्याबरोबर कॉलेजमध्ये असलेला पण अजीबातच संपर्कात नसलेला शरदसुद्धा मला अचानकच फेसबुकवर भेटला. मी दहा वर्षांपूर्वी टाकलेला माझा फोटो त्याने ओळखला, माझी माहिती वाचली आणि मला मैत्रीची हाक दिली. पूर्वी कॉलेजात शिकतांनाही तो आमच्या कंपूमध्ये नव्हता त्यामुळे मला तो आता आठवतही नव्हता, पण त्याने दिलेल्या खुणा ओळखून मीही त्याचा हात हातात घेतला. या एका काळी फक्त तोंडओळख असलेल्या कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली.
एकदा त्याच्याशी बोलता बोलता दिलीप हा माझा एक गांववाला मित्र त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे शरदला घेऊन सरळ दिलीपच्या घरी जाऊन धडकलो. त्या अकल्पित भेटीतून आम्हा दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एकत्र घालवलेल्या जुन्या काळातल्या अनंत आठवणी उजळून निघाल्या. मधल्या पंचावन्न वर्षात कुणी काय काय केले याची अगदी थोडक्यात माहिती करून घेऊन आम्ही वर्तमानकाळापर्यंत आलो. आमच्या शाळेतले इतर मित्र आता कुठे आहेत आणि काय करतात त्याचा दिलीपलाही पत्ता नव्हता, पण त्याला सुरेशचा फोन नंबर तेवढा माहीत होता. मग आम्ही लगेच त्याच्याबरोबर बोलून घेतले. आमचा आणखी एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला.
कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढाच होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे बालपण मुंबई महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे परंपरागत संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि तो थकवा घालवण्यासाठी आराम करण्यात तसेच इतर आवश्यक कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणाऱ्या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.
कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक अत्यावश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने त्या वेळी लावला नव्हता. हे कसे काय शक्य आहे? असा विचार करत मी त्याच्याकडे निरखून पहात असतांना तो माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे घाऱ्या, काय पाहतोय्स? मी कामत्याच आहे. माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा एकदा अचानक अदृष्य झाला. या वेळी तर तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.
२०१७ साली म्हणजे मधल्या काळात आणखी बारा वर्षे लोटल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणाऱ्या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका डॉक्टरच्या दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहकाऱ्यांशी बोलून एक पूर्ण दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.
ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही अत्यंत जवळचा मित्र श्रीकांत भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे येऊ शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे अशोकला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. तेंव्हाही भोजकर चांगल्या मूडमध्ये आणि पूर्वीप्रमाणेच हसत खेळत होता. आम्ही चौघांनी तासभर चांगला हसत खिदळत पूर्वीच्या आठवणींवरून एकमेकांना डिवचत आणि पुन्हा कधी निवांतपणे भेटायचे याच्या योजना आखत काढला. पण ती श्रीकांतशी अखेरची भेट ठरली. काही महिन्यांनंतर मी पुन्हा त्या वास्तूमध्ये गेलो तो त्याचे अंत्यदर्शन घ्यायला.
ठरवल्याप्रमाणे मी कामतला घेऊन रवी या बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्यालाही सोबत घेऊन केशवकडे म्हणजे आमच्या दुसऱ्या एका जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या निरनिराळ्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त फेसबुक आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे आणि मोटारगाडीसारखे वाहन जवळ असल्यामुळे. अलेक्झँडर ग्रॅहॅम बेल, हेन्री फोर्ड आणि मार्क झुकरबर्ग यांचे आम्ही मनोमनी आभार मानले.
पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले माझे कांही जुने मित्र गेल्या १-२ वर्षांमध्ये मला पुन्हा सापडले. त्यातल्या कांहींना मी प्रयत्नपूर्वक शोधून काढले आणि काही अवचित भेटले. आता पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणी पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.
1 comment:
थोड्याफार फरकांने हीच सगळ्यांची कहानी आहे
Post a Comment