Monday, September 27, 2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण
"नेमेचि येतो बघ पावसाळा । हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा ।।" या उक्तीमुळे तो दरवर्षी येतो आणि त्यातच गणेशोत्सवसुध्दा आपली हजेरी लावतो. हे सगळे ठरल्याप्रमाणे घडत असते आणि ते का घडते हे सुध्दा आता बहुतेक लोकांना माहीत झाले असल्यामुळे यात कौतुक करण्यासारखे कोणालाच काहीच दिसत नाही. त्या उत्सवातल्या मूर्ती, सजावट, गर्दी, उत्साह, भक्तीभाव, गजर, गोंगाट, रस्त्यातले अडथळे, वाहतूकीचे नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, स्पर्धा, बक्षिससमारंभ, पुढारी आणि नटनट्यांचे गणपतीसोबत काढलेले फोटो, लोकमान्य टिळक आणि त्यांची उद्दिष्टे, पर्यावरण, त्याचा -हास आणि त्याचे दुष्परिणाम, विसर्जनातली सुसूत्रता तसेच त्यातले अपघात वगैरे वगैरे वगैरे सगळेच विषय आता इतके नेहमीचे झाले आहेत आणि त्यावर इतके चर्वितचर्वण होऊन गेले आहे की त्यासंबंधीच्या बातम्या आणि लेख पाहून त्या न वाचताच वर्तमानपत्राचे पान उलटले जाते. या विषयांवर मीसुध्दा पूर्वी बरेच वेळा लिहिले आहे. त्यात आणखी भर टाकली तर हे पानसुध्दा वाचले न जाण्याची शक्यता वाटते. यामुळे या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या तयारीवरील एक मजेदार अल्पकथा मागच्या भागात दिली होती. या वेळी एक वेगळा विषय हातात घेतला आहे.
आजकाल सगळ्याच क्षेत्रात नेहमी चढाओढ चाललेली असते आणि रोजच कोणी ना कोणी कसला ना कसला विक्रम मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसेच चाकोरीबाहेरचे काहीतरी वेगळे करून दाखवत असतो. गणेशोत्सव वर्षाकाठी एकदा येत असल्यामुळे त्यातसुध्दा दरवर्षी कोणी ना कोणी काही तरी वेगळे करत असतो. यंदाचे नाविन्यवीर कोण आहेत ते थोडक्यात पाहू.
लालबागचा राजा दरवर्षीच अतिशय प्रखर अशा प्रकाशझोकात असतो. तिथल्या उत्सवाच्या पूर्वतयारीपासून त्याच्या खोल सागरात केल्या जाणा-या विसर्जनापर्यंत खडान् खडा बातमी वाचायला आणि ऐकायला मिळत असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांची संख्या आणि त्यांनी उदारपणे केलेले दान याची मोजदाद होत असते आणि तो आकडा वाढत असतो. तरीसुध्दा यंदा त्यात नाविन्याचा भागही दिसला. दर्शनोत्सुक भक्तांचे कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने या वर्षी त्यांच्यासाठी वातानुकूलित मंडप उभारला होता. तसेच त्यांना खाद्यपेयेसुध्दा पुरवली जात होती. देवदर्शनासाठी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात पुण्यप्राप्ती होते असा काही लोकांचा समज आहे. घरात गाडी असतांनासुध्दा अन्नपाणी वर्ज्य करून उपाशीपोटी दहा दहा किलोमीटर पायपीट करून देवदर्शनाला जाणारे महानुभाव मी पाहिले आहेत. त्यांना कदाचित हे आवडले नसेल, तसेच या सगळ्या खर्चातून समाजाचा किंवा देशाचा काय फायदा झाला असा प्रश्न मूलगामी विचारून हा सगळा आटापिटा अनाठायी आहे असा सूर अश्रध्द लोकांनी लावला असेल. तसेच एवढ्या पैशात किती लोकांना पोटभर अन्न, अंगभर कपडे मिळाले असते, किती मुले शाळेला जाऊ शकली असती वगैरेंचे आकडेदेखील देतील.
गौडसारस्वतब्राह्मण म्हणजेच जीएसबी समाजाचा गणपती अत्यंत श्रीमंत समजला जातो. त्याचे सिंहासन, अंगावर चढवलेले दागदागीने आणि मुकुट वगैरे सरळ्याच गोष्टी सोन्याने बनवलेल्या आणि रत्नजडित असतात. हे ऐश्वर्य पहाण्यासाठी भाविक तसेच उत्सुक लोक दूरदूरहून येतात. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या दौलतीचा कायमचाच विमा उतरवलेला असतोच. या वर्षी तिथे येणा-या प्रेक्षकांचासुध्दा विमा उतरवला होता म्हणे. विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करेलच. तरीही जर काही अनुचित घटना घडली तर त्यात हताहत होणा-या प्रेक्षकांना त्याची भरपाई करून मिळणार होती. सुदैवाने तशी वेळ आली नाही.
परंपरेनुसार गणेशाची मूर्ती शाडू मातीची असायची. यांत्रिकीकरण झाल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. पर्यावरणवाद्यांच्या आग्रहाखातच पुन्हा एकदा शाडूमातीकडे ओघ वळू लागला आहे. काही लोक मूर्ती ठेवतच नाहीत, चित्राची पूजा करतात. काही लोक कायम स्वरूपाची मूर्ती ठेवतात, तिचे विसर्जन करत नाहीत. काही कल्पक लोक वेगळ्याच पदार्थांपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. नारळांच्या ढिगातून गजाननाचा आकार तयार केलेला मी पूर्वी पाहिला आहे. यंदा काही निराळे प्रकार केले गेले. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असे लहान मुलांचे स्वप्न असते. ६०० चॉकलेटे आणि २०००० बिस्किटे यांचा वापर करून एक गणपतीची मूर्ती या वर्षी तयार केली गेली होती, तर दुस-या एका जागी गणपतीच्या सर्वांगावर टूटाफ्रूटीचे तुकडे चिकटवले होते. अर्थातच यातला एकादा तुकडा जरी कोणी तोंडात टाकला तो गणपतीभक्षक ठरेल. यामुळे कोणीही असे करणार नाही. या मूर्तींचे विसर्जन कुठे केले आणि त्या जलाशयातील जलचर प्राण्यांना मेजवानी मिळाली की प्रदूषणाने जिवाला मुकावे लागले ते कांही समजले नाही.
ओरिसाच्या समुद्रकिना-यावर वाळूची शिल्पे बांधणा-या कलाकरांना जगभर प्रसिध्दी मिळाली आहे. एका जागी असा वालुकामय गणपती तयार केला गेला. एका कलाकाराने १२ लक्ष साबूदाणे घेतले, त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून त्यांचा उपयोग केला आणि त्यातून अप्रतिम सुंदर रांगोळी सजवली. या प्रत्नाची गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment