
माझ्या उजव्या डोळ्यामधला मोतीबिंदू अत्यंत मंद गतीने वाढत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्यानंतर मनात एक प्रकारची विरक्तीची भावना निर्माण झाली होती. वर्षभरातच एक मोठे आजारपणही येऊन गेले. त्यात ती भावना वाढीला लागली. "जेवढ्या प्रयत्नसाध्य गोष्टी मला मिळवणे शक्य होते, त्यातल्या बहुतेक सगळ्या मिळून गेल्या आहेत, आता जे काही पदरात पडेल ते गोड मानून आलेला दिवस पुढे ढकलावा, कसला हव्यास धरू नये, आकांक्षा, अभिलाषा वगैरेंना मुरड घालावी" अशा प्रकारच्या विचारांचे ढग मनात जमायला लागले. नियमितपणे डोळ्यांची तपासणी होत होतीच. "उजव्या डोळ्यातला मोतीबिंदू पुरेसा वाढला असल्याने पाहिजे तर आता शस्त्रक्रिया करता येईल, पण ती नाही केली तरी त्यापासून धोका नाही" असे एकदा डॉक्टरांनी सांगितले. डाव्या डोळ्यातला मोतीबिंदू या अवस्थेत येण्यापूर्वीच काढून झाला होता, पण थोडी सावधगिरी, थोडी निश्क्रियता आणि थोडे औदासिन्य यांनी मिळून या वेळी दुसरा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातला मोतीबिंदू हळू हळू वाढत होता आणि दृष्टीला अंधुक करत होता, तरीही पुढे दरवर्षी याचीच पुनरावृत्ती होत राहिली आणि मी त्या डोळ्याचे ऑपरेशन पुढे ढकलत राहिलो.
दरम्यानच्या काळात मनात विचांरांचे मंथन चाललेले होते. मूळचा चळवळ्या स्वभाव आणि लहानपणापासून त्यावर झालेले प्रयत्नवादाचे संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते. मोकळ्या वेळात काही नवे अवांतर उपद्व्याप सुरू केले आणि त्यांना थोडे फार यश मिळाल्यामुळे आशावादाला फुलोरा येत गेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुन्हा किंचित बदलला, त्याला सामोरे जाण्यासाठी वेगळा पवित्रा घेतला गेला. हे सगळे माझ्या कळत नकळत होत होते. क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नवे कोरे पिच असते, ताज्या दमाचा फलंदाज त्यावर खेळतांना धावांचा ढीग जमवण्यासाठी मनसोक्त फटकेबाजी करतो. पण शेवटची पारी खेळण्याची वेळ येईपर्यंत पिच ढेपाळलेले असते, त्यावरून चेंडू अनिश्चित उसळ्या मारतात किंवा वेडेवाकडे वळायला लागतात, खेळाडू थकलेले असतात, कधी कधी थोडे जखमी झालेले असतात. त्यांना कदाचित पहिल्या पारीतल्यासारखा खेळ करता येणार नाही याची जाणीवही असते, पण या वेळी सामना जिंकण्याची जिद्द मनात असते. समोरचे आपले साथीदार एकामागोमाग एक तंबूत परतत असतांनासुध्दा एकादा खेळाडू नेटाने खेळत राहतो. "जीवनातल्या दुस-या इनिंगमध्येसुध्दा असेच खेळायचा प्रयत्न केला, फक्त 'शेवटचा दिस'च नव्हे तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस गोड व्हावा यासाठी अट्टाहास धरला तर त्यात काही गैर नाही." असे विचार मनात घर करायला लागले. तसे पूर्वी तिथे जमलेले ढग विरू लागले
या वर्षी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टराने पहिल्यासारखा हो किंवा नाही असा मोघम अभिप्राय दिला तेंव्हा मी विचारले, "एक डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला कोणता सल्ला द्याल?"
तो गृहस्थ सकारात्मक विचार करणारा आहे हे मला माहीत होते. त्याने सांगितले, "आता जेंव्हा तुम्हाला सोयिस्कर असेल त्या वेळी ऑपरेशन करून घ्या."
मी याबद्दल विचार केलेला होताच. रक्तदाब आणि मधुमेह हे विकार सध्या आटोक्यात होते, तांत्रिक सल्लागार म्हणून हातात घेतलेली सारी कामे मी मार्गी लावली होती, घरात कोणता कौटुंबिक कार्यक्रम ठरवलेला नव्हता की परदेशगमनाचा बेत आखला होता. थोडक्यात म्हणजे सध्या मी मोकळा होतो आणि परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे दिवाळीची धूमधाम संपल्यावर लगेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवून टाकले आणि ते काम करवून घेतले.
मुंबईतले प्रख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री केकी मेहता यांच्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले. फॅकोइमल्सिफिकेशन नावाच्या गुंतागुंतीच्या टेक्निकचा वापर यात केला गेला. त्यांनी सर्वात आधी डोळ्यावरील आवरणाला एक लहानसा छेद घेतला. त्यातून आत भिंगापर्यंत सुई घातली आणि तिच्यातून मोतीबिंदूच्या खड्याला अल्ट्रासॉनिक ध्वनीलहरींचे धक्के देऊन त्याचा चुराडा केला. हा 'मोतीचूर' आणि डोळ्याच्या नैसर्गिक भिंगामधला द्रवपदार्थ पोकळ सुईमधून शोषणाने बाहेर काढला. त्यानंतर एका खास प्रकारच्या इंजेक्शनच्या सुईमधून पारदर्शक कृत्रिम भिंगाची सुरळी डोळ्यात सोडली आणि तिला योग्य जागी फैलावून व्यवस्थित बसवले. हे सारे काम फार फार तर पंधरा मिनिटात झाले असेल.
ऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर मला शिरेतून एक इंजेक्शन दिले गेले. त्याने मी बोलता बोलता स्वप्नाच्या जगात गेलो. पंधरा वीस मिनिटांनी कोणी तरी मला नावाने हाक मारताच उठून बसलो. तेंव्हा स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले, पण त्या स्वप्नातला कसलाच तपशील मात्र आठवला नाही. अर्धवट गुंगीच्या अवस्थेत असतांना एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे सांगितलेले ऐकत होतो. टेबलावरून उठून खाली उतरलो आणि व्हीलचेअरवर बसलो. मला ढकलत वॉर्डमध्ये नेले. तिथे गेल्यावर व्हीलचेअरवरून उतरून बेडवर जाऊन पडलो. माझी पत्नी तिथे माझी वाट पहात बसली होती. पाच मिनिटात पूर्णपणे जागा झाल्यानंतर कपडे बदलले आणि पत्नीबरोबर टॅक्सीत बसून घरी गेलो. मी नेहमीच बेशुध्द झाल्यासारखा गाढ झोपतो असे घरातले सांगतात. त्यामुळे यावेळी निद्रावस्थेत गेलो होतो की बेशुध्दावस्थेत ते मलाही नक्की सांगता येणार नाही. पण इतक्या झटपट बेशुध्द होणे आणि पुन्हा शुध्दीवर येणे बहुधा कठीण असावे. तेंव्हा ती झोपच असावी.
माझे पहिले ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गृहस्थांनी मला फोल्डेबल लेन्सबद्दल छेडले होते ते आज कुठे आहेत कोण जाणे. त्यांना शोधून काढून मी आता 'भिंगाचे भेंडोळे (फोल्डेबल लेन्स)' डोळ्यात बसवली असल्याचे सांगावे असे एकदा वाटले. पण आता ती लेन्स 'मल्टीफोकस' आहे का असे ते कदाचित (किंवा नक्कीच) विचारतील.
. . . . . . . . . . (समाप्त)
1 comment:
Post a Comment