Sunday, August 02, 2009

वो जब याद आये ....... भाग १

या ठिकाणी लिहितांना मी नेहमी माझ्या लहानपणच्या आठवणी सांगत असतो असे कोणाला वाटेल। उतारवय आल्यावर बहुतेक लोकांना ती खोड लागत असावी. त्यात आणखी एक गंमत अशी आहे की त्या गोष्टी ऐकणे लोकांना आवडते अशी त्यांची आपली (कदाचित गैर)समजूत असते. तर मी एकदा बाहेरगांवाहून येणार असलेल्या कोणाला तरी बसमधून उतरवून घेण्यासाठी एस्टीस्टँडवर जाऊन मोटारीची वाट पहात बसलो होतो. तेंव्हा तशी पध्दतच होती. आपल्या इवल्याशा जगाच्या बाहेर काय चालले आहे ते पहाण्याची तीही एक खिडकी असल्यामुळे आम्हालाही ते काम हवेच असायचे. गृहपाठाचा बोजा नसल्यामुळे स्टँडवर जाऊन थोडा वेळ बसून रहायला फावला वेळ असायचा. खांद्यावर गांठोडे घेऊन चिल्ल्यापिल्ल्यांचे लटांबर सांभाळत दूरवरच्या खेड्यातून पायपीट करत दमून भागून येणा-या खेडुतांपासून ते प्रवासात घामाघूम झाल्यामुळे खिशातून रुमाल काढून त्याने घाम पुसत आपला चुरगळलेला मुळातला झकपक पोशाख ठीकठाक करण्याचा प्रयत्न करणा-या मोठ्या शहरातल्या पांढरपेशा पाहुण्यापर्यंत वेगवेगळे नमूने, त्यांचे कपडे, त्यांचे हांवभाव वगैरे पाहण्यात आणि त्यांच्या निरनिराळ्या बोलीतले आगळे वेगळे हेलकावे ऐकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. तर एकदा असाच बसच्या येण्याची प्रतीक्षा करत बसलो होतो. त्या दिवशी बुधवार होता आणि रात्रीची वेळ होती. स्टँडवरल्या कँटीनमधल्या रेडिओतून बिनाका गीतमालेचे सूर ऐकू येत होते. अमीन सायानींनी त्यांच्या विशिष्ट लकबीत घोषणा केली, "अब अगली पादानपर आप सुनेंगे मोहम्मद रफीकी आवाजमें एक फडकता हुवा गीत ..." आणि लगेच एक अद्भुत आवाजातली लकेर आली, "ओ हो हो..., ओ हो ... हो, खोया खोया चाँद, खुला आसमान, ऐसेमें कैसे नींद आयेगी ..... " त्यातला झोप न येणे वगैरेचा अनुभव नसल्यामुळे तो भाग कळण्यासारखा नसला तरी ते ओहोहो तेवढे थेट काळजापर्यंत जाऊन भिडले आणि तिथेच कायमचा मुक्काम ठोकून राहिले.

पुढे तो दिव्य आवाज नेहमी कानावर पडत आणि मनाचा ठाव घेत राहिला. रफीसाहेबांनी हजारो गाणी गायिली आणि त्यातली निदान शेकडो अजरामर झाली. आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले. भूतकाळातल्या आठवणींना सतत उराशी बाळगून वर्तमानकाळ हातातून घालवायचा नसतो हे खरे असले तरी त्यांनीच गायिलेल्या 'वो जब याद आये, बहुत याद आये' या गाण्यानुसार जेंव्हा कांही लोकांची आठवण येते तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ती उत्कटपणे येते हेसुध्दा तितकेच खरे आहे. रफीसाहेबांच्या निधनाला एकोणतीस वर्षे एवढा काळ लोटून गेला असला तरी अजून त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम होतात आणि त्यांच्या मागून आलेल्या पिढीतले लोकसुध्दा तो पहायला व ऐकायला गर्दी करतात.
काल असाच एक कार्यक्रम पहायचा योग आला. मोहम्मद रफींच्या आवाजातली खूपशी उत्तमोत्तम सुरेल गाणी श्री. प्रभंजन मराठे यांनी त्या कार्यक्रमात गायिली. 'मेंदीच्या पानावर' या अत्यंत लोकप्रिय झालेल्या वाद्यवृंदातून ते मराठी माणसांना परिचित झालेले होतेच. सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातल्या प्रौढांच्या पर्वात त्यांनी भाग घेतल्यामुळे ती ओळख दृढ झाली होती. दोन कीबोर्ड आणि एक सेक्साफोन एवढीच सुरांची संगत देणारी वाद्ये साथीला होती आणि तबला, ढोलक, खुळखुळे व ऑक्टोपॅड ही तालवाद्ये गरजेनुसार वाजवणारे तीन वादक होते. पण या सर्वांच्या अप्रतिम कौशल्याची दाद द्यायलाच हवी. त्यांनी सतार, व्हायलिन किंवा फ्ल्यूटवर वाजवलेल्या खास जागासुध्दा घेऊन आणि कोंगोबोंगो किंवा ड्रम्सवरील नाद आपापल्या वाद्यांमधून काढून त्यांची उणीव भासू दिली नाही. ड्यूएट्स गाण्यासाठी विद्या आणि आसावरी या दोन नवोदित गायिका होत्या. रफींनी गायिलेली आणि त्याच चालीवर एकाद्या गायिकेने गायिलेली अशी कांही गाणी त्यांनी स्वतंत्रपणे गायिली. वेगवेगळ्या गीतकारांनी रचलेली, निरनिराळ्या संगीतकारांनी, त्यात पुन्हा अनेक प्रकारच्या संगीताच्या आधाराने स्वरबध्द केलेली, विविध भाव व्यक्त करणारी अशी गाणी निवडून त्यात शक्य तेवढी विविधता आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न स्तुत्य होता. मोहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची रेंज दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. पण त्यातले वैविध्य थोडे कमी करून माझ्या आवडीची आणखी कांही गाणी घेतली असती तर मला ते अधिक आवडले असते. तरीसुध्दा जी घेतली होती ती सगळीच गाणी त्या त्या काळी लोकप्रिय झाली होती आणि माझ्या ओळखीचीच होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन दोन शब्द लिहिण्याचा मोह होतो. कुठल्या तरी एका प्रकारच्या वर्गवारीनुसार क्रम घेतला तर तो दुस-या प्रकारात बसणार नाही. यामुळे ज्या क्रमाने ती सादर केली गेली त्याच क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलेले बरे. हा क्रम ठेवण्यामागे आयोजकांचासुध्दा कांही उद्देश असणारच ना !

कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेली आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबध्द केलेली मोजकीच गाणी गाऊन मोहम्मद रफी यांनी मराठी सुगमसंगीताच्या विश्वात त्यांचा खास ठसा उमटवला आहे. बहुतेक मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात त्यातले एकादे गाणे असतेच. या कार्यक्रमाची सुरुवात 'शोधिसी मानवा राउळी मंदिरी । नांदतो देव हा आपुल्या अंतरी ।।' या गाण्याने झाली. 'काया ही पंढरीस आत्मा हा विठ्ठल ।' या शब्दांत संत नामदेवांनी सांगितलेले मानवतेचे तत्वज्ञान शिकवून अंतर्मुख करणारे हे गंभीर स्वरूपाचे मराठी गीत एका परभाषिक आणि परधर्मीय गायकाने गायले असेल असे वाटतच नाही.
त्यानंतर रफींच्या खास अंदाजातले नायकाच्या प्रेमिकेच्या रूपाचे कौतुक करणारे गाणे सादर झाले आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या सिनेमात असणारी रोमँटिक दृष्ये नजरेसमोर आली. नायकाने किंचित झुकून तिची वाहवा करायची आणि तिने लाजत मुरडत त्याला साद द्यायची वगैरे त्यात आले.
ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका । तेरा मुस्कुराना गजब हो गया ।।न होशमें तुम न होशमें हम । नजरका मिलाना गजब हो गया ।।
ऊँचे लोग या त्या काळातल्या ऑफबीट सिनेमातले चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेले एक वेगळ्या प्रकारचे गाणे त्यानंतर आले. त्यातले उच्च प्रकारचे उर्दू शब्दप्रयोग ओळखीचे नसल्यामुळे त्यातला भाव बहुतेक लोकांपर्यंत पोचत नव्हता. फक्त सुरावलीतली मजा तेवढीच समजत होती.
जाग दिल ए दीवाना रुत आयी रसिल ए यार की ।
प्रेमगीतांच्या या मालिकेतले पुढचे गाणे जरतर करणारे पण त्याबरोबरच आशावाद दर्शवणारे होते,
गर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होंगे । हम तुम जुदा न होंगे ।।
त्यानंतरच्या गाण्यात एक खोटी खोटी प्रेमळ तक्रार करून एक लटका सल्ला (न मानण्यासाठी) दिला होता.
आवाज देके हमें तुम बुलाओ । मोहब्बतमें इतना न हमको सताओ ।।
यापुढच्या द्वंद्वगीतात एकरूप होऊन साथसाथ राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं । ले जहाँ भी ये राहे, हम संग हैं ।।
'त्यां'च्या जवळ येण्यामुळे आपण सगळ्या जगापासून दूर गेल्याची भावना पुढच्या गाण्यात होती.
दो घडी वो जो पास आ बैठे । हम जमानेसे दूर जा बैठे ।।
तर प्रेमाच्या धुंदीत धुंद झालेला प्रेमिक सगळे जगच आपल्या मालकीचे करत असल्याचा दावा त्यापुढील गाण्यात केला होता. है दुनिया उसीकी जमाना उसीका । मोहब्बतमें जो भी हुवा है किसीका ।।
. . .. .. . . . .. . ..(क्रमशः)----

10 comments:

Anonymous said...

प्रीतम मेघानी आणि डोम्बिवलीचे अजित प्रधान यांनी ८-१० वर्षांपूर्वी मोहम्मद रफ़ी यांच्या गाण्यांची सूची पुस्तकरुपाने प्रसिद्‌ध केली. पुस्तकाचे नाव मला स्मरत नाही, पण या रफ़ी-गीतकोशात गायकाने गायलेल्या ४,५००-४,६०० गाण्यांपैकी प्रत्येकाची वर्षवार माहिती आहे. (गेल्या काही वर्षांत पुस्तकात समावेश न झालेली ५-६ गाणी उजेडात आली आहेत.) संख्येचा विचार करता या पुस्तकातून दाखवता येईल की १९८० साली मृत्युसमयी रफ़ीची कारकीर्द बहरात नव्हती. १९७५ च्या सुमारास तर शिरीष कणेकरांच्या एका लेखानुसार 'किशोरच्या लोकप्रियतेमुळे रफ़ी अडगळीत पडल्यासारखा होता'. गुणवत्ता तर सिनेसंगीतातून त्याआधीच नाहीशी झाली होती. कणेकरांच्याच सज्जादवरील लेखात उल्लेख आहे की लेखकाने 'आज़चा आघाडीचा संगीतकार आर डी बर्मन याच्याविषयी काय मत आहे' विचारताच 'सज्जाद शहारतो आणि कपाळावर हात मारून घेतो'. गंगाधर गाडगीळांनी लताची १९६७ च्या सुमारास मुलाखत घेतली होती. तेव्हा सुद्धा सिनेसंगीताच्या घसरत्या दर्ज्यावर दोघांनी चिंता आणि चर्चा केली होती.

'आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले' या आपल्या विधानातला फक्त 'अचानकपणे' एवढाच भाग काय तो खरा आहे.

Anand Ghare said...

आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. १९८० च्या सुमारास सिनेसंगीतच पूर्वीसारखे राहिले नव्हते. किशोरदांच्याबद्दल मला रफी इतकाच आदर वाटतो. ते निश्चितपणे पहिल्या क्रमांकावर गेले होते, पण रफीसाहेब अडगळीत पडले होते असे मात्र मला कधीही वाटले नाही. तलत नेहमूद या गुणी गायकाबद्दल कदाचित तसे म्हणता येईल.
माझे मत पुस्तकांच्या अभ्यासावरून किंवा गाण्यांच्या संख्यांवरून बनलेले नाही. रोजच्या जीवनात सहजपणे जो अनुभव येत असतो, त्यावरून परिस्थितीचा एक अंदाज येत असतो त्या आठवणींच्या आधारावर ते बनलेले आहे. माझे एक्स्पोजर कमी असण्याची शक्यता आहे.

Anonymous said...

In my last comment, I had alluded to Lata's talk with Gangadhar Gadgil, circa 1967.

This is what Lata said in April 1967: 'There has been a considerable change in musical taste and it has not all been for the better. I would not really blame the people for the
vulgarisation of taste. It is the music directors who are responsible
for it. They are the makers of popular taste.' Gadgil adds: 'She wanted to say more but didn't, obviously not wanting to hurt
anybody.'

Check: http://thaxi.usc.edu/rmim/sami/R-lataInterview.txt


Frankly, you may try to hide behind some weak excuse like 'this is a casually written document of times long past' but you compromise your credibility as a serious commentator worth reading of an overall well-intentioned and reasonably well-written blog if you carelessly toss around comments defending (or at least condoning) undesirable trends in society. Putting a gloss over the quality of Rafi's output in 1980 as 'कारकीर्दीचा ऐन बहर' just because he happened to die that time makes me wonder: which world was the writer living in in 1980? If anything, the public taste which Lata deemed 'vulgar' in 1967 had become much more vulgar by the time Rafi died in 1980 and the situation has been getting increasingly worse since. But let's forget what Lata or Gadgil thought about the quality. You are entitled to disagree with them. Here is a blunt question to you: can you honestly say that you liked what you were hearing about the musical releases in late 1970s in Hindi Films? Even when classicalists like Hariprasad Chaurasia tried their hand (Silsila) in film music's behti Ganga, we did not hear anything which can be compared with the quality associated with film music before its vulgarisation. Gangadhar Gadgil should be thanked for placing on record just how lamentable the state of affairs was in film music as early as 1967.

Anonymous said...

मोहम्मद रफ़ी काय, किशोर काय, किंवा लता-आशा काय, यांनी संगीताच्या गुणवत्तेची फारशी चिंता कधीच केली नाही. मुलाखतीत टीका करणं वेगळं आणि स्वमताशी सुसंगत वर्तन वेगळं. लताला पैशाची काळजी होती असाही भाग नाही.

तलत महमूदची गोष्ट वेगळी आहे. शिरीष कणेकरांच्या 'गाये चला जा' पुस्तकात माहिती आहे की कारकीर्द बहरात असतानाही तलत गुणवत्तेविषयी आग्रही होता. गाणं स्वीकारण्यासाठी संगीतकारांना तलतपाशी सहाव्या दशकातल्या (१९५१-१९६०) त्याच्या उत्कर्षकाळातही आग्रह धरावा लागे. १९७० नंतर तलतनीच गाणी स्वीकारली नसती. हे संगीतकारांना माहिती होतंच, आणि ती गाणीही तलतच्या मुलायम आवाजाला लागू पडली नसती. तेव्हा 'तलत अडगळीत पडल्यासारखा होता' हे मान्य आहे. पण ती तलतसाठी मानाची आणि सिनेमाजगतासाठी शरमेची बाब आहे.

Anand Ghare said...

श्री.अनामिक यांच्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यातल्या कांही मुद्द्यांशी मी सहमत आहे. सिनेसंगीताचा दर्जा हा या लेखाचा विषय नाही. स्व.मोहम्मद रफी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झालेल्या एका कार्यक्रमाचा तो त्रोटक वृत्तांत आहे. अशा प्रकारच्या लेखनात मृतात्म्याबद्दल आदर व्यक्त करणे एवढेच महत्वाचे असते असे मला वाटते.

Anonymous said...

मुख्य लेखाचे लेखक श्री आनंद घारे म्हणतात: 'अशा प्रकारच्या लेखनात मृतात्म्याबद्दल आदर व्यक्त करणे एवढेच महत्वाचे असते असे मला वाटते.'

या मताबद्दल मी आक्षेप घेण्याचे कारण मला दिसत नाही. पण मृत कलाकाराविषयी अवास्तव दावे, त्याला नसलेले गुण चिकटवण्याचा प्रयत्न हे प्रकार टाळल्यास ती आदरांजली यथायोग्य ठरते. आता 'अवास्तव दावा' शब्दामागे भाटगिरीची छटा असते. तो माझा आरोप नाही. पण कला उतरणीला लागलेल्या काळाचा 'ऐन बहरातली' असा उल्लेख करणे हा शिथिलपणा किंवा गलथानपणा आहे, आणि तो दोष लेख अतिचिकित्सक दृष्टीनी वाचत नसतानाही लगेच लक्षात येतो. आणि मुळात लेखकाची संगीताची रुची अशी असेल (उदा. सध्या सिनेमासिकांतून बॉलीवूडयुगाबद्दल भरभरून लिहिणारी मंडळी) तर त्या लेखाचं मूल्य कमी होतं. तुमच्याकडून त्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत.

'१९८० च्या सुमारास सिनेसंगीतच पूर्वीसारखे राहिले नव्हते' हे तुमचे मत मला अर्थातच मान्य आहे. हा असा 'सहजपणाने येणारा परिस्थितीचा अंदाज़' मूळ लेखात व्यक्त झाला नाही, म्हणून मी टीका केली. पुण्यतिथीला वाहिलेली त्रोटक श्रद्‌धांजली सहसा कारकीर्दीचा आढावा घेण्याच्या भानगडीत न पडता आदर व्यक्त करायला वापरली जाते या तुमच्या विधानाशी मी सहमत आहे.

Anonymous said...

I have a suggestion. Several people have written, and many more will write hence, about famous names like Gangubai Hangal, Bhimsen Joshi, Talat Mahmood and Rafi. It is fine if you want to pay your own respects to them. But a huge number of very sincere, and often quite talented, artists contributed to the aggregate achievement whose finest fruit is represented by the famous names. Do you have memories of less famous artists? It could be someone like Gajanan Watwe or Malati Pande, or a person totally unknown outside Jamkhindi who performed only locally but was not untouched by genius. If you run such a series, whether it covers only one artist or half a dozen of them, I for one would be interested in reading it.

Anand Ghare said...

धन्यवाद. आपण माझ्या ब्लॉगची जुनी पाने चाळली असतील तर दोन गोष्टी कदाचित जाणवतील.
१. मला सर्वसामान्य माणसांचे आलेले अनुभव मी कांही वेळा लिहिले आहेत.
२. मी चुकूनसुध्दा संगीतातील बारकाव्यांबद्दल माझे मत व्यक्त केलेले नाही, कारण मला तो अधिकारच नाही.

माझ्या सध्याच्या रोजच्या जीवनात मी जे अनुभवले आहे, त्यावरून मला जे आठवले त्याबद्दल मी या जागी लिहितो. माझ्या व्यावसायिक जीवनात मी तांत्रिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत, पण ते वेगळ्या ठिकाणी.

मनात येईल तसे लिहितांना संदर्भ शोधायला वेळ नसतो, तपशीलात थोड्या चुका होतात, त्या कृपया कोणीही मनावर घेऊ नयेत अशी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे.

Anand Ghare said...

तपशीलात थोड्या चुका होतात, त्या कृपया कोणीही मनावर घेऊ नयेत
असे मी मागील प्रतिसादात लिहिले होते. त्यात कृपया थोडी सुधारणा करावी.
माझ्या लिखाणात आढळलेल्या चुका मला जरूर जरूर कळवाव्यात. या स्थळाचा दर्जा सुधारावा याची आणि विश्वासार्हता वाढावी अशीच माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मला प्रयत्न करायलाच हवेत.

Anonymous said...

अप्रसिद्‌ध कलाकारांच्या आठवणी असतील तर त्या तुम्ही सांगा. तांत्रिक विश्लेषण तुम्ही मोठ्या कलाकारांचंही टाळता, कारण काहीही असो. तोच नियम सुरू ठेवावा. स्थानिक कलाकार बोलताना कधीकधी असे अनुभव सांगतात की आपल्याला कलाकारांविषयी आणि कलेविषयीही त्याद्‌वारे जाण वाढते. दोन दमडीचे कलाकार आपण भीमसेनजींचे अवतार असल्यासारखे वागतात. तोही एक अनुभव असतो. पण मला अभिप्रेत आहेत ते लहान स्तरावरचे पण चांगले अनुभव. इतर व्याप सांभाळूनही आपल्या परीनी लोक कसे कलेची मनःपूर्वक आराधना करतात, या धर्तीची चर्चा. तसे अनुभव फारसे नसल्यास हा विषय तुमचा नसेलही. पण ज़र काही आठवणी असतील तर मात्र ज़रूर लिहा.