Wednesday, August 12, 2009

जिवतीचा पट आणि कहाण्या


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत श्रावण महिन्याला एक खास स्थान आहे. जिवतीचा पट आणि कहाण्या या दोन गोष्टींना हा महिनाभर विशेष महत्व प्राप्त होते. शहरातल्या वातावरणात आता पंचांगातल्या महिन्यांना महत्व राहिले नाही आणि जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असल्यामुळे ते महिनेच बाजूला पडले आहेत असे चित्र दिसत असले तरी निदान ग्रामीण भागात आणि शहरातल्या कांही घरात अजून श्रावण महिना पाळला जातो. पूर्वी तो सरसकट सगळ्यांच्या घरी पाळला जात असे, आता एका बाजूने त्याचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असले तरी परदेशात गेलेले मराठी लोकसुध्दा त्यातला कांही भाग पाळतात असेही मी पाहिले आहे.

श्रावण महिना लागताच देव्हा-याच्या बाजूला जिवतीच्या पटाची स्थापना होते. पूर्वी तो साध्या कागदावर काळ्या शाईने छापला जात असे. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे गुळगुळीत कागदावर सुबक आणि रंगीत चित्रे असलेले पट मिळतात. हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेले श्रीनरसिंह, त्यांच्या समोर हात जोडून उभा असलेला बालक प्रह्लाद, कालियामर्दनाचा प्रसंग, अनेक बालगोपालांसह दोन जिवत्या, हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती यांची चित्रे या पटावर काढलेली असतात. त्यासाठी याच देवतांची निवड कोणी आणि कां केली वगैरे प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत. परंपरांच्या मुळाशी जाऊन पोचणे कठीण असते. तिथी आणि वार पाहून यातल्या एकेका देवतेची पूजा करावी असा विचार कदाचित असेल, पण बहुतेक सगळे लोक रोजच या सर्व चित्रांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहतात. पूर्वीच्या काळी वापरलेल्या साध्या कागदावरचे चित्र महिनाभरानंतर ओळखू येत नसे आणि त्याचे विसर्जन केले जात असे. आजकाल कांही लोक हा पट लॅमिनेट करून घेतात आणि श्रावण महिना संपल्यानंतर स्वच्छ पुसून तो उचलून ठेवतात. पुढच्या वर्षी श्रावण आल्यानंतर (त्या वेळी तो सापडला तर) पुन्हा त्याची पूजा करावी अशी योजना असते, ती किती यशस्वी होते ते माहीत नाही.

श्रावण महिन्यात संध्याकाळी कहाण्या वाचण्याचा प्रघात मात्र आता मागे पडत चालला आहे. माझ्या लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाल्यानंतर घरातली सगळी मुले एकत्र बसून शुभंकरोती आणि परवचा म्हणत असत. श्रावण महिन्यात त्यानंतर कहाणीवाचनाचा कार्यक्रम ठरलेला असे. त्या वेळी घरातली कांही मोठी माणसे सुध्दा येऊन बसत आणि श्रवण करत असत. पहिली कहाणी नेहमी गणेशाची असे. "निर्मळ मळं, उदकाचं तळं, तेथे गणेशाची देवळंरावळं" अशी त्याची सुरुवात केल्यानंतर "संपूर्णाला काय करावे, पसापायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत, सहाचे सहकुटुंब भोजन करावे." वगैरे सूचना असत. पण रोज वाचूनसुध्दा त्यावर कोणी अंमलबजावणी केलेली मात्र कधी माझ्या पाहण्यात आली नाही.

त्यानंकर रोज त्या दिवसानुसार वेगळी कहाणी वाचायची. रविवारी आदित्यराणूबाईची, सोमवारी शंकराची, मंगळवारी मंगळागौरीची, नागपंचमीला नागोबाची वगैरे. या सर्व कहाण्या "आटपाट नगर होते." पासून सुरू होत आणि "ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण " या वाक्याने संपत. त्यात बहुतेक करून तीन चार शब्दांची लहान लहान वाक्ये असत. आटपाट नगर होते झाल्यानंतर "तिथे एक राजा होता. तो खूप शूर होता. त्याला दोन राण्या होत्या." किंवा "तिथे एक ब्राम्हण रहायचा, तो खूप गरीब होता." वगैरे सोप्या वाक्यांमधून ती गोष्ट पुढे सरकत असे. त्याचे वाचन करतांना सुध्दा ते एका विशिष्ट लयीत केले जात असे.

कांही कहाण्यांमधून खूप चांगला आशय मनावर बिंबवला जात असे. उदाहरणार्थ शुक्रवारची कहाणी घेता येईल. एका श्रीमंत भावाची दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती. एकदा त्या भावाने रोज सहस्रभोजन घालायला सुरुवात केली, पण आपल्या बहिणीला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तिची दैन्यावस्था पाहून लोक आपल्याला नांवे ठेवतील याची भीती त्याला वाटली. आपल्या मुलांच्या पोटात चार चांगले घास जावेत या उद्देशाने अन्नाला मोताद झालेल्या बहिणीने तिथे जायचे ठरवले. पण निमुटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या अंगावरले कपडे पाहून त्या निष्ठुर भावाला लाज वाटली आणि तिचा राग आला. तिने तिला पुन्हा न यायला सांगितले, पण मुलांनी मामाकडे जायचा हट्ट धरल्यामुळे झालेला अपमान विसरून ती बहीण दुसरे दिवशी पुन्हा सहस्रभोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली. भाऊ या वेळी जास्तच डाफरला. तिसरे दिवशी तर त्याने तिला हाताला धरून बाहेर काढले.

पुढे तिच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. आता मात्र भावाने तिला आग्रहाने आपल्याकडे जेवायला बोलावले. तिच्यासाठी पंचपक्वांनांचा बेत केला. ती जेवायला आल्यावर तिला सन्मानाने पाटावर बसवले. त्या बहिणीने आपला भरजरी शेला, गळ्यातला चंद्रहार, हातातल्या गोठ पाटल्या वगैरे एकेक अलंकार काढून त्या पाटावर ठेवले. मग त्यातल्या एकाला जिलबीचा घास दिला, दुस-याला पुरणाच्या पोळीचा, तिस-याला लाडूचा वगैरे. ती हे काय करते आहे असे भावाने विचारताच त्या मानिनीने उत्तर दिले, "आज तू ज्यांना जेवायला बोलावले आहेस त्यांनाच मी हे जेवण भरवते आहे. माझे जेवण मला सहस्रभोजनाच्या दिवशी मिळाले आहे." त्या बोलण्याने भावाचे डोळे खाडकन उघडले, त्याने बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली.

अशा अनेक बोधप्रद गोष्टी या कहाण्यांमध्ये आहेत. पण आजच्या जीवनात घरातली सारी मंडळी तीन्हीसांजेला घरी परतच नाहीत आणि आल्यानंतर टीव्हीसमोर बसलेली असतात. ते मनोरंजन सोडून त्यांनी जुन्या पुराण्या कहाण्या ऐकाव्यात अशी अपेक्षा धरता येणार नाही.

No comments: