Saturday, October 11, 2008

विजयादशमी


आमच्या लहानपणी दसऱ्यावर एक कविता होती. तिची सुरुवात "सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनि आला" अशी होती. त्यानंतर बहीण काशीने त्याचे ओवाळून स्वागत केले वगैरे वर्णन होते. ते वाचून दसरा हा केवळ लुटारू लोकांचा सण आहे की काय अशी शंका कुणाला येईल. मराठी भाषेत 'लुटणे' म्हणजे 'लुबाडणे' असा गैरसमज होऊ शकतो. पण 'लुटणे' याचा 'मनमुरादपणे घेणे' असाही अर्थ आहे. एखाद्या पदार्थाची लयलूट झाली असे आपण म्हणतो तेंव्हा तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असा अर्थ होतो. दसऱ्याच्या सुमारास खरीप हंगामातील पिके बहराला आलेली असतात. वर्षा ऋतूच्या कृपेने भरपूर पाणी मिळाल्याने सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने पाने, फुले, फळे देत असतो. त्या सगळ्यांची लयलूट झालेली असते. ज्यांना हे प्राप्त होते त्यांची  मनस्थिती ते दुसऱ्या लोकांना वाटण्याची असते. आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा फक्त स्वतः उपभोग करून न घेता तो इतरांना वाटण्यामध्ये मजा असते याची जाणीव करून घेण्याचा व या सगळ्यांचा प्रियजनासमवेत मनसोक्त उपभोग घेण्याचा हा उत्सव आहे. म्हणूनच प्रतीकात्मक सोने देऊन "सोन्यासारखे रहा" म्हणण्याची पद्धत आहे.

दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट शक्तींचा विजय हे दसऱ्याच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. रामाद्वारे रावणाचा वध आणि दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचे केलेले निर्दाळन या दिवशी साजरे केले जाते. दुर्जनांच्या अत्याचारापुढे हतबल होत असलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यातून एक दिलासा मिळतो. या सगळ्या वाईटाचा घडा भरून शेवटी त्याचा निश्चितपणे अंत होणार आहे असा विश्वास निर्माण होतो आणि त्यासाठी लढण्याची उमेद मिळते. अशा प्रयत्नाने मिळालेला आनंदाचा क्षण स्मरणात रहावा यासाठी जल्लोषात घालवला जातो. आयुधपूजा व सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या सणाचे अविभाज्य भाग आहेत.

पूर्वीच्या काळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आजच्या प्रमाणे राज्यांच्या सीमारेखा निश्चित नव्हत्या. "कालौ निरर्वधि विपुलाच पृथ्वी" अशी परिस्थिती आणि समजूत होती. त्यामुळे आपापल्या राज्यांचा विस्तार करणे नैसर्गिक मानले जायचे. त्यात निसर्गावर मात करून नवीन भूमी लागवडीसाठी आपल्या अंमलाखाली आणणे आणि शत्रुराष्ट्राचा युध्दात पराभव करून त्याचेकडून भूभाग हिसकावून घेणे हे दोन्ही आले. पावसाळ्याच्या दिवसांत नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे सैन्याने कूच करणे शक्य असायचे नाही. भूसंपादनासाठीही विशेष कांही करता येण्यासारखे नसायचे. पावसाच्या धारांमुळे सुतार, लोहार, गवंडी वगैरेंच्या कामात मंदी असायची. घरी बसून राहिल्याने किंवा शेतात काम करत राहिल्याने शस्त्रास्त्रांकडे आणि कामाच्या औजारांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता असते. ती बाहेर काढून, साफसूफ करून, धार वगैरे लावून आता जोमाने काम सुरू करायची वेळ आल्यावर आपल्या संस्कृतीनुसार आधी त्यांचे पूजन करायची प्रथा सुरू झाली.

अज्ञातवासात असलेल्या अर्जुनाने याच दिवशी आपले बृहन्नडेचे स्त्रीरूप टाकून देऊन वीर योध्याचे मूळ रूप धारण केले, शमीच्या झाडवर झाकून ठेवलेली आपली आयुधे काढली आणि लढाई करून लुटारू कौरवांना पिटाळून लावले अशी पौराणिक कथा आहे. त्यात बरेच कांही शिकण्सासारखे आहे. आजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे हातघाईचे युध्द कालबाह्य झाले आहे. पण प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रांत कांहीतरी वेगळे किंवा जास्तीचे करून दाखवण्यासाठी धडपडत असतोच. त्यातील अडचणीवर मात करून पुढे पाऊल टाकणे, नवीन कांही तरी करणे, यशाचे उच्च शिखर गाठणे हे सुध्दा सीमोल्लंघनच आहे. यासाठी दसऱ्यासारख्या मुहूर्ताची वाट पहात बसण्याची गरज नसते. पण असे दिवस या ध्येयाची आठवण करून देतात व एक स्फूर्ती देतात. त्या दिशेने मार्गक्रमण करावे असा संदेश देतात.

No comments: