Friday, May 02, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३)

ज्या दहा प्राचीन शास्त्रज्ञांचा समावेश या यादीत केलेला होता, त्यापैकी महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची नांवे वैद्यक क्षेत्रात सर्वश्रुत आहेत. चरकसंहितेवर आधारलेल्या आयुर्वेदातील नियमानुसार चालणारी चिकित्सापध्दती गुणकारी आहे आणि त्यामुळे लोकप्रियही आहे. सुश्रुताची शल्यचिकित्सा पध्दत अनुसरून आज तितक्याशा शस्त्रक्रिया केल्या जात नसतील, पण पंचकर्म आदि क्रिया करणारे वैद्य आहेत आणि ब-याच रुग्णांना त्यामुळे गुण येत आहे. पतंजलीने सांगितलेला योगाभ्यास तर फारच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. आधुनिक काळातील ताण तणावाच्या जीवनात तो खूपच उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या तीन महान शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाबद्दल आदर आणि अभिमान वाटतोच वाटतो. ते तीघेही त्यांच्या स्वतःच्या कार्यानेच प्रख्यात आहेत. त्यांची तुलना कोठल्या पाश्चात्य शास्त्रज्ञाबरोबर करून त्यांचे कार्य मोठे आहे असे सांगण्याचा प्रश्नच उठत नाही.
इतर सात शास्त्रज्ञांची नांवे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबद्दल घेतली जातात. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आपल्या ग्रंथात मांडलेले विचार थक्क करायला लावणारे आहेत. त्यांनी प्रतिपादन केलेले सिध्दांत त्या काळातील सर्वमान्य समजुतींना धक्का देणारे आहेत. पण ज्या प्रकाराने चरक, सुश्रुत आणि पतंजली यांचे सांगणे परंपरागत पध्दतीने
आपल्या पिढीपर्यंत पोचले आहे तसे या इतर शास्त्रज्ञांचे कथन आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. मलासुध्दा या थोर शास्त्रज्ञांविषयी आदरभावना आहे, पण न्यूटन, कोपर्निकस, डाल्टन इत्यादी गेल्या कांही शतकातल्या शास्त्रज्ञांबरोबर त्यांची तुलना करून त्यांना मोठेपण देण्याचा प्रयत्न करणे मला प्रशस्त वाटत नाही.
आता मला मिळालेल्या पत्रातील मुद्याकडे वळू.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
. . . . . होता ना! युध्दात विजयी झालेल्या आक्रमक सैनिकांची मनस्थिती विचारात घेतली तर त्यातला विजयाचा उन्माद, शत्रूबद्दल द्वेष व सूडभावना, निःशस्त्र नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी दहशत बसवणे वगैरे कारणांमुळे ते विध्वंसक वृत्तीचे बनतात असे जगभर घडलेले आहे. फक्त मुसलमान आणि इंग्रजांनी फक्त हिंदू समाजावर अत्याचार केले होते अशातला भाग नाही. जर्मन, रशियन, जपानी आणि चिनी लोकांनी असेच वर्तन केल्याचे आपण गेल्या शतकात पाहिले आहे. परकीय आक्रमकांखेरीज स्थानिक असंतुष्ट लोकांनी रागापोटी केलेली जाळपोळ आणि कांही लोकांच्या स्वार्थापोटी घडत असलेला हिंसाचार याच्या बातम्या रोजच कुठून ना कुठून ऐकू येत असतात. त्याशिवाय नैसर्गिक कारणाने लागलेल्या आगी, पाऊस, महापूर, वाळवी, उंदीर वगैरे अनेक कारणांनी जुने ग्रंथ नष्ट होत असतात. गौतमबुध्द, महावीर किंवा पायथॅगोरस, प्लूटो आधी लोकांच्या काळातली हस्तलिखिते आता क्वचितच सापडतील, पण त्यांचे विचार इतर अनेक मार्गाने पसरले आहेत. महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची उदाहरणे आहेतच. तेंव्हा जे ज्ञान लोकांना पचते, रुचते, त्यांच्या मनाचा ठाव घेते ते त्याची पुस्तके जाळण्याने नाहीसे होत नाही असेच दिसते. शास्त्रीय संशोधनाविषयी जी माहिती आज आपणास मिळत नाही, जिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे, ती सगळी क्रूरकर्म्या आक्रमकांनी मुद्दाम नष्ट केली असे ठामपणे म्हणणे बरोबर नाही. जे संशोधन हजार पाचशे वर्षांनंतर पाश्चात्य शास्त्रज्ञ करून जगापुढे मांडणार होते नेमके त्यांच विषयांचे कागद निवडून पूर्वीच्या काळातल्या दुष्टांनी नाहीसे केले असे सांगणे कितपत तर्काला धरून आहे यावर विचार व्हायला हवा.

२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
. . . . हे शक्य नसेल त्यावर अवास्तव बोलण्याची काय गरज आहे?

३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील गोष्टींचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. (म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
. . . .. . ललित वाङ्मय मुख्यतः कल्पनाविलासावरच आधारलेले असते. त्यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यकथाच असली पाहिजे असा आग्रह धरून चालणार नाही. तसे असते तर शेक्सपीअरपासून आजपर्यंतच्या एकूण एक कथाकादंबरीकारांना आपण "खोटारडे" म्हणायला हवे.त्याचप्रमाणे वाङ्मयात उल्लेख आलेल्या गोष्टी सत्यात उतरलेल्या असतातच असे नाही. अरेबियन नाइट्समधले उडते गालिचे, लिलिपुटांचा देश किंवा इसापनीतीमधली बोलणारी जनावरे प्रत्यक्षात होती काय? आपण यांच्या गोष्टी किंवा परीकथा लहान मुलांना सांगतो तेंव्हा खोटे बोलणे हा आपला उद्देश असतो का? अशा प्रकारचे भारतीय संदर्भ मी मुद्दाम दिले नाहीत कारण कांही लोक त्यातले अक्षर न अक्षर काळ्या दगडावरली रेघ आहे असे मानतात.

४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे कांही सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
. . . .. . . हे वाक्य सरळ सरळ वर्णभेदाचे समर्थन करणारे आहे. आज आपण दाखवत असलेल्या कौशल्याचा संबंध आपल्या पूर्वजांच्या रक्ताशी जोडण्याचा हा प्रयत्न मला मान्य नाही.

५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि अचाट प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि
संपन्न स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वजही तसे असतीलच!
अ) एकाद्या भुसभुशीत वाळू असलेल्या जमीनीकडे बोट दाखवून इथे "आमच्या पूर्वजांची टोलेजंग इमारत होती ती भूकंपात नष्ट झाली" असे कोणी म्हणत असेल तर त्याला मी बहुधा "थापाड्या" म्हणेन कारण अशा प्रकारच्या जमीनीवर मोठी इमारत बांधता येईल याची मला खात्री वाटत नाही. तसेच कुठलीही इमारत भूकंपात एकदम अदृष्य होत नाही, तिचे भग्नावशेष, निदान पाया तरी शिल्लक राहतो
एवढे मला माहीत आहे.
आ) पण तो माणूस एवढ्यावर थांबत नाही. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध असलेले साहित्य वापरून इतर लोकांनी बांधलेल्या आणि सर्व लोकांना ज्याची चांगली माहिती आहे अशा आधुनिक पध्दतीच्या इमारतींकडे बोट दाखवून "त्यातले खांब, कमानी, दरवाजे वगैरे सगळे कांही माझ्या पूर्वजांनी बनवले होते. ते आपण तयार केले असल्याचे हे लोक खोटेच सांगत आहेत. या जुन्या काळातल्या कागदावर हे सगळे लिहिलेले आहे. तेंव्हा ते खरे असणारच." असे सांगू लागला तर मी त्याला कोण म्हणायचे? त्याच्या आजकालच्या कर्तृत्वाचे कौतुक करून त्याच्या दुराग्रहाचे समर्थन करायचे कां?

६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.
.. . . .. . कुठलीही गोष्ट 'आहे' किंवा 'होती' हे कांही पुराव्यावरून सिध्द करता येते. ती 'नाही' किंवा ' नव्हती' असे सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. पण पुरेसा आधार नसतांनासुध्दा 'ती होती' असे म्हणणे मला मान्य नाही.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: