Tuesday, June 05, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग २)

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे. हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प असते असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास आहे आणि पुढे असे होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंब-या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जात आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे शिल्लक उरते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणा-या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती पतीगृही जाते. त्याच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसास-यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. पहिल्या भागात मी लिहिल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. वटवृक्षाचे वेगळेपण मी मागील भागात दाखवले आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेच कठीण झाले होते. मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेत पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे मी काल पाहिले. घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याचा विरोध राहणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात जागा राखून ठेवल्या असतील किंवा त्यांना मोक्षप्राप्ती झाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. सगळ्या बाजूंनी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना कोंदट माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेत वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच आनंददायी वाटते. या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणातली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.



. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: