आज गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी आहे. कृष्ण हा हिंदू धर्मीयांचा अत्यंत लाडका आणि मनाजोगा देव असल्यामुळे हा सण भक्तीभावाने म्हणण्यापेक्षा उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. काही लोकांच्या घरी हा आनंदोत्सव आठवडाभर साजरा केला जातो. गणेशोत्सव किंवा नवरात्राप्रमाणे या सात आठ दिवसात कृष्णाच्या मूर्तीची सजावट करून तिच्यासमोर संगीत नृत्य आदी सेवा सादर करतात. या सजावटीमध्ये कृष्णाच्या जन्मातल्या अनेक प्रसंगांची चित्रे असलेल्या झांक्या मुख्यतः असतात. या निमित्याने कृष्णाच्या जीवनामधील कांही घटनांवर लिहिलेली गाणी सादर करण्याचा विचार आहे.
यातले पहिले गाणे सत्यभामेच्या तोंडी आहे. सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या प्रमुख राण्या सर्वांना माहीत आहेत. यातली रुक्मिणी ही आदिशक्ती, आदिमायेचा अवतार असल्याने तिच्यात दैवी गुण होते, तर सत्यभामा पूर्णपणे मानवी आहे. मनुष्याच्या मनात उठणारे सारे विकार तिच्या मनात उठत असतात. याचा फायदा घेऊन नारदमुनी कळ लावण्याचे काम करत असतात. ते एकदा सत्यभामेला एक पारिजातकाचे फूल आणून देतात. त्याकाळात हे फूल फक्त स्वर्गलोकात उपलब्ध होते. त्या फुलाचे अनुपम सौंदर्य आणि नारदमुनींनी केलेले त्याचे रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध होते की मला रोज हे फूल हवे असा हट्ट कृष्णाजवळ धरते. कृष्णभगवान तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचे एक रोप स्वर्गामधून मागवतात आणि सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशेजारी ते लावतात. ते झाड वाढतांना पहात असतांना सत्यभामा प्रेमाने आणि अहंकाराने त्याच्याकडे पहात असते. शेजारच्या महालात रहात असलेल्या रुक्मिणीकडे हे झाड नाही, तिला न देता श्रीकृष्णाने ते खास आपल्याला दिले आहे यामुळे आपण वरचढ असल्याचा आभास होऊन ती अतीशय सुखावते. त्याचा उल्लेख करून रुक्मिणीला सारखी डिवचत असते, पण रुक्मिणी तिच्याकडे लक्षच देत नाही.
झाड मोठे झाल्यावर त्याला कळ्यांचा बहर येतो. उद्या त्या उमलतील, आपण त्या फुलांचा गजरा करून तो आपल्या केशसंभारावर माळू आणि द्वारकेतल्या लोकांना दुष्प्राप्य असलेले हे वैभव सगळ्यांना दाखवू, ते पाहून रुक्मिणी चिडली, आपल्यावर जळफळली तर कित्ती मजा येईल अशा प्रकारचे विचार करत ती झोपी जाते. दुस-या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी ती अंगणात जाते आणि पहाते की तिच्या झाडावरली फुले वा-याने उडून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडत आहेत आणि ती बया शांतपणे त्यांचा हार गुंफत बसली आहे. हार गुंफून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार कृष्णालाच समर्पण करते. हे पाहून दिग्मूढ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते,
बहरला पारिजात दारी
फुले का, पडती शेजारी ?
...... हे काय होऊन बसले आहे ? या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्का बसतो.
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणि जन तिजसी म्हणती
दुःख हे, भरल्या संसारी !
..... कृष्णाचे सर्वात जास्त प्रेम तिच्यावर आहे अशी तिची समजूत असते. कृष्णाचे तिच्याबरोबर असलेले लाघवी वागणे तिला सारखे हेच दाखवत असते, पण लोकांच्या नजरेत मात्र ती 'दुसरी' असते. रुक्मिणी हीच मुख्य पत्नी किंवा पट्टराणी, सगळा मान सन्मान नेहमी तिला मिळत असतो हे सत्यभामेला सहन होत नसते. तिला हे दुःख सारखे टोचत असते. आजही पारिजातकाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते.
असेल का हे नाटक यांचे,
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का, करिति चक्रधारी ?
. . . . . . हळूहळू तिच्या डोक्यात वेगळा प्रकाश पडतो. धूर्त कृष्णाने हे मुद्दाम केले असेल का? ते आपल्याशी कपटाने वागले का अशा संशय तिच्या मनात उत्पन्न होऊ लागतो.
वारा काही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो, दौलत तिज सारी !
. . . . . . . . कृष्णावरचा राग हा केवळ संशयावरून आलेला आहे, पण वा-याने केलेली कृती समोर दिसते आहे. तिच्या लहानशा जगातले सगळे प्रजाजन जसे रुक्मिणीलाच अधिक मान देतात त्यांच्याप्रमाणे हा वारा सुध्दा पक्षपाती झाला आहे. आपल्या अंगणातील प्राजक्तपुष्पांची दौलत हा वारा खुषाल तिला बहाल करतो आहे. हा आपल्यावर केवढा अन्याय आहे या विचाराने ती चिडून उठते, पण आपण त्याला काहीही करू शकत नाही ही निराशेची असहाय्यतेची भावना तिच्या मनाला ग्रासून टाकते.
अशा प्रकारे सत्यभामेच्या मनात उठणा-या विविध भावनातरंगांचे सुरेख चित्रण या गीताच्या तीन कडव्यातून कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी केले आहे. स्व.सुधीर फडके यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर स्व. माणिक वर्मा यांनी अशा आर्ततेने हे गाणे गायिलेले आहे की एकदा ऐकले तर ते आतमध्ये कुठेतरी रुतून बसते. आज ही त्रयी आपल्यात नसली तरी अशा अजरामर कृतींमुळे ते अमर झाले आहेत. मधुवंती या मधुर रागावर आधारलेले हे गाणे एका काळी आकाशवाणीवरील संगीतिकेसाठी बसवले होते हे आज ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल.
गीत - ग. दि. माडगूळकर, संगीत - सुधीर फडके, स्वर - माणिक वर्मा, पुणे आकाशवाणी संगितिका ’पारिजातक’
------------------------------------------------------------
बंधुभगिनीभाव
श्रीकृष्णाचे जीवन अद्भुत आणि अगम्य घटनांनी भरलेले आहे. रॅशनल विचार करून त्याची नीट सुसंगती लागत नाही. पौराणिक कालखंडात अगदी अटळ समजली जाणारी आकाशवाणी खोटी ठरवण्यासाठी कंसमामा आयुष्यभर प्रयत्न करत राहिला. त्या प्रयत्नात अनेक दुष्टांचा नाश झाला, तसेच निष्पाप जीवांचाही बळी गेला. देवकीच्या सर्व पुत्रांचा जन्मतःच कपाळमोक्ष करण्याचा चंग कंसाने बांधला होता, तरीही बलराम त्याच्या जन्माच्याही आधी आणि श्रीकृष्ण नवजात बालक असतांना सुखरूपपणे गोकुळाला जाऊन पोचले. त्याच्या पाठीवर जन्माला आलेली सुभद्रा कंसाच्या तावडीतून कशी सुटली, तिचे बालपण कुठे गेले वगैरेबद्दल मला काहीच माहिती नाही. महाभारताची जेवढी गोष्ट मला ठाऊक आहे त्यात सुभद्रेचा प्रवेश ती उपवर झाली असतांना होतो. कृष्णाच्या सहाय्याने अर्जुन तिचे हरण करून (पळवून) नेतो. या कथेवर संगीत सौभद्र हे नाटक रचलेले आहे. त्यानंतर सुभद्रा जी लुप्त होते ती कौरवांचा चक्रव्यूह भेदतांना अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या मातेच्या रूपातच पुन्हा भेटते. कृष्ण आणि बलराम यांचे बालपण गोकुळात जाते आणि कंसाच्या वधानंतर लगेच ते सांदीपनीच्या आश्रमात अध्ययनासाठी जातात आणि चौदा वर्षानंतर माघारी येतात. त्यानंतर सारा काळ धामधुमीचा असतो. त्यामुळे ही बहीण भावंडे कोणत्या काळात आणि कुठे एकत्र राहतात कोण जाणे.
अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ असतो. या नात्याने श्रीकृष्ण आणि द्रौपदी हे दीर भावजय लागतात, पण ते एकमेकांना बहीण भाऊ मानतात. कृष्णाला जशी सुभद्रा ही सख्खी बहीण असते तसाच द्रौपदीला धृष्टद्युम्न हा सख्खा भाऊ असतो, पण श्रीकृष्ण आणि द्रौपदी ही बंधुभगिनीची जोडी अद्वितीय मानली गेली आहे आणि आदर्श नातेसंबंधांचे उदाहरण म्हणून तिचा उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक कवींना स्फूर्ती दिली आहे. सखाराम गटणेचे पात्र रंगवतांना पु.ल.देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे मीसुध्दा एका वयात श्यामची आई हे जगातले सर्वश्रेष्ठ पुस्तक आणि साने गुरुजी हे सर्वश्रेष्ठ लेखक मानत होतो. मी त्या वयात असतांना आचार्य अत्रे यांचा श्यामची आई हा चित्रपट आला. त्यातले त्यांनीच लिहिलेले आणि आशाताईंनी गायिलेले एक गाणे अजरामर झाले. कोकणातल्या येश्वदेच्या तोंडी शोभून दिसतील अशी आचार्यांची साधी पण भावपूर्ण शब्दरचना आणि साधी सोपी, लोकगीताच्या वळणाने जाणारी वसंत देसाई यांनी दिलेली चाल मनात घर करून राहते.
भरजरी ग, पितांबर, दिला फाडुनं । द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।।
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण । विचाराया गेले नारद म्हणून ।
बोट श्रीहरिचे कापले ग बाई । बांधायाला चिंधी लवकर देई ।
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी । फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !
द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ? परी मला त्याने मानिली बहीण ।
काळजाचि चिंधी काढून देईन । एवढे तयाचे माझ्यावरी ऋण ।
वसने देउन प्रभू राखी माझी लाज । चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून । प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण ।
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण ।।
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम । पटली पाहिजे अंतरीची खुण ।
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण । प्रीती ती खरी जी जगी लाभाविणं ।
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न ।।
"वसने देउन प्रभू राखी माझी लाज" या ओळीवरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधण्याचा हा प्रसंग द्रौपदीवस्त्रहरण होऊन गेल्यानंतर घडलेला असावा. कृतज्ञतेच्या भावनेतून द्रौपदीने आपले वस्त्र फाडून त्याची चिंधी काढून दिली असे कदाचित वाटेल. पण खाली दिलेल्या गाण्यावरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला झालेली जखम पाहून द्रौपदीचे हृदय कळवळले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने पांघरलेल्या भरजरी शेल्याची चिरफाड केली. यावर कृष्ण प्रसन्न होऊन द्रौपदीला आश्वासन देतो, "तुला जर कधी गरज पडली तर मी नक्की धावून येईन." त्यावर द्रौपदी म्हणते, "तुझ्यासारखा पाठीराखा असतांना मला कसली काळजी?" या संवादावरून असे वाटते की द्रौपदीच्या चिंधीची परतफेड कृष्णाने द्रौपदीला अगणित वस्त्रे देऊन केली. हे गाणे कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी स्वरबध्द केले आहे. हे गीतदेखील आशाताईंनीच गायिले आहे.
चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला
बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !
प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
कवी योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या खालील गाण्यात द्रौपदीने व्याकुळ होऊन कृष्णाचा धांवा केला आहे. अशा प्रसंगी द्रौपदी स्वतः होऊन चिंधीचा उल्लेख करेल अशी शक्यताच नाही. ती फक्त आपल्या असहाय्य परिस्थितीचे निवेदन करून कृष्णाची आळवणी करते आहे. त्या काळच्या भयाकुल अवस्थेत तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे तिला सावळ्या गोपाळाचे रूप दिसते आणि तिला धीर देते. श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर हे गीत माणिक वर्मा यांनी गायिले आहे.
तव भगिनीचा धावा ऐकुनि, धाव घेइ गोपाळा ।
गोपाळा, लाज राख नंदलाला ।।
द्यूतामध्ये पांडव हरले, उपहासाने कौरव हंसले
लाज सोडुनी सभेत धरिले, माझ्या पदराला ।।
अबलेसम हे पांडव सगळे, खाली माना घालुनि बसले ।
आणि रक्षाया शील सतीचे, कुणी नाही उरला ।।
आंसू माझिया नयनी थिजले, घाबरले मी, डोळे मिटले ।
रूप पाहता तुझे सावळे, प्राण आता उरला ।।

No comments:
Post a Comment