Friday, June 12, 2009

अडला हरी

'अडला नारायण' किंवा 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. अत्यंत बिकट अवस्था आली तर मानापमान किंवा सदसद्विचार थोडा बाजूला ठेऊन कोणाचेही पाय धरायची वेळ येते असा या म्हणीचा अर्थ आहे असे मी आतापर्यंत समजत आलो आहे. या म्हणीचा एक वेगळाच अर्थ लावून त्यावरून एक अजब तर्कट काढल्याचे एका लेखात वाचले, त्यामुळे या म्हणीची थोडी चिरफाड या लेखात करावी असे वाटले.

हरी आणि गाढव या दोन व्यक्ती आणि अडणे व पाय धरणे या क्रिया धरल्या तर त्यापासून अनेक शक्यता संभवतात.
१. हा हरी नेहमीच अडलेला असतो आणि गाढवाचे पाय धरून बसलेला असतो.
२. जेंव्हा जेंव्हा हरी अडतो तेंव्हा थेट गाढवाकडे जाऊन त्याचे पाय धरतो.
३. ज्या कोणाचे पाय हरी धरेल तो गाढवच असतो.
४. अडल्यानंतर हरी कोणाचेही पाय धरतो, कधी कधी ते पाय गाढवाचे असतात.
५. तातडीच्या मदतीची गरज असते आणि त्या वेळी इतर कोणाचीही मदत मिळत नाही, तेंव्हाच हरी ख-या अर्थाने 'अडतो' आणि निरुपाय झाल्यामुळे गाढवाचे पाय धरायला तयार होतो किंवा ते धरतो.
अशा प्रकारच्या अधिक शक्यता सांगता येतील. पण माझ्या मते यातली फक्त ५ क्रमांकाची शक्यता या म्हणीशी सुसंगत आहे. इतर सर्व शक्यतांचा या म्हणीच्या संबंधात विचार करण्याचे कारण नाही.

प्रामुख्याने माणसांच्या जगात हरीच्या सोबतीला नारायणही असेल तसेच अनेक गाढवेही असतील हे लक्षात घेतले तर इतर असंख्य शक्यता निर्माण होतात. उदाहरणार्थ:
१. हरी नारायणाचे पाय धरेल.
२. एक गाढव दुस-या गाढवाचे किंवा माणसाचे किंवा हरीचे पाय धरेल.
३. भाविक माणूस अडलेला नसतांनासुध्दा नेहमीच हरी- नारायण यांचे पाय धरेल आणि "सुखमे सुमिरन ज्यों करे तो दुख काहे होय?" या कबीराच्या वाणीनुसार दुःखमुक्त होईल.
४. "मी एक वेळ गाढवाचे पाय धरेन, पण नारायणाचे नांवसुध्दा घेणार नाही." असे पक्का नास्तिक म्हणेल.
५. कोणीच कोणाचेच पाय धरणार नाही.
अशा प्रकारच्या शक्यता अपरंपार आहेत, पण त्यासुध्दा या म्हणीच्या कक्षेच्या बाहेर आहेत. कुंपणावर बसलेली माणसे अडचणीचा काळ आल्यावर देवाचे स्मरण करून त्याचा धांवा करतात, पण त्यांना देवावर भरोसा नसतो. त्यामुळे ते एकादा तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिशी, बुवा, बाबा, फकीर, हस्तसामुद्रिक, न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरॉटरीडर, क्रिस्टलगेझर, नाडीवाला, पोपटवाला अशा 'सिध्दीप्राप्त' किंवा 'चमत्कारी' माणसाकडे धांव घेतात. त्यांच्या बाबतीत "अडला माणूस लबाड कोल्ह्याचे पाय धरी" अशी नवी म्हण काढायला हरकत नाही!
"अडला हरी गाढवाचे पाय धरी... पण याचा अर्थ असा नाही ही, शंभर टक्के प्रसंगांत अडलेला, अडचणीतला माणूस फक्त मुर्ख व्यक्तीचेच पाय फक्त धरेल? खरोखर चांगला माणुससुद्धा त्याला मदत करू शकतोच की!" असे एक अफलातून विधान या लेखात केले आहे. कठीण प्रसंगी सज्जन माणसे नेहमीच मदतीला येतात, हा त्यांचा धर्मच आहे, त्यासाठी त्यांचे पाय धरावे लागत नाहीत. ऐनवेळी एकादा माणूस न बोलावतासुध्दा देवासारखा धांवत येऊन मदत करतो असे दिसते. हे चांगले लोक वरील म्हणीला अपवाद आहेत असे म्हणता येणार नाही. 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' याचा अर्थ तो नेहमी गाढवाचे आणि फक्त गाढवाचेच पाय धरतो असा मुळीच होत नाही. गाढवाचे पाय धरल्यामुळे त्याच्या मार्गातला अडसर दूर होतो असे आश्वासनसुध्दा या म्हणीत नाही. उलट गाढवाकडून लत्ताप्रहार होण्याची शक्यताच दांडगी असते. त्यामुळे गाढवाचे पाय धरणे ही नित्याच्या जीवनातली बाब नाही.
एकाद्या बिकट प्रसंगी इतर सर्व उपाय संपलेले असतात, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, अशा वेळी अपाय होण्याचा धोका पत्करूनसुध्दा मदतीची किंचित आशा बाळगून एकादा माणूस अपात्र माणसाला शरण जातो अशा अपवादास्पद प्रसंगाचे उदाहरण या म्हणीद्वारे दिले आहे. हरी किंवा नारायण हे देव आहेत, त्यामुळे ते माणसापेक्षा श्रेष्ठ समजले जातात, तर गाढव हे एक निर्बुध्द, निष्क्रिय आणि निकृष्ट जनावर गणले जाते. त्यामुळे सर्वात उच्च पातळीवरील हरी सर्वात खालच्या पातळीवरील गाढवाच्या पायाशी लोळण घेतो ही त्याच्या अगतिकतेची परमावधी असते. अशा प्रकारच्या टोकाच्या अगतिकतेचे उदाहरण या म्हणीद्वारे दिलेले आहे. त्याचा उपयोग बारीक सारीक अडचणींसाठी सर्रास केला जात असल्यामुळे त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रहसनांमध्ये ज्याला गाढव म्हणायचे असेल त्याचे पाय धरले जातात. या म्हणीच्या अशा वापरामुळे ती थोडी गुळगुळीत झाली आहे एवढेच.
भगवान हरीने अडल्याप्रसंगी कोणा गाढवाचे पाय धरल्याचे सुरस आख्यान एकाद्या गर्दभपुराणात किंवा खरोपनिषदात कदाचित असलेच तरी ते कधी माझ्या ऐकण्यात आलेले नाही. त्यामुळे या म्हणीचा उद्भव कसा झाला हे मला माहीत नाही. आपल्या भाषातज्ज्ञ मित्रांनी यावर प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.

No comments: