Thursday, May 01, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग १)

परवा मला एका मित्राच्या ईमेलबरोबर एक देखणा लेख आला. त्यात दहा थोर भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची कार्यक्षेत्रे यांचे दर्शन घडवणारी सुरेख चित्रे देऊन त्याखाली थोडक्यात त्यांचा परिचय खालील क्रमाने दिला होता. या इंग्रजीतील लेखात दिलेल्या मथळ्यांचा मी जमेल तसा अनुवाद केला आहे. ज्या शब्दांना योग्य प्रतिशब्द आठवले नाहीत ते इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत.
१. आर्यभट (इ.स. ४७६) महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
२. भास्कराचार्य द्वितीय (इ.स. १११४-११८३) बीजगणितातले ' जीनियस'
३. आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते
४. नागार्जुन (इ.स. १००) रसायनशास्त्रातले जादूगार
५. आचार्य चरक (इ.स.पूर्व ६००) वैद्यकीय शास्त्राचे जनक
६. आचार्य शुश्रुत (इ.स.पूर्व ६००) शल्यचिकित्सेचे जनक
७.वराहमिहिर (इ.स.४९९-५८७) खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी
८. आचार्य पतंजली (इ.स.पूर्व २००) योगशास्त्राचे जनक
९. आचार्य भारद्वाज (इ.स.पूर्व ८००) उड्डयनशास्त्राचे ' पायोनियर'
१०. आचार्य कपिल (इ.स.पूर्व ३०००) ' कॉस्मॉलॉजी' चे जनक
हा परिचय अगदी त्रोटक होता. यातील प्रत्येक शास्त्रज्ञाने अमूक तमूक कार्य केले आणि अमके अमके शोध लावले असे सांगून हे काम त्यांनी कोपर्निकस, न्यूटन, डाल्टन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या हजार(रो) वर्षे आधीच केले होते असे लिहिले होते. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून
दाखवले यात शंका नाही. हा परिचय वाचल्यानंतर कोणाही सर्वसामान्य भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे वर्णन यात दिले होते.

पण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयुष्य घालवले असल्यामुळे हल्लीच्या युगात संशोधन कार्य कशा प्रकारे चालते ते मला थोडेसे जवळून पहायला मिळाले आहे. आभाळात विजा चमकाव्यात तशा कांही कल्पना मेंदूला सुचत असतात. त्यांवर सारासार विचार, सखोल अभ्यास, विचार विनिमय, प्रयोग, परीक्षण, निरीक्षण, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण, त्यातून निघणारी तात्पर्ये, त्यांचा इतर माहितीशी जुळत असलेला संदर्भ किंवा त्यांमधील विसंगती आणि त्यांचे स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टींचे सादरीकरण, त्यावर साधक बाधक चर्चा, तज्ञांचे अभिप्राय इत्यादी अनंत पाय-या चढून गेल्यानंतर कुठे त्यातून सर्वमान्य असा कांही निष्कर्ष काढला जातो. विविध उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा, चांगली वाचनालये आणि भरपूर साधनसामुग्री यांचे पाठबळ असतांनासुध्दा हा प्रवास किती अवघड व खडतर असतो हे मी जवळून पाहिले आहे. इतक्या लोकांना कमालीच्या चिकाटीने आणि निष्ठेने जीव तोडून रात्रंदिवस काम करतांना पाहूनसुध्दा माझ्या माहितीतल्या एकाद्या प्रयोगशाळेत एकादा जगप्रसिध्द शोध लागलेला पाहण्याचे भाग्य कांही मला कधी लाभले नाही.

चारपांचशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये शास्त्रीय संशोधन करणा-या शास्त्रज्ञांकडे फारशी साधनसामुग्री नसायची. जनतेचा पाठिंबा तर त्यांना मिळतच नव्हता, उलट अनेक वेळा विरोधच होत असे. त्यात कित्येकांच्या जिवावरदेखिल बेतले होते. अपमान, उपेक्षा, प्रसंगी छळ सहन करून आणि कळ काढून त्या लोकांनी जगाला थक्क करून सोडणारे शोध कसे लावले याच्या गौरवगाथा वाचायला मिळतात. त्या वेळी आपल्या देशात पूर्वीच्या काळात काय घडत असेल हा विचार ही मनात येतो. आपल्या सहिष्णु समाजाने कोणा शास्त्रज्ञाचा छळ केला नसेल, त्या विद्वानांना साजेसे आदराचे स्थानसुध्दा समाजात मिळत असेल. अशा चांगल्या वातावरणात त्यांना आपले संशोधनकार्य करायला अधिक वाव मिळावा अशी अपेक्षा आहे.
यामुळे त्या शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा वाटते. त्यांनी नेमके काय कार्य केले, म्हणजे कशाकशाचे निरीक्षण केले, त्यात कोणती माहिती त्यांना मिळाली, त्यांनी तिचे कसे विश्लेषण केले, त्यावरून कोणते निष्कर्ष काढले, त्यांनी प्रतिपादन केलेल्या सिध्दांतावरून कोणत्या इतर गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते, तिथून पुढे कशी प्रगती झाली असे अनंत प्रश्न मनात उठतात. त्याबद्दल
कुतूहल निर्माण होते. बहुतेक सर्व पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या बाबतीत अशा प्रकारची माहिती सुलभपणे उपलब्ध आहे. दुर्दैवाने प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांबद्दल मात्र ती सहजासहजी मिळत नाही. सगळीकडे नुसती वर्णनात्मक विधाने सापडतात, त्यातली कांही बुध्दीला पटतात, कांही तितकीशी पटत नाहीत, असे मागे एकदा मी माझ्या लिखाणात नमूद केले होते. त्यावर "तुम्ही अशी शंकाच कशी घेता? गरज असेल तर अमक्या तमक्या पुस्तकसंग्रहालयात जाऊन जुने पुराणे संस्कृत ग्रंथ वाचून पहा." अशा प्रकारचे प्रतिसाद आले. अर्थातच मला हे दिव्य करण्याची तेवढी गरज नव्हती आणि सामर्थ्यही नव्हते. मी आपला क्षमा मागून मोकळा झालो.

सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत फक्त झाडावरून सुटलेले फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीमुळे खाली पडते एवढेच सांगण्यापुरता मर्यादित नाही. गुरुत्वाकर्षणाची ही शक्ती नेमकी किती असते, ती कशाकशावर अवलंबलेली असते, त्यामुळे होणारे त्वरण, म्हणजे वाढत जाणारा वेग किती असतो, स्थिर असलेल्या, सरळ रेषेत जाणा-या किंवा घिरटी घालत असलेल्या गतिमान वस्तूंवर त्याचे काय परिणाम होतात वगैरे अनेक गोष्टी समीकरणामध्ये सूत्रबध्द करून मांडलेला तो अत्यंत महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत आहे. पृथ्वीवरील जड वस्तू आणि आकाशातील ग्रह, तारे या सर्वांना समान त-हेने लागू पडणारा तो बहुधा पहिला शास्त्रीय सिध्दांत होता. निसर्गात असे कांही नियम असतील अशी कल्पना त्यापूर्वी कोणी करू शकत नव्हते. हा सिध्दांत मांडण्यापूर्वी न्यूटनने काय काय केले, कोणकोणती माहिती गोळा केली, त्यांची सांगड कशी घातली वगैरेबद्दल मी पूर्वी विस्ताराने लिहिले आहे. यातल्या इतर कोणत्याच गोष्टींचा थांगपत्ता नसतांना हा शोध आमच्या आचार्यांनी हजार वर्षांपूर्वी लावला होता असे विधान करण्यात कांही अर्थ नाही असे मला वाटते.

"पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे ओढून घेते " अशा प्रकारचा विचार मनात येणे हे सुध्दा खरे तर कौतुकास्पद आहे. "पृथ्वी आणि वस्तू या दोघांमध्ये कोणतेही दृष्य बंधन नसतांना, त्यांना जोडणा-या कोठल्याही दोराशिवाय पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे कसे ओढत असेल?" असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. पण असामान्य बुध्दीमत्ता असलेला शास्त्रज्ञ अशी कल्पना करू शकतो. त्या विचाराला पोषक अशी
उदाहरणे त्याला मिळाली असतील. त्यामुळे त्याला विचारांती आपल्या कल्पनेची खात्री पटली असेल व त्याने असे प्रतिपादन करायला सुरुवात केली असेल. त्यामुळे अशा प्रकारचा संदर्भ जुन्या ग्रंथात सापडत असेल. पण याचा अर्थ न्यूटनने केले सर्व विवेचन त्या विद्वानाने केले होते असा होत नाही. निव्वळ विचार किंवा कल्पना आणि परिपक्व संशोधन यात खूप मोठे अंतर असते. त्यातले निष्कर्ष इतर विद्वानांनी मान्य करून ते इतरांना सांगायला लागल्यानंतरच मूळ संशोधकाला त्याचे श्रेय मिळते असा विज्ञानाच्या जगातला पायंडा आहे. हे एक उदाहरण माझ्या माहितीतले आहे त्यामुळे सहज माझ्या लक्षात आले. इतर शास्त्रज्ञांबद्दल केलेली विधानेसुध्दा अशीच अवास्तव वाटतात.
. . . . . . . . . . . . . .. . . . . . (क्रमशः)

No comments: