२०१५ साली होऊन गेलेल्या या घटना अजून माझ्या लक्षात राहिल्या आहेत. मी आधी हा लेख तीन भागांमध्ये लिहिला होता. ते तीन्ही भाग एकत्र केले. दि.०४-०४-२०२२
विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १)
सूर्य आणि विश्वातले सारे तारे नेहमी आपापल्या जागांवरच असतात. पण आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि आपण तिच्यासोबत फिरत असतो यामुळे आपल्याला ते सगळे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पृथ्वीबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतांना आपण त्याला निरनिराळ्या ठिकाणांहून जरा जवळून पहात असतो. यामुळे आपल्याला तो खूप खूप दूर असलेल्या इतर ताऱ्यांच्या तुलनेत हळू हळू सरकत बारा राशींमधून प्रवास करतांना दिसतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तो धनूराशीमधला प्रवास आटोपून मकर राशीत प्रवेश करतो. पण त्या वेळी सूर्याच्या प्रकाशात आपल्याला आकाशातली धनू रासही दिसत नसते आणि मकर रासही. या दोन राशींमध्ये कसली सीमारेषा तर आखलेली नाहीच. त्यामुळे तो इकडून तिकडे गेल्याचे आपल्याला दिसणार तरी कसे? खरे तर त्या दिवशी आपल्याला आकाशात काहीच वेगळे घडतांना दिसत नाही आणि इतर दिवसांपेक्षा वेगळे असे काही त्या दिवशी प्रत्यक्षात घडतही नाही हे सगळे मला चांगले माहीत आहे. संक्रांत नावाची एक विध्वंसक देवी या दिवशी एका दिशेने येते आणि दुसऱ्या दिशेकडे पहात पहात तिसरीकडे चालली जाते असे सांगितले जाते. प्रत्यक्षात तिला कोणीच कधी पाहिलेले नाही कारण ती फक्त एक रंजक कल्पना आहे याबद्दल मला खात्री आहे. तरीही एकाद्यावर कोणते संकट आले किंवा एकाद्याचे नुकसान झाले तर त्याच्यावर 'संक्रांत आली' असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. त्या अर्थाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती.
या वर्षातली मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी एका पहाटे बाहेरून धडाड् धुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्या दिवशी नरकचतुर्दशी किंवा गुढीपाडव्यासारखा पहाटे उठून साजरा करण्याचा कोणताच सण नव्हता, ख्रिसमस, ईद वगैरे नव्हती आणि जैन, बौद्ध, शीख वगैरेंपैकी कोणाचाही सण नव्हता. कोणाची वरात किंवा बारात निघाली असेल म्हणावे तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते, भारतपाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅचही कुठे चाललेली नव्हती. मग हे फटाके कोण उडवत असेल? कदाचित शेजारच्या बिल्डिंगमधल्या वात्रट मुलांचे हे काम असावे किंवा दूर कुठे तरी अतिरेक्यांनी केलेले बाँबस्फोट होत असावेत असे काही अंदाज मनात आले.
बाहेरून येत असलेल्या आवाजांपेक्षा घरातल्या पंख्यांमधून येत असलेले घुर्र घुर्ऱ असे आवाज जास्त चिंताजनक वाटल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे होते. आमच्या घरातली वीज गेली होती आणि इन्ह्रर्टरमधून पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्यामुळे पंखे कुरकुरत होते हे लक्षात येतांच आधी पंख्यांची बटने बंद केली. पहाटेच्या वेळी त्यांची फारशी गरजही वाटत नव्हतीच. समोरच्या आणि शेजारच्या बिल्डिंग्जमध्ये उजेड दिसत होता पण आमच्या बिल्डिंगमधल्या जिन्यातले व गेटवरचे दिवे बंद झाले होते. यावरून हा फक्त माझ्या घरातला प्रॉब्लेम नसून आमच्या बिल्डिंगचा आहे एवढे लक्षात आले. कदाचित मुख्य फ्यूज उडला असेल आणि सकाळी कोणीतरी तो लावून देईल असे वाटले.
बाहेर थोडा उजेड झाल्यावर मी नित्याचा मॉर्निंगवॉक घेऊन परत आलो. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आणि टाटापॉवर कंपनीत काम करणारे सद्गृहस्थ खाली भेटले. "वीज आली का?" असे त्यांना विचारताच "बहुतही व्होल्टेज फ्लक्च्युएशन हो रहा है।" असे पुटपुटत ते त्यांच्या गाडीत बसून चालले गेले. मला काहीच समजले नाही. मी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन लावला. तोही म्हणाला, "अरे साब, ४०० व्होल्ट्सतक व्होल्टेज जा रहा है। आप अपने कॉस्टली इक्विपमेंट्सको बचाइये। कोई केबल फॉल्ट लगता है।" माझ्याघरात तर अजीबातच वीज नव्हती, पण या केबलफॉल्टचे काही सांगता येत नाही. मागे एकदा एका केबलफॉल्टमुळे चक्क न्यूट्रल वायरमधून फेजमधला करंट येत होता आणि त्या गोंधळात आमच्या वॉशिंगमशीनचे कंट्रोल सर्किट जळून गेले होते, त्याचा मला चांगला फटका बसला होता. ते आठवल्याने मी सावध झालो, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरेंची सगळी स्विचे तर फटाफटा ऑफ केलीच, त्यांचे प्लग्जही सॉकेट्समधून काढून ठेवले.
आमच्या भागातल्या सबस्टेशनमधून आमच्या बिल्डिंगमध्ये येणारा विजेचा प्रवाह वाहून नेणारी भूमीगत (अंडरग्राउंड) केबल होती. जमीनीखाली ती नेमकी कुठून नेलेली होती, त्यात कोणत्या जागी हा फॉल्ट आला असेल, म्हणजे ती केबल तुटली बिटली असेल ते कसे शोधून काढतात आणि त्याची दुरुस्ती कशी केली जाणार होती याची कणभरही कल्पना आम्हा कोणाला नव्हती. त्या कामाला अनिश्चित काळ लागणार होता एवढे मात्र निश्चितपणे वाटत होते. यामुळे माझ्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला.
त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले होते आणि त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण घरी आल्यानंतर तिला प्राणवायूच्या कृत्रिम पुरवठ्याची गरज पडणार होती. त्यासाठी आणलेले यंत्र चालवण्यासाठी विजेची आवश्यकता होती आणि वीज नसेल तर आमची पंचाईत होणार होती. शिवाय वीज नाही म्हणजे पाण्याचे पंप चालणार नाहीत, ओव्हरहेड टँकमध्ये पाणी भरता येणार नाही, त्यात शिल्लक असलेले पाणी संपले की घरात पाण्याचा ठणठणाट होणार, विजेशिवाय अॅक्वागार्ड चालणार नाही, म्हणजे टँकच्या तळातले गाळाने गढूळ झालेले पाणी मिळणार ते आजारी व्यक्तीला कसे द्यायचे आणि मी तरी ते कसे प्यायचे? स्वयंपाक तरी कुठल्या पाण्याने करायचा? अशा वेळी हॉटेलातले जेवण मागवून खाणेही योग्य नव्हते. असा सगळाच घोळ झाला होता. यामुळे त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला तर कोणा नातेवाइकाच्या किंवा मित्राच्या घरी नेऊन ठेवावे का? तसेच ही गोष्ट तिला कशी सांगावी व पटवून द्यावी? याच विचारात मी धडपडत होतो.
पण या वेळी काही तातडीची कामे करणेही आवश्यक होते. आधी स्वयंपाकघरात आणि बाथरूम्समध्ये शक्य तेवढे नळाचे पाणी भरून ठेवले. त्यानंतर इन्व्हर्टरकडे मोर्चा वळवला. महाराष्ट्रात जेंव्हा बारनियमन आणि भारनियमन जोरात चालले होते तेंव्हा घरातली वीज रोजच जायची. यामुळे घरात इन्हर्टर बसवून घेतला होता आणि त्याचा चांगला उपयोग होत होता. पुढे विजेच्या पुरवठ्य़ात सुधारणा होत गेली. तरीही वाशीला अधूनमधून वीज जातच असल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट अगदीच वाया गेली नाही असे वाटण्याइतपत त्याचा उपयोग होत राहिला. एकदा त्याची बॅटरी आणि एकदा इन्हर्टरही बदलून झाले होते. मात्र गेल्या तीन चार महिन्यात वीजेचा पुरवठा खंडित न झाल्यामुळे कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या त्या यंत्राकडे आमचे दुर्लक्षच झाले होते. पण या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मात्र आता त्या यंत्राला महत्वाची भूमिका बजावायची होती आणि त्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते.
मी आधी पेट्रोल पंपावर जाऊन डिस्टिल्ड वॉटरचा कॅन आणला, इन्हर्टरच्या वजनदार बॅटरीला कसेबेसे ओढत कोपऱ्यातून बाहेर काढले आणि ते उकळून शुद्ध केलेले पाणी त्यातल्या तहानलेल्या सेल्सना पाजले. त्यांनीही ते गटागटा पीत जवळजवळ अख्खा कॅन संपवून टाकला. आणखी काही काळ लोटला असता तर कदाचित त्यांचे डिहायड्रेशन होऊन त्यांनी मानच टाकली असती. आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीमुळे त्या बॅटऱ्यांना मात्र नवजीवन मिळाले होते.
घरकाम आणि स्वयंपाक करणाऱ्या बायांना मी वीज आणि पाणी जपूनच वापरण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांनी अनवधानाने काही दिवे आणि पंखे लावले आणि थोडे पाणी वाहून जाऊ दिलेच. त्यामुळे बॅटरीतली थोडी वीज खर्च झाली आणि पाण्याचा साठाही कमी झाला. तोंपर्यंत घरातले सगळे नळ तर कोरडे झालेले होतेच. माझ्यासमोर असलेला प्रश्न जास्त गंभीर झाला. हा प्रॉब्लेम अलकाला लगेच फोनवर सांगावा की बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला प्रत्यक्ष भेटून सांगावा याचा विचार मी करत असतांना तिचाच फोन आला. मी काही बोलण्याच्या आधीच तिचा हिरमुसलेला स्वर कानावर पडला. हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्यांच्या वॉर्डमधल्या रोजच्या राउंडवर येऊन गेले होते, पण तिची केस ज्या मोठ्या डॉक्टरीणबाई पहात होत्या त्या काही कारणाने आल्या नव्हत्या आणि तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेतला जाणार नव्हता. यामुळे तिचा तिथला मुक्काम एका दिवसाने वाढला होता.
खरे तर हे ऐकून मला जरा हायसे वाटले होते, पण माझ्या आवाजातूनसुद्धा तिला तसे कळू न देता मी तिची समजूत काढली. "आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याने तुझी तब्येत आणखी सुधारेल, आज ज्युनियर डॉक्टर्सच्या मनात कदाचित काही शंका असल्या तरी उद्या मोठ्या डॉक्टरांनीच तुला तपासून खात्री करून घेतली तर मग घरी आल्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. एका दृष्टीने ते ही ठीकच आहे. मला आणखी एक दिवस तुझ्यापासून दूर रहावे लागेल, पण त्याला काही इलाज नाही. मी दुपारी तुला भेटायला येईनच, तेंव्हा काय काय आणायचे आहे?" विषय बदलून झाल्यावर कोणाकोणाचे फोन येऊन गेले? ती मंडळी कशी आहेत? काय म्हणताहेत? वगैरेंवर चर्चा करून संभाषण संपवले.
काही वेळाने बाहेरून कोणी तरी मोठ्याने बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. बाल्कनीत जाऊन पाहिले तर एक माणूस आमच्या बिल्डिंगच्या काम्पाउंडजवळ असलेल्या एका झाडावर चढला होता तर त्याचा साथी फूटपाथवर असलेल्या दिव्याच्या खांबापाशी उभा होता. त्याने दिव्याच्या वायरला जोडलेली एक लहान जाडीची केबल झाडावरल्या माणसाकडे फेकली, त्या माणसाने ती ओढून घेतली आणि तिची गुंडाळी करून आमच्या अंगणात फेकली. त्यानंतर त्या दोघांनी आत येऊन ती केबल आमच्या बिल्डिंगच्या मुख्य कनेक्शनला जोडून दिली आणि विजेचा तात्पुरता पुरवठा सुरू करून दिला.
वीज कंपनीच्या लोकांनी केलेल्या या जुगाडू प्रकारच्या उपाययोजनेचे मला कौतुकही वाटले आणि त्यातला धोकाही जाणवला. पण त्या क्षणी तरी आमचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. आम्ही लगेच पाण्याचे पंपिंग सुरू करून दिले. ओव्हरहेड टँकमधून नळाला पाणी येऊ लागताच आंघोळ केली, कपडे धुवून टाकले, इन्हर्टरची बॅटरीही चार्ज करून घेतली. केबल फॉल्टची पक्क्या स्वरूपाची दुरुस्ती होईपर्यंत थोडा मोकळा श्वास घ्यायची सोय झाली होती.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग २)
मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. आणि त्यामुळे आमच्या घरातली वीज अचानक गेली होती. त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडाली होती वगैरे हकीकत या लेखाच्या पहिल्या भागात दिली आहेच. त्या दिवशी मी हॉस्पिटलला जायला निघालो तेंव्हा आमच्या घराच्या पलीकडच्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर तीन चार माणसे हातात कुदळ, फावडे, पहार वगैरे घेऊन कुणाची तरी वाट पहात बसली होती. त्या अर्थी आमच्या भूमीगत केबलच्या दुरुस्तीसाठी चक्रे फिरायला सुरुवात झाली होती आणि काही तासांमध्ये ते काम पूर्ण होईल अशी आशा होती. मी जरा खुशीत येऊन पुढे गेलो.
कुठल्याही पतीला पत्नीशी बोलत असतांना हं, हां याच्या पलीकडे जास्त काही उच्चारायची जास्त गरज सहसा पडत नाही किंवा त्याला तशी जास्त संधीही मिळत नाही हे एक वैष्विक सत्य आहे. त्या दिवसभरात हॉस्पिटलमध्ये आलेले अनुभव, घरात करायची साचलेली कामे, बाजारातून आणायचे असलेले सामान यासारख्या अनेक विषयांवर अलका बोलत राहिली आणि मी ते ऐकत राहिलो. घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीचा उल्लेख मी मुद्दामच टाळला. मी हॉस्पिटलमधून घरी परत येत असतांना आमच्या घराजवळच्या रस्त्याच्या कडेला एक खड्डा खणलेला मी चालत्या रिक्शेमधूनच पाहिला. त्या खड्ड्यातून बाहेर काढलेल्या विजेच्या केबलवर जो़डणीसाठी शस्त्रक्रिया सुरू होती. ते लोक नेमके काय करत होते ते पाहण्याची मला उत्सुकता असली तरी सकाळपासून झालेल्या धावपळीनंतर तिथे जाऊन उभे राहण्यासाठी माझ्या अंगात त्राण उरले नव्हते आणि पोटात सडकून भूकही लागली होती. त्यामुळे मी रिक्शा सरळ आमच्या घरापर्यंत नेली, चार घास जेवण पोटात ढकलले आणि बिछान्यावर आडवा झालो. तोपर्यंत वीजही आली. पहाटे तिच्य़ावर आलेली संक्रांत बहुधा रात्री तिच्या निजधामाला परत गेली असे वाटले.
दुसरे दिवशी अलकाला हॉस्पिटलमधून घरी आणले. अजूनही तिला संपूर्ण विश्रांतीची गरज होती. तिच्याकडे लक्ष देऊन मी जमतील तेवढी कामे उरकून घेत होतो. असाच आणखी एक दिवस सुरळितपणे पार पडला. त्या दिवशीच्या रात्री साडेतीनच्या सुमाराला पुन्हा पंख्याचे जोरात घुरघुरणे सुरू झाल्याने मला जाग आली. पंखा बंद करून खिडक्या उघडल्यावर थंड आणि ताजी हवा आत आली. अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद करावे लागले, पण ती गाढ झोपेत होती. दचकून किंवा खडबडून जागी झाली नाही. मीही थोडा वेळ आडवा झालो आणि तिच्याकडे लक्ष ठेवत राहिलो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये लखलखाट होता पण आमचीच बिल्डिंग अंधारात होती. याचा अर्थ आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांपूर्वी केलेली केबलदुरुस्ती बहुधा कुचकामी ठरली असावी. सकाळ होईपर्यंत मला त्यावर काहीही करणे शक्य नव्हते. पहाटेची वाट पहात राहिलो.
बिल्डिंगमधले इतर लोक उठण्याच्या आधीच मी भल्या पहाटे उठून एक मोठे पातेलेभर पाणी स्वयंपाकघरातल्या नळावर भरून ठेवले आणि त्या दिवशीच्या स्वयंपाकाची सोय केली. कोपऱ्यात रिकामा पडलेला प्लॅस्टिकचा ड्रम बाथरूममध्ये नेऊन भरून ठेवला. पूर्वी कधीकाळी विजेचे भारनियमन चाललेले असतांना घेऊन ठेवलेल्या या वस्तूंचा पुन्हा एकदा उपयोग करण्याची वेळ आता आली होती. पिण्यासाठी गाळलेले भरपूर पाणी चार पाच बाटल्यांमध्ये आदल्या रात्रीच भरून ठेवलेले होते. नळाला पाणी येत होते तोपर्यंत सकाळची सगळी कामे आणि आंघोळ वगैरे आटोपून घेतली. आता केंव्हाही ते गेले तरी काही वांधा नव्हता.
अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद झाले होते हे सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात आले. पण सुदैवाने त्या वेळी तिला काही त्रास होत नव्हता. ऑक्सीमीटर लावून तिच्या रक्तातले प्राणवायूचे प्रमाण तपासून पाहिले, ते थोडे कमी झाले असले तरी मर्यादेतच होते. ही जमेच्या बाजूची गोष्ट होती. ते आणखी कमी झाल्यानंतर तिला जाणवले असते आणि त्याहून कमी झाल्यावर त्याचा त्रास झाला असता. याचा अर्थ आमच्याकडे बरेच मार्जिन होते. आता मला विजेचे नियोजन करणे शक्य होते आणि बराच वेळ वीज आली नाही तरी तिचा फार मोठा प्रोब्लेम होणार नव्हता. बॅटरीवर चालणारे दुसरे ऑक्सीजनचे मशीन थोडा वेळ चालवून रक्तातले प्राणवायूचे प्रमाण वाढवायचे आणि काही वेळ मशीन बंद करून ठेवायचे असे करून ते जास्त वेळ चालवणे शक्य होते. इन्हर्टरच्या विजेवर मशीनची बॅटरी चार्ज करून घेऊन तिचे आयुष्य वाढवता येत होते.
त्या दिवशी इन्व्हर्टरचा उपयोग फक्त या एकाच कामासाठी करायचा असे मात्र आम्ही ठरवले. आमच्या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये थोडा फार सूर्यप्रकाश येत असल्यामुळे दिवसा उजेडी विजेचे दिवे लावायची चैन एक दिवस करायची नाही, जानेवारीचा महिना असल्यामुळे एकादा दिवस पंख्याशिवाय राहणे अशक्य नव्हते. टीव्हीचे जास्त अॅडिक्शन बरे नाही असे म्हणताच माझ्या कॉम्प्यूटरच्या व्यसनावर गाडी घसरली. तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायची घोषणा केली. त्यामुळे मला बराचसा मोकळा वेळही मिळाला.
कपाटांमधले सामान काढून ते आवरायला घेतले. त्यात काही जुने फोटो, पत्रे वगैरे मिळाली. त्यांनी मला भूतकाळाची सफर घडवून आणली. नजरेआड गेलेल्या काही उपयोगाच्या किंवा शोभेच्या वस्तू गवसल्या. त्या नव्याने मिळाल्याचा आनंद झाला. शीतकपाटाचे मुख्य यंत्र (रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर) थंड पडल्यामुळे त्यातले तपमान वाढायला लागले. त्यातले उरलेसुरले आइसक्रीम वाया जाऊ नये म्हणून खाऊन फस्त केले आणि फळांचे रस (फ्रूट ज्यूस) पिऊन टाकले. ज्यांच्या टिकण्याबद्दल शंका होती अशी काही फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ बाहेर काढले. "आम्ही सारे खवय्ये" आणि "खाना खजाना" या कार्यक्रमांच्या गेल्या दोन तीन आठवड्यातल्या भागात पाहिलेल्या काही रेसिपीजचे प्रयोग त्यांच्यावर करून पाहिले. कुठलाही तिखटमिठाचा पदार्थ चांगला खरपूस भाजला किंवा तळला तर मस्तच लागणार आणि कुठल्याही गोड पदार्थात मुबलक बदाम, काजू, बेदाणे वगैरे घातले तर तो कशाला वाईट लागणार आहे? "शाहंशाही ताश्कंदी टिक्का", आणि "मॅजेस्टिक बव्हेरियन फज्" असली फॅन्सी नावे देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थोडक्यात म्हणजे वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड देऊन जमेल तेवढी मजा करायची असे मी या वेळी ठरवले होते.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः)
विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)
वीज कंपनीच्या कामगारांनी येऊन सगळी पाहणी केली आणि पुन्हा एकदा केबलफॉल्टच आला आहे असा निष्कर्ष काढून ते लोक परत गेले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी खणलेला खड्डा अजून भरलेलाही नव्हता. त्यानंतर आलेल्या कामगारांनी त्या खड्ड्यातली माती उकरून आधी मारलेला केबलचा जॉइंट पाहिला. तो ठीकठाकच दिसत होता. त्या लोकांनी तिथून खणायला सुरुवात करून तो खड्डा रस्त्याच्या कडेने वाढवत नेला. दीड दोन मीटर्स लांब खड्डा खणून झाल्यानंतर त्यांना केबलमधला नवा दोष (फॉल्ट) सापडला. या दोन ठिकाणांमधली खराब झालेली केबल बदलायचे ठरवून ते लोक केबलचा एक नवा तुकडा घेऊन आले. त्यांनी हा तुकडा जुन्या केबलच्या जागेवर ठेऊन त्याला दोन्ही बाजूंच्या बाकीच्या केबलशी दोन ठिकाणी नवे जॉइंट्स मारून जोडले.
आमच्या इमारतीला विजेचा पुरवठा करणारी ही केबल चौपदरी होती. मनगटाएवढ्या जाड मुख्य केबलचे जाड आणि कठीण कवच काढल्यावर आत लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या जाड चार केबल्स होत्या. आर, वाय आणि ब्ल्यू या तीन फेजमधल्या विजेचा पुरवठा तीन रंगांच्या केबल्समधून होत होता आणि काळ्या कॉमन न्यूट्रल केबलमधून ती वीज ग्रिडकडे परत जात होती. या प्रत्येक लहान केबलमध्येसुद्धा दीडदोन मिलिमीटर जाडीच्या पंधरावीस अॅल्युमिनियमच्या तारा दाटीवाटीने बसवलेल्या होत्या. यामुळे यातली एक एक केबल एकेका सळीसारखी दिसत होती. हे लोक त्यांना एकमेकांसोबत कसे जोडणार होते ते मला माहीत नसल्यामुळे ते पाहण्याची मला उत्सुकता होती.
त्या लोकांनी अॅल्युमिनियमच्या जाडसर नळीचे बोटबोटभर लांब असे अनेक तुकडे आणले आणि दोन बाजूच्या तारा एकेका तुकड्यात दोन बाजूंनी घुसवून त्या पोकळ तुकड्याला आतल्या तारांवर हातोडीने मारून चांगले चेचून काढले. अशा त-हेने त्या दोन तारा त्या नळीच्या तुकड्यांमधून एकमेकींशी जोडल्या गेल्या. लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या तारांसाठी दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रत्येकी चार जॉइंट्स करून त्यांनी हे जोडणीचे काम केले. त्यावर इन्सुलेशन टेपचे अनेक थर गुंडाळून झाल्यावर त्यामधून विजेचा पुरवठा सुरू केला गेला. विजेवरल्या संक्रांतीचा हा अध्याय एकदाचा मिटला असे मला एकीकडे वाटत होते, पण या जुन्या केबलमध्ये आणखी कुठे कुठे नवे फॉल्ट्स निर्माण होणार आहेत ही शंकासुद्धा मनात येत होतीच.
या घटनेला दोन तीन दिवसही झाले नसतील तेवढ्यात या वर्षीच्या संक्रांतीने पुन्हा आपला तडाखा आम्हाला दिला. मात्र या वेळी तिने फक्त आमच्या फ्लॅटमधल्या विजेवरच हल्ला चढवला. एका संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आमच्या घरातले सगळे दिवे अचानक प्रखर आणि मंद व्हायला लागले, टेलिव्हिजनवरील चित्रे थयथयाट करायला लागली, एरवी सुप्तावस्थेत पडून असलेले इन्व्हर्टरवरचे तीन लाल दिवे आलटून पालटून डोळे मिचकावायला लागले. इन्व्हर्टरमधून खस्स्स खस्स्स असे लहानसे स्पार्क पडल्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. आम्ही लगेच टीव्ही बंद केला. आमच्या इन्व्हर्टरमध्येच काही लोचा झाला असावा असे गृहीत धरून त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेली सगळी बटने दाबून पाहिली, स्विचे वर खाली करून पाहिली, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हते. एक तर घरात संपूर्ण अंधार व्हायचा, नाही तर सगळे दिवे प्रखर आणि मंद होण्याची भुताटकी व्हायची. बहुधा या वेळी संक्रांतीने तिच्या एकाद्या गणाला सोबत आणले असावे. आम्हाला क्षणभर काहीच समजेनासे झाले, तेंव्हा आमच्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला म्हणजे पठारांना फोन लावला. त्यातल्या त्यात सुदैवाची एक गोष्ट घडली. "इस लाइनकी सभी लाइने व्यस्त है।", "आप जिस फोनसे संपर्क करना चाहते हैं वह इस समय संपर्कक्षेत्रके बाहर है।", "डायल किया हुवा नंबर मौजूद नही है।" अशा प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. चक्क पठारांनीच फोन उचलून हॅलो म्हंटले. मी लगेच त्यांना विचारले, "पठार, तुम्ही आत्ता कुठे आहेत?"
"सेक्टर १७ मध्ये" त्यांनी सांगितले.
"अहो तुम्हाला काय सांगू? आमच्या घरातले दिवे सारखे सेकंदासेकंदाला जाताय्त आणि येताय्त, इन्व्हर्टरमधून कसले कसले आवाज येताय्त. तुम्ही लगेच येऊन पाहू शकाल का? नाही तर रात्रभर आम्हाला वीजही नाही आणि इन्व्हर्टरही नाही असे झाले तर मोठे प्रॉव्लेम येतील हो."
माझ्या आवाजातली काकुळती पाहून त्यांनी लगेच यायचे कबूल केले. मी एक मेणबत्ती पेटवली आणि विजेचे मेनस्विच आणि इन्व्हर्टर या दोघांनाही बंद ठेऊन अंधारात बसून राहिलो. सांगितल्याप्रमाणे पठार आले. त्यांनी इन्व्हर्टर सुरू केला तर या वेळी तो सुतासारखा सरळ झाला होता. त्यातून येणारे चित्रविचित्र आवाज येणेही बंद झाले होते. मेन स्विच ऑन करून मात्र काही उपयोग झाला नाही. आमच्या घरातला वीजपुरवठा बंद झालेला होताच. शेजारी आणि जिन्यातले दिवे मात्र लागलेले होते.
"अहो, तुम्ही नक्की विजेचं बिल भरलं होतं ना?" या वेळी एक अविश्वासदर्शक विचारणा व्हायला हवीच होती.
"आता या अंधारात तुला रिसीट शोधून काढून आणून दाखवू का?" हर सवाल का सवाल ही जवाब हो या जुन्या गाण्याची मला आठवण झाली.
पठारांनी आमच्या घरातला कंट्रोल बोर्ड उघडून दोन तीन जागी टेस्टर टोचला आणि तिथपर्यंत सप्लाय येत नसल्याची खात्री करून घेतली. मग आम्ही दोघेही खाली उतरलो. बिल्डिंगच्या स्विचबोर्डाच्या जाळीदार कॅबिनेटचे कुलूप उघडले. तिथल्या भिंतीवरल्या बोर्डावर चौदा मीटर्स दाटीवाटीने लावलेली होती आणि त्यांचे चौदा फ्यूज खालच्या जागेत दाटीवाटीनेच बसवले होते. त्यातले आमचे मीटर आणि फ्यूज शोधून काढले. खरे तर त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. त्यातली फ्यूजवायर नाहीशी झालेली होतीच, तिला जोडलेल्या तारेवरचे इन्सुलेशनही जळून काळे ठिक्कर पडले होते, शिवाय ते अजून धुमसत असल्याने जळक्या रबराचा वास दरवळत होता. त्या वायरला टेस्टरने जरासे हलवताच तिच्यातून भल्या मोठ्या ठिणग्या पडत होत्या. झोपडपट्ट्यांपासून गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यत अनेक ठिकाणी लागलेल्या आगी इलेक्टिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्या असल्याची शंका घेतल्याच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या, पण आतापर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. या वेळी आमच्या घराकडे येणा-या मुख्य वायरमधून येणा-या मोठ्या ठिणग्या पाहिल्या आणि त्या बातम्या मला ख-या वाटायला लागल्या. जर एकादा ज्वालाग्राही पदार्थ जवळपास असता तर त्याने पेट घेणे या ठिणग्या पाहून शक्य वाटत होते. आमचे नशीब म्हणा किंवा आमचा शहाणपणा म्हणा, अशा कुठल्याही वस्तू त्या जागेच्या आसपास ठेवलेल्या नव्हत्या.
फ्यूजला जोडलेली वायर का जळली असेल? हा प्रश्न मला पडल्याने मी पठारांना विचारला. "वायरिंग जुनं झालंय्." असे एक मोघम उत्तर मिळाले. खरे तर फ्यूजने सर्वात आधी वितळून वीजपुरवठाच बंद करावा आणि इतर उपकरणांना वाचवावे असे अपेक्षित असते, मग या वेळी तसे का झाले नाही? या जागची फ्यूज कधी आणि कुणी लावली होती हेसुद्धा मला माहीत नव्हते किंवा आठवत नव्हते. त्या वेळेलाच त्यात काही तरी घोटाळा झाला असला तर आम्ही किती वर्षे असुरक्षितपणे रहात होतो याचा विचार मनात आला. पठारांनी मात्र शांतपणे जळलेला वायरचा तुकडा काढून त्या जागेवर नवा तुकडा बसवला आणि फ्यूजच्या जागी एमसीबी बसवून वीजप्रवाह सुरू करून दिला.
या घटनेला आठवडाही झाला नसेल तेवढ्यात पुन्हा एका भल्या पहाटे बाहेरून धडाड् धुडुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्याच वेळी आमच्याकडली वीज गेली असल्याचेही लक्षात आले. दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या वेळी जेंव्हा असले आवाज यायला लागले होते तेंव्हा ते फटाक्यांचे आवाज असावेत असे मला वाटले होते आणि त्याच वेळी गेलेल्या विजेकडे सगळे लक्ष द्यावे लागल्यामुळे मी त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र विजेच्या वारंवार जाण्याची संवय झालेली असल्यामुळे मी त्या विचित्र आवाजांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. हे आवाज जमीनीखालील केबलमध्ये होत असलेल्या भयानक स्पार्किंगमुळे निघत असल्याचे कळल्यामुळे अचानकपणे असे आवाज येणे आणि त्याच वेळी वीज जाणे यात जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले. हे सगळे जसे मला समजले तसेच ते इतरांच्याही लक्षात आले असणार. आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरच राहतात. पहाटेच्या शांत वातावरणात त्यांचे टेलिफोनवरून चालत असलेले संभाषण मला ऐकू येत होते. आमच्या घराजवळ जमीनीखाली मोठमोठे स्फोट होत असल्याचे कुणाला तरी ओरडून सांगून त्यावर ताबडतोब उपाययोजना करायला ते जोराजोरात सांगत होते. पाच मिनिटातच मोटारसायकलवर बसून एक जोडगोळी आली, त्यांनीही ते स्फोटाचे आवाज ऐकले, कदाचित ते त्यांच्या ओळखीचे असतील. त्यांनी लगेच सबस्टेशनमध्ये जाऊन आमच्या सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केला.
सकाळी मी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा घटनास्थळावर जाऊन पाहिले. आठवडाभरापूर्वी केलेल्या दुरुस्तीनंतर त्या केबल्सना जमीनीखाली गाडून त्यावर माती पसरलेली होती, पण वर काँक्रीटचे कवच केलेले नव्हते. खड्ड्यातली ती माती भिजून ओली किच्च झालेली दिसत होती. त्याच जागी एक टोयोटा गाडी उभी होती आणि तीदेखील भिजलेली दिसत होती. बहुधा रात्री कोणीतरी ती गाडी तिथे उभी केली होती आणि पाण्याने धुतली होती. जमीनीतले पाणी केबलच्या इन्सुलेशनच्या आतपर्यंत झिरपत जाऊन शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामधून ठिणगी पडताच त्या पाण्याची वाफ होऊन तिचा स्फोट झाला असावा. त्या स्फोटाने केबल तुटल्यामुळे आमच्याकडची वीज गेली असली तरी सबस्टेशनपासून त्या जागेपर्यंतचे सर्किट शाबूत होते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा थोडे पाणी झिरपून इन्सुलेशनच्या आत शिरले की दुसरा स्फोट होत असेल अशा प्रकारे तो प्रकार दहा पंधरा मिनिटे चालला होता. वीजपुरवठाच बंद केल्यानंतर ते थांबले. त्यानंतर वीजकंपनीच्या लोकांनी यथावकाश येऊन पुन्हा एकदा ती केबल जोडून दिली. यावेळी मुद्दाम तिकडे जाऊन त्यांचे काम पहावेसेही मला वाटले नाही.
एकाच ठिकाणी पंधरावीस दिवसांमध्ये तीन वेळा केबव फॉल्ट आल्यामुळे वीजमंडळाच्या उच्चपदस्थांनाही त्यात लक्ष घालावेसे वाटले आणि त्यांनी ती जुनी केबलच बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्यात एक अडचण होती. आमची बिल्डिंग आणि जवळचे सबस्टेशन यांच्या मधून एक रस्ता जातो. त्या रस्त्याखालून जात असलेली केबल बदलायची असल्यास त्या रस्त्यावरील रहदारी बंद ठेऊन त्या रस्त्याच्या आरपार जाणारा खड्डा खणून काढावा लागणार. यासाठी महानगरपालिकेची परवानगी हवी. ती मिळायला खूप वेळ लागणार. यावर त्यांनी एक उपाय काढला. हे काम एका वेळी न करता ते दोन टप्प्यात करायचे असे ठरवले. त्या रस्त्याच्या आमच्या बाजूच्या कडेला एक लाल रंगाचे मोठे कपाट आणून उभे केले. त्यांच्या भाषेत त्याला केबल पिलर असे म्हणतात. या पिलरमध्ये तीन फेजेस आणि न्यूट्रल केबल्सना जोडणारे पॉइंट्स आणि फ्यूज वगैरे असतात. या पिलरपासून ते आमच्या घऱापर्यंत एक नवी केबल टाकली. पण रस्त्याच्या पलीकडल्या बाजुने आलेली केबल पिलरपर्यंत पोचू शकली नाही. यामुळे त्यादरम्यान पुन्हा एक जोड आलाच.
केबलमधला हा जोड टिकाऊ आहे असे त्यावेळी सांगण्यात आले होते, पण तो जेमतेम महिनाभर टिकला. त्यानंतर म्हणजे मागल्या आठवड्यात पुन्हा एकदा रस्त्याखालून स्फोटाचे आवाज येऊ लागले, धूर यायला लागला. वीजकंपनीच्या लोकांनी येऊन रिपेअरीचे काम केले, पण तेही फुसकेच ठरले, तीन चार तासदेखील टिकले नाही. त्यानंतर अधिक खोलवर आणि दूरवर खणून त्यांनी त्याच ठिकाणी दुसरा जोड (जॉइंट) मारला आणि जमीनीतल्या पाण्याने तो भिजू नये म्हणून तो खड्डा न बुजवता अजून तसाच ठेवला आहे. केबलसाठी हे ठीक असले तरी माणसांसाठी ते असुरक्षित आहेच. शिवाय कावळे, चिमण्या, उंदीर, घुशी, कुत्री, मांजरे वगैरे प्राणी केंव्हा त्यात जाऊन कडमडतील आणि कसले घोटाळे करून ठेवतील ते सांगता येत नाही. रस्त्याखालून आरपार जाणारी केबल बदलून हा जोड जेंव्हा नाहीसा होईल तोपर्यंत या धोक्याची टांगती तलवार शिल्लक राहणार आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास या वर्षी आमच्या घराच्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून परत गेलेली नव्हतीच.
आमच्या बिल्डिंगच्या समोरचा रस्ता खणणेही शक्य होत नव्हतेच. त्यानंतर वीजबोर्डाच्या लोकांनी आणखी एक वेगळी युक्ती योजिली. आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला दुसऱ्या एका मोठ्या कॉलनीतल्या बिल्डिंग्ज होत्या. त्यांच्यासाठी वेगळे सबस्टेशन होते. तिथून एक लांबच लांब केबल जमीनीवरूनच आणून ती कुंपणावरून आमच्या बिल्डिंगमध्ये टाकली आणि तिच्यातून वीजपुरवठा करून दिला.
. . . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)
No comments:
Post a Comment