Friday, June 08, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ५, अंतिम)

"हरित अर्थकारण, तुम्ही त्त्यात आहात का ?" (Green Economy: Does it include you?) हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाचा मुख्य विषय आहे. 'हरित आर्थिक व्यवस्था' म्हणजे काय आणि तुम्ही त्यासाठी काय करायचे आहे याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) कार्यक्रमानुसार पर्यावरणाला कमीत कमी हानी व धोका पोचवत समस्त मानवजातीचा उध्दार करणे आणि त्यांच्यामधील सामाजिक सामंजस्य वाढवणे असा काहीसा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा घालायचा, निसर्गातली जैवविविधता राखायची, ऊर्जेची बचत करायची आणि हे सांभाळून अधिकाधिक जनतेसाठी उत्पन्नाची साधने निर्माण करायची. यासाठी अनुकूल अशी सरकारी धोरणे असायला हवीत आणि त्यासाठी सरकारच्या खजिन्यामधून निधी उपलब्ध करायचा हे आहेच, पण पुरेसे नाही. तुम्ही आम्ही सर्वांनी या कार्याला सक्रिय पाठिंबा द्यायला हवा. हे काम निरनिराळ्या आघाड्यांवर करू शकतो आणि करायला पाहिजे. त्यांची वर्गवारी खाली दिल्याप्रमाणे केली आहे.


१. इमारतींचे बांधकाम -

२. मासेमारी

३. वनसंरक्षण

४. वाहतूक

५. जलव्यवस्थापन

६. कृषि

७. ऊर्जा

८. पर्यटन

९. कच-याची विल्हेवाट

१०. कारखानदारीप्रत्येक आघाडीवर काय काय करावे याबद्दल मार्गदर्शन केलेले असले तरी त्यात काही समान सूत्रे आहेत. कोठलेही काम करण्यासाठी संसाधनांची तसेच ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच ती ऊर्जा मिळवण्यासाठी संसाधनांची गरज असते. कमीत कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त लाभ मिळवावा ( कार्यक्षमता वाढवावी), संसाधने आणि ऊर्जा यांच्या वापरात बचत करावी, काहीही वाया जाऊ देऊ नये, कच-याचा शक्यतोवर पुनर्वापर (रिसायकलिंग) करावा. वगैरे वगैरे गोष्टी वरील प्रत्येक क्षेत्रात निरनिराळ्या उदाहरणाने दिल्या आहेत. मी लहान असतांना माझी आई नेमक्या याच गोष्टी आमच्या कानीकपाळी ओरडून सांगत होती. याशिवाय ऊन, पाऊस, वारा वगैरे जी नैसर्गिक संसाधने आपल्याला मिळत राहतात, त्यांच्या उपयोगावर भर द्यावा. भूमीगत खनिज पदार्थांचा साठा संपून जाऊ नये, तसेच आज पृथ्वीवर वावरणारे पशुपक्षी व वनस्पती नामशेष होऊ नयेत यासाठी त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष पुरवायला हवे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास काटकसर करा आणि निसर्गाकडे वळा.. . . . . . . . . . . . (समाप्त)

No comments: