Wednesday, August 12, 2009

श्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार

चातुर्मासात केलेल्या धार्मिक कृत्यांचे फळ जास्त मिळते आणि श्रावण महिन्यात तर ते त्याहून जास्त मिळते अशी भाविकांची श्रध्दा असल्यामुळे या काळात जास्त प्रमाणात व्रतवैकल्ये केली जातात. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या बहुतेक प्रौढ बायका दर चातुर्मासाला कसला तरी नेम करायचा असा विचार करून त्याची सुरुवात करीत असत, पण चार महिन्यांचा काळ जरा जास्तच लांब वाटत असल्यामुळे श्रावण महिनाभर तरी तो नेम पाळून मिळेल तेवढे जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेत असत. या महिन्याची सुरुवात जिवतीच्या पटाने आणि कहाण्या वाचण्याने होत असे हे मी मागील लेखात सांगितले आहेच. महिन्यातल्या वेगवेगळ्या वारी आणि तिथींना त-हेत-हेची व्रतवैकल्ये आणि रूढी पाळायच्या असत.

कंटाळा करून घालवलेली सूर्यनमस्काराची संवय श्रावणातल्या रविवारी पुन्हा सुरू केली जाई. त्यासाठी सूर्याची बारा नांवे एका कागदावर लिहून घेतली जात आणि एकेकाच्या नावाने साष्टांग नमस्कार घातले जात. श्रावण सोमवारी मोठ्या लोकांचा उपवास असे. हे शिवव्रत एकदा घेतले की मोडता येत नाही अशी श्रध्दा असल्यामुळे आणि ही पोरे मोठी झाल्यावर त्यांना शिंगे फुटणारच याची खात्री असल्यामुळे मुलांना त्यातून वगळले जात असे. त्यामुळे नेहमीच्या जेवणाबरोबरच साबूदाण्याची खिचडी पण खायला मिळत असे.

आमच्या जमखंडीपासून कोसभर अंतरावर डोंगरावर रामतीर्थावर रामेश्वराचे पुरातन मंदीर आहे, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्याचे दर्शन घ्यायचेच. त्या दिवशी तिथे जत्रा असल्यामुळे त्याचे जास्तीचे आकर्षण असायचे. जत्रेत खर्च करण्यासाठी प्रत्येक मुलाला एक आणा मिळायचा. इतर कुठल्या पॉकेटमनीची पध्दत नसल्यामुळे त्याचे अप्रूप वाटायचे. घरातली, शेजारची आणि शाळेतली मित्रमंडळी मिळून सात आठ जणांचा घोळका करून आम्ही जत्रेत फिरत असू. सगळ्यांचे मिळून झालेल्या सात आठ आण्याचे कुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे वगैरे घेऊन ते खायचे. त्या काळात ते पुरेसे असत. रामतीर्थाच्या परिसरात गुलमोहोराची बरीच झाडे होती. तिथल्या स्थानिक बोलीभाषेत त्याला संकासूर म्हणतात. त्याला उन्हाळ्यात आलेली लालभडक फुले कोमेजून पावसाबरोबर पडून जातात. त्या जागी काळपट लाल रंगाच्या शेंगा येऊन श्रावण महिना येईपर्यंत त्या चांगल्या हातभर लांब झालेल्या असत. त्यातली सर्वात जास्त लांब आणि सरळ शेंग शोधून ती पटकावण्याची चढाओढ लागत असे. त्या शेंगा हातात धरून वाटेवरच्या गवतावर आणि झुडुपांवर त्या सपासपा चालवीत आम्ही घराकडे परतत असू. पण वाटेतच कोणाच्या तरी अंगात मावळा संचारल्यामुळे युध्द सुरू होई आणि त्यात झालेले त्या शेंगांचे तुकडे आसमंतात भिरकावून दिले जात. त्यातून गुलमोहराची किती नवी झाडे उगवली असतील याची गणना करायचा प्रयत्नही कधी केला नाही. पण अभावितपणे कां होईना आम्ही या प्रकारे निसर्गाला साथ दिली होती असे आता सांगता येईल.

मंगळवारी मंगळागौर असायची. गांवात बहुतेक सगळी एकत्र कुटुंबेच होती. त्यातल्या आमच्या घरी, शेजारपाजारी, किंवा गावात राहणा-या काकामामांपैकी कोणा ना कोणाच्या घरी नवीन लग्न झालेल्या लेकी किंवा सुना असायच्या आणि त्यामुळे मंगळागौरीची पूजा व्हायचीच. त्या निमित्याने प्रसाद खायला मिळायचा. स्त्रीवर्गामध्ये खेळ, नाचगाणी, उखाणे वगैरेचा कार्यक्रम रंगायचा, त्यात मुली तर उत्साहाने भाग घेतच, मुलांनाही त्याची झलक तरी पहायला मिळत असे. बुधवार आणि गुरुवारची वैशिष्ट्ये आता मला आठवत नाहीत, पण शुक्रवारचा दिवस खास असायचा. त्या दिवशी पुरणाचे दिवे लावून जिवतीला त्याची आरती केली जात असे आणि त्यानंतर मुलांचे औक्षण केले जाई, तसेच लेकुरवाळ्या सवाष्णींना त्यांच्या लेकरांसह भोजनाला बोलावले जात असे. त्या निमित्य पुरणावरणाचा घाट घातला जाई. शनिवारी ज्वारी किंवा बाजरीच्या कण्या शिजवून त्या ताकाबरोबर खायचा रिवाज होता. कांही जणांना तो पदार्थ आवडत असे, पण बाकीच्यांना त्या दिवशी दोन चार घास तरी खावाच लागत असे. संध्याकाळी मारुतीच्या देवळात नारळ फोडायचा आणि तिथल्या दिव्यात आपले पळीभर तेल घालायचा रिवाज होता. आधीच्या काळात त्यासाठी घरून बुदलीभर तेल न्यावे लागत असे. पुढे त्याचे व्यापारीकरण झाले. देवळाशेजारीच एका तेल्याने दुकान उघडले आणि छोट्या छोट्या अनेक पात्रात तेल भरून ते मारुतीला वाहण्यासाठी तो तयार ठेऊ लागला. शिवाय त्या तेलाची किंमत बाजारभावापेक्षा कमी असे. ते तेल खाण्यासाठी वापरावयाचे नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल विचार करायचे कारण नव्हते. स्वस्त आणि सुटसुटीत असा हा पर्याय लोकांनी लगेच उचलून धरला.

नागपंचमीला वेताच्या गोल डब्यात नागाची वेटोळी ठेऊन ती घेऊन गारुडी लोक घरोघरी जात. इतर वेळी पुढे पुढे करणारी बच्चे कंपनी या वेळी मात्र आईच्या पदराआड दडून विस्फारलेल्या डोळ्यांनी नागाचा उभारलेला फणा पहात असत. आमच्या गावापासून शंभर कोसांच्या अंतरात कोठेही समुद्रकिनारा नव्हता. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा समुद्राशी कांही संबंध नसायचा. त्या दिवशी भरपूर नारळी भात केला जात असे. इतके चविष्ट आणि सर्वांना आवडणारे पक्वान्न एरवी कधीच होत नसे. ते खाण्यासाठी पुढल्या वर्षाच्या नारळी पौर्णिमेची वाट पहावी लागे. नंदा या नटीची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा लोकप्रिय चित्रपट आल्यानंतर घरातल्याच रेशमाच्या धाग्यापासून राखी बनवून बहिणी आपल्या भावांना बांधायला लागल्या होत्या. त्या काळात त्या बाजारात मिळत नसत किंवा पोस्टाने येत नसत. ग्रीटिंग कार्ड हा प्रकारच त्या भागात ऐकूनही ठाऊक नव्हता.

गोकुळाष्टमीला कृष्णजन्म होत असे आणि त्याच्या दुसरे दिवशी गोपाळकाला. आपापल्या घरातून निरनिराळे चविष्ट पदार्थ आणून ते एका मोठ्या परातीत मिसळले जायचे आणि तो काला सगळ्यांच्या हातावर घास घास ठेवला जात असे. ती एक प्रकारची भेळ असली तरी त्यात कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात मिसळायचे हे ठरले नसल्यामुळे गोड, तिखट, आंबट, खारट या सगळ्या चवींनी युक्त अशी दर वेळी एक वेगळीच चंव तयार होत असे. याशिवाय जास्त फळ मिळण्याच्या आशेने सत्यनारायणादि अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात असत. जुन्या काळातल्या पूजा अर्चा, एकादष्ण्या, अभिषेक वगैरे अनेक गोष्टी आता बंद झाल्या आहेत, तर संतोषी माता आणि वैभवलक्ष्मी वगैरे नवी कांही व्रते लोकप्रिय होऊ लागली आहेत असे दिसते. त्या सुध्दा श्रावण महिन्यातच जास्त प्रमाणात होतात.

श्रावण महिन्यात कर्माचे जास्त फळ मिळत असल्याने सगळे लोक देवाच्या नजरेत गुड बॉय किंवा गुड गर्ल बनण्याच्या प्रयत्नात असत. त्या महिनाभर कांही लोक मद्यपान वर्ज्य करत तर कांही लोक शुध्द शाकाहारी बनत. आमच्या घरात मद्य आणि मांस या दोन्ही गोष्टींचा उच्चार सुध्दा करायला मनाई होती. तोंडाला बाटली लावण्याचा किंवा एका हाताने दुस-या हाताच्या पंजावर सुरी चालवण्याचा अभिनय करून त्याचा उल्लेख केला जात असे. त्यामुळे श्रावण महिन्यामुळे त्यात कांही फरक पडत नसे. पण कांदा लसूण वर्ज्य केलेले जाणवत असे. चातुर्मासात जमले नाही तर महिनाभर तरी कांही ना कांही सोडायची फॅशनच असायची. न आवडणा-या गोष्टी आधीच जन्मभरासाठी सोडलेल्या असत आणि उपलब्ध नसलेल्या गोष्टी सो़डल्या म्हणून सांगितले तर हंसे होईल. यामुळे कांही प्रौढ महिला चहा किंवा बटाटा यासारखी रोजच्या उपयोगातली एकादी वस्तू सोडत. यात आपण फार मागे रहायला नको म्हणून पुरुषवर्ग महिनाभरात हजामत करून घेत नसत, कांही लोक दाढीमिशादेखील वाढवत.

अशा त-हेने श्रावण महिना चांगला गाजत असे आणि तो संपण्यापूर्वीच गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असे.

No comments: