Sunday, June 03, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग १)

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. फक्त वनस्पतींना ते सामर्थ्य मिळाले आहे.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे रोजमर्राचे जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली संस्कृती आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निग्रह, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा संबंध या कथेशी असावा. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

उद्या वटपौर्णिमा आहे. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल. जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार?

शहरांमध्ये वडाच्या फांदीची पूजा करणे असे विकृत रूप या व्रताला मिळाले आहे. त्यासाठी आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी मोडतोड करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

या वर्षी वटपौर्णिमेच्या पाठोपाठ जागतिक पर्यावरण दिवस येतो आहे. तो नक्की कसा साजरा होणार आहे हे मला माहीत नाही. कदाचित त्या दिवशी पोपटपंची करून वृक्षांचे तोंडभर कौतुक केले जाईल. लेख लिहिले आणि वाचले जातील. वनस्पतीविश्वाशी ज्यांची ओळख पुस्तकी ज्ञानामधून झाली आहे असे लोक यात पुढाकात घेतांना दिसले तर मला यात आश्चर्य वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळात अशा व्रतांच्या निमित्याने माणसांच्या मनात वृक्षवल्लींबद्दल आत्मीयता निर्माण केली जात होती तसे काही केले गेले तर ते पर्यावरणासाठी खरोखर उपयुक्त ठरेल.

. . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

No comments: