Friday, August 07, 2009

श्रावणमासी ........

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

आषाढात सुरू झालेल्या पावसाचा वेळी अवेळी होणारा धिंगाणा आता कमी झालेला असतो. उन्हाबरोबर त्याचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. कधी लख्ख ऊन पडले असतांना मध्येच पावसाची सर येऊन जाते तर पिशवीतली छत्री बाहेर काढून ती उघडेपर्यंत ती ओसरून पुन्हा ढगांमधून उन्हाच्या तिरिपी दिसायला लागतात. ना थंड ना ऊष्म अशा या सौम्य वातावरणात मन प्रसन्न होतेच. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून ते अधिकच उल्हसित होते.
बालकवी ठोंबरे यांच्या या प्रसिध्द कवितेत त्यांनी श्रावणातल्या या निसर्गाच्या विलोभनीय रूपाबद्दल जे लिहिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी दिलेल्या कांही अनुपम उपमा खाली दिलेल्या पंक्तींमध्ये पहायला मिळतात.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

आकाशातल्या हवेत पाण्याचे तुषार असतील तर त्यातला प्रत्येक सूक्ष्म कण स्फटिकाप्रमाणे काम करतो आणि त्यावर पडलेल्या सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यांचे असंख्य रंगांमध्ये परावर्तन करतो. आकाशात सूर्य तळपत असला आणि समोरच्या बाजूला दमट हवा असेल तर आपल्याला त्यातून सप्तरंगी सूर्यधनुष्य दिसते. हे त्याच्या मागे असलेले सायन्स झाले. एकमेकात बेमालूमपणे गुंतलेल्या सात रंगांचा ङा गोफ विणला आहे असे बालकवींच्या कवीमनाला वाटते आणि श्रावणराजाच्या आगमनाने आनंदून जाऊन सृष्टीदेवीने आभाळाच्या मांडवावर हे मंगल तोरण बांधले आहे असा भास त्यांच्या संवेदनशील मनाला होतो.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

बगळ्यांची माळ अंबरात उडत असतांना ती म्हणजे स्वर्गातल्या तल्पवृक्षाच्या फुलांची माळ आहे किंवा आकाशातल्या चांदण्या, ग्रह, तारे वगैरे रांगेने जमीनीवर उतरत आहेत असे बालकवींना वाटते.
पुराणातल्या एका आख्यानाचा दाखला देऊन ते म्हणतात,
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सोनचाफा फुलला, केवडा दरवळला आणि त्यांच्या सोबतीने पारिजातकांनेसुध्दा बहरून फुलांचा सडा पाडला, पण बालकवींची सत्यभामा "फुले कां पडती शेजारी" असे म्हणत रुष्ट किंवा खिन्न होत नाही. उलट त्या नाजुक फुलांच्या मंद सुगंधाने तिच्या मनात असलेली अढी मावळते.
असे हे श्रावणाचे रूप कोणाकोणाला मोहवत असेल?
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात, 
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत
हिरव्या गार कुरणातून मनसोक्त चरत फिरतांना गायी आणि त्यांची खिल्लारे मौजमस्ती करतातच. त्यांना सांभाळणारे गुराखी आनंदाने गाणी गातात आणि आपल्या अलगुजाच्या मधुर आवाजातून श्रावणराजाच्या महात्म्याचे गुणगान करतात. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या निमित्याने देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहे-यावरच क्षावण महिन्याचे गीत स्पष्ट दिसते.
या ब्लॉगचा मागोवा घेणारे श्री.सुजीत बालवडकर यांच्या स्थळावर मला ही बालपणीची अत्यंत आवडती कविता वाचायला मिळाली. त्यांचा मी आभारी आहे. ही संपूर्ण कविता या दुव्यावर वाचता येईल.
http://kavyanjali.info/?p=237
इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांना बालकवी हे नांव कदाचित खास परिचयाचे नसेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिले आहेत. त्यांचे पूर्ण नाव श्र्यंबक बापूजी ठोंबरे. मुख्यतः निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यांमध्ये केले होते.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती ।।
या गाण्याचा समावेश ती फुलराणी या नाटकात अतिशय सुंदर रीतीने केला आहे. तर
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी । काय हरवले सांग साजणी या यमुनेच्या जळी ।।
हे गाणे मत्स्यगंधा या नाटकात चपखलपणे बसवले आहे.
बालकवींच्या कवितांमध्ये नेहमी एक सकारात्मक विचार असतो.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे ।
आणि
माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे । 
या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका अतीशय लोकप्रिय आहेत.
------------------------------------------------------

श्रावणमासी ..... संपूर्ण कविता
ज्या कवितेशिवाय कदाचीत मराठी काव्य सृष्टीला पूर्णत्व येणार नाही,जी कविता भर वैशाखात जरी म्हटली तरी श्रवणाचा अनुभव देते,ती म्हणजे कवी कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता,अर्थातच
*श्रावण मासी*
हि संपूर्ण कविताच स्वभावोक्ती अलंकाराच उदाहरण आहे अस मला वाटते.श्रावण महिन्यात सर्व चराचर सृष्टी कवितेत वर्णन केल्याप्रमाणेच वागत असते.किंबहुना सृष्टीचा स्वभावच त्या काळात तसा असतो
श्रावण मासी हर्ष मानसी,  हिरवळ दाटे चोहीकडे   । 
क्षणात येते सरसर शिरवे,  क्षणात फिरुनी ऊन पडे  ।।धृ।।
वरती बघता इंद्रधनुचा,  गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले,  नभोमंडपी कुणी भासे ।।१।।
झालासा सूर्यास्त वाटतो,  सांज अहाहा तो उघडे ।
तरु शिखरावर उंच घरांवर,  पिवळे पिवळे ऊन पडे ।।२।।
बलाकमाला उडता भासे,   कल्पसुमांची माळच ते ।
उतरून येती अवनीवरती,    ग्राहगोलची कि एक मते ।।३।।
फडफड करुनी भिजले अपुले,  पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी,  निज बालांसह बागडती ।।४।।
खिल्लारेही चरती रानी,  गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गात तयाचा,  श्रावण महिमा एक सुरे ।।५।।
सुवर्ण चंपक फुलला विपिनि,   रम्य केवडा दरवळला ।
पारिजात हि बघता भामा,   रोष मनीचा मावळला ।।६।।
सुंदर परडी घेऊन हाती,   पुरोपकंठी शुद्ध मती ।
सुंदर बाला त्या फुलमाला,   रम्य फुले पत्री खुडती ।।७।।
देव दर्शना निघती ललना,   हर्ष माईंना हृदयात ।
वदनी त्यांच्या ऐकून घ्यावे,   श्रावण महिन्याचे गीत ।।८।।


1 comment:

Asha Joglekar said...

Balkawinchya kawita karach chirantan aahet kenva hee wacha man prasann hot.