Thursday, September 16, 2010

गणेशोत्सवातली उणीव

संदीप आणि संपदा या दोघांनाही आनंदोत्सवांची खूप हौस होती. दरवर्षी ते मोठ्या हौसेने आणि भक्तीभावाने आपल्या घरातला गणेशोत्सव साजरा करायचे. एकदा ऐन श्रावण महिन्याच्या अखेरीस संपदाला एक अपघात झाला आणि पायाला प्लॅस्टर घालावे लागल्यामुळे झोपून रहाणे भाग पडले. ऑफीसातून महिनाभर सुटी काढून संदीप घरी राहिला. संपदाच्या तबेतीबद्दल काही चिंताजनक नसल्याने आणि मुलांच्या हौसेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले.

संदीपला सगळीच कामे व्यवस्थित नियोजनपूर्वक करायची संवय होती. त्याने गणेशोत्सवासाठी एक वही उघडली आणि वेगवेगळ्या पानांवर पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, खाद्यपेये वगैरे सर्व गोष्टींच्या तपशीलवार याद्या लिहून काढल्या. तसेच गणपती बसवायला रिकामी जागा करण्यासाठी घरात कोणते बदल करायचे, कोणते सामान कोठे हलवायचे, या कालावधीत काय काय करायचे, काय काय करायचे नाही वगैरे सगळ्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या. त्यातले कांही स्वतः लिहिले, काही संपदाने सांगितल्या, काही मुलांनी सुचवल्या. वहीत पाहून त्याने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्याच, शिवाय आयत्या वेळी समोर दिसल्या, आवडल्या, मुलांनी मागितल्या वगैरे कारणांनी चार जास्तच वस्तू आणल्या.

दरवर्षी संदीपला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ऑफिसातून आल्यानंतर रात्री जागून गणपतीची जमेल तेवढी सजावट करावी लागत असे आणि नंतर रोज सकाळी लवकर उठून ऑफीसला जायच्या आधी घाईघाईने पूजा आटपावी लागत असे. त्या वर्षी दिवसभर घरीच असल्यामुळे त्याने दोन तीन दिवस राबून छानशी सजावट केली. त्याला हौसही होती आणि त्याच्या हातात कसबही होते. घरगुती गणेशोत्सवांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवण्याइतका चांगला देखावा त्याने उभा केला. ऑफिसला जायचे नसल्यामुळे तो रोज सकाळी गणपतीची शोडषोपचार पूजा करून अथर्वशीर्षाची आवर्तने करू शकत होता. शेजारच्या स्वीटमार्टमधून रोज नवनवी पक्वान्ने आणून तो त्यांचा नैवेद्य दाखवत होता. त्यामुळे बाप्पांची आणि मुलांची चंगळ झाली. संध्याकाळची आरती वेळेवर होत होती. संदीपने भरपूर मिठाया आणि नमकीन पदार्थ आणि ते वाढून देण्यासाठी पेपर प्लेट्स आणि ग्लासेस आणून ठेवले होते. आल्यागेल्या प्रत्येकाला तो तत्परतेने प्लेटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेल्यामध्ये शीतपेय देत होता. संपदाचा सहभाग नसल्यामुळे कसलेही न्यून राहू नये याची तो प्रयत्नपूर्वक काळजी घेत होता.

गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे त्यावर्षीसुध्दा नेहमीचे परिचित लोक आले. त्यात संपदाच्या खास मैत्रिणीही आल्या. दर्शन आणि तीर्थप्रसाद घेऊन झाल्यावर त्या संपदाला भेटायला आतमध्ये गेल्या. संपदा म्हणाली, "या वर्षी मी अशी नुसती पडून राहिली आहे, मला तर काहीच करता येत नाही आहे." "खरंच गं, यंदा जरासुध्दा मजा नाही आली." एक मैत्रिण उद्गारली. योगायोगाने हे शब्द संदीपच्या कानावर पडले आणि तो थोडा खट्टू झाला. आपल्या प्रयत्नात न्यून राहून गेले याची खंत त्याच्या मनाला बोचत राहिली, तसेच नेमके काय कमी पडले याचे गूढ त्याला पडले.

पुढच्या वर्षातला गणेशोत्सव आला. दुस-या दिवशी रविवार असल्याने सगळ्या आप्तेष्टांना संपदाने घरी बोलावले. त्या दिवशी ती नेमके काय खास करणार आहे हे समजून घेण्यासाठी संदीपने तिच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली होती. दुपारपर्यंत त्याला काहीच वेगळे जाणवले नाही. चहाच्या सुमाराला संपदाची मैत्रिण सुकन्या आली आणि दोघीजणींनी आत जाऊन कपड्यांची कपाटे उघडून साड्यांचे गठ्ठे बाहेर काढले. त्यातल्या एकेक साडीचा प्रकार, पोत, किंमत, ती कोणत्या प्रसंगी आणि कुठल्या शहरातल्या कुठल्या दुकानातून विकत घेतली की भेट मिळाली वगैरेवर चर्चा करता करताच "ही साडी खूप तलम आहे तर ती जास्तच जाड आणि जड आहे, एकीचा रंग फारच फिका आहे तर दुसरीचा जरा भडकच आहे, एक आउट ऑफ फॅशन झाली आहे तर दुसरी एकदम मॉड आहे" वगैरे कारणांनी त्या बाद होत गेल्या. एक साडी चांगली वाटली पण तिचा फॉल एका जागी उसवला होता, तर दुसरीच्या मॅचिंग ब्लाउजचा हूक तुटला होता. असे करून नकारता नकारता अखेर एक छानशी साडी पसंत पडली, त्याला अनुरूप ब्लाउज, पेटीकोट वगैरे सारे काही नीट होते आणि ती साडी नेसून संपदा तयार झाली.

त्या साडीला पिना, टाचण्या टोचून आणि वेगवेगळ्या कोनातून आरशात निरखणे चालले असतांनाच संपदाची दुसरी मैत्रिण समिधा आली. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे आणि त्याची कारणे सांगून झाल्यावर ती उद्गारली, "हे काय? आज ही साडी नेसणार आहेस तू?"
संपदा आणि सुकन्या दोघीही आ वासून पहात राहिल्या. एकदम म्हणाल्या "कां ग?, काय झालं?"
"अगं, असं काय पाहते आहेस?, मागच्या महिन्यात प्रतीक्षाच्या नणंदेच्या मंगळागौरीला तू हीच साडी नेसली नव्हतीस का?" समिधा म्हणाली.
"हो का? त्या दिवशी मी मला माझ्या जावेकडे जावं लागलं होतं त्यामुळे मी आले नव्हते. पण समिधाचं म्हणणं बरोबर आहे, आज प्रतीक्षा इथे आली तर ती काय म्हणेल?" सुकन्याने दुजोरा दिला.
त्यामुळे वेगळ्या साडीसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. आधी पाहिलेल्या बनारसी, कांजीवरम, पटोला, चंदेरी, आसाम सिल्क, इटालियन क्रेप, आणखी कुठली तरी जॉर्जेट वगैरे सगळ्यांची उजळणी झाली. शिवाय साडीच कशाला म्हणून निरनिराळे ड्रेसेसही पाहून झाले, संपदा एकटी असती तर तिने पंधरा मिनिटात निर्णय़ घेतला असता, दोघींना मिळून दुप्पट वेळ लागला होता. आता तीन डोकी जमल्यावर तिप्पट वेळ लागणे साहजीक होते. अखेर कपड्यांचा निर्णय पक्का झाल्यानंतर दागिन्यांचे बॉक्स बाहेर निघाले. त्यातसुध्दा कुठले हलके, कुठले जड, कोणते चीप वाटणारे तर कोणते गॉडी, कोणते चांगले आहेत पण डल् पडले आहेत, कोणते जास्तच ब्राइट वाटतात वगैरे ऊहापोह झाल्यावर निवड झाली. आता निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनांचे डबे काढून त्यावर चर्चा सुरू झाली होती तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली.

ठीकठाक पोशाख करून संदीप केंव्हाच तयार होऊन बसला होता. त्याने पाहुण्यांचे स्वागत केले. "एक मिनिटात मी येतेय् हं." असे आतूनच संपदाने सांगितले. बाहेर आणखी दोन तीन कुटुंबे आली. संदीपने त्यांची आवभगत करून संभाषण चालू ठेवले. महागाई, पर्यावरण, ट्रॅफिक जॅम यासारख्या विषयावर पुरुषमंडळी थोडी टोलवाटोलवी करत होती आणि महिलावर्ग संपदाची वाट पहात होता. दहा बारा मिनिटांनी तीघी मैत्रिणी तयार होऊन बाहेर आल्यावर चर्चेची गाडी सांधे बदलून साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, ज्युवेलरी वगैरे स्टेशनांवरून धावू लागली. आता पुरुषमंडळी प्रसादाच्या प्लेटची वाट पहात आणि त्यातले पदार्थ चवीने खाण्यात गुंगली.

संदीपला वर्षभर सतावणारे कोडे सुटले, त्याच्या मनातली खंत मिटली आणि गणेशोत्सवात भेट देणारी मंडळी देवाच्या दर्शनासाठी किंवा त्याला भेटायला येतात हा त्याचा गोड गैरसमज दूर झाला.

No comments: