Monday, June 29, 2009

सांचीचे स्तूप - भाग २


बौध्द धर्माच्या पुरातनकालीन परंपरेत स्तूप म्हणजे एक समाधी किंवा स्मारक असते. महात्मा गौतम बुध्दाचे महानिर्वाण ख्रिस्तजन्माच्या पाचशे वर्षे आधी होऊन गेले. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार त्यांचेवर दाहसंस्कार करून त्यावर एक समाधी बांधली गेली. ती कदाचित स्तूपाच्या आकाराची असावी. त्यानंतर सुमारे तीन शतकांनी सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्या प्रसाराचे काम हिरीरीने पुढे नेले. त्याने त्यापूर्वी केलेल्या निरनिराळ्या लढायांत प्रचंड मानवसंहार झाला होता. त्या पापातून मुक्त होऊन चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बोधिसत्वाचे चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधले होते अशी आख्यायिका आमच्या मार्गदर्शकाने सांगितली. एकाच पुण्यात्म्याच्या अनेक जागी समाध्या असणे मी तर कधी ऐकले नाही. त्यात तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मानवाच्या पार्थिवाचे चौर्‍याऐंशी हजार भागात विभाजन करणे शक्यतेच्या कोटीतले वाटत नाही. त्यामुळे यात अतीशयोक्ती वाटली. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे सत्ता आणि समृध्दी या दोन्ही गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याने गांवोगांवी भिक्खूंसाठी मठ बांधून दिले असतील आणि ते दुरूनही चटकन ओळखू यावेत यासाठी टेकड्या टेकड्यांवर स्मारकाच्या रूपात स्तूप उभे केले असण्याचीही शक्यता आहे. त्या कालातले सारेच बांधकाम दगड, माती, विटा वगैरेंपासून केलेले असल्यामुळे ते दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालौघात वाहून गेले असणार. त्यातल्या त्यात सांची येथील काम आज जास्तीत जास्त सुस्थितीत दिसते, पण त्यामागे वेगळीच कारणे आहेत.

महात्मा गौतम बुध्दाचा जन्म आजच्या नेपाळमधील लुंबिनी या जागी झाला. राजकुमार सिध्दार्थ या नांवाने तो कपिलवस्तू या नगरात वाढला. राजवाड्यातील सुखी जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला आणि बिहारमधल्या गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करतांना त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी तो आजचा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ या भागात पुढे आयुष्यभर भ्रमण करत राहिला. आजच्या मध्यप्रदेशातील सांची या गांवाला गौतमबुध्दाने कधीच भेट दिली नव्हती. मग त्याची समाधी किंवा एवढे मोठे स्मारक इथे कां बांधले गेले? या प्रश्नाचे एक कारण असे दिले जाते की सम्राट अशोकाच्या एका राणीचे माहेर नजीकच असलेल्या विदिशानगरीत होते. त्यामुळे त्याचा थोडा ओढा या बाजूला होता. हा भाग आर्थिक दृष्टीने समृध्द होता आणि विदिशा हे एक महत्वाचे शहर होते. मोठ्या शहराच्या जवळ पण उंच टेकडीवर असल्यामुळे त्यापासून थोडे अलिप्त अशी ही निसर्गरम्य जागा भिख्खूंना राहण्यासाठी आकर्षक होती. असा सर्व बाजूंनी विचार दूरदृष्टीने करून सम्राट अशोकांने या जागी फक्त एक स्तूपच बांधला नाही, तर बौध्द धर्माच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे एक प्रमुख केंद्र या जागी उभे केले.

देशभरातील शिकाऊ तसेच अनुभवी भिख्खू इथे येऊन रहात असत आणि प्रशिक्षण घेऊन तयारीनिशी धम्मप्रसारासाठी बाहेर पडत असत. यात हे केंद्र चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आणि पुढील तेरा शतके त्याचा विकास अधून मधून होत राहिला. वेगवेगळ्या काळातल्या तत्कालिन राजांनी त्याच्या सौंदर्यात आणि समृध्दीत वेळोवेळी भर घातली. सम्राट अशोकाने बांधलेला मुख्य स्तूप फक्त विटांनी बांधलेला होता. कांही काळाने तो मोडकळीला आला. तेंव्हा त्याची डागडुजी करून त्याच्या सर्व बाजूंनी दगडी बांधकाम केले गेले. नंतर कोणी त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरुषभर उंच असा चौथरा सर्व बाजूंनी बांधून त्यावर चढण्याउतरण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या. भारताचे सुवर्णयुग मानले जाणार्‍या गुप्तवंशाच्या राजवटीत अनेक सुंदर मूर्ती या परिसरात बसवल्या गेल्या. बौध्द धर्म परमेश्वराची मूर्तीपूजा मानत नाही. त्यांच्या मताप्रमाणे तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमेश्वराची कोणत्याही सगुण रूपातली प्रतिमा इथे दिसत नाही किंवा तिची पूजाअर्चा होत नाही, पण बुध्दाच्या मात्र अगणित रूपामधील प्रतिमा पहायला मिळतात. मुख्य स्तूप बांधून कांही शतके लोटल्यानंतर इतर स्तूप त्या जागी बांधले गेले, तसेच त्यांना आकर्षक अशी प्रवेशद्वारे बांधली गेली. सांचीच्या स्तूपामधील सर्वात सुंदर, अगदी अप्रतिम म्हणता येईल असा भाग म्हणजे स्तूपांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उभ्या केलेल्या कमानी किंवा तोरणे आहेत. इतके सुंदर प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे विशेष असे कांहीच नाही असा अनुभव आपल्याला फार क्वचित येतो. या कमानींबद्दल सांगण्यासारखे खूप असल्यामुळे ते पुढील भागात देईन.

सम्राट अशोकाचे एकछत्र साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा भाग कधी एकाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली यायचा तर कधी स्थानिक राजेरजवाडे शिरजोर होत असत. त्यांच्या मर्जीनुसार कधी बौध्द धर्माला महत्व प्राप्त होत असे, तर कधी त्याचा राजाश्रय काढून घेतला जात असे. हा उतार चढाव तेरा शतके इतका प्रदीर्घ काळ चालल्यानंतर बहुधा बौध्द धर्मीयांनी या जागेला कायमचा रामराम ठोकला असावा. कारण अकराव्या शतकानंतरच्या काळातला एकही बौध्द धर्माशी संबंधित अवशेष येथील उत्खननात सापडला नाही. त्यानंतर इतर कोणीही या जागेचा सदुपयोग न केल्यामुळे ती पुढील सातआठ शतके पडून राहिली होती. मोठ्या स्तूपांची पडझड झाली होती, लहान लहान स्तूप दगडामातीच्या ढिगा-यांखाली गाडले गेले होते आणि सगळीकडे दाट झाडाझुडुपांची गर्दी झाली होती. भारतातील इतर कांही सौंदर्यस्थळांप्रमाणेच सांचीच्या प्राचीन स्तूपांचा नव्याने शोध एका इंग्रज अधिका-याने लावला.
..... . . . . . . (क्रमशः)

No comments: